Home world news marathi पाकिस्तानचं पूर्ण कर्ज फिटेल इतक्या किंमतीची अण्वस्त्र, कुठे लपवलीयत? हल्ल्याचा निर्णय कोण...

पाकिस्तानचं पूर्ण कर्ज फिटेल इतक्या किंमतीची अण्वस्त्र, कुठे लपवलीयत? हल्ल्याचा निर्णय कोण घेतं? सर्वकाही जाणून घ्या!

3
0

Source :- ZEE NEWS

Nuclear Weapons Stockpiles: अण्वस्त्रसंपन्न देश भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अण्वस्त्रांबाबत जगभरात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. अण्वस्त्रांबाबत पाकिस्तानच्या अनेक नेत्यांकडून बेजबाबदार विधाने करण्यात येत आहेत. ज्यात भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. पण या सर्वात अणुबॉम्बची किंमत किती असते? ते कुठे असतात? अण्वस्त्र हल्ल्याबाबत कोण ठरवत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानमधील नागासाकी आणि हिरोशिमावर लिटिल बॉय आणि फॅट मॅन नावाचे दोन अणुबॉम्ब टाकले. यामुळे जपानला हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागले. आज जगातील देश अण्वस्त्रांच्या देखभालीवर 91.4 अब्ज डॉलर्स खर्च करत आहेत. जर आपण प्रति सेकंदाच्या आधारावर पाहिले तर ते 2898 डॉलर्स म्हणजेच 2.5 लाख रुपये प्रति सेकंद आहे. जगातील 100 हून अधिक देशांचा जीडीपी यापेक्षा कमी आहे.

भारताची भूमिका 

भारताकडे अग्नी, शौर्य, प्रलय आणि ब्रह्मोस सारखी क्षेपणास्त्रे आहेत, ज्यातून शत्रुदेशावर अणुहल्ला केला जाऊ शकतो. भारताकडे समुद्र, हवा आणि जमीन या तिन्ही ठिकाणांहून अणुहल्ला करण्याची क्षमता आहे, ज्याला न्यूक्लियर ट्रायड म्हणतात. आम्ही कधीही कोणत्याही देशावर प्रथम अणुहल्ला करणार नाहीत, असं भारताने म्हटलंय. पण अशा हल्ल्यांना त्याच भाषेत योग्य उत्तर दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आलंय. 

अण्वस्त्राचे घातक परिणाम 

1957 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये एका विमानातून चुकून अणुबॉम्ब पडला. पण कोणताही अणुस्फोट झाला नाही आणि विनाश टळला. 1958 मध्ये दक्षिण कॅरोलिनामध्ये बी-47 लढाऊ विमानातून अणुबॉम्ब टाकण्यात आला. पण सुदैवाने क्षेपणास्त्रात बसवलेले अण्वस्त्र विमानातच राहिले. 1961 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये दोन अणुबॉम्ब वाहून नेणारे बी-52 विमान कोसळले. 1965 मध्ये अमेरिकन विमानवाहू जहाजावरून उड्डाण करणाऱ्या विमानातून समुद्रात एक अणुबॉम्ब पडला आणि तो आजपर्यंत सापडलेला नाही. शीतयुद्धाच्या वेळी जगात अणुबॉम्बची संख्या 60 हजारांच्या जवळपास पोहोचली होती. अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी अण्वस्त्र निःशस्त्रीकरण कार्यक्रम सुरू केला. जगात फक्त दक्षिण आफ्रिकेनेच सर्व अण्वस्त्रे नष्ट करून स्वतःला अण्वस्त्रांपासून मुक्त केले. ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अणुहल्ला केला. यामध्ये 1.25 लाख ते 2.5 लाख लोकांचा मृत्यू झाला. असे असले तरी जपानी शहरे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ अणु हल्ल्यांचे विनाशकारी परिणाम सहन करत आहेत.

कोणाकडे किती अण्वस्त्र?

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 2024 च्या अंदाजानुसार, जगातील नऊ देशांकडे 12 हजारहून अधिक अण्वस्त्रे आहेत. रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया. रशियाकडे 2815 आणि अमेरिकेकडे 1928 अणुबॉम्ब आहेत. चीनकडे 410, फ्रान्सकडे 290, ब्रिटनकडे 225, पाकिस्तानकडे 170 आणि भारताकडे 172 अण्वस्त्रे आहेत. उत्तर कोरियाकडे कमीत कमी 30 अणुबॉम्ब आहेत. 

पाकिस्तानची अण्वस्त्र कुठेयत?

पाकिस्तानची एफ-16 सारखी लढाऊ विमाने सरगोधा (मुशफ) हवाई तळ आणि शाहबाज हवाई तळावर तैनात आहेत. त्यांची अण्वस्त्रे सरगोधा वेपन्स स्टोरेज कॉम्प्लेक्समध्ये ठेवली जातात. जिथे अणुबॉम्ब डागले जातात त्या ठिकाणापासून 10 किमी अंतरावर, असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानकडे अब्दाली, शाहीन, गौरी, हत्फ, शाहीन अशी क्षेपणास्त्रे आहेत. पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कमांड प्राधिकरण अणुबॉम्ब हल्ल्याचा निर्णय घेऊ शकते.

अण्वस्त्र डागण्याचा निर्णय कोण घेतं?

कोणत्याही देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान थेट अणुबॉम्ब हल्ल्याचे आदेश देत नाहीत. असे असले तरी देशातील अशा प्रमुख नेत्यांकडे असा स्मार्ट कोड आहे ज्याशिवाय अणुबॉम्ब डागता येत नाही. अणुबॉम्ब हल्ल्याचे प्रत्यक्ष काम अणु कमांडच्या शेवटच्या स्तरावरील टीमकडून केले जाते. जे अण्वस्त्रांनी सुसज्ज क्षेपणास्त्रे डागते. अणुबॉम्ब हल्ला करण्याचा निर्णय पंतप्रधान कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, एनएसए, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या उच्च संस्था आणि व्यक्तींच्या सल्ल्यानुसार घेतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे एक अणु फुटबॉल आहे आणि रशियन राष्ट्राध्यक्षांकडे एक ब्रीफकेस आहे. ज्यामध्ये युद्ध योजना, अणु क्षेपणास्त्रे आणि त्यांच्या लक्ष्यांची संपूर्ण माहिती आहे.

तर पाकिस्तानचे सर्व कर्ज फिटेल 

पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची एकूण किंमत $44.55 अब्ज आहे. जर पाकिस्तानने आपली सर्व अण्वस्त्रे कोणत्याही देशाला विकली तर त्याचे संपूर्ण कर्ज फेडले जाईल. पाकिस्तानचे परकीय कर्ज सुमारे 2740 कोटी डॉलर्सच्या आसपास आहे. पण आजच्या काळास अणू बॉम्ब म्हणजेच न्यूक्लियर वॉरहेड बनवण्यासाठी 1.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 1530 कोटी ते 5.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 4516 कोटी रुपये खर्च येतो. म्हणजे अणुबॉम्बच्या संपूर्ण यंत्रणेची एकूण किंमत सुमारे 4500 कोटी रुपये आहे. ही किंमत प्रत्येक देशात येणाऱ्या खर्चानुसार बदलते. 

एका अणुबॉम्बची किंमत

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सच्या 1998 च्या अहवालानुसार, अमेरिकेचा अणुबॉम्ब B61-12s हा खूपच प्राणघातक मानला जातो. त्याच्या वॉरहेडची (बॉम्बची) किंमत 28 दशलक्ष डॉलर्स होती. पण जर आपण क्षेपणास्त्र ते डागण्यासाठी वापरले जाणारे लढाऊ विमान, लाँचिंग पॅड आणि त्याची देखभाल यांचा समावेश केला तर एका अण्वस्त्राची किंमत सुमार 27 कोटी डॉलर इतकी आहे. म्हणजे एका अणुबॉम्बची किंमत सुमारे 2300 कोटी रुपये आहे.

SOURCE : ZEE NEWS