Home LATEST NEWS ताजी बातमी बानू मुश्ताक यांना इंटरनॅशनल बुकर प्राईज

बानू मुश्ताक यांना इंटरनॅशनल बुकर प्राईज

3
0

Source :- BBC INDIA NEWS

बानू मुश्ताक

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, चेरिलिन मोलान
  • Role, बीबीसी न्यूज मुंबई
  • 21 मे 2025, 07:30 IST

    अपडेटेड 43 मिनिटांपूर्वी

भारतीय लेखिका, वकील आणि कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांना ‘हार्ट लॅम्प’ या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविलेले कन्नड भाषेतील हे पहिलेच पुस्तक आहे.

हार्ट लॅम्प‘चा इंग्रजी अनुवाद दीपा भास्ती यांनी केला आहे.

या संग्रहात 1990 ते 2003 या तीन दशकांत बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या 12 लघुकथा समाविष्ट आहेत. या कथा दक्षिण भारतातील मुस्लीम महिलांचे जीवन आणि त्यांच्या संघर्षांचे चित्रण करणाऱ्या आहेत.

गीतांजल श्री यांच्या ‘रेत समाधी’ (Tomb of Sand) या पुस्तकापाठोपाठच आता मुश्ताक यांच्याही पुस्तकाला बुकरने गौरविण्यात आलं आहे.

‘रेत समाधी’चा इंग्रजी अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला होता. या पुस्तकाला 2022 इंटरनॅशनल बुकर पारितोषिक मिळालं होतं.

बानू मुश्ताक आणि दीपा भास्ती

फोटो स्रोत, Getty Images

बानू मुश्ताक यांचे लेखनसाहित्य पुस्तकप्रेमींमध्ये चांगलेच परिचित आहे; पण बुकरसारख्या आंतरराष्ट्रीय पारितोषिकामुळे त्यांचं आयुष्य आणि साहित्यिक प्रवास अधिक प्रकाशझोतात आला आहे. त्यांच्या कथा स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष दर्शवतात, ज्यामध्ये धार्मिकता आणि खोलवर रूजलेल्या पितृसत्ताक समाजामुळे आलेल्या त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं.

या आत्मजाणीवेतूनच कदाचित मुश्ताक यांना बारकाईने विचार करून साकारलेली पात्रं आणि कथानकं रेखाटण्यास मदत झाली असावी.

“साहित्यिक जगतात जेव्हा भव्यतेला महत्त्व दिलं जातं. तेव्हा हार्ट लॅम्प काठावरच्या आयुष्यांकडे, दुर्लक्षित निर्णयांकडे आणि केवळ टिकून राहण्यासाठी लागणाऱ्या ताकदीकडे लक्ष देते. हीच बानू मुश्ताक यांची ताकद आहे,” असं ‘इंडियन एक्सप्रेस‘मधील एका परीक्षणात लिहिले आहे.

मुश्ताक यांचा जन्म कर्नाटक राज्यातील एका छोट्या लहान शहरात झाला. त्यांच्या आसपास मुस्लिम वस्तीच होती. शेजारपाजारच्या इतर मुलींप्रमाणेच त्यांनीही शाळेत उर्दू भाषेतून कुराणाचे शिक्षण घेतले.

त्यांचे वडील सरकारी नोकर होते. त्यांना बानूसाठी अधिक अपेक्षा होत्या. त्यामुळेच त्यांनी बानू यांना वयाच्या आठव्या वर्षी एका कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश घेतला. तिथे शिक्षणाचे माध्यम कन्नड होते, जी कर्नाटकची राज्यभाषा होती.

दहा वर्षे पत्रकारिता केल्यानंतर बानू मुश्ताक यांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी वकीलीचा व्यवसाय स्वीकारला.

फोटो स्रोत, Getty Images

मुश्ताक यांनी कन्नड भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. काही काळानंतर हीच परकी वाटणारी भाषा त्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीची भाषा बनली.

शाळेत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या सोबतच्या अनेक मुली लग्न करून संसारात रमत असतानाच त्यांनी महाविद्यालयात जाण्याचा निर्णय घेतला.

त्यांचे लेखन प्रसिद्ध होण्यासाठी अनेक वर्षं लागली आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ सुरू असतानाच ही गोष्ट घडली.

वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या मर्जीने विवाह केला आणि त्यानंतर एका वर्षाने त्यांची पहिली लघुकथा एका स्थानिक मासिकात प्रकाशित झाली. मात्र, त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष आणि तणाव होते. याबद्दल त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे बोलले आहे.

‘व्होग’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत बानू मुश्ताक यांनी सांगितलं होतं की,”मला नेहमीच लेखिका व्हायचं होतं, पण लिहायला काहीच विषय नव्हता. कारण प्रेमविवाहानंतर मला अचानक बुरखा घालण्यास सांगण्यात आलं. मला घरातल्या कामांमध्येच स्वतःला झोकून द्यावं लागलं. वयाच्या 29 व्या वर्षी मी आई झाले आणि मला पोस्टपार्टम डिप्रेशनने ग्रासलं.”

‘द वीक’ या मासिकाला दिलेल्या दुसऱ्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांना घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त जीवन जगण्यास भाग पाडलं गेलं.

मग एका धक्कादायक घटनेमुळे त्यांची यातून सुटका झाली.

“एकदा अतिशय निराशेत मी पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा विचार केला. सुदैवाने, त्यांनी [पतीने] ते ओळखलं, मला मिठी मारली आणि माझ्याकडून माचिस हिसकावून घेतली. त्यांनी आमच्या बाळाला माझ्या पायाशी ठेवून विनवणी केली — ‘कृपया आम्हाला सोडून जाऊ नकोस,” त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

20 मे रोजी लंडनमध्ये पुरस्कार स्वीकारताना बानू मुश्ताक आणि त्यांच्या पुस्तकाच्या अनुवादक दीपा भास्ती

फोटो स्रोत, Getty Images

‘हार्ट लॅम्प’मधील त्यांच्या महिला पात्रांमध्ये हीच प्रतिकाराची आणि बंडखोरीची भावना दिसून येते.

“मुख्य प्रवाहातील भारतीय साहित्यामध्ये मुस्लिम स्त्रिया या मूकपणे दुःख सहन करणाऱ्या किंवा कोणाच्या तरी युक्तिवादातील प्रतीकं अशा रुपकांमध्येच साकारल्या जातात. पण मुश्ताक यांना हे मान्य नाही. त्यांच्या कथांमधील स्त्रिया या सहन करतात, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रकार करतात आणि वेळोवेळी प्रतिकारही करतात,” असं इंडियन एक्सप्रेसच्या पुस्तक परीक्षणात म्हटलं आहे.

मुश्ताक यांनी एका प्रसिद्ध स्थानिक टॅब्लॉइडमध्ये वार्ताहर म्हणून काम केले आणि नंतर त्या ‘बंडाया’ चळवळीशीही जोडल्या गेल्या — जी साहित्य आणि चळवळीच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक अन्यायांविरोधात लढणारी होती.

दहा वर्षांनी पत्रकारितेला रामराम ठोकून त्यांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी वकीलीचा व्यवसाय स्वीकारला.

त्यांच्या संपन्न कारकिर्दीत त्यांनी विपुल लेखन केले आहे — ज्यात सहा लघुकथासंग्रह, एक निबंधसंग्रह आणि एक कादंबरीचा समावेश आहे.

पण त्यांच्या धारदार लेखणीमुळेच त्यांना द्वेषाचा देखील सामना करावा लागला आहे.

‘द हिंदू ‘ वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत बानू मुश्ताक यांनी सांगितले की, 2000 साली जेव्हा त्यांनी महिलांना मशिदीत नमाज अदा करण्याचा हक्क असावा अशी भूमिका मांडली, तेव्हा त्यांना धमकीचे फोन येऊ लागले.

त्यांच्याविरोधात ‘फतवा’ काढण्यात आला आणि एका व्यक्तीने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या पतीने त्या व्यक्तीला अडवलं.

पण या घटनांनी मुश्ताक अजिबात डगमगल्या नाहीत. त्यांनी आपलं लिखाण प्रामाणिकपणाने सुरूच ठेवले.

“मी नेहमीच पुरुषसत्ताक धार्मिक समजुतींना आव्हान दिले आहे. हे मुद्दे अजूनही माझ्या लेखनाचा गाभा आहेत. समाज खूप बदलला आहे, पण मुख्य प्रश्न तसेच आहेत. संदर्भ बदलले आहेत; पण महिलांचे आणि वंचित समुदायांचे मूलभूत संघर्ष अजूनही सुरूच आहेत,” असे त्यांनी ‘द वीक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या लेखनप्रवासात बानू मुश्ताक यांना अनेक महत्त्वाच्या स्थानिक आणि राष्ट्रीय पारितोषिकांनी गौरविण्यात आलं आहे— त्यामध्ये कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार आणि दान चिंतामणी अत्तिमब्बे पुरस्कार यांचा समावेश आहे.

2024 मध्ये त्यांच्या 1990 ते 2012 दरम्यान प्रकाशित झालेल्या ‘हसीना अ‍ॅन्ड अदर स्टोरीज’ या पाच लघुकथासंग्रहांच्या इंग्रजी अनुवादित संकलनाला पेन ट्रान्सलेशन पुरस्कार मिळाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC