Source :- ZEE NEWS
India- Pakistan Tension : आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावपूर्ण नात्याची जोरदार चर्चा सुरू असून याचदरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरची जागतिक स्तरावरही दखल घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. तर, पाकिस्तानचा कावेबाजपणासुद्धा यावेळी लपून राहिलेला नाही. भारतावर हल्ले केले असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानसंदर्भातील काही पुरावे सादर करत लष्करानं या शेजारी राष्ट्राची बोलती बंद केली. ज्यानंतर आता याच देशातील किराना हिल्स हा भागा एकाएकी गंभीर चर्चांचा विषय ठरताना दिसत आहे.
पाकिस्तानमधील किराना हिल्स भागामध्ये ‘न्यूक्लिअर रेडिएशन लीक’ अर्थात अण्विक गळतीचा दावा केला जात असतानाच अमेरिकेचं एक विमान गोपनीय पद्धतीनं पाकच्या या भागावर घिरट्या घालताना दिसल्यानं आता त्याचाही थेट संबंध या किराना हिल्सशी जोडला जात आहे.
कुठे आहे किराना हिल्सचा परिसर?
पाकिस्तानातील पंजाबच्या सरगोधा इथं किराना हिल्स हा परिसर असून ही संपूर्ण पर्वतरांग पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात आहे. जिथं किराना हिल्स नामक क्षेत्रात कथित स्वरुपात पाकिस्ताननं अण्वस्त्रसाठा ठेवला आहे. सध्याच्या घडीला ही बाब गोपनीय राहिली नसून अगदी अमेरिकेलाही याची कल्पना असल्याचं नाकारता येत नाही.
पाकिस्तानमधील या भागासंदर्भातील एक प्रश्न जेव्हा तब्बल 11 हजार किमी अंतरावर असणाऱ्या अमेरिकेच्या राजधानीत विचारण्यात आला तेव्हा मात्र या ठिकाणानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नानं खळबळ माजवली. ‘अमेरिकेनं आपलं एखादं पथक न्यूक्लिअर रेडिएशनच्या तपासासाठी इस्लामाबाद किंवा पाकिस्तानला पाठवलं आहे का?’ हाच तो प्रश्न.
हा प्रश्न ऐकताच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी अवघ्या काही सेकंदांमध्ये त्याचं उत्तर दिलं आणि त्याच कारणानं किराना हिल्सविषयी जगभरात कैक चर्चांनी जोर धरला. ‘असं काही नाही, ज्याचा तपास करण्याची आवश्यकता आहे…’ असंच उत्तर देत प्रवक्त्यांनी अतिशय हुशारीनं प्रश्न वळवला. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या जाणकारांच्या मते अमेरिकेला हा प्रश्न टाळता आला असता मात्र, आता त्याचं उत्तर देऊन हा महासत्ता देश काहीतरी लपवू पाहत आहे, असाच कयास अनेकजण लावत आहेत.
खरंच अमेरिकी विमानं पाकिस्तानात पोहोचली?
सध्या भारत आणि पकिस्तानसंदर्भातील अनेक मुद्द्यांची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, एका अशाही विमानाची चर्चा आहे, जे प्रत्यक्षात अमेरिकेचं असल्याचं म्हटलं जात आहे. बीच-क्राफ्ट किंग एयर 350 असं अमेरिकेच्या या विमानाचं नाव असून, बी350 असाही त्याचा उल्लेख केला जातो. सध्याच्या घडीला भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर हे विमान पाकिस्तानात पोहोचल्याचा दावा केला जात आहे.
पाकिस्तानात पाठवण्यासाठी याच विमानाची निवड का केली ?
या विमानात लहान सेंसर लावण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून हवेसह जमिनीवर असणाऱ्या रेडिओअॅक्टीव्ह पदार्थांची माहिती मिळवून त्यांची रिडींग रेकॉर्ड करता येते. ही विमानं अण्वस्त्र ठेवलेल्या ठिकाणावरून घिरट्या मारतानाही अनेक गोष्टींचं निरीक्षण करून तिथं अण्वस्त्र सुरक्षित आहेत की नाही याचीसुद्धा माहिती सहजपणे मिळवू शकतात. जपानच्या फुकूशिमा येथील न्यूक्लिअर रेडिएशननंतरही अशाच विमानांचा वापर करण्यात आला होता.
थोडक्यात जर किराना हिल्स आणि नजीकच्या भागात कोणत्याही प्रकारची अण्विक गळती झाली आहे, तर हे विमान तातडीनं त्याचं परीक्षण आणि निरीक्षण करून त्याबाबतची सावयध करणारी माहिती संबंधित यंत्रणेला जेऊ शकतं. याच कारणास्तव सध्या हे विमान पाकिस्तानात घिरट्या घालत आहे असं म्हटलं जातं आहे. असं असलं तरीही त्याची अधिकृत बातमी मात्र समोर आली नसून आता अमेरिका किंवा पारिस्तानकडून याबाबत नेमकं काय वक्तव्य केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
SOURCE : ZEE NEWS