Home LATEST NEWS ताजी बातमी पाठीवर झोपून बाळ जन्माला घालणं किती धोकादायक? प्रसूतीसाठी का वापरली जाऊ लागली...

पाठीवर झोपून बाळ जन्माला घालणं किती धोकादायक? प्रसूतीसाठी का वापरली जाऊ लागली ही पद्धत?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रकाश येत असलेल्या खिडकीच्या पार्श्वभूमीवर उभी असलेली गरोदर महिला

फोटो स्रोत, Getty Images

महिलांनी झोपून प्रसूती करणं किंवा बाळाला जन्माला घालणं सहसा अधिक धोकादायक असतं. मग त्यांची प्रसूती अशाप्रकारे का होते?

हे झालं आहे एका फ्रेंच माणसामुळे. त्याला वाटलं की झोपलेल्या स्थितीत महिलांची प्रसूती करणं पुरुषांसाठी अधिक सोयीचं आहे.

जगभरात हजारो वर्षांपासून महिला उभ्या राहूनच किंवा शरीर उभ्या, सरळ अवस्थेत ठेवूनच बाळाला जन्म देत असत. मग ते क्लिओपात्राप्रमाणे गुडघे टेकलेल्या स्थितीत असो की स्टूल, खुर्च्यांचा वापर करून केलेली प्रसूती असो की स्क्वॉटच्या स्थितीतील असो.

खरंतर स्क्वॉटिंगच्या स्थितीत म्हणजे बैठका मारतानाच्या स्थितीत, महिलांच्या पेल्विक म्हणजे ओटीपोटीचा भाग किमान 2.5 सेंटीमीटरनं (1 इंच) वाढू किंवा पसरू शकतो.

त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या मदतीनं प्रसूती करणं खूपच सोपं होतं.

मग, आज अनेक महिला पाठीवर झोपलेल्या स्थितीत बाळाला जन्म का देतात?

जॅनेट बालास्कास युकेतील ॲक्टिव्ह बर्थ सेंटरच्या संस्थापिका आहेत. तसंच, महिला त्यांच्या प्रसूतीच्या क्रियेवर कसं नियंत्रण मिळवू शकतात याची तपशीलवार माहिती देणाऱ्या अनेक पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत.

“प्रसूतीच्या शरीरशास्त्राबद्दल डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ आणि गरोदर महिलांमध्ये एक सामान्य अज्ञान आहे,” असं जॅनेट म्हणाल्या.

प्रसूतीचा जाहीरनामा

जॅनेट बालास्कास यांनी 1982 मध्ये ‘ॲक्टिव्ह बर्थ मॅनिफेस्टो’ म्हणजे सक्रिय प्रसूतीचा जाहीरनामा प्रकाशित केला. तो त्यांच्या संस्थेचा मुख्य सिद्धांत किंवा तत्व बनला.

“संपूर्ण जगभरात आणि हजारो वर्षे, महिलांनी उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत राहून उत्स्फूर्तपणे प्रसूती केली आहे. मग त्यांचा वंश किंवा संस्कृती कोणतीही असो. प्रसूतीसाठी याच उभ्या स्थितीचं प्राबल्य दिसून येतं,” असं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

2011 मधील एका संशोधनातून दिसून आलं की प्रसूतीच्या वेळेस बर्थ सेंटर्समध्ये असलेल्या महिला बाळाला जन्म देत असताना उभ्या किंवा सरळ स्थितीत राहण्याची शक्यता खूपच अधिक असते

फोटो स्रोत, Getty Images

बालास्कास म्हणाल्या, “औद्योगिक व्यवस्थेतून पुढे जात सेवा, तंत्रज्ञान क्षेत्रावर अर्थव्यवस्था केंद्रीत झालेल्या देशांमध्ये (पोस्ट इंडस्ट्रियल कंट्रीज) बहुतांश महिलांना हॉस्पिटलमध्ये आडव्या स्थितीत ठेवलं जातं. ही पद्धत अतार्किक आहे. यामुळे प्रसूतीची क्रिया, अनावश्यकपणे गुंतागुतींची आणि महागडी होते.”

“याचा परिणाम असा होतो की एका नैसर्गिक क्रियेचं रुपांतर एका वैद्यकीय घटनेमध्ये होतं. यात प्रसूतीवेदना सहन करणारी महिला एका निष्क्रिय रुग्ण बनते. कोणताही प्राणी किंवा जीव इतक्या महत्त्वाच्या वेळेस इतकी गैरसोयीची स्थिती अवलंबत नाही.”

इतर तज्ज्ञ याबाबत सहमत आहेत.

किंबहुना, झोपून किंवा आडवं होऊन बाळाला जन्म देणं, ही “तुलनात्मकरित्या एक आधुनिक घटना आहे”, असं हना डाहलेन यांनी 2013 मध्ये ‘द कॉन्व्हर्सेशन’साठी लिहिलेल्या एका संपादकीय लेखात लिहिलं आहे.

त्या ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठात प्रसूतीशास्त्राच्या (मिडवाईफरी) प्राध्यापिका आहेत.

गर्भधारणेकडे एक ‘आजारपण’ म्हणून पाहणं

महिलांनी आडवं होऊन किंवा पाठीवर झोपलेल्या स्थितीत बाळाला जन्म हे प्रामुख्यानं गेल्या 300 ते 400 वर्षांमध्येच होऊ लागलं आहे. हे झालं ‘फ्रँकोइस मॉरिसॉ’ या फ्रेंच माणसामुळं.

पाठीवर झोपलेली स्थिती गरोदर महिलांसाठी अधिक आरामदायी ठरेल. तसंच तिच्यावर उपचार करणाऱ्या किंवा तपासणी करणाऱ्या पुरुष डॉक्टरांसाठीदेखील ती अधिक सोयीची ठरेल, असा दावा फ्रँकोइसनं केला होता.

त्या काळात प्रसूतीच्या वेळेस सुईणींऐवजी पुरुष डॉक्टर किंवा सर्जन असण्याची एक चळवळ आधीच जोर धरू लागली होती.

पाठीवर झोपून बाळाला जन्म देण्याचा ट्रेंड 1600 च्या दशकापासून प्रचलित झाला, मात्र अनेक महिलांना ही पद्धत गैरसोयीची वाटते

फोटो स्रोत, Getty Images

फ्रँकोइस मॉरिसॉनं गरोदरपणाकडे एक आजारपण म्हणून पाहिलं. फ्रँकोइसचं ‘द डिझीजेस ऑफ वीमेन विथ चाईल्ड अँड इन चाईल्ड-बेड’ हे पुस्तक 1668 मध्ये प्रकाशित झालं होतं.

या पुस्तकात त्यानं सल्ला दिला होता की, “प्रसूतीसाठीची सर्वोत्तम आणि खात्रीशीर पद्धत म्हणजे महिलांनी बिछान्यातच बाळाला जन्म देणं. यामुळे त्यांना प्रसूतीनंतर दुसरीकडे उचलून नेण्याचा त्रास आणि गैरसोय टाळता येईल.”

मात्र, काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की, महिलांच्या प्रसूतीच्या स्थितीमधील हा बदल प्रत्यक्षात दुसऱ्या एका फ्रेंच माणसामुळे झाला असावा. हा फ्रेंच माणूस मॉरिसॉच्याच काळातीलच होता. त्याचं नाव होतं, राजा लुई चौदावा (किंग लुई चौदावा).

राजाचा प्रसूती प्रक्रियेवरील प्रभाव

“लुई चौदावा याला महिलांची प्रसूती पाहायला आवड असे. मात्र प्रसूतीसाठीच्या स्टूल किंवा आसनावर बसून होणारी प्रसूती नीट दिसत नसल्यामुळे लुई वैतागला. मग त्यानं आडव्या, पाठीवर झोपलेल्या स्थितीत महिलांची प्रसूती करण्यास प्रोत्साहन दिलं,” असं लॉरेन डंडेस यांनी 1987 सालच्या एका शोधनिबंधात लिहिलं आहे.

प्रसूतीच्या स्थितींमध्ये होत गेलेल्या उक्रांती किंवा बदलावरील हा शोधनिबंध आहे. लॉरेन या अमेरिकेतील मेरिलँडमधील मॅकडॅनियल कॉलेजमध्ये समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.

“राजाच्या धोरणाचा प्रसूतीच्या प्रक्रियेवर किती प्रभाव होता, हे अज्ञात आहे. तरीदेखील राजघराण्याच्या वागणुकीचा सामान्य जनतेवर काही प्रमाणात परिणाम झालाच असणार,” असं त्या म्हणाल्या.

“प्रसूतीच्या स्थितीत बदल होत असल्याच्या काळातच लुई चौदावा याच्याकडून ही कथित मागणी झाली. त्यामुळे तिचा यामध्ये निश्चितच प्रभाव पडला असावा,” असं त्या पुढे म्हणाल्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

महिलांना पाठीवर झोपण्याच्या स्थितीत ठेवून प्रसूती करण्याची पद्धत कशी सुरू झाली, हे माहिती नसलं तरी ही पद्धत टिकून राहिली. यामुळे महिलांच्या प्रसूतीच्या क्रियेचं मोठं नुकसान झालं.

“प्रसूती संस्थात्मक स्वरुपाची झाली आहे. घरी प्रसूती करण्यासारखे पर्याय कमी होत आहेत. घरी प्रसूती करणं हे नैसर्गिकरित्या प्रसूती होण्याची इच्छा असणाऱ्या अनेक महिलांसाठी अधिक सोयीचं किंवा हिताचं आहे,” असं बालास्कस म्हणाल्या.

वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत

महिला हजारो वर्षांपासून उभ्या किंवा सरळ स्थितीत बाळाला जन्म देत आल्या आहेत. यामागचं कारण सोपं आहे. ते म्हणजे गुरुत्वाकर्षण.

प्रसूतीच्या वेळेस जन्ममार्गातून बाळाचा प्रवास खालच्या दिशेनं होतो. या क्रियेसाठी गुरुत्वाकर्षण फायद्याचं ठरतं.

असं दिसून आलं आहे की जर प्रसूतीच्या वेळेस महिलांना त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार राहण्याची मुभा दिली, तर त्या मागील बाजूस नाही तर आपोआप पुढील बाजूस झुकतात. त्या स्क्वॉटसारखी म्हणजे गुडख्यावर बसण्याची स्थिती घेतात.

यात गुडघ्यावर वाकून हात गुडघ्यांवर टेकवून पुढच्या दिशेनं झुकलं जातं किंवा एखाद्या कमी उंचीच्या फर्निचरचा आधार घेऊन झुकण्यात येतं.

ग्राफिक्स

याचसंदर्भात 2013 मध्ये एक आढावा घेण्यात आला. त्यात 5,200 हून अधिक महिलांचा समावेश असलेल्या 25 अभ्यासांचा समावेश होता.

या आढाव्यात असं नमूद करण्यात आलं आहे की, बेडवर झोपून बाळाला जन्म देण्याऐवजी उभ्या आणि गतिशील स्थितीत प्रसूती करणाऱ्या महिलांना काही महत्त्वाचे फायदे होतात.

यामध्ये “सीझेरियन पद्धतीनं प्रसूती होण्याचा धोका कमी होणं, वेदनाशमनाची पद्धत म्हणून एपिड्युरल म्हणजे पाठीजवळ ॲनेस्थेशिया देण्याचा कमी वापर होणं आणि जन्मलेल्या बाळांना नवजात शिशू विभागात दाखल करण्याची कमी शक्यता असणं” या गोष्टींचा समावेश आहे.

या आढाव्यात असंही नमूद करण्यात आलं होतं की, अधिक जोखीम असलेल्या गटातील महिलांसाठी यासंदर्भात अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तर काही अभ्यासांमध्ये उभ्या स्थितीत प्रसूती झाल्यास रक्तस्त्राव वाढल्याचं दिसून आलं आहे.

उभ्या किंवा सरळ स्थितीतील प्रसूतीचे फायदे

उभ्या किंवा सरळ स्थितीत प्रसूती झाल्यानं महिलांच्या प्रसूती वेदनांचा कालावधी कमी होतो, असं आढळून आलं आहे.

“प्रसूती वेदनेच्या वेळेस आणि प्रसूतीच्या वेळेस उभ्या, सरळ स्थितीत राहिल्याचे माता आणि बाळ या दोघांनाही फायदे होतात” असं हना डाहलेन यांनी 2013 मध्ये लिहिलं होतं. त्यांनी या पद्धतीचे अनेक फायदे नमूद केले होते.

यात, अधिक प्रभावी स्वरुपाचं आकुंचन, मातेला प्रसूतीच्या वेळेस शारीरिक, मानसिक कमी वेदना होणं, फोर्सेप (डॉक्टर वापरत असलेलं चिमट्यासारखं साधन) चा कमी वापर होतो. तसंच व्हॅक्यूम बर्थ आणि एपिसिओटॉमीची कमी गरज भासते (यात अवजारांचा वापर करून प्रसूतीला चालना दिली जाते). तसंच मातेच्या गर्भाशयात असणाऱ्या बाळाला ऑक्सिजनचा अधिक चांगला पुरवठा होणं, या गोष्टींचा समावेश होता.

निसर्गत: महिलांची शरीररचना पाठीवर झोपून बाळाला जन्म देण्यासाठी झालेली नाही, मग ही पद्धत का वापरतात?

फोटो स्रोत, Getty Images

डाहलेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2011 मध्ये प्रसूतीच्या वेदनेत असणाऱ्या महिलांवर एक अभ्यास केला.

प्रसूतीच्या वेळेस महिलांनी जे ठिकाण निवडलं होतं, म्हणजे हॉस्पिटल किंवा घर इत्यादी, त्याचा महिलांनी प्रसूतीसाठी स्वीकारलेल्या स्थितीवर परिणाम होतो की नाही, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता.

त्यांनी यात दोन ठिकाणांना अभ्यास केला. एक म्हणजे बर्थ सेंटर किंवा प्रसूती केंद्र. जिथे बॉल्स, बर्थ स्टूल आणि बीन बॅग यासारखी आधार देणारी उपकरणं होती. तर दुसरं ठिकाण म्हणजे प्रसूती कक्ष. जिथे हॉस्पिटलमधील बेड हा एकमेव पर्याय होता.

त्यांना आढळलं की, ज्या महिलांची प्रसूती बर्थ सेंटरमध्ये झाली, त्यांनी प्रसूती वेदनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात उभ्या स्थितीत राहण्याची शक्यता खूपच अधिक होती.

त्या तुलनेत वॉर्ड किंवा प्रसूती कक्षात प्रसूती करणाऱ्या महिलांमध्ये हे प्रमाण कमी होतं. बर्थ सेंटरमधील 82 टक्के महिलांनी ही स्थिती वापरली होती. तर प्रसूती कक्षात हे प्रमाण फक्त 25 टक्के होते.

सक्रिय प्रसूतीची संकल्पना

पाश्चात्य देशांमध्ये आता ‘सक्रिय प्रसूती’ (ॲक्टिव्ह बर्थ) या संकल्पनेबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे, असं बालास्कास म्हणतात.

सक्रिय प्रसूती म्हणजे अशी पद्धत, ज्यात प्रसूती वेदनेच्या वेळेस मातेला मशीन आणि मॉनिटर्सना बांधून पाठीवर झोपण्याऐवजी मुक्तपणे आणि सहजपणे हालचाल करण्यास, तसंच उभ्या किंवा सरळ स्थितीत राहण्यास प्रोत्साहन दिलं जातं. अर्थात, सिझेरियनचं प्रमाण ‘चिंताजनकपणे’ वाढतंच आहे, असं त्या म्हणाल्या.

“युकेमध्ये सक्रिय प्रसूतीच्या प्रभावामुळे प्रसूतीसाठीच्या सेवांमध्ये बदल झाला आहे. उदाहरणार्थ, सुईणीच्या नेतृत्वाखालील बर्थ सेंटर्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे,” असं त्या पुढे म्हणाल्या.

निसर्गत: महिलांची शरीररचना पाठीवर झोपून बाळाला जन्म देण्यासाठी झालेली नाही, मग ही पद्धत का वापरतात?

फोटो स्रोत, Getty Images

त्या असंही नमूद करतात की, हे बर्थ सेंटर्स सहसा हॉस्पिटलमध्येच असतात. महिलांना हालचालींचं स्वातंत्र्य मिळावं आणि प्रसूतीसाठीच्या पाण्याच्या कुंडात (बर्थ पूल) जाता यावं, यासाठी त्यांची आवश्यकतेनुसार खास रचना केलेली असते.

“ही व्यवस्था 50 वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हती,” असं त्या म्हणाल्या.

युकेमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्स (एनआयसीई)च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सूचना करण्यात आली आहे की, ज्या महिलांना प्रसूती वेदना होत आहेत, “त्यांना प्रसूती वेदनेच्या दुसऱ्या टप्प्यात पाठीवर किंवा गुडघे दुमडून पाठीवर झोपण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. तसंच त्यांना सर्वाधिक आरामदायक वाटेल अशी इतर कोणतीही स्थिती घेण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे.”

प्रसूतीविषयी सामाजिक शिक्षण देण्याचं महत्त्व

ज्ञान हे नेहमीच ताकद, सामर्थ्य असतं. महिलांना त्यांच्या प्रसूतीसाठीच्या पर्यायांविषयी जितकी माहिती असेल, तितकंच त्यांना योग्य, सोयीचा वाटणारा पर्याय त्या निवडू शकतील.

आयलीन हटन, आधी सुईण होत्या आणि आता त्या शिक्षणतज्ज्ञ झाल्या आहेत. त्या कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठात सुईणींसाठीचा शिक्षण कार्यक्रम (मिडवायफरी एज्युकेशन प्रोग्रॅम) चालवतात. तसंच त्यांनी प्रसूतीवरील अनेक शोधनिबंध लिहिले आहेत.

त्या म्हणाल्या, “प्रसूतीसाठीच्या पर्यायांविषयी सार्वजनिक शिक्षण देणं नेहमीच उपयुक्त ठरेल.”

त्या पुढे म्हणाल्या, “सर्वसामान्यांसाठी केलेलं लिखाण किंवा लोकप्रिय साहित्य, टीव्ही आणि चित्रपट यामधील प्रसूतीबाबतच्या चित्रणावर एक नजर टाकली, तर प्रसूतीच्या प्रक्रियेची किती चुकीच्या पद्धतीनं मांडणी झाली आहे, हे चटकन लक्षात येतं. या विषयात प्रतिसंतुलन साधल्यास ते निश्चितच उपयुक्त ठरू शकतं.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC