Home LATEST NEWS ताजी बातमी बिरबल कोण होते? त्यांचा दुर्दैवी शेवट कसा झाला? वाचा बिरबलाच्या आयुष्याची गोष्ट

बिरबल कोण होते? त्यांचा दुर्दैवी शेवट कसा झाला? वाचा बिरबलाच्या आयुष्याची गोष्ट

13
0

Source :- BBC INDIA NEWS

अकबराच्या नवरत्नांपैकी एक राजा बिरबल

फोटो स्रोत, Juggernaut

अकबर बादशाहाबद्दल म्हटलं जातं की, त्यांच्या दरबारात देशातील सर्वात योग्यतेच्या लोकांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं. यात कवी, विद्वान, तत्वज्ञानी, कलाकार, संगीतकार, सेनापती आणि प्रशासक यांचा समावेश होता.

नंतर हे लोक अकबराच्या दरबारातील ‘नवरत्न’ म्हणून ओळखले जाऊ लागले. याच नवरत्नांपैकी एक होते बिरबल.

बादशाह अकबर आणि बिरबल यांच्या मैत्रीचे, तसंच बिरबलाच्या हजरजबाबीपणाचे किस्से आजदेखील भारतीय लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत.

भारताच्या इतिहासात असे फार थोडे लोक आढळतात, जे लोकांमध्ये इतके लोकप्रिय आहेत, मात्र असं असूनही त्यांच्या आयुष्याबद्दल लोकांना फारच कमी माहिती आहे.

बादशाह अकबर यांना बिरबलाला नेहमीच त्यांच्यासोबत ठेवायचं होतं.

इरा मुखौटी यांनी ‘अकबर : द ग्रेट मुघल’ हे बादशाह अकबर यांचं चरित्र लिहिलं आहे. त्या लिहितात, “अकबर जेव्हा फतेहपूर सिक्री बांधत होते, तेव्हा त्यांनी यात बिरबलासाठी एक महाल बनवण्याचा आदेश दिला होता. जानेवारी, 1583 मध्ये हा महाल बांधून तयार झाल्यावर बादशाह अकबर या महालाच्या उद्घाटन समारंभाला हजर होते.”

या दोघांमधील मैत्री इतकी घनिष्ठ होती की मुघल साम्राज्य लयाला गेल्यानंतर कित्येक वर्षांनी अजूनही अकबर आणि बिरबल यांचे किस्से मोठ्या आवडीनं सांगितले जातात.

इरा म्हणतात, “हे किस्से सांगताना नेहमी बादशाहाची थट्टा केली जाते आणि बिरबलाला त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान दाखवलं जातं. हे किस्से सत्य घटनांवर आधारित आहेत, याचे फारसे पुरावे नाहीत. मात्र या कोणतीही शंका नाही की अकबराला विनोद आणि हजरजबाबीपणा आवडायचा.”

बिरबलचं खरं नाव

एम. एच. आझाद यांनी ‘दरबार-ए-अकबरी’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, “राजा बिरबल यांचं नाव अकबराशी त्याच प्रकारे जोडलेलं आहे, ज्याप्रकारे ॲरिस्टॉटलचं नाव अलेक्झांडर द ग्रेटशी जोडलेलं आहे. बिरबलाच्या आठवणी भारतीय लोकांना मनात खोलवर रुजलेल्या आहेत.”

“बिरबलाच्या खऱ्या नावात राजा नव्हतं, तसंच बिरबलदेखील नव्हतं. मात्र यामुळे काहीही फरक पडत नाही. हे नाव त्यांना एक पदवी म्हणून देण्यात आलं होतं. त्यामुळे लोक त्यांचं खरं नाव विसरले होते.”

अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबलशी मुघल बादशाहाबरोबरच्या मैत्रीची कहाणी

फोटो स्रोत, Aleph

बिरबल यांच्याबद्दल म्हटलं जातं की ते 1556 मध्येच अकबराच्या दरबारात आले होते. त्यावेळेस त्यांचं वय 28 वर्षे होतं. ते बादशाह अकबर यांच्यापेक्षा वयानं 14 वर्षे मोठे होते.

बिरबल यांच्या खऱ्या नावाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. अकबराच्या काळातील इतिहासकार अब्दुल कादिर बदायूंनी यांच्या मते बिरबल यांचं खरं नाव गदई ब्रह्मदास होतं. मात्र जॉर्ज ग्रियरसन यांच्या मते बिरबल यांचं खरं नाव महेश दास होतं.

‘दरबार-ए-अकबरी’चे लेखक एम एच आझाददेखील या गोष्टीची पुष्टी करतात. एच ब्लॉकमॅन यांनीदेखील ‘आईन-ए-अकबरी’च्या अनुवादातदेखील याच नावाचा वापर केला आहे.

अलाहाबादच्या (आताचं प्रयागराज) किल्ल्यातील अशोक स्तभांवरदेखील नंतर कोरलेल्या वर्णनात बिरबल यांचं खरं नाव महेश दास आणि त्यांच्या वडिलांचं नाव गंगा दास म्हटलं आहे.

अकबराच्या दरबारात बिरबल कसे आले?

बिरबल बादशाह अकबराच्या दरबारात 24 वर्षे होते. हा त्यांच्या कार्यकाळाच्या जवळपास निम्मा कालावधी होता. बादशाह अकबर यांच्या दरबारात येण्याआधी बिरबल यांनी इतर अनेक राजांच्या दरबारात दरबारी कवी म्हणून काम केलं होतं.

बदायूंनी यांच्यानुसार, बिरबल रीवाचे राजा राम चंद्र यांच्याकडे होते. बिरबल बादशाह अकबराच्या दरबारात येण्यासंदर्भातदेखील इतिहासकारांनी वेगवेगळे तपशील दिले आहेत.

काही इतिहासकारांनुसार, अकबर आणि बिरबल यांची अचानक भेट झाली होती. अकबर बिरबल यांच्या चातुर्यानं प्रभावित झाले आणि त्यांनी बिरबल यांना स्वत:च्या दरबारात बोलावलं.

अलाहाबाद (प्रयागराज) च्या किल्ल्यातील अशोक स्तंभ

फोटो स्रोत, UP Tourism

इतर काही इतिहासकारांनुसार, आमेरचे राजा भगवान दास यांच्या दरबारात बिरबल होते. त्यांनी भेट म्हणून बिरबल यांना अकबराच्या दरबारात पाठवलं होतं.

अकबराच्या आणखी एका चरित्रकारानुसार, बिरबल यांना अकबराच्या दरबारात तोडरमल यांनी आणलं होतं.

डॉक्टर आर पी त्रिपाठी यांनी ‘पार्टीज अँड पॉलिटिक्स इन मुघल कोर्ट’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, “तानसेनप्रमाणेच बिरबल आधी रीवाचे राजा राम चंद्र यांच्या दरबारात काम करत होते. नंतर अकबरानं त्यांना स्वत:च्या दरबारात बोलावलं होतं.”

बदायूंनी यांना वाटतं की बिरबल स्वत:च अकबराच्या दरबारात आले होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि चतुर संवादानं प्रभावित होऊन अकबरानं त्यांना दरबारात ठेवून घेतलं होतं.

अकबराच्या प्रशासनातील बिरबल यांची भूमिका

बिरबल यांच्या भूमिकेबद्दल लिहिताना जे एम शेलत त्यांच्या ‘अकबर’ या पुस्तकात लिहितात, “इबादतखान्यात धार्मिक मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये अकबरानं कट्टरतावाद्यांच्या विरोधात बिरबलाच्या हजरजबाबीपणाचं आणि वक्तृत्वाचा उत्तम वापर केला होता.”

शेलत लिहितात, “वैष्णव धर्म आणि सूर्य पुजेत श्रद्धा असणाऱ्या बिरबलाचा अकबरावर इतका प्रभाव होता की तेदेखील सूर्य आणि अग्निचं महत्त्व मानण्यास तयार झाले होते.”

एम एल रॉयचौधरी यांनी ‘दीन-ए-इलाही’मध्ये इबादतखान्याचं वर्णन करताना लिहिलं आहे, “अकबराच्या दरबारात बिरबल यांचं आसन ईशान्येला असायचं. तर फैजी दरबारात वायव्येला बसत असत. अबुल फजल आग्नेय दिशेला बसत असत.”

अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबलशी मुघल बादशाहाबरोबरच्या मैत्रीची कहाणी

फोटो स्रोत, Aleph

बांबर गॅसक्वाएन यांनी ‘द ग्रेट मुघल्स’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, “बिरबल यांनी बादशाह अकबराला हिंदू धर्म समजून घेण्यात खूप मदत केली. बिरबल यांनी स्वत:देखील इस्लाम आणि इतर धर्मांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.”

“दोन वेगवेगळ्या धर्मात विभागल्या गेलेल्या समाजात अकबर आणि बिरबल असं साम्य शोधण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे लोक जवळ येतील आणि सौहार्दानं राहतील.”

प्रशासकीय बाबींमध्येदेखील बिरबल निपुण होते. अबुल फजल यांच्याप्रमाणे मंत्रीपद नसतानादेखील बिरबल मंत्र्यांचं काम करायचे.

आजच्या भाषेत त्यांची तुलना बिन खात्याच्या मंत्र्याशी केली जाऊ शकते. त्यांना 1577 मध्ये मथुरेत ब्राह्मणांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठवण्यात आलं होतं.

त्यांना ‘मदद-ए-माश’च्या संचालनासाठी 1578 मध्ये जालंधरला पाठवण्यात आलं होतं. त्यांना गुराढोरांची किंमत आणि विक्रीवर नियंत्रण ठेवणाऱ्या मजलिसचा सदस्यदेखील करण्यात आलं होतं.

लष्करी मोहिमांमधील बिरबलचा सहभाग

एक मुत्सद्दी म्हणून बिरबलाचं मुख्य काम अकबर आणि इतर हिंदू राजांमध्ये एक दुवा म्हणून काम करण्याचं होतं.

बिरबलानं 1568 मध्ये हस्तक्षेप केल्यानंतरच राजा राम चंद्राचा प्रदेश मुघल साम्राज्याला जोडण्याचा विचार सोडून देण्यात आला होता.

अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबलशी मुघल बादशाहाबरोबरच्या मैत्रीची कहाणी

फोटो स्रोत, Robinson

बिरबल यांच्याकडे राजपूत राजे मुघल दरबारातील त्यांच्या रक्षकाच्या दृष्टीकोनातून पाहत असत. बिरबल फक्त हिंदू आणि मुस्लिम उच्चभ्रूं, सरादारांमध्येच लोकप्रिय नव्हते. तर बादशाहाबरोबरच्या त्यांच्या जवळच्या संबंधांमुळे लोकांना त्यांची भीतीदेखील वाटायची.

अकबराच्या दरबारातील बिरबलाचं महत्त्व किती होतं, याचा अंदाज या गोष्टीवरून बांधला जाऊ शकतो की बादशाह अकबर त्यांच्या लष्करी मोहिमांमध्येदेखील बिरबलाला सोबत घेऊन जात असत. सर्वात आधी त्यांना पंजाबच्या अशांत प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाठवण्यात आलं.

त्यानंतर कांगडा मोहिमेतील त्यांच्या भूमिकेनंतर बादशाह अकबरानं 1572 मध्ये त्यांना नागरकोटची जहागिरदारी दिली होती. त्यानंतर गुजरात आणि बिहारमधील मोहिमेतदेखील ते बादशाह अकबरासोबत होते.

बिरबलावर कधीच रागावले नाहीत बादशाह अकबर

बिरबल ब्रज भाषेतील चांगले कवीदेखील होते. अकबरानं त्यांना ‘कवी राय’ ही पदवी देऊन सन्मानित केलं होतं.

इरा मुखौटी यांनी लिहिलं आहे, “बिरबलाच्या रुपात अकबराला एक बुद्धिमान आणि चांगली समज असणारा व्यक्ती मिळाला होता. बिरबल पूर्णपणे बादशाह अकबर यांच्याशी कटिबद्ध होते. बिरबलाचं वक्तृत्व, उदारपणा आणि काव्य प्रतिभेचं गुण यामुळे बिरबल एक आदर्श मुघल दरबारी बनले होते.”

अकबर आणि बिरबल यांच्या अत्यंत जवळच्या संबंधांचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे बिरबल यांच्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत बादशाह अकबर त्यांच्यावर कधीही नाराज झाले नाहीत की रागावले नाहीत.

बादशाह अकबर

फोटो स्रोत, Getty Images

अकबराच्या इतर जवळच्या दरबारींना कधीतरी बादशाहाच्या रागाला तोंड द्यावं लागलं होतं.

अन्टोनियो डे मॉन्सेरेट यांनीदेखील लिहिलं आहे, “सरकारी कामात चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची अकबरानं कधीही गय केली नाही. फक्त तीन दरबाऱ्यांवर अकबर कधीच रागावले नाहीत. ते म्हणजे कवी फैजी, संगीतकार तानसेन आणि बिरबल.”

कधीही बिरबलाच्या बाजूचे नसलेल्या बंदायूनी यांनीदेखील लिहिलं आहे, “अकबराचं बोलून बिरबलानं पाहता पाहता सर्व वातावरण त्यांच्या बाजूनं करून घेतलं. त्यांचं फक्त पदच वाढत गेलं नाही तर ते बादशाहाचे विश्वासूदेखील होत गेले. काही दिवसांमध्ये अशी वेळ आली की तुझं मांस, माझं मांस आणि तुझं रक्त, माझं रक्त यासारखी परिस्थिती निर्माण झाली.”

म्हणजे दोघांमध्ये घनिष्ठ नातं तयार झालं.

फक्त एकदाच बिरबल थोडेसे अडचणीत सापडल्यासारखे दिसले. बदायूंनी यांनी ‘मुंतखब-उत-तवारीख’ या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, “एकदा अकबरानं फतेहपूर सिक्रीतील वेश्यांना बोलावून विचारलं की त्यांच्या दरबारातील असे कोण लोक आहेत जे त्यांच्याकडे येऊन त्यांना भरीला घालतात, किंवा त्यांना फूस लावतात.”

“वेश्यांनी दिलेल्या यादीत बिरबलाचं नावदेखील होतं. बिरबलाला जेव्हा हे माहित झालं, तेव्हा त्यांनी दरबारात त्यांचे प्राण अर्पण करण्याची तयारी दर्शविली. मात्र अकबरानं त्यांना शिक्षा देणं दूरच राहिलं, त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न केले.”

अकबर आणि बिरबलामधील घनिष्ठ नातं

अकबराच्या सर्वात जवळचे सल्लागार असूनदेखील बिरबलाची गणना चमचेगिरी करणाऱ्यांमध्ये होत नव्हती.

बदायूंनी यांना वाटत होतं की ‘अबुल फजल अकबराचे सर्वात मोठे चमचे होते’, मात्र बिरबलाची निष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल बदायूंनीसह कोणत्याही इतिहासकारानं प्रश्नही उपस्थित केले नाहीत आणि कोणतीही शंका व्यक्त केली नाही.

अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबलशी मुघल बादशाहाबरोबरच्या मैत्रीची कहाणी

फोटो स्रोत, Publication Division AMU

निष्ठा आणि कटिबद्धतेच्या बाबतीत ते मान सिंह, रहीम आणि मिर्झा अजीज यांच्यापेक्षा अधिक चांगले ठरले. अकबर आणि बिरबल यांच्यामधील जवळच्या संबंधांचा अंदाज या गोष्टीवरून देखील लावला जाऊ शकतो की अकबर 4 वेळा बिरबलाच्या खासगी निवासस्थानी गेले. इतर दरबाऱ्यांकडेदेखील अकबर गेले. मात्र दोनपेक्षा अधिक वेळा नाही.

अकबर, 1574 मध्ये अलाहाबादला (आताचं प्रयागराज) जात असताना अकबरपूरमध्ये पहिल्यांदा बिरबलाच्या निवासस्थानी थांबले. अबुल फजल यांनी या प्रवासाचा उल्लेख त्यांच्या ‘अकबरनामा’ या पुस्तकात केला आहे.

अकबरानं वाचवला बिरबलाचा जीव

फतेहपूर सिक्रीमध्ये 1583 मध्ये झालेल्या एक घटनेनं देखील सिद्ध केलं की अकबर आणि बिरबल यांचे संबंध किती जवळचे आहेत.

अमिता सरीन यांनी ‘अकबर अँड बिरबल, टेल्स ऑफ विट अँड विस्डम’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, “अकबर आणि त्यांचे दरबारी एका मैदानात हत्तींची लढाई पाहत होते. अकबर घोड्यावर बसलेले होते. लढाईदरम्यान अचानक हिंसक स्वभावाच्या एका हत्तीनं बिरबलावर हल्ला चढवला.”

अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबलशी मुघल बादशाहाबरोबरच्या मैत्रीची कहाणी

फोटो स्रोत, Atlantic Publishers

“अकबरानं जेव्हा हे पाहिलं की बिरबलाचा जीव धोक्यात आहेत, तेव्हा त्यांनी त्यांच्या घोड्याला पळवून बिरबल आणि हत्तीच्या मध्ये आणलं. अकबरानं शाही अंदाजात हत्तीला थांबवण्याचा आदेश दिला. अकबराचा प्रभावी, रुबाबदार आवाज ऐकून हत्ती तिथेच थांबला.”

त्याचप्रमाणे एका पोलो सामन्याच्या वेळेस बिरबल घोड्यावरून पडले. पार्वती शर्मा यांनी त्यांच्या ‘अकबर ऑफ हिंदुस्तान’मध्ये लिहिलं आहे, “बिरबल बेशुद्ध पडल्यावर अकबरानं पळत जाऊन त्यांच्या तोंडानं बिरबलाच्या तोंडात श्वास भरला होता.”

पश्तून मोहिमेत बिरबलाचा मृत्यू

बादशाह अकबरानं 1586 मध्ये स्वात आणि बाजौड प्रदेशात पश्तून युसूफझाई लोकांचं बंड मोडून काढण्यासाठी जैन खां कोका आणि बिरबल यांना पाठवलं.

राजा बिरबल

फोटो स्रोत, Victoria & Albert Museum

अबुल फजल यांनादेखील या मोहिमेचं नेतृत्व करायचं होतं. अकबरानं दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून बिरबलाची निवड केली. मात्र 16 फेब्रुवारी, 1586 ला मुघलांच्या सैन्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांचे 8 हजार सैनिक मारले गेले. त्यात बिरबलाचाही समावेश होता.

बदांयूनी लिहितात, “अफगाणांनी मलंदराई खिंडीजवळच्या उंच भागांवर चढून मुघलांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांसाठी मुघल सैनिक एका वाटीतील माशांप्रमाणे होते. त्यांनी मुघल सैन्यावर बाण आणि दगडांनी हल्ला केला.”

शोकाकूल अकबर

इरा मुखौटी लिहितात, “अकबरापर्यंत ही बातमी पोहोचल्यावर ते अत्यंत शोकाकूल झाले. पुढील दोन दिवस आणि रात्री त्यांनी काहीही खाल्लं नाही, पाणीदेखील प्यायले नाहीत. त्यांनी तूरानच्या दूताला भेटण्यास नकार दिला. ते लोकांना दर्शन देण्यासाठी झरोक्याच्या खिडकीत देखील आले नाहीत.”

अबुल फजल यांनी ‘अकबरनामा’मध्ये लिहिलं आहे, “अकबरानं कोणत्याही गोष्टीत रस घेणं बंद केलं. त्यांची आई हमीदा बानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विनंतीवरून बादशाह अकबरानं पुन्हा नेहमीचं आयुष्य जगण्यास सुरुवात केली. ते मला म्हणाले की अचानक आलेल्या या संकटामुळे त्यांना धक्का बसला आहे.”

अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबलशी मुघल बादशाहाबरोबरच्या मैत्रीची कहाणी

फोटो स्रोत, Rekhta Books

अकबराच्या मन:स्थितीचं वर्णन करताना बदांयूनी यांनीदेखील लिहिलं, “अकबराला बिरबलाच्या मृत्यूंचं जितकं दु:ख झालं होतं, तितकं दु:ख त्यांच्या कोणत्याही अमीराच्या मृत्यूचं झालं नव्हतं. ते त्यांचे सेनापती जैन खां आणि अबुल फजल यांच्यावर इतके रागावलेले होते की त्यांनी त्यांना आदेश दिला की त्यांनी तोंड दाखवू नये.”

“त्यांना या गोष्टीची देखील खंत होती की त्यांचे सैनिक बिरबलाचा मृतदेहदेखील त्यांच्यापर्यंत आणू शकले नाहीत. जेणेकरून त्यांच्यावर योग्यप्रकारे अंत्यसंस्कार करता आले असते.”

बादशाह अकबर इतके रागावलेले होते की ते स्वत: काबूलला जाऊन बिरबलाचा मृतदेह आणणार होते. मात्र दरबारींनी त्यांना समजावलं की त्यांच्या मित्राच्या अवशेषांना पवित्र करण्यासाठी सूर्यप्रकाश पुरेसा आहे.

बिरबलाच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांच्या आत अकबरानं त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, तोडरमल यांच्या नेतृत्वाखाली स्वात आणि बाजौडवर हल्ला करण्यासाठी सैन्य पाठवलं. यावेळेस मुघल सैन्याचा विजय झाला.

बादशाह अकबरानं बिरबलाला श्रद्धांजली देत म्हटलं, “ते सर्वश्रेष्ठांमध्ये सर्वश्रेष्ठ होते. माझ्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये ते सर्वोत्तम होते. त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC