Home LATEST NEWS ताजी बातमी ‘पुस्तकं माझ्यासाठी चॉकलेटसारखी होती’; 20 लाख पुस्तकांची लायब्ररी साकारणाऱ्या गौडांची कहाणी

‘पुस्तकं माझ्यासाठी चॉकलेटसारखी होती’; 20 लाख पुस्तकांची लायब्ररी साकारणाऱ्या गौडांची कहाणी

8
0

Source :- BBC INDIA NEWS

79 वर्षांच्या गौडांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.

फोटो स्रोत, Alphonse Vimulraj

तुम्ही एकाच वेळी किती पुस्तकं एकत्र पाहिली आहेत? लायब्ररीमध्ये का असेना? पण जास्तीत जास्त किती पुस्तकं? पाच हजार? दहा हजार? एक लाख?

कर्नाटकमध्ये एका अवलियाने एक दोन लाख नाही तर चक्क 20 लाख पुस्तकांचा संग्रह केला आहे. आणि हा संग्रह सर्वांसाठी खुला आहे. ज्या व्यक्तीलाही पुस्तकं हवी आहेत, त्यांनी तिथे बिंधास्त यावे आणि आपल्या आवडीचं पुस्तक घ्यावं आणि वाचावं. आणि याच कामासाठी या ग्रंथवेड्या व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हे ग्रंथालय नेमकं कुठे आहे? त्यांनी ही पुस्तकं कशी जमवली, यातून कुणाला काय फायदा झाला याची ही गोष्ट.

अंके गौडा या अवलियानं गेल्या पाच दशकांमध्ये हीच संपत्ती कमावलेली आहे. ते कर्नाटकमधील एका साखर कारखान्यातील सेवेतून निवृत्त झाले आहेत. नुकताच 79 वर्षांच्या गौडांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ते बातम्यांच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. साक्षरता आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे.

गौडा यांच्याकडे असलेल्या या जवळपास वीस लाख पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकांचाही समावेश आहे. त्यामध्ये बायबलची एक दुर्मिळ आवृत्तीदेखील आहे.

इतकंच नाही, तर तुम्ही कुठलाही विषय सांगितलात तरी त्या विषयावर तुम्हाला त्यांच्या लायब्ररीत पुस्तक हमखास मिळेलच, इतकी विविधता त्यांच्या संग्रहात आहे.

ते एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. ते सांगतात की त्यांच्या घरी पुस्तकं विकत घेणं हीच खरं तर एक चैनीची गोष्ट मानली जायची.

बीबीसीशी बोलताना गौडा म्हणाले की, “माझी जडणघडण गावातच झाली. आम्हाला शिकण्यासाठीही पुस्तकं मिळायची नाहीत. त्यामुळेच, माझ्या मनात पुस्तकांबद्दल नेहमीच एक कुतूहल असायचं.”

“मला नेहमीच असं वाटायचं की, मला वाचायला हवं. खूप सारी पुस्तकं जमवायला हवीत आणि ज्ञान मिळवायला हवं.”

‘पुस्तकं जणू चॉकलेटसारखीच होती’

गौडा यांची ही लायब्ररी कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा नावाच्या एका छोट्याशा शहरात आहे.

या लायब्ररीमध्ये कुणीही ग्रंथपाल नाहीये. त्यांची ही पुस्तकं कपाटात ठेवलेली आहेत. त्यातली बरीचशी जमिनीवरच एकावर एक रचून ठेवली आहेत तर काही अशीच इकडे-तिकडे विखुरलेली आहेत.

बाहेर, ग्रंथालयाच्या ताडपत्रीखाली, सुमारे आठ लाख पुस्तकं पोत्यांमध्ये भरलेली आहेत. ही पुस्तकंही वाचकांची वाट पाहत आहेत. गौडा यांचा हा पुस्तकांचा संग्रह उत्तरोत्तर वाढतच चालला आहे. यातली काही पुस्तकं गौडा स्वत: खरेदी केली आहेत तर काही त्यांना दान स्वरूपात मिळाली आहेत.

त्यांनी ज्या आवारात ही पुस्तकं ठेवली आहेत, तिथे विद्यार्थी, त्यांचे आई-वडील, शिक्षक आणि वाचनप्रिय लोकांची नेहमीच वर्दळ असते. जे लोक नियमितपणे या लायब्ररीत येतात, ते आता सहजतेने पुस्तकांमधून वाट काढत इथं वावरतात आणि हवं ते पुस्तक शोधतात. त्यातही समजा एखादं हवं ते पुस्तक नाहीच मिळालं, तर हे वाचक म्हणतात की, गौडा या इतक्या साऱ्या पुस्तकांमधून तुम्हाला हवं ते कोणतंही पुस्तक शोधून देऊ शकतात.

गौडा यांची ही लायब्ररी कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा नावाच्या एका छोट्याशा शहरात आहे.

फोटो स्रोत, Alphonse Vimulraj

गौडा, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांनी याच लायब्ररीच्या एका भागामध्ये आपलं घर थाटलं आहे. ही लायब्ररी आठवडाभर खुली असती.

गौडा यांचं लहानपण शाळा आणि वडिलांसोबत शेतात काम करण्यात गेलं. लहाणपणी ते पुस्तकं खरेदी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडे तसेच मोठ्या बहिणीकडे पैसे मागायचे.

लहानपणी ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि संतांवर लिहिलेली पुस्तकं वाचत असत. त्यातूनच त्यांना पुस्तकं वाचायची गोडी लागली. त्यांची ही आवड वाढतच गेली. इतकी की त्याचं व्यसन लागलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग ते पुस्तकांच्या दुनियेत हरवले.

ते सांगतात, “ही पुस्तकं माझ्यासाठी चॉकलेट्ससारखीच होती.”

एका शिक्षकापासून प्रेरित होऊन त्यांनी पुस्तकांचा एक छोटासा संग्रह करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातील इतर मुलंही ही पुस्तकं वाचू शकतील, असा त्यांचा उद्देश होता.

त्यांचे आई-वडील त्यांना खाऊसाठी जे पैसे द्यायचे, त्या पैशातून ते नेहमी पुस्तकं खरेदी करायचे. आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बस कंडक्टर म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.

‘अशी वेळ आली की पुस्तकांसाठी जागाच उरली नाही’

बस कंडक्टरच्या नोकरीला साधारण दहा महिने पूर्ण झाले होते, तेव्हा त्यांची आपल्या जुन्या शिक्षकाशी भेट झाली. गौडा यांनी आपलं पुढचं महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिल्याचं कळताच त्यांचे शिक्षक हैराण झाले.

गौडा यांनी बस कंडक्टरची ही नोकरी सोडून कॉलेजचं शिक्षण घ्यावं, यासाठी त्या शिक्षकांनी त्यांची समजूत घातली.

गौडा यांनी त्यांचा सल्ला ऐकला आणि त्यांनी कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पांडवपुरामधल्याच एका शुगर फॅक्टरीमध्ये ‘टाइमकीपर’ म्हणून काम करू लागले.

ते आपल्या पगारातील जवळपास दोन-तृतीयांश भाग पुस्तकांवरच खर्च करायचे. त्यातून उरलेल्या पैशांमध्ये लागणारं वाणसामान आणि इतर आवश्यक गोष्टी घ्यायचे.

ते सांगतात की, “त्यावेळी पगार कमी होता, पण लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीही तशा कमीच होत्या.”

फॅक्टरीमध्ये काम करत करतच गौडा यांनी 33 वर्षांच्या काळात कन्नड साहित्य परिषदेच्या कित्येक संमेलनांमध्ये सहभाग घेतला. कन्नड साहित्य परिषद ही कन्नड भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी ना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे.

गौडा यांनी जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील धुरिणांची तसेच अध्यात्मिक प्रभूतींवर लिहिलेली पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना पुस्तकांची चटक लागली.

फोटो स्रोत, Alphonse Vimulraj

या संमेलनामधून गौडा अनेकदा सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करायचे.

यासोबतच ते, गायपालनही करायचे. त्यातून मिळणारं दूध विकून तसेच विमा एजंट म्हणून काम करून त्यांनी आपलं उत्पन्न अधिक वाढवलं.

त्यानंतर त्यांच्यासमोर तीच एक समस्या उभी ठाकली जिचा सामना जगभरातील वाचनप्रेमींना करावा लागतो.

ती समस्या म्हणजे, एवढी सगळी पुस्तकं आता ठेवायची कुठे? या पुस्तकांसाठी चांगली जागा शोधणं.

ते सांगतात की, “लोखंडाच्या मोठमोठ्या पेट्यांमध्ये मी पुस्तकं ठेवू लागलो. त्यानंतर मग घरातच कपाटं लावून घेतली. मात्र, एकवेळ अशी आली की, घरात पुस्तकं ठेवण्यासाठी थोडीही जागा शिल्लक राहिली नाही.”

तोपर्यंत, त्यांच्याकडे जवळपास 50 हजार पुस्तकं जमा झालेली होती.

जेव्हा गौडा यांचे काही मित्र हरी खोडे नावाच्या एका दारू व्यावसायिकाशी भेटले, तेव्हा त्यातून त्यांना या समस्येवरचा मार्ग सापडला.

हरी खोडे तेव्हा पांडवपुरामध्ये मंदिर बांधत होते.

गौडा आपली आठवण सांगतात की, हरी खोडे यांना या गोष्टीवर विश्वासच बसला नाही, की एखाद्या व्यक्तीकडं इतकी सारी पुस्तकं असू शकतात.

‘मी माझी जबाबदारी पार पाडलीये’

गौडा सांगतात की, “ते स्वत: आले आणि त्यांनी माझी पुस्तकं पाहिली. त्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की, तुम्हाला काय हवंय? मी सांगितलं की, मला माझ्यासाठी काहीही पैसे वगैरे नको आहेत. माझी फक्त एकच इच्छा आहे की, या पुस्तकांसाठी लायब्ररी करून द्यावी.”

हरी खोडे यावर सहमत झाले आणि त्यांनी एका मोठ्या इमारतीच्या निर्मितीचा खर्च उचलला. याच इमारतीत आता गौडा यांची भव्य लायब्ररी आहे. ही लायब्ररी एकूण 15 हजार 800 स्क्वेअर फूट इतक्या जागेत पसरलेली आहे.

काही वर्षांनंतर गौडा तेव्हाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना ही लायब्ररी दाखवण्यासाठी घेऊन आले.

तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आधीच्या इमारतीला लागूनच आणखी दोन इमारती बांधण्यास मंजुरी दिली.

आता राज्यभरातून अनेक विद्यार्थी आणि शिक्षक या लायब्ररीला भेट द्यायला येतात.

अशा उत्सुक वाचकप्रिय लोकांमध्ये रवी बेट्टास्वामीही आहेत. रवी हे एका खासगी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक आहेत. ते सांगतात की, हजारो पुस्तकांचा संग्रह करण्याची प्रेरणा त्यांना इथूनच मिळाली आहे.

गौडा यांच्याकडे असलेल्या या जवळपास वीस लाख पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकांचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, Alphonse Vimulraj

पुढे ते सांगतात की, “मी माझ्या शिक्षणासाठीही गौडा यांच्या लायब्ररीचा वापर केलेला आहे. आता मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन इथे आलो आहे. जेणेकरून तेदेखील वाचायला लागतील. तसेच, ही पुस्तकं व्यवस्थित करण्यासाठी मदत करतील.”

सरकारी कॉलेजमध्ये शिकणारी शिल्पाश्री हरनू सांगते की, “कुणा व्यावसायिक लायब्रेरियनकडून ही लायब्ररी रचण्यात आलेली नाहीये, त्यामुळे इथे विस्कळीतपणा जाणवतो. पुस्तकांचा हा संग्रह भलेही विस्कळीत वाटत असेल, पण गौडा यांना व्यवस्थितपणे माहिती असतं की, कोणतं पुस्तक कुठे ठेवण्यात आलंय. त्यामुळे, ते क्षणार्धात सांगतात की, अमुक एखादं पुस्तक कुठंय.”

पण एवढी मोठी लायब्ररी सांभाळण्यासाठी त्यांनी एखादा लायब्ररियन का नाही ठेवला, हा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते सांगतात की, आजवर असं काही करण्याचा सल्ला त्यांना कुणी दिलाच नाही.

गौडा या लायब्ररीच्या भविष्याबाबत तत्त्वज्ञानात्मक भूमिका घेताना दिसतात. ते म्हणतात की, आता माझा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी इतरांची आहे.

ते सांगतात की, “मी माझी जबाबदारी पार पाडलीये. मात्र, आता माझ्यात तेवढी उर्जा उरलेली नाहीये. कदाचित आता सरकार आणि जनतेनंच ही लायब्ररी सांभाळायला हवी.”

“मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत. आता ही जबाबदारी इतरांनी आपल्या खांद्यावर घ्यावी.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC