Source :- ZEE NEWS
अंतराळात पृथ्वीच्या बाहेर इतर ग्रहांवरही जीवसृष्टी आहे का यासंदर्भात वैज्ञानिक नेहमीच संशोधन करत असतात. यासंदर्भात अनेक दावेही करण्यात आले आहेत. मात्र नुकतंच खगोलशास्त्रज्ञांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या एका गटाला आपल्या सौर मंडळाबाहेरील (खूप दूर असलेल्या) एका ग्रहाच्या वातावरणात काहीतरी आढळलं असून, ज्याने लक्ष वेधून घेतलं आहे. हा एक संकेत असू शकतो. हा संकेत जरी ठोस नसला तरी, आपण या विश्वात एकटे नाही आहोत असं दर्शवणारा आहे. आपल्या ग्रहाबाहेर जीवसृष्टी असल्याचा पहिला पुरावा आपल्याला खरोखरच सापडला आहे का?
जेम्स वेब टेलिस्कोपच्या सहाय्याने हा शोध लावण्यात आला आहे. हा मानवाने तयार केलेला आणि आतापर्यंत अंतराळात सोडलेला सर्वात प्रगत टेलिस्कोप आहे. जर तुम्हाला माहित नसेल, तर हा टेलिस्कोप आपल्या ग्रहापासून खूप दूर आहे आणि लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या गॅलॅक्सींना कैद करण्यास सक्षम आहे.
त्याद्वारे, शास्त्रज्ञांनी K2-18b ग्रहाचे निरीक्षण केलं असता डायमिथाइल सल्फाइडचे अंश आढळले आहेत. हा रेणू पृथ्वीवर जवळजवळ केवळ सजीवांद्वारे तयार केला जातो. यामुळे आपल्या ग्रहाबाहेर जीवनाचे पहिले ठोस संकेत आपल्याला खरोखरच मिळत आहेत का, की इतर काही कारणं आहेत?
खरं तर आताच निष्कर्ष काढणे हे फार घाईचं ठरु शकतं. संशोधकांनी स्वत:च अद्याप बरंच काही काम शिल्लक असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे हा उत्साह मर्यादित ठेवणं महत्त्वाचं आहे.
K2-18b हे नेमकं काय आहे?
K2-18b हा फक्त कोणताही ग्रह नाही. नासाच्या केप्लर मोहिमेने शोधलेला हा 18 वा ग्रह होता आणि त्याच्या नावात ‘b’ असणं याचा अर्थ तो सापडलेला पहिलाच ग्रह होता.
K2-18b आकाशगंगेच्या दृष्टीने तुलनेने जवळचा आहे, परंतु तो पृथ्वीपेक्षा खूप वेगळा आहे. त्याचे वस्तुमान आपल्या ग्रहापेक्षा सुमारे आठ पट जास्त आहे आणि त्याचे आकारमान 18 पट जास्त आहे. याचा अर्थ असा की तो कदाचित आपल्यासारखा खडकाळ नाही, तर खूप दाट वातावरणाने किंवा अगदी विशाल महासागरांनी व्यापलेला आहे.
शास्त्रज्ञ अनेक अंदाज लावत आहेत. पहिलं म्हणजे आपण “मिनी-नेपच्यून” किंवा “गॅस ड्वार्फ” बद्दल बोलत आहोत. तथापि, एक कल्पना अधिक मजबूत होत चालली आहे: ती म्हणजे हा हायड्रोजन वातावरणाखाली जागतिक महासागराने व्यापलेला ग्रह असू शकतो.
पण शास्त्रज्ञांनी अद्याप याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. सध्या सर्व डेटाचा अभ्यास केला जात आहे.
SOURCE : ZEE NEWS