Home LATEST NEWS ताजी बातमी बाई आणि बाटलीच्या नादात देशाची रहस्य शत्रूराष्ट्राला विकणारा अमेरिकन डबल एजंट कोण...

बाई आणि बाटलीच्या नादात देशाची रहस्य शत्रूराष्ट्राला विकणारा अमेरिकन डबल एजंट कोण होता?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

बाई आणि बाटलीच्या नादात देशाची रहस्य शत्रूराष्ट्राला विकणारा अमेरिकन डबल एजंट एल्ड्रिच एम्स

फोटो स्रोत, Getty Images

एल्ड्रिच एम्स तब्बल 10 वर्ष अमेरिकेची गुप्त माहिती सोव्हियत रशियाला पुरवत राहिला. यादरम्यान अमेरिकन गुप्तचर संघटनेच्या (सीआयए) 100 पेक्षा जास्त गुप्त मोहिमा त्याने रशियाकडे उघड केल्या. एल्ड्रिच एम्सच्या या दगाफटक्यामुळे किमान 10 पाश्चात्य गुप्तहेर पकडले जाऊन त्यांची हत्या करण्यात आली.

28 एप्रिल 1994 रोजी अखेर हा डबल एजंट पकडला गेला आणि त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली. त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एल्ड्रिच एम्समुळे पकडल्या गेलेल्या एका ब्रिटिश गुप्तहेरासोबत बीबीसीने संवाद साधला‌‌.

नशिब चांगलं असल्यामुळे हा गुप्तहेर सोव्हियत रशियाच्या तावडीतून सुटला आणि त्याचा जीव वाचला. त्याच्याशी झालेल्या संवादातून एल्ड्रिच एम्सच्या दुष्कृत्यांचा बीबीसीने घेतलेला हा आढावा.

सालं होतं 1985. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएसाठी काम करणारे सोव्हियत एजंट्स अचानक एकामागोमाग एक गायब व्हायला सुरुवात झाली. अमेरिका आणि अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या पाश्चात्य देशांच्या गुप्तहेरांचा सुगावा सोव्हियत रशियाची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या केजीबीला लागला.

या सगळ्या गुप्तहेरांना पकडून केजीबीकडून त्यांची चौकशी झाली आणि नंतर त्यातील बहुतांश गुप्तहेरांंची रशियात हत्या करण्यात आली. हे सगळेच पाश्चात्य देशांसाठी काम करणारे डबल एजंट होते. शीतयुद्ध सुरू असताना शत्रूराष्ट्र असलेल्या सोव्हियत रशियात घुसखोरी करून त्यांचा विश्वास संपादन करत रशियाची गुप्त संवेदनशील माहिती अमेरिकेला पोहचवण्याचं काम हे डबल एजंट करत होते.

ओलेग गोर्डिव्हस्की हा ब्रिटनच्या गुप्तहेर यंत्रणेसाठी काम करणारा असाच एक डबल एजंट होता. लंडनमधील केजीबीचा स्टेशन प्रमुख म्हणून तो नोकरी करत असला तरी प्रत्यक्षात डबल एजंट बनून तो ब्रिटनची परराष्ट्र गुप्तहेर यंत्रणा असलेल्या एम आय 6 साठी अनेक वर्ष पडद्याआड काम करत होता.

रशियाचा विश्वास संपादन करून अनेक वर्ष त्यांच्याकडे नोकरी करत सोव्हियत रशियाची संवेदनशील माहिती ब्रिटनला त्याने अनेक वर्षे पुरवली. पण अचानक एके दिवशी त्याला कळालं की, आपण मॉस्कोमध्ये आहोत. त्याला गुंगीचं औषध पाजण्यात आलं होतं आणि तो आता बेड्यांमध्ये होता.

आपला भांडाफोड झालेला आहे आणि आपण पकडले गेलेलो आहोत, याची जाणीव त्याला शुद्ध आल्यावर झाली. यानंतर पाच तास रशियन अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली. लवकरच तो मारला जाणार हे आता जवळपास नक्की होतं‌. पण एम आय 6 नं एक सुटकेची मोहीम आखून कारच्या डिक्कीत त्याला लपवून रशियाच्या तावडीतून बाहेर काढलं आणि ओलेग गोर्डिव्हस्की जीवानिशी वाचला.

मायदेशी सुखरूप परतल्यानंतर आपण डबल एजंट असल्याच्या रहस्याचा भांडाफोड रशियाकडे नेमका कोणी केला, हे शोधण्याचा ओलेग गोर्डिव्हस्कीनं बराच प्रयत्न केला. तो डबल एजंट आहे हे फक्त त्याच्या काही निकटच्या सहकाऱ्यांनाच माहित होतं‌. म्हणजे कोणीतरी त्याच्या जवळच्याच व्यक्तीनं दगाफटका केलेला होता.

“मी तब्बल 9 वर्ष तो सहकारी कोण आहे, याचं उत्तर शोधत राहिलो. पण मला काही याचं उत्तर मिळालं नाही,” असं बीबीसीचे पत्रकार टॉम मॅनगोल्ड यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलताना फेब्रुवारी 1994 ला ओलेग गोर्डिव्हस्की म्हणाले.

मात्र यानंतर दोनच महिन्यात त्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं जेव्हा सीआयएचे वरिष्ठ अधिकारी एल्ड्रिच एम्स यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अमेरिकन न्यायालयात हजर करण्यात आलं.

“अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या रशियात कार्यरत मला माहित असलेल्या जवळपास सगळ्याच गुप्तहेरांचा मी रशियाकडे भांडाफोड केला,” अशी स्पष्ट कबुली एम्सने न्यायालयात दिली.

एल्ड्रिच एम्सनं आपलं महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केलं नव्हतं‌. मात्र वडिलांच्या वशिल्यामुळे त्याला सीआयएमध्ये नोकरी मिळाली.

फोटो स्रोत, Alamy

28 एप्रिल 1994 रोजी एम्सने हे मान्य केलं की, 30 पेक्षा जास्त पाश्चात्य गुप्तहेरांची ओळख त्याने रशिया जवळ उघड केली होती. तसेच 100 पेक्षा जास्त गुप्त मोहिमांची माहिती देखील रशियाला त्याने पुरवली‌. केजीबीने त्याला कोलोकोल असं गुप्त नाव दिलं होतं. या रशियन शब्दाचा मराठीत धोक्याची घंटा असा अर्थ होतो.

एम्सच्या या दगाबाजीमुळे सीआयएचे किमान 10 गुप्तहेर मारले गेले. यात सोव्हियत लष्कराच्या गुप्तहेर संस्थेत वरिष्ठ पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या दिमित्री पोलयाकोव्हचाही समावेश होता. दिमित्री पोलयाकोव्ह हाही डबल एजंट होता.

सोव्हियत लष्करात काम करत असताना तो प्रत्यक्षात अमेरिकेसाठी गुप्त माहिती गोळा करत होता. जवळपास 20 वर्ष रशियन लष्कराविषयीची मौल्यवान गुप्त माहिती अमेरिकेला पोहचवण्याची महत्वाची जबाबदारी त्याने यथासांग पार पाडली. शीतयुद्धादरम्यान रशियाला शह देण्यासाठी आपले असे अनेक गुप्तहेर सीआयएनं केजीबीमध्ये पेरले होते.

दिमित्री त्यापैकीच एक होता. यावेळी एल्ड्रिच एम्सच्या रूपात केजीबीनं सीआयएचा डबल एजंटचा डाव सीआयएवरच उलटवून मोठी चाल खेळली. शीतयुद्धातील अमेरिका आणि रशिया दरम्यान चाललेल्या कुरघोडीत केजीबीनं मिळवलेला हा मोठा विजय होता.

अमेरिका ज्याला आपला अत्यंत विश्वासू गुप्तहेर समजत होती त्यालाच फूस लावून आपल्यासाठी काम करायला लावण्यात रशियाने यश मिळवलं होतं.

“याआधी 1960 च्या दशकात किम फिलबाय हा ब्रिटनचा गुप्तहेर प्रत्यक्षात रशियाने पेरलेला डबल एजंट होता, हे कळाल्यानंतर ब्रिटनमध्ये एकच खळबळ माजली होती. आता अमेरिकेची बारी होती. एल्ड्रिच एम्सच्या दगाबाजीमुळे वॉशिंग्टनचं मोठं नुकसान झालं.”

“आपलाच इतका विश्वासू एजंट प्रत्यक्षात इतकी वर्षे मॉस्कोसाठी काम करत होता, यावर वॉशिंग्टनला सुरुवातीला विश्वासच बसला नाही. अमेरिकेसाठी हा फार मोठा धक्का होता,” असं 1994 साली बोलताना मॅनगोल्ड म्हणाले‌.

सोव्हियत रशियाच्या गुप्त मोहिमांचा भांडाफोड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सीआयएच्या सोव्हियत काऊंटर इंटेलिजन्स डिपार्टमेंटचं प्रमुख पद एल्ड्रिच एम्सकडे होतं. त्याच्या या पदामुळेच अमेरिका रशिया विरुद्ध राबवत असलेल्या सगळ्या गुप्त मोहिमांची आणि त्यावर काम करत असलेल्या अमेरिकन गुप्तहेरांची सगळी इत्यंभूत माहिती एम्सकडे होती.

रशिया विरोधातील शीतयुद्धात अमेरिकेचे पाश्चात्य मित्रराष्ट्र देखील अमेरिकेच्या बाजूने लढत होती. या पाश्चात्य मित्रराष्ट्रांच्या गुप्तहेर यंत्रणांसोबत सीआयएची भागीदारी होती.

उदाहरणार्थ ब्रिटनच्या एम आय 5 आणि एम आय 6 या गुप्तचर संस्थांसोबत अनेक महत्वाच्या मोहिमा सीआयएनं संयुक्तिकरित्या पार पाडल्या. सीआयए आणि मित्रराष्ट्रांच्या या गुप्तचर संस्थांदरम्यान अनेक बैठका त्यावेळी पार पडायच्या. सीआयएचा वरिष्ठ पदाधिकारी या नात्यानं एल्ड्रिच एम्सदेखील या बैठकीमध्ये हजेरी लावत असे.

या बैठकींमधून फक्त अमेरिकाच नव्हे तर ब्रिटनच्या गुप्त मोहिमा आणि गुप्तहेरांची माहिती देखील एम्सला मिळाली जी त्याने नंतर रशियाला पुरवली‌. यामुळे सीआयएबरोबरच एम आय 5 व एम आय 6 चे गुप्तहेर देखील पकडले गेले. गोर्डिव्हस्की हा ब्रिटनचा महत्वाचा गुप्तहेर देखील या बैठकांना हजेरी लावत असे.

या बैठकांमध्ये नेमकं काय चालायचं आणि ब्रिटन व अमेरिकेच्या गुप्तचर संस्था कशा एकत्रितपणे काम करायच्या, याचा अनुभव बीबीसीशी बोलताना गोर्डिव्हस्की यांनी सांगितला.

“केजीबीनं पेरलेला वरिष्ठ अमेरिकन गुप्तहेर केजीबीविरोधात काम करत असलेल्या कनिष्ठ अमेरिकन / ब्रिटिश गुप्तहेराला सूचना/आदेश देतोय, असं काहीसं मजेशीर चित्र या बैठकींमध्ये दिसून यायचं,” असं मॅनगोल्ड सांगतात.

“सीआयएसोबत चालणाऱ्या आमच्या बैठकींना मी हजर असायचो. अमेरिकन अधिकाऱ्यांची कार्यपद्धती मला आवडायची. ते अतिशय शिस्तबद्ध आणि हुशार होते. आम्ही एकमेकांसोबत गुप्त माहितीची देवाणघेवाण करायचो आणि सोबत मोहीमा राबवायचो. आता मागे वळून पाहताना आठवतंय की या बैठकींना एल्ड्रिच एम्स देखील हजर असायचा.

म्हणजे मी सांगितलेली सगळी गुप्त माहिती त्याला देखील मिळायची आणि तो ती रशियाला पुरवायचा. इतकी वर्ष आमच्यातलाच एक बनून हा केजीबीचा हस्तक आमचाच काटा काढत होता,” अशी आठवण गोर्डिव्हस्कीनं नमूद केली.

डबल एजंट बनून शत्रूराष्ट्रासाठी काम करण्याचा गुन्हा सिद्ध झालेला एल्ड्रिच एम्स हा सीआयएचा आजतागायतचा सर्वात वरिष्ठ अधिकारी आहे.

फोटो स्रोत, Getty Images

अति मद्यपान आणि घटस्फोट

गुप्तहेरांच्या जगाशी एल्ड्रिच एम्स लहानपणापासूनच परिचित होता. त्याचे वडिल सीआयएमध्ये विश्लेषक म्हणून काम करायचे. वडिलांच्या वशिल्यानेच महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडल्यानंतरही एल्ड्रिच एम्सला सीआयएमध्ये नोकरी मिळाली‌. सीआयए विरूद्ध दगाफटका करत केजीबीशी हातमिळवणी करण्याचा त्याचा निर्णय कुठल्या वैचारिक मतभेदातून नव्हे पैशांच्या गरजेतून आलेला होता.

सुरुवातीला गुप्तहेर म्हणून सीआयएमध्ये एम्सनं चांगलं काम केलं. आपल्या या कामामुळे तो वरिष्ठांच्या नजरेत देखील आला. त्याची पत्नी नॅन्सी सेजबर्थ ही सुद्धा सीआयएचीच गुप्तहेर होती. 1960 च्या दशकात हे दोघेही सीआयएसाठी तुर्कीमध्ये काम करत होते. तिथे परकीय गुप्तहेरांना रुजू करून घेण्याची जबाबदारी या दोघांना सीआयएकडून देण्यात आलेली होती. पण 1972 ला वरिष्ठांनी त्याला परत अमेरिकेत सीआयएच्या मुख्यालयात बोलवून घेतलं.

परदेशी मोहीमांवर काम करण्यासाठी तो सक्षम नाही त्यामुळे त्याला कार्यालयीन कामच दिलेलं बरं, या हेतूने त्याला परत बोलावण्यात आलं होतं. अमेरिकेत परतल्यानंतर एल्ड्रीच एम्सनं रशियन भाषेचा अभ्यास केला. रशियन भाषेत पारंगत झाल्यानंतर सोव्हियत पदाधिकाऱ्यांविरोधात मोहीमा आखण्याची जबाबदारी सीआयएनं त्याला दिली.

एल्ड्रिच एम्सचे वडिल हे मद्यपानाच्या आहारी गेलेले होते. या अतिरेकी मद्यपानामुळेच त्यांची सीआयएमधील कारकीर्द अवेळी संपुष्टात आली होती. एल्ड्रिच एम्स देखील वडिलांच्याच मार्गावर निघाला होता. अति मद्यपानामुळे त्याच्या कामावर विपरीत परिणाम होऊ लागला. 1972 साली एका गुप्तहेराला तो दारूच्या नशेत सीआयएमधील आपल्या एका महिला सहकाऱ्यासमवेत अभद्र अवस्थेत सापडला.

दारूच्या आहारी गेल्यामुळे एम्सचा कामातला हलगर्जीपणा देखील वरचेवर वाढत चालला होता. 1976 साली आपल्याकडली महत्वाची गुप्त संवेदनशील माहिती असलेली ब्रिफकेस तशीच उघड्यावर बेवारस टाकून मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरच बेशुद्ध होऊन पडलेला तो आढळून आला. या सगळ्या हलगर्जीपणामुळे त्याची सीआयएमधील कारकिर्दीच धोक्यात आली होती.

अति मद्यपानामुळे एल्ड्रिच एम्सच्या कामावर विपरीत परिणाम होऊ लागला.

फोटो स्रोत, Getty Images

आपली नोकरी वाचवण्यासाठी मग 1981 साली एम्सनं मेक्सिको सिटीतील काम स्वीकारलं. ही तुर्कीनंतर त्याची दुसरी परदेशवारी होती. पण यावेळेस तो एकटाच मेक्सिकोत कामासाठी गेला. त्याची पत्नी न्यूयॉर्कमधील घरीच राहिली. मात्र इथे सुद्धा त्याचं मद्यपान आणि कामातील हलगर्जीपणा तसाच सुरू राहिला. मेक्सिकोतील आपल्या नोकरीच्या पहिल्याच वर्षी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना त्याचा अपघात झाला.

अपघातनंतर त्याने तिथल्या स्थानिक पोलीस व नंतर मदतीला आलेल्या अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांसोबत देखील हुज्जत घातली. दारू पिऊन त्याने असंच पुन्हा एका अमेरिकन दूतावासातील एका क्यूबन अधिकाऱ्यासोबत जोरदार भांडणं करत तमाशा केला. पाणी आता डोक्यावरून वाहतंय हे लक्षात आल्यानंतर तिथल्या वरिष्ठांनी सीआयएच्या मुख्यालयाला पत्र लिहित ‘हा इथे काम करण्यास लायक नाही. याला अमेरिकेत परत बोलावून याची दारू सोडवण्यासाठी मदत पुरवा,’ अशी शिफारस केली.

या दरम्यान मद्यपानाबरोबरच एल्ड्रिच एम्सचे इतर महिलांसोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध देखील सुरू होते. अशाच एका विवाहबाह्य संबंधानं त्याच्या आयुष्याला एक निर्णायक वळण दिलं. 1982 साली मारिया डेल रोझारियो कॅसास ड्युप्ये या सीआयएमध्ये काम करणाऱ्या कोलंबियन महिलेशी एल्ड्रिच एम्सचं सूत जुळलं‌. त्यांच्यातलं प्रेम वाढलं तसं एम्सनं आपली पहिली पत्नी नॅन्सी सेजबर्थला घटस्फोट देत रोझारियोशी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. याच उद्देशानं तो रोझारियोसोबत अमेरिकेत परतला.

1983 साली अमेरिकेत परतल्यानंतर तो सीआयएच्या मुख्यालयात कामाला लागला. इथे सीआयएतील सोव्हियत रशिया विभागाचा प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती झाली. सोव्हियत रशियाविरोधात सीआयएच्या सगळ्या गुप्त मोहीमांची माहिती या विभागाचा प्रमुख या नात्यानं एल्ड्रिच एम्सकडे असायची.

घटस्फोटाच्या करारानुसार आपली पहिली पत्नी नॅन्सीला दरमहा पोटगी आणि त्यांनी घेतलेल्या जुन्या कर्जाची परतफेड द्यायला एल्ड्रिच बांधिल होता. त्यात पुन्हा त्याची नवी पत्नी रोझारियोला अनेक खर्चिक शौक होते. सतत महागड्या वस्तू खरेदी करण्याची तिची आवड आणि कोलंबियातील आपल्या कुटुंबियांसोबत सातत्यानं फोन वरुन बोलण्याची तिची सवय अत्यंत खर्चिक होती.

स्वतः एल्ड्रिच एम्सलाही मद्यपानाची तर सवय होतीच. हा सगळा खर्च आपल्या सीआयएमधील आपल्या मर्यादीत पगारात भागवणं त्याला शक्यच नव्हतं. इथूनच त्याची पैशांची चणचण सुरू झाली. अमेरिकन संसदेतील प्रतिनिधी डेनिस डेकोसिनी यांना दिलेल्या साक्षीत एल्ड्रिच म्हणाला की, “वाढता खर्च भागवण्यासाठी आणि कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मी सीआयएची गुप्त माहिती रशियाला विकायला सुरुवात केली. त्यावेळी आर्थिक तणावाला मी बळी पडलो आणि तो निर्णय घेतला. पण आज मागे वळून पाहताना माझा तो निर्णय अतातायिपणाचा होता, हे मला जाणवतंय.”

दगाबाजी आणि राष्ट्रद्रोह

“त्यानं हे सगळं पैशांसाठी केलं. त्यामागे अजून दुसरं काही कारण होतं, असं म्हणता येणार नाही,” असं एफबीआयच्या अधिकारी लेस्ली जी वायजर बीबीसीशी बोलताना म्हणाल्या. पकडलं गेल्यानंतर एल्ड्रिच एम्सची चौकशी करुन गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी एफबीआय एजंट या नात्यानं लेस्ली वायजर यांनीच पार पाडली होती.

सीआयएचं गुपित रशियाला विकून पैसे कमावण्याचा एल्ड्रिच विचार करत होता. पण राजद्रोहाइतका गंभीर गुन्हा करायची त्याची हिंमत होत नव्हती. शेवटी 16 एप्रिल 1985 रोजी दारू पिऊन त्याने हिंमत एकवटली आणि तो सरळ वॉशिंग्टन डीसीमधील रशियन दूतावासाच्या इमारतीत घुसला. तिथल्या रिसेप्शनिस्टकडे एक पाकिट त्याने सरकावलं. अमेरिकेसाठी काम करणाऱ्या रशियातील डबल एजंट्सची नावं, तो सीआयएचा अधिकृत पदाधिकारी असल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रं आणि या माहितीच्या बदल्यात 50 हजार डॉलर्सची मागणी करणारं पत्र या पाकिटात होतं.

पहिल्यांदा त्याला वाटलं होतं की आपण फक्त एकदाच हा व्यवहार करू. एकदा पैसे मिळाले आणि कर्ज फेडल्यानंतर पुन्हा जैसे थे आयुष्य सुरळीत जगू. पण लवकरच त्याला कळालं की आपण हे कृत्य करून जुन्या आयुष्याची रेघ ओलांडली आहे आणि इथून आता माघार घेणं शक्य नाही. तो आता कायमसाठी राष्ट्रद्रोही बनला होता. पूर्ववत आयुष्य जगणं त्याला आता शक्य होणार नव्हतं.

त्यामुळे सीआयएची गुपितं तो पुढची 9 वर्ष केजीबीला पुरवत राहिला आणि त्याबदल्यात पैसे लाटत राहिला. सीआयएनं कशा प्रकारे रशियावर नजर ठेवलेली आहे, याची सगळी गुपितं त्यानं एक एक करून सांगून टाकली. मॉस्कोतील रशियाच्या अवकाश संशोधन केंद्रात घुसखोरी करण्यापासून सोव्हियत महासंघाच्या आण्विक शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्रांवर देखरेख ठेवणारी अमेरिकेची छुपी यंत्रणा नेमकी कशी काम करते, याचा उलगडा करणारे सगळे पुरावे तो एक एक करून सीआयएच्या कार्यालयातून रशियन दूतावासात नेऊन पोहचवू लागला.

तो कोणाशीही नजर न चोरता बंद पाकिटात गुप्त कागदपत्रं घेऊन सरळ रशियन दूतावासात जायचा‌. तरीही कोणाला काही शंका आली नाही. कारण रशियन पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी हा त्याच्या अधिकृत कामाचाही अविभाज्य भाग होता. कामासाठीच तो रशियन दूतावासात लोकांना भेटायला जात असेल, असंच त्याच्या सहकाऱ्यांनाही वाटायचं‌.

सीआयएचं गुपित रशियाला विकून पैसे कमावण्याचा एल्ड्रिच विचार करत होता. पण राजद्रोहाइतका गंभीर गुन्हा करायची त्याची हिंमत होत नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images

“गुप्त कागदपत्रांची देवाणघेवाण करण्याची एक पद्धत त्यांनी विकसित केली होती‌‌. एल्ड्रिच एम्स ही कागदपत्रं एका ठरलेल्या ठिकाणी ठेवायचा‌. या ठिकाणाला डेड ड्रॉप्स म्हटलं जायचं‌. ही कागदपत्रंत ठेवल्यानंतर एम्स तिथल्या टपाल बॉक्सवर खडूने एक चिन्ह काढायचा‌. हे चिन्ह पाहून नवीन कागदपत्रं एम्सनं दिलेली आहेत, हे रशियन लोकांना कळायचं.

मग ती कागदपत्रं उचलून ते खडूचं चिन्ह मिटवून टाकायचे. खडूचं चिन्ह मिटवलं गेलंय याचा अर्थ आपली कागदपत्रं व्यवस्थित पोहोच झालेली आहेत, याची खातरजमा एम्सला व्हायची. अशा पद्धतीने अगदी बिनबोभाट आणि सुखरूपपणे हा सगळा देवाणघेवाणीचा व्यवहार चालत असे,” अशी माहिती लेस्ली वायजर यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

या काळात एम्सनं केजीबीला इतकी सगळी माहिती पुरवली की त्या आधारे सोव्हियत महासंघात काम करणारे जवळपास सगळेच अमेरिकन गुप्तहेर पकडले गेले. त्यामुळे सोव्हियत रशियातील अमेरिकच्या गुप्तचर मोहीमाच ठप्प झाल्या. “इतिहासात अमेरिकेचं इतकं नुकसान आणि इतक्या गुप्तहेरांचा जीव घेण्याचं काम दुसऱ्या कोणत्याच एजेंटने केलेलं मला तरी आठवत नाही. हा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला बसलेला आजवरचा सर्वात मोठा झटका होता,” अशा शब्दात वायजरने एम्सनं केलेल्या दुष्कृत्यांची तीव्रता मांडून दाखवली.

आपले इतके सगळे गुप्तहेर एकदाच पकडले जात असल्यामुळे धोक्याची घंटा सीआयएच्या डोक्यात देखील वाजली होती. कोणीतरी आपल्यातलाच एक दगाफटका करत आहे, याची जाणीव त्यावेळी सीआयएला झाली. त्याचा शोध घेण्यासाठी 1986 साली सीआयएनं अंतर्गत चौकशीसुद्धा सुरू केली. मात्र एल्ड्रिच एम्स नजर चुकवून तब्ब्ल एक दशक सीआयएला गंडा घालत राहिला. त्याच्यावर कधी शंका घेतली गेली नाही.

एल्ड्रिच एम्स नजर चुकवून तब्ब्ल एक दशक सीआयएला गंडा घालत राहिला. त्याच्यावर कधी शंका घेतली गेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या देशासोबत हा विश्वासघात केल्याचे बक्कळ पैसे एम्सला रशियाकडून मिळाले. गुप्त माहिती केजीबीला पुरवत 9 वर्षात तब्बल 25 लाख डॉलर्स त्याने आपल्या खिशात घातले. अचानक आलेली इतकी सगळी संपत्ती लपवण्याचाही एम्सने प्रयत्न केला नाही. वेतनामधून मिळणारं त्याचं उत्पन्न वर्षाला 70 हजार डॉलर्सपेक्षाही कमी असताना त्याने 5,40,000 डॉलर्सचं अलिशान घर चक्क रोख रक्कम देऊ करून विकत घेतलं. या घराच्या सजावटीसाठी पुन्हा काही हजार डॉलर्स खर्ची घातले.

इतकंच नव्हे तर अत्यंत महागडी अशी जॅगवार गाडीही विकत घेतली. शेवटी त्याचं इतकं विलासी आणि राजेशाही थाटातील जगणंच त्याच्या अंगलट आलं. साधी नोकरी करणाऱ्या नोकरदाराची ही इतकी सुखवस्तू जीवनशैली सुरक्षा यंत्रणेच्या नजरेत आली आणि 1994 साली लेस्ली वायजरच्या नेतृत्वाखालील एफबीआयच्या दलानं एल्ड्रिच एम्सला अटक केली.

अटक झाल्यानंतर एल्ड्रिच एम्सनं चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य केलं. त्याने आपल्यावरील सगळे आरोप कुठलेच आढेवेढे न घेता मान्य केले. आपण मागच्या 9 वर्षात कोणती गुपितं केजीबीला सांगितली आहेत, याची सगळी माहिती द्यायला तो तयार झाला. फक्त त्याबदल्यात आपली पत्नी रोझारियोची शिक्षा कमी करावी, अशी अट त्याने घातली. एल्ड्रिच एम्सची ही अट मान्य करण्यात आली.

अटक झाल्यानंतर एल्ड्रिच एम्सनं चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य केलं. त्याने आपल्यावरील सगळे आरोप कुठलेच आढेवेढे न घेता मान्य केले.

फोटो स्रोत, Getty Images

पाचच वर्षात तिची तुरुंगातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. रोझारियोला शिक्षा होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेत जसा राजद्रोह हा गुन्हा आहे तसा राजद्रोह होतोय हे माहिती असताना ती गोष्ट सुरक्षा यंत्रणेपासून लपवून ठेवणं, हासुद्धा तितकाच गंभीर गुन्हा आहे.

आपला पती अमेरिकेची गुपितं रशियाला विकत आहे आणि त्याबदल्यात खोऱ्याने पैसे लाटत आहे, याची पूर्ण जाणीव रोझारियोला होती. या पैशांचा तितकाच विलासी उपभोग तिने देखील घेतला होता. पतीच्या अटीमुळे रोझारियो 5 वर्षांनी तुरुंगातून बाहेर आली खरी पण एल्ड्रिच एम्सला आजन्म कारावास सुनावला गेला. आजही तो इंडियाना राज्यातील टेरे हॉट येथील तुरुंगात कैदी बनून शिक्षा भोगतो आहे.

“मात्र, आजही त्याला स्वतःच्या कृत्याचा कुठलाही पश्चात्ताप नाही. आपल्या दगाबाजीमुळे अमेरिकेचे इतके गुप्तहेर मारले गेले याबद्दल त्याला तसूभरही वाईट वाटत नाही. स्वतःबद्दल त्याला फारच आत्मविश्वास किंबहुना माज आहे. त्याला खेद असलाच तर तो आपण देशद्रोह केला याचा नव्हे तर आपण

पकडलो गेलो याचा आहे,” असं सांगत लेस्ली वायजर यांनी एल्ड्रिच एम्सच्या अहंकारी आणि तितक्याच बेमुर्तखोर वृत्तीवर बोट ठेवलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC