Home LATEST NEWS ताजी बातमी पहलगाम हे भारताचं स्वित्झर्लंड म्हणून का ओळखलं जातं?

पहलगाम हे भारताचं स्वित्झर्लंड म्हणून का ओळखलं जातं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

पहलगाम (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून पाच किलोमीटरवर असलेल्या बैसरन इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.

पहलगाम हे जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातलं गाव एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं.

दरवर्षी इथे देशभरातून आणि परदेशातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक येतात.

पहलगाम

फोटो स्रोत, Getty Images

अधिकृत आकडेवारीनुसार 2024 मध्ये 35 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आणि मोठ्या संख्येनं लोक पहलगामलाही आले होते.

यातले बहुतांशजण मार्च ते जून या कालावधीत काश्मीरला भेट देतात. कारण या कालावधीत पहलगामचं सौंदर्य पाहण्याची संधी मिळते.

हे गाव आणि आसपासचा प्रदेश हिरवीगार कुरणं आणि सुंदर सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे. इथला परिसर गर्द जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला आहे.

त्यामुळेच अनेकजण पहलगामला भारताचं स्वित्झर्लंड असंही म्हणतात. काश्मीर मधल्या पर्यटनाच्या दृष्टीनं पहलगाम अत्यंत महत्त्वाचं आहे.

हा प्रदेश हिंदू भाविकांच्या अमरनाथ यात्रेच्या वाटेवरचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

निसर्गानं पहलगामला भरभरून सौंदर्य दिलं आहे आणि या नेत्रदीपक परिसरात अनेक जागा पाहण्यासारख्या आहेत.

पहलगाम हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही रेल्वेनं प्रवास केला, तर उधमपूर आणि जम्मू इथे उतरून पुढे टॅक्सीनं पहलगामला जाता येतं. पहलगाम उधमपूरपासून 217 किलोमीटरवर तर जम्मूपासून 285 किलोमीटरवर आहे.

या परिसरात रस्त्यावरून दळणवळणाची चांगली सोय आहे. राज्याची बस सेवा आहे, तसंच श्रीनगर, जम्मू आणि अनंतनागमधून खासगी बसही उपलब्ध असतात. इथून टॅक्सीनंही पहलगामला जाता येतं.

पहलगामच्या आसपासची पर्यटन स्थळं

काश्मिरी भाषेत पहलगामचा अर्थ होतो, मेंढपाळांचं गाव. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचं शूटिंग पहलगाम परिसरात झालं आहे.

  • चंदनवाडी : इथला ‘स्नो ब्रिज’ (नदी किंवा दरीवरचा बर्फाचा गोठलेला मार्ग) प्रसिद्ध आहे. अमरनाथ यात्रेचा एक मार्ग चंदनवाडीवरूनच पुढे जातो. हे एक अगदी छोटं खोरं आहे.
  • बैसरन : आजूबाजूला बर्फाच्छादीत शिखरांनी वेढलेलं बैसरान म्हणजे एक उंचावरचा काहीसा सपाट कुरणाचा प्रदेश आहे. उन्हाळ्यात हिरवंगार गवत, आजूबाजूला पाईनची झाडं यांमुळे हा परिसर अत्यंत नयनरम्य दिसतो आणि मोठ्या संख्येनं पर्यटक इथे येतात. पण या भागात येण्यासाठी नीट रस्ता नाही, त्यामुळे घोड्यावरून किंवा ट्रेक करत इथे यावं लागतं. 22 एप्रिल 2024 रोजी बैसरान इथेच पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला.
अनेकजण पहलगामला भारताचं स्वित्झर्लंड असंही म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

  • तुलियान सरोवर : बैसरनपासून 11 किलोमीटरवरचा हा बर्फाळ तलाव समुद्रसपाटीपासून 3,353 मीटरवर आहे. याच्या तीन बाजूंनी बर्फाच्छादीत डोंगर आहेत.
  • शेषनाग सरोवर : शेषनाग तलाव चंदनवाडीपासून 13 किलोमीटरवर आणि समुद्रसपाटीपासून 3,453 मीटरवर आहे. या तलावाचं पाणी निळसर हिरवट रंगाचं दिसतं आणि ते जूनपर्यंत गोठलेलं राहतं. ट्रेकिंगसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. पर्यटन विभागानुसार या भागाला शेषनाग तलाव हे नाव कसं पडलं, याची एक कहाणी आहे. The Leh Ladakh Tourism website नुसार इथे सात शिखरं आहेत जी हिंदू पुराणांतील शेषनागाच्या माथ्याची आठवण करून देतात.
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचं शूटिंग पहलगाम परिसरात झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

  • पंचतरणी : पंचरणी हा पाच झऱ्यांचा संगम आहे. अमरनाथ यात्रेआधीचा हा शेवटचा पाडाव आहे जिथे मुक्काम करता येतो. इथून सहा किलोमीटरवर अमरनाथ आहे.
  • अमरनाथ : शिवशंकर म्हणजे महादेवांच्या बर्फाच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो हिंदू भाविक अमरनाथला भेट देतात. दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा चालते.
दरवर्षी देशभरातून आणि परदेशातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक येथे पर्यटनास येतात.

फोटो स्रोत, Getty Images

  • अरू व्हॅली : डोंगरांमधून ट्रेक करत या सुंदर कुरणामध्ये पोहोचता येतं. या परिसरातून वाहणारी लिडर नदी गुर कुंभ इथे जमिनीत लुप्त होते आणि 27 मिनिटं ड्राईव्ह केल्यावर पुन्हा जमिनीवर येते, असं लेह-लडाख टुरिझमच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
  • लिडरवाट : लिडरवाट ही एक सुंदर कँपिंग साईट आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यातील ट्रेकची सुरूवात इथून होते. या जागेवरूनच लिडर नदीला तिचं नाव मिळालं.
  • बेताब व्हॅली : बॉलिवूड चित्रपट बेताबमध्ये सनी देओल आणि अमृता सिंग एका दृश्यात ज्या व्हॅलीमध्ये दिसले, त्या व्हॅलीला बेताब व्हॅली म्हणून ओळखलं जाऊ लागलं. डोंगरांच्या मध्ये कुरणानी वेढलेला हा परिसर पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. तसंच निसर्गप्रेमीही इथे आवर्जून भेट देतात.
निसर्गानं पहलगामला भरभरून सौंदर्य दिलं आहे

फोटो स्रोत, Getty Images

काश्मीर टूरिझमच्या वेबसाईटवरील माहितीनुसार इथे स्नो लेपर्ड (हिमबिबट्या), आशियाई काळे अस्वल, लाल कोल्हा आणि कस्तुरी मृग अशा जंगली प्राण्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे.

या परिसरात मुस्लीम बहुसंख्य (80%) आहेत, तसंच हिंदू (17%), शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि अन्य धर्मीय लोकही राहतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC