Home LATEST NEWS ताजी बातमी पंतप्रधानांची हत्या, भोपाळ वायू गळती आणि मुंबईत उप-उच्चायुक्तांची हत्या; असा होता इंग्लंडचा...

पंतप्रधानांची हत्या, भोपाळ वायू गळती आणि मुंबईत उप-उच्चायुक्तांची हत्या; असा होता इंग्लंडचा ऐतिहासिक भारत दौरा

1
0

Source :- BBC INDIA NEWS

1984 - 85 भारत दौऱ्यात इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघातील स्टार आणि अनुभवी खेळाडू अनुपस्थित राहिले.

फोटो स्रोत, Getty Images

पीटर बॅक्सटर अजूनही गाढ झोपेतच होते. आता कुठे पहाट झाली होती. तितक्यात त्यांचा फोन जोरजोरात वाजू लागला. या फोनमुळेच त्यांना जाग आली.

बाहेर अजूनही नीट उजाडलं नव्हतं. पण सतत वाजणारा फोन काही त्यांना झोपू देत नव्हता. दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. सरतेशेवटी झोप आवरत त्यांनी फोन उचलला.

खरंतर अगदी काही तासांपूर्वी त्यांचं भारतात आगमन झालं होतं. इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील कसोटी सामन्यांचं वृत्तांकन करण्याची जबाबदारी पीटर बॅक्सटर यांना सोपवण्यात आली होती. संपूर्ण भारत दौऱ्यात इंग्लंडच्या संघासोबत ते फिरतीवर असणार होते.

फोन उचलला आणि पलीकडून बोलणाऱ्याचे शब्द ऐकल्यावर त्यांना कळून चुकलं की, हा काही नेहमीचा क्रिकेट दौरा नसणार आहे. खऱ्या अर्थाने आता त्यांची अग्निपरीक्षा सुरू होणार होती.

प्रदीर्घ भारत दौऱ्यावर आलेला इंग्लंडचा क्रिकेट संघ आणि त्यांचं वृत्तांकन करणारे पीटर बॅक्सटर यांच्या समोर पुढच्या काही दिवसांत काय अग्निदिव्य वाढून ठेवलं आहे, याचा अंदाज त्यांनासुद्धा नव्हता. तो एक फोन म्हणजे त्यांच्या समोरील कठीण काळाची नांदी होती.

भारत दौऱ्यावर येण्याआधी इंग्लंड संघानं आपल्या मायदेशात वेस्ट इंडिज कडून 5 - 0 अशा फरकाने सपाटून मार खाल्ला होता.

फोटो स्रोत, Getty Images

हॅलोविनच्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंग्लंड क्रिकेट संघाच्या या भारत दौऱ्याची सुरुवात होणार होती. पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच तब्बल 3 महिने हा प्रदीर्घ दौरा चालणार होता.

पण या 3 महिन्यात क्रिकेट व्यतिरिक्त भारतात अशा काही गोष्टी घडल्या की, ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.

या तीन महिन्यांत भारत राजकीय हत्याकांड, धार्मिक दंगली आणि औद्योगिक अपघातानं हादरत होता.

इतकंच काय या दौऱ्यातले क्रिकेटपटू जेव्हा मुंबईत ब्रिटिश डेप्युटी हायकमिशनरला भेटले, त्याच दिवशी या अधिकाऱ्याची हत्या झाली. अशा एकेक घटनांची मालिकाच या दौऱ्यात घडली.

31 ऑक्टोबर 1984 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरात शीखांविरुद्ध धार्मिक दंगल उसळली.

इतकी सगळी उलथापालथ होत असताना देखील इंग्लंडचा संघ भारतातच राहिला. अनेकदा दौरा रद्द करण्याची वेळ आली, पण हा दौरा इतक्या अडथळ्यानंतरही सुरूच राहिला आणि पूर्णही झाला.

देशभरात अक्षरशः हाहाकार माजत असताना इग्लंडचा संघ अशा विस्फोटक वातावरणात 3 महिने भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी दोरे करत होता.

या दौऱ्यात 5 कसोटी सामने खेळले गेले. सरावासाठी 7 प्रथम श्रेणी सामने घेतले गेले. 6 एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. भारतभर 16 वेगवेगळ्या ठिकाणी इग्लंडचा संघ सामने खेळण्यासाठी फिरला. दरम्यानच्या काळात काही सामन्यांसाठी श्रीलंकेलाही जाऊन आला. या ऐतिहासिक दौऱ्याचा बीबीसीने घेतलेला हा आढावा :

एकामागोमाग एक अडचणींचा डोंगर उभा राहिल्याने हा दौरा रद्द होण्याच्या मार्गावर अनेकवेळा आला. पण रद्द झाला नाही. डेव्हीड गोवरच्या नेतृत्वाखाली नवख्या आणि अननुभवी इंग्लंडच्या संघानं इतिहास रचत भारताला भारतात येऊन धूळ चारली.

विशेष म्हणजे, पहिला सामना हरल्यानंतर पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाने भारताला मात दिली. त्या आधी इंग्लंड संघ भारतीय संघाला भारतात हरवू शकला नव्हता. पिछाडीवर असल्यानंतर भारतात येऊन मालिका जिंकणं त्यानंतरही कोणत्याही संघासाठी फक्त एकदाच शक्य झालेलं आहे.

 2 डिसेंबरला भोपाळमध्ये जगाच्या औद्योगिक इतिहासातली सर्वात मोठी दुर्घटना घडली.

फोटो स्रोत, Getty Images

या दौऱ्यावर येण्याआधी इंग्लंडच्या संघाची कामगिरी काही फार चांगली होत नव्हती. आपल्या घरात वेस्ट इंडिजकडून 5-0 असा मानहानीकारक पराभव इंग्लंडला नुकताच सहन करावा लागला होता‌. त्यामुळे भारतात येताना इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास खालावलेला होता. त्यात भर म्हणजे ग्रॅहम गूच, बॉब वूल्मर आणि आणि जॉन लिव्हर यांसारखे वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यासाठी गैरहजर होते. याचं कारण म्हणजे या खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं बंदी घातली होती.

या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघानं दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार टाकला होता. कृष्णवर्णीयांसोबत भेदभाव करणारी अपारर्थाइड राजवट दक्षिण अफ्रिका हा देश राबवत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती.

तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघाच्या आदेशाला झुगारून हे खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी 1982 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले होते‌. हा दौरा यासाठीच बंडखोरांचा दौरा म्हणून ओळखला जातो. या बंड केलेल्या खेळाडूंवर मग कारावाई दाखल काही काळाची बंदी घातली गेली. त्यामुळे हे तीन वरिष्ठ इंग्लिश खेळाडू भारत दौऱ्यावर येऊ शकले नाहीत.

अर्थात भारताचा संघ त्यावेळच्या जगज्जेत्या वेस्ट इंडिज संघाइतका बलवान नव्हता. पण म्हणून हे आव्हान इंग्लिश संघासाठी खचितच सोपं नव्हतं. कारण भारताला भारतात हरवणं कुठल्याही परदेशी संघासाठी अशक्यप्राय आव्हान होतं.

तीन वर्षांपूर्वी इंग्लंडच्या संघाने भारताचा दौरा केला होता. या इग्लंड संघात सगळ्या अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूंचा भरणा होता. तरिही त्यांना 6 कसोटींच्या मालिकेत भारताकडून 1-0 असा पराभव पत्करावा लागला होता.

त्या दौऱ्यात आता बंदी घातल्या गेलेल्या ग्रॅहम गूचनेच इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा केल्या होत्या‌. आणि आता हा इग्लंडचा संघ याच ग्रॅहम गूच शिवाय भारतात भारताला आव्हान द्यायला आला होता.

इयान बोथम

फोटो स्रोत, Getty Images

हेही कमी म्हणून की काय, इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू इयान बोथमनं सुद्धा या दौऱ्यातून आपलं नाव मागे घेतलं.

इयान बोथम इंग्लंडचा आजतागायत झालेला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानला जातो. उत्कृष्ट फलंदाजी आणि तितकीच घातक गोलंदाजी करणारा इयान बोथम हा इंग्लंडच्या संघाचा कणा होता. पण त्यानेच भारतात न येण्याचा निर्णय घेतल्यानं इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला.

मैदानातील आपल्या चमकदार कामगिरी बरोबरच मैदानाबाहेरील करामतींमुळे सुद्धा इयान बोथम कायम चर्चेत असायचा. मनमौजी स्वभावाच्या इयान बोथमच्या मागे वृत्तपत्र देखील हाथ धुवून मागे लागले होते. एकामागोमाग एक वादंग त्यामुळे उठत राहिले.

इयान बोथमच्या मैदानाबाहेरील कर्तृत्वाचे रकाने वृत्तपत्रांमध्ये भरले जाऊ लागले‌. यातल्या काही गोष्टी खऱ्या तर बऱ्याच खोट्या देखील होत्या‌.

इयान बोथमच्या लोकप्रियतेमुळे आपलाही खप वाढेल या आशेनं माध्यमांनी सुरू केलेल्या बदनामीकारक मोहीमेला वैतागून इयान बोथमनं क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेत एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला. भारतात येऊनही पुन्हा कोण्या नव्या वादंगाला सामोरं जायची त्याची इच्छा नव्हती.

फिल एडमंड्स

फोटो स्रोत, Getty Images

आता इतक्या सगळ्या वरिष्ठ स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक नव्या खेळाडूंना संधी देणं इग्लंडला भाग होतं. रिचर्ड एलिसन, ख्रिस कोड्रे, नील फॉस्टर, टीम रॉबिन्सन, नॉर्मन कोवन्स आणि व्हिक मार्क्स यांसारख्या तरूण खेळाडूंचा तर हा पहिलाच भारत दौरा होता‌.

पॅट पोकॉक आणि फिल एडमंड्स ही फिरकीची जोडी थोडी अनुभवी होती. ग्रॅमी फ्लॉवर आणि ॲलम लॅम्ब हे दोन फलंदाज फक्त तेवढे अनुभवी होते. तुलनेनं नवख्या मार्क गोव्हरवर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. तर अतिशय खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या माईक गटिंगला उपकर्णधार म्हणून घोषित केलं गेलं. कारण दुसरा कुठला पर्यायच इंग्लिश संघाकडे उपलब्ध नव्हता.

अशा नवख्या आणि अननुभवी खेळाडूंसह इग्लंडचा संघ भारतात आला होता. त्यामुळेच जिंकणं तर लांबची गोष्ट हा संघ भारताला भारतात आव्हान तरी देऊ शकेल काय? हा सहाजिक प्रश्न दौरा सुरू होण्याआधीच विचारला जाऊ लागला‌.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

भारत दौऱ्यासाठी हा इंग्लंडचा संघ नुकताच भारतात उतरला होता. तेव्हा बातमी आली की पंतप्रधान इंदिरा गांधीची हत्या झाली आहे. त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांनी इंदिरा गांधीवर बेछूट गोळीबार केला होता. बॅक्सटर यांंना तो फोन हीच बातमी कळवण्यासाठी आला होता. बॅक्सटर यांना बातमी समजली तेव्हा इंग्लिश खेळाडू अजूनही झोपलेले होते.

“बीबीसीच्या लंडनमधील न्यूजरूममधून मला हा फोन आला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार झाल्याचं त्यांनी सांगितलं. नेमकं त्यावेळी बीबीसीचा दिल्लीतील वार्ताहर प्रिन्सेस ॲनी यांच्या भारत दौऱ्याचं वार्तांकन करण्यासाठी बाहेरगावी गेला होता. त्यामुळे बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयात जाऊन या बातमीचं वृत्तांकन करण्यासाठी तिथले सहाय्यक सतीश जेकब यांची मदत करा, असा आदेश मला दिला गेला,” पीटर बॅक्सटर यांनी बीबीसीशी बोलताना या सगळ्या दौऱ्याची पार्श्वभूमी मांडली.

क्रिकेटचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पीटर बॅक्सटरवर आता वेगळीच जबाबदारी येऊन पडली होती. या घटनेनंतर न्यूजरूममध्ये सुद्धा खळबळ उडाली.

पाच दिवस अगदी आरामात चालणाऱ्या कसोटी सामन्याचं वार्तांकन करायला आलेला पीटर बॅक्सटर आता जगातील सगळ्यात प्रभावशाली राजकारण्याचा एका जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू झालाय की त्या अजून जिवंत आहेत, याची खात्री करायच्या कामाला लागला.

बीबीसीच्या कार्यालयात एकामागोमाग फोन्स आणि टेलिग्राम येऊ लागले. क्रीडा पत्रकार असलेल्या पीटर बॅक्सटरसाठी हे सगळंच अतिशय भारावून टाकणारं होतं.

मार्क टली आणि सतीश जेकब यांचं पुस्तक

फोटो स्रोत, Rupa Publications

सरतेशेवटी एका विश्वासार्ह सूत्राचा सतीशला फोन आला आणि त्यांनी कळवलं की इंदिरा गांधीचा मृत्यू झालेला आहे. पण इतकी महत्वाची बातमी दोन वेगवेगळ्या सूत्रांकडून खातरजमा केल्याशिवाय प्रसिद्ध करायची नाही, असा बीबीसीचा नियम असल्यामुळे सतीश आणि पीटर आणखी एका सूत्राकडून ही बातमी पक्की असल्याची खातरजमा करण्यासाठी कामाला लागले.

“काही मिनिटांनी आम्हाला आणखी एक टेलेक्स संदेश आला. त्यातही इंदिरा गांधी मृत पावल्याचंच म्हटलं गेलं. यानंतर मी सतीश सोबत चर्चा केली. तो अजूनही बातमी प्रसिद्ध करावी की नाही याबाबत संदिग्ध होता. मी लंडनच्या कार्यालयाला याबाबत कळवलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमच्या सूत्रांवरती विश्वास असेल तर बातमी प्रसिद्ध करा. मग मी ही बातमी प्रसिद्ध केली. पण तरीही अजूनही थोडी भीती आणि चलबिचल मनात सुरुच होती. कारण आमच्या शिवाय इतर कुठल्याच वृत्तसंस्थेनं ही बातमी अजून प्रसिद्ध केली नव्हती,” बॅक्सटर त्या दिवशीचा न्यूजरूममधील धांदलीचा आणि तितकाच तणावपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगत होते.

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आणि क्रीडा पत्रकार प्रकाश वाकणकर यांच्याशी सुद्धा या घटनेबाबत बीबीसीने संवाद साधला.

ही बातमी जेव्हा पहिल्यांदा समोर आली तेव्हा प्रकाश वाकणकर पुण्यामधील एका उपहारगृहात आपला 21 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत जमले होते.

इंदिरा गांधींवर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले

फोटो स्रोत, Getty Images

“आम्ही सगळे मित्र उपहारगृहात जेवण करत असताना रेस्टॉरंटची मालक असलेली एक शीख व्यक्ती आमच्या टेबलाजवळ आली. त्यांनी सांगितलं की आम्ही तातडीनं रेस्टॉरंट बंद करत आहोत. त्यामुळे कृपया तुम्ही इथून निघून जा. इंदिरा गांधींवर त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे आता दंगल पेटण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही रेस्टॉरंट बंद करत आहोत,” असं त्या रेस्टॉरंटच्या मालकानं आम्हाला सांगितल्याची आठवण प्रकाश वाकणकर यांनी नमूद केली.

“भारतातली परिस्थिती तेव्हा फार विचित्र बनली होती. पुण्यातही अगदी भयाण शांतता पसरली होती. सगळं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं‌‌. आता पुढे नेमकं काय होणार याचा अंदाज कोणालाही लावता येत नव्हता. पण ज्याची भीती होती तेच घडलं. देशभरात शीखांविरुद्ध दंगली पेटल्या. हिंदू आणि शीख लोक इतकी वर्ष एकमेकांशी अगदी गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांच्यामध्ये वितुष्ट येऊन धार्मिक हिंसा होईल, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. कारण या दोन धर्मातील बंधुभाव अतिशय चांगला होता. पण या दंगलींमुळे सगळ्यांच हादरा बसला,” वाकणकर आपला त्यावेळचा अनुभव सांगत होते.

दिल्लीतल्या दंगलीची स्थिती

फोटो स्रोत, Getty Images

“सकाळी उठल्यानंतर इग्लंडचे खेळाडू हॉटेलमध्ये नाष्टा करायला जात होते तेव्हा त्यांना ही बातमी कळाली. इंदिरा गांधींची जिथे हत्या झाली तिथून आमचं हॉटेल‌ फक्त दोन‌ मैलाच्या अंतरावर होतं. आजूबाजूच्या वातावरणात तणाव स्पष्टपणे जाणवत होता. कधीही हिंसेची आग भडकू शकते, या विचारांनी आम्ही घाबरलो होते. आम्ही आता कुठे अडकून पडलोय? असा प्रश्न आम्हाला पडायला लागला,” असी आठवण मार्क्स सांगतात.

व्हिक मार्क्स त्यावेळी भारतात आलेल्या इंग्लंड संघातलाच एक खेळाडू होता. बीबीसीशी बोलताना त्याने या संपूर्ण दौऱ्याचा इतिवृत्तांत मांडला. या सगळ्या घटनाक्रमाचा तो प्रमुख साक्षीदार राहिलेला आहे.

व्हिक मार्क्स

फोटो स्रोत, Getty Images

“ब्रिटनच्या उच्च आयोगाने हॉटेलमध्ये थांबा. बाहेर पडू नका, असा आदेश आम्हा खेळाडूंना दिला होता. काही दिवस हॉटेलातील खोलीत बंदिस्त राहिल्यानंतर खेळाडू आता अस्वस्थ होऊ लागले. हे नेमकं काय चालू आहे? असं एकाच खोलीत बंदिस्त किती दिवस राहणार? असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला पडत होते. दौऱ्याची सुरूवातच अशी झाल्यानं सगळ्यांनाच अस्वस्थ वाटत होतं‌. क्रिकेट दौऱ्यात क्रिकेट सोडून दुसरंच काहीतरी घडत होतं,” मार्क्सनं त्यावेळी होत असलेला कोलाहाल बीबीसीसोबत बोलताना विस्ताराने सांगितला.

खेळाडूंनी संघाचे व्यवस्थापक टोनी ब्राऊन यांच्यासोबत चर्चा केली. दौरा सोडून घरी परतण्याची आपली इच्छा खेळाडूंनी टोनी ब्राऊन यांच्याजवळ दबक्या आवाजात व्यक्त करायला सुरुवात केली. यात ॲलन लॅम्ब आघाडीवर होता. ‘आम्हाला अशा परिस्थितीत इथे भारतात थांबायचं नाही. आम्हाला घरी परतायचं आहे’, असं ठामपणे तो एका बैठकीत म्हणाला. खेळाडूंनी अशी भूमिका घेतल्यानं संघातही तणाव निर्माण झाला होता. सगळं वातावरण अनिश्चिततेनं भारलेलं होतं. पण व्यवस्थापक टोनी ब्राऊन सुद्धा अतिशय कडक शिस्तीचे खमके व्यक्ती होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

ब्राऊन यांच्याजवळच संघातील सगळ्या खेळाडूंचे पासपोर्ट होते. त्यांनी एक बैठक बोलवून ॲलन लॅम्बच्या पुढ्यात त्याचा पासपोर्ट फेकून दिला.

‘बाकीच्यांनाही कोणाला जायचं असेल त्यांनी पासपोर्ट घेऊन निघून जा. पण संघ क्रिकेट खेळणारच’, असं बजावून सांगितलं. ब्राऊन यांचा कणखरपणा पाहून सगळे खेळाडू सुतासारखे सरळ होत खेळायला आणि भारतात थांबायला तयार झाले. त्यानंतर कोणी परत जाण्याविषयी ब्र शब्द देखील उच्चारला नाही.

इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर भारत सरकारने 12 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे पुढच्या 12 दिवसांत काहीच घडलं नाही.

क्रिकेटचे सामने खेळणं तर दूर इंग्लंडच्या खेळाडूंना सरावासाठी मैदानातही जाता आलं नाही. ते हॉटेलातील खोलीतच बसून होते. त्यामुळे श्रीलंकेनं आपल्या देशात येऊन काही सामने खेळायचा प्रस्ताव मांडल्यानंतर इंग्लडच्या संघाने तो लगेच मान्य केला.

श्रीलंका क्रिकेट बोर्डानं एका खास विमानाची सोय करून दिली. सरावासाठी एक प्रथम श्रेणी कसोटी सामना आणि एक एकदिवसीय सामना आता इंग्लंडचा संघ कोलंबोत खेळायला आला.

कोलंबो शहराचे एक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

श्रीलंकेचा हा दौरा पावसाच्या अडथळ्यामुळे म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. पण या निमित्ताने इंग्लंडच्या खेळाडूंना बाहेर पडून क्रिकेटचा सराव करायला मिळाला.

कसोटी सामना पावसामुळे बारगळला. एकदिवसीय सामनादेखील 38 षटकांनंतर पावसामुळे रद्द करावा लागला. पावसामुळे संपूर्ण मैदानात पाणी साचलं होतं‌. या सामन्यानंतर पीटर बॅक्सटर गोव्हरची मुलाखत घ्यायला म्हणून इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला.

“पाऊस इतका होता की त्या ड्रेसिंग रूममध्ये देखील पाणी साचलं होतं. उंचवट्यावरील बाथरूमच्या परिसरात फक्त तेवढं पाणी जमा झालं नव्हतं. त्यामुळे गोव्हरनं मुलाखत घ्यायला मला चक्क बाथरूममध्ये बोलावलं. हा प्रसंग म्हणजे आमच्यासाठी नंतर मोठा विनोदाचा विषय बनला. त्यानंतर या दौऱ्यात कधीही भेट झाली की गोव्हर मुलाखत हवी असेल तर घर बाथरूम शोधूया, असं मिश्किलपणे चिडवायचा,” अशी आठवण पीटर बॅक्सटनं सांगितली.

“या दौऱ्यात आम्ही पत्रकारांसोबत बराच वेळ व्यतित केला. साधारणत: असं होत नाही. पत्रकारांसोबत खेळाडूंचा संवाद हा फार मर्यादित असतो. पण हा दौरा त्याला अपवाद होता. दौऱ्यातील असामान्य परिस्थितीमुळे क्रीडा पत्रकार कायम आमच्या सोबतच असायचे. प्रवासातही ते आमच्या संघाच्याच बसमधून यायचे. आम्ही एकाच हॅटेलमध्येही थांबलो होते. त्यामुळे जेवणाच्या वेळी अथवा बारमध्ये मद्यपान करतानाही आमची नेहमी भेट व्हायची आणि गप्पा रंगायच्या. त्यामुळे व्यावसायिक संबंधांच्या पलीकडे जात आमची मैत्री झाली. आम्ही कायम सोबतच असायचो,” पत्रकारांसोबत या दौऱ्यात निर्माण झालेली जवळीक मार्क्सनं नमूद केली.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येण्याच्या काही महिन्यांपूर्वीच डेव्हिड गोव्हरकडे कर्णधारादाची धुरा सोपवण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images

श्रीलंकेतील इंग्लंड संघाचा मुक्काम फक्त एक आठवडाच राहिला. त्यानंतर लगेच इंग्लिश खेळाडू भारतात परतले. पहिले काही दिवस वाया गेल्यामुळे आता या दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक बनवण्यात आलं होतं.

नवीन वेळापत्रकानुसार पुढच्या 12 दिवसांत 3 सराव सामने इंग्लंड खेळणार होता. त्यासाठी जयपूर, अहमदाबाद आणि तिथून राजकोट असा प्रवास इंग्लंडच्या संघाला करावा लागणार होता.

या तीन सराव सामन्यांपैकी दुसरा सामना इंग्लंडचा संघ भारताच्या 25 वर्षांखालील वयोगटाच्या संघासोबत खेळणार होता. ज्यात अर्थातच सर्व तरूण भारतीय खेळाडूंचा भरणा होता.

18 वर्षीय लक्ष्मण शिवरामक्रिष्णन आणि तरूण मोहम्मद अझरुद्दीनचा या संघात समावेश होता. या दोन तरुण भारतीय खेळाडूंनी सराव सामन्यात इतकी प्रभावी कामगिरी केली की त्यांना थेट मुख्य कसोटी मालिकेत संधी दिली गेली.

सराव सामन्यात लेग स्पिन गोलंदाज लक्ष्मण शिवरामक्रिष्णन याने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत 5 बळी घेतले. तर फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनने 151 धावांची आकर्षक खेळी करून इंग्लंडच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं.

या दोघांच्या कामगिरीच्या बळावर 25 वर्षाखालील तरुण भारतीय संघाने सराव सामन्यात इंग्लंडच्या संघाला एकतर्फी मात दिली.

मोहम्मद अझरुद्दिन

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर मुख्य मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ मुंबईला पोहोचला. मुंबईत आल्यानंतर इंग्लंडच्या संघाचं स्वागत ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर पर्सी नोरिस यांनी केलं.

अशा अधिकृत भेटी अथवा स्वागताचा कार्यक्रम हा कुठल्याही क्रिकेट दौऱ्याचा असा भाग असतो ज्याबद्दल खेळाडूंना फारशी उत्सुकता नसते‌. पण सरकारी कामकाजाप्रमाणे जबाबदारी म्हणून खेळाडू असे सोपस्कार पूर्ण करतात. पण पर्सी नोरिस त्यांच्यासोबत झालेली भेट खेळाडूंसाठी अशी कंटाळवाणी नव्हती.

नोरिस इतर कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याप्रमाणे नीरस अथवा कंटाळवाणे अजिबात नव्हते. त्यांनी अगदी उत्साहात आणि आत्मीयतेनं इंग्लंडच्या खेळाडूंचं स्वागत केलं. त्यांच्यासाठी आखलेल्या खास कार्यक्रमात प्रत्येक खेळाडूसोबत मनसोक्त गप्पा मारल्या.

नोरिस यांना क्रिकेटचं चांगलं ज्ञान होतं. त्यामुळे सरकारी रुबाब झाडत न बसता त्यांनी क्रिकेटवरती खेळाडूंसोबत अगदी हसतखेळत मित्रांसारखी चर्चा केली. त्यामुळे सगळ्या खेळाडूंनाही नोरिस यांचं व्यक्तिमत्त्व आवडलं. अगदी खुश होऊन सगळे खेळाडू या कार्यक्रमातून आपल्या हॉटेलमध्ये परतले.

मुंबईत फ्लोरा फाऊंटनजवळ पर्सी नॉरिस यांची हत्या करण्यात आली

फोटो स्रोत, Getty Images

दुसऱ्या दिवशी सकाळी इंग्लंडचा संघ फोटो घेण्यासाठी एकत्र जमला तेव्हा बातमी आली की पर्सी नोरिस मृत पावले आहे. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या बातमीने इंग्लंडच्या संघाचे खेळाडू मुळापासून हादरून गेले.

पर्सी नोरिस शहरातील अरूंद गल्लीच्या रस्त्यावरून कार्यालयाकडे निघाले होते तेव्हा त्यांच्या पांढऱ्या रोव्हर गाडीवर दोन्ही हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार सुरू केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन ऑफ मुस्लीम सोशलिस्ट या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली‌. नोरिस हे ब्रिटिश गुप्तहेर म्हणून भारतात काम करत होते.

‘अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएसोबत मिळून आपल्याकडे पुन्हा पाश्चात्यांचं राज्य आणण्याच्या उद्देशाने भारतात राजकीय हस्तक्षेप घडवून आणण्याचा या पाश्चात्य वसाहतवाद्यांचा हेतू आहे. नोरिस हे याच वसाहवादी षडयंत्रातील भागीदार होते. म्हणून आम्ही वसाहतवादविरोधी लोकांनी मिळून त्यांची हत्या केली’, असा दावा या संघटनेनं केला.

सुरुवातीला इंदिरा गांधीच्या हत्येशी या हल्ल्याचा संबंध जोडण्याचे प्रयत्न झाले. पण त्यात काही तथ्य नसल्याचं नंतर समोर आलं. पण या घटनेनं आता कुठे इतक्या अडथळ्यांवर मात करून सुरू होऊ घातलेला इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा पुन्हा रद्द होण्याच्या मार्गावर आला.

“पर्सी नोरिस सोबत कोणाचं काय वैर असेल? त्याची हत्या का झाली असेल? असे प्रश्न आम्हाला सतावत होते. जी व्यक्ती काल आमच्यासोबत हसत खेळत गप्पा मारत होती तिची निघृण हत्या झाली होती. कारण? ती फक्त इंग्लिश व्यक्ती होती. ऑक्टोबरच्या शेवटी इथल्या पंतप्रधानाची हत्या आणि आता आमच्या डेप्युटी हाय कमिशनरची हत्या. काय घडतंय हे कळायला मार्ग नव्हता. क्रिकेट सोडून दुसऱ्याच गोष्टींचा सामना आमच्या संघाला करावा लागत होता. सगळ्यांनाच वाटलं की आता काय हा दौरा होऊ शकणार नाही. आता आम्हाला घरी परतावंच लागेल. पण तरीही आम्ही भारतात राहिलो आणि हा दौरा पूर्ण केला. या सगळ्या घटनाक्रमाकडे आज मागे वळून पाहताना आश्चर्यच वाटतं,” मार्क्स सांगत होता.

हत्या झाल्यानंतर पुढच्याच दिवशी पहिला कसोटी सामना सुरू होणार होता. त्यामुळे खेळाडूंना कदाचित विचार करायलाही वेळ मिळाला नसावा.

खेळापूर्वी पर्सी नॉरिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images

कर्णधार डेव्हिड गोव्हर आणि उपकर्णधार माईक गटिंग यांनी प्रत्येक खेळाडूजवळ जाऊन विचारणा देखील केली.

गोव्हरनं जेव्हा खेळाडूंना सांगितलं की आपल्याला सरावासाठी मैदानात जायचं आहे तेव्हा ग्रॅमी फाऊलर आपल्या नेहमीच्या उपरोधिक सुरात म्हणाला की कसला सराव? क्रिकेटचा की गोळी चालवण्याचा? इतकं सगळं होऊनही क्रिकेट खेळण्याविषयी डेव्हिड गोव्हरचा ठामपणा इतर खेळाडूंसाठी आश्चर्यकारक होता.

पण दुसऱ्या दिवशी दौऱ्याचा पहिला अधिकृत कसोटी सामना सुरू झाला. इंग्लंडची फलंदाजी पहिली होती. त्यांची सुरुवात चांगली झाली.

आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या 18 वर्षीय शिवरामक्रिष्णनने पहिली विकेट घेतली. सलामीवीर फॉवलरला त्याने आपल्या फिरकीवर बाद केलं.

“मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे इंग्लिश खेळाडूंची मनस्थिती चांगली नव्हती. याचा परिणाम आमच्या खेळावर झाला”, असं मार्क्स सांगतो.

लक्ष्मण शिवरामकृष्णन

फोटो स्रोत, Getty Images

“फॉवलर शिवरामकृष्णनच्या एका फुलटॉस चेंडूवर बाद झाला. बाद झाल्यावर पॅव्हिलियनमध्ये परतल्यावर वाईट वाटण्याऐवजी त्याने सुटकेचा निश्वास टाकला. कारण खेळण्याकडे त्याचं फारसं लक्षच लागत नव्हतं,” अशी आठवणही मार्क्सनं नमूद केली.

इंग्लंडच्या खेळाडूंमधील अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. मागच्या काही दिवसात ज्या गोष्टी बघाव्या लागल्या त्याचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. क्रिकेटपेक्षा इतर विचारच त्यांचं लक्ष विचलित करत होते.

साहजिकच या सामन्यात भारताच्या संघाने इंग्लंडच्या संघाचा धुव्वा उडवला. पहिल्या डावातच रवी शास्त्री आणि यष्टिरक्षक सय्यद किरमानांनी झळकवलेल्या शतकांच्या जोरावर भारताने 270 धावांची बढत मिळवली. तिथून पुढे इंग्लंडचा संघ कायम पिछाडीवरच राहिला.‌

कसोटीत फटका लगावताना ग्रॅमी फ्लॉवर आणि मागे भारताचे यष्टीरक्षक सय्यद किरमाणी

फोटो स्रोत, Getty Images

इतक्या मोठ्या पराभवानंतरही एक चांगली गोष्ट इंग्लंडच्या संघासोबत घडली. ती म्हणजे उपकर्णधार माईक गटिंगनं झळकावलेलं शतक. हे माईक गटिंगचं पहिलं आंतरराष्ट्रीय कसोटी शतक होतं. या सामन्याआधी माईक गटिंग हा अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. पहिलं आंतरराष्ट्रीय शतक करण्यासाठी त्याची 54 वी इनिंग उजाडावी लागली. त्याची फलंदाजीतील सरासरी फक्त 24 होती.

अनेक लोकांनी त्याच्या संघातील स्थानावर सवाल उपस्थित करायला सुरुवात केली होती. त्याला भारत दौऱ्यावर घेऊन जाऊ नये, अशीही चर्चा सुरू झाली होती. पण इंग्लंडच्या व्यवस्थापनानं त्याच्यावर विश्वास दाखवला. त्याला फक्त संघातच स्थान दिलं नाही तर उपकर्णधारही बनवलं‌.

माईक गटिंगनं व्यवस्थापनाचा आणि निवड समितीचा निर्णय सार्थ ठरवत दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं. या सामन्यात भारताच्या शिवरामक्रिष्णननं तब्बल 12 बळी पटकावले. इग्लंडच्या फलंदाजांना त्यानं आपल्या फिरकीच्या तालावर अक्षरशः नाचवलं. माईक गटिंग वगळता कोणीच त्याच्या फिरकीसमोर टिकाव धरू शकलं नाही.

माईक गॅटिंग

फोटो स्रोत, Getty Images

हा सामना इंग्लंड हरला असला तरी शतक केल्यामुळे माईक गटिंगचा आत्मविश्वास दुणावला. ज्याचा फायदा त्याला आणि त्याच्या संघाला पुढे झाला. पहिल्याच सामन्यातील इतक्या मोठ्या पराभवानंतर पुनरागमन करणं खरं तर कठीण असतं‌. त्यात इंग्लंड संघात तर अननुभवी आणि नवख्या खेळाडूंचा भरणा होता. त्यामुळे हा पराभव मागे सोडून मालिकेत पुनरागमन करणं इंग्लंडसाठी आता फार मोठं आव्हान होतं.

आता कुठे या सगळ्या धक्क्यांमधून सावरत क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत होतंय असं वाटत असताना पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारतात आणखी एक आक्रित घडलं. भारताच्या केंद्रस्थानी असलेल्या भोपाळमध्ये भयंकर औद्योगिक दुर्घटना घडली. तिथल्या युनियन कार्बाईडच्या केमिकल फॅक्टरीमध्ये वायू गळती झाली. अति विषारी असा मिथेल आयसोसायनाईड गॅस कारखान्यातून हवेत पसरला. या गळतीमुळे भोपाळ‌ शहरातील हवा जीवघेणी बनली. हजारो लोक हालहाल करून मेले. पुढच्या काही दिवसांत पसरलेल्या हाहाकारातून स्पष्ट झालं की ही भारताच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना होती.

“भोपाळमधील वायू गळती ही जगाच्या इतिहासातील सर्वात भयावह दुर्घटनांपैकी एक म्हणता येईल. तिची तुलना एखाद्या अण्वस्त्र हल्ल्यासोबत करता येईल. या कारखान्यात बऱ्याच दिवसांपासून गैरकारभार आणि हलगर्जीपणा सुरू होता. त्यामुळे अशी दुर्घटना कधीही घडू शकते ही भीती होतीच. दुर्दैवानं ही भीती त्या काळ रात्री खरी ठरली. त्याचे परिणाम आजही इतक्या वर्षांनंतर जाणवत आहेत. हजारो लोक या दुर्घटनेत पुढच्या काही दिवसांत मारले गेले. पण जे वाचले त्यांनाही आयुष्यभरासाठी वेदनेचा शाप मिळाला. आजही भोपाळमध्ये या विषारी वायूमुळे कायमचं अपंगत्व आलेले लोक दिसून येतात. इतकंच काय या घटनेनंतर जन्माला आलेल्या लहान मुलांमध्येही आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. त्यामुळे या घटनेचे घाव अजूनही ओसरलेले नाहीत,” अशा शब्दात वाकणकरांनी या दुर्घटनेची तीव्रता समजावून सांगितली.

भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार या दुर्घटनेत 3000 लोक पुढच्या काही दिवसांतच मारले गेले. तर 15000 लोकांचा पुढच्या काही महिन्यांमध्ये या विषारी वायूमुळे मृत्यू झाला. पण प्रत्यक्षातील मृत्यूची आकडेवारी 25000 असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

या दुर्घटनेनं भारत हादरला. संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. तरीही हा इंग्लंडचा दौरा सुरूच राहिला.

सुनील गावस्कर

फोटो स्रोत, Getty Images

मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा दिल्लीत होता. खेळपट्टी बघूनच अंदाज बांधला जात होता की हा कसोटी सामना दोन – तीन दिवसांमध्येच संपेल. भारताने फिरकीला अनुकूल अशी खेळपट्टी बनवून इंग्लंडचा गाशा गुंडाळण्याची योजना आखली होती.

सुनिल गावसकर यांनी तर इंग्लिश पत्रकारांना कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी जवळच्या ताज महालच्या सहलीची योजना आखून ठेवण्याचा सल्ला देखील देऊन टाकला. तीन दिवसांत आपण इंग्लंडला हरवू, असा ठाम विश्वास त्यांना होता. त्यात पुन्हा नाणेफेकीच्या कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडच्या संघाचा टिकाव लागणं आता आणखी कठीण झालं होतं. भारताला हरवणं तर दूर इंग्लंडचा संघ भारताला या कसोटीत आव्हान तरी देऊ शकेल काय? असा सहाजिक प्रश्न उभा राहिला होता.

पहिल्या डावात भारताने 307 धावा चोपल्या. खेळपट्टीच्या अनुषंगाने या धावा बऱ्याच जास्त होत्या. आता इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण खेळपट्टी म्हणावी तितकी फलंदाजीसाठी प्रतिकूल नाही, याचा अंदाज हळूहळू येऊ लागला होता.

सामना पुढे सरकेल तशी फिरकी अधिक घातक होत जाईल, असा कयास बांधला जात होता. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी कराव्या लागलेल्या इंग्लंडच्या पराभवाची भविष्यवाणी सगळ्यांनी आधीच करुन ठेवली होती. पण प्रत्यक्षात झालं उलटंच.

सलामीवीर रॉबिन्सननं ठोकलेल्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं धावांचा डोंगर रचत 109 धावांची आघाडी मिळवली. नवख्या रॉबिन्सनचं हे कसोटीतील पहिलं शतक होतं.

दिलीप वेंगसरकर

फोटो स्रोत, Getty Images

पण दोन्ही संघानी पहिल्या डावात चांगली फलंदाजी केल्यानं सामन्याची वेळ संपत चालली होती. दुसऱ्या डावात इंग्लंडने मनोज प्रभाकर आणि दिलीप वेंगसरकर या भारताच्या दोन‌ फलंदाजांना लवकर माघारी पाठवलं. पण त्यानंतर गावसकर यांनी खेळपट्टीवर नांगर टाकला. त्यांना मोहिंदर अमरनाथ यांनी देखील तितकीच तगडी साथ दिली.

हळूहळू भारतानं आघाडी मिळवायला सुरुवात केली. सामना आता अनिर्णितच राहिल, अशी लक्षणं दिसू लागली. शेवटच्या पाचव्या दिवसाचा लंच ब्रेक जवळ आल्यावर भारताकडे 90 धावांची आघाडी होती. पहिल्या धावांत आघाडी मिळवल्यानं सामना जिंकण्याची संधी इंग्लंडकडे चालून आली होती. पण गावसकर यांच्या चिवट फलंदाजीमुळे सामना अनिर्णित होण्याकडे चालला होता. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू देखील आता निराश आणि वैतागलेले दिसत होते.

इंग्लंड संघाच्या खेळाडूंच्या देहबोलीवरून त्यांनीही या सामन्याचा निकाल लागण्याची आशा आता सोडून दिलेली आहे, असं वाटत होतं.

कर्णधार गोव्हर हा तसा शांत स्वभावाचा होता. मैदानात तो कधीच आक्रमक वगैरे झालेला पाहायला मिळायचा नाही. पण आपल्या खेळाडूंची हात झटकलेली देहबोली पाहून तो सुद्धा कधी नव्हे ते चिडलेला पाहायला मिळाला. विजयाची आशा सोडायला तो तयार नव्हता. आपण अजूनही जिंकू शकतो. त्यामुळे शक्य तितका जोर लावून जिंकण्यासाठी खेळण्याचा आक्रमक आग्रह त्याने धरला. त्यामुळे इतर खेळाडूंमध्ये स्फुरण चढलं.

कर्णधार गोव्हरची ही आक्रमक रणनीती कामी आली आणि इग्लंडनं विकेट्स घ्यायला सुरुवात केली. यात अर्थात कपिल देवचा हलगर्जीपणा देखील इंग्लंडच्या पथ्यावर पडला.

सामना अनिर्णित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून संथ गतीने फलंदाजी करण्याचे आदेश कपिल देवला देण्यात आले होते. पण व्यवस्थापनाच्या या आदेशाकडे कानाडोळा करत कपिल देवनं आक्रमक शॉट खेळत स्वतःची विकेट फेकली.

सुरुवातीलाच पोकॉकला कपिलने एक षटकार ठोकला होता. आणखी एक षटकार मारण्याच्या नादात पुढच्याच चेंडूवर कपिल देवने लॅम्बच्या हातात झेल‌ दिला.

कपिल देव हा शेवटचा चांगला फलंदाज उरला होता. हलगर्जीपणामुळे तो बाद झाल्यानंतर भारताचा डाव पत्त्यांचा बंगल्याप्रमाणे कोसळला. तळाचे फलंदाज झटक्यात बाद झाले आणि 235 धावांवर भारताचा डाव आटोपला.

भारताचे शेवटचे सहा फलंदाज फक्त 28 धावांमध्ये गारद झाले. सामना संपायला आता फक्त दोन तास उरले होते आणि इंग्लंडला या दोन तासात विजयासाठी 125 धावा करायच्या होत्या. इंग्लंडने फक्त 2 फलंदाज गमावत अवघ्या 23.4 षटकांमध्ये हा सामना जिंकला.

माईक गटिंग आणि ॲलन लॅम्बने जलदगतीने धावा काढत हे लक्ष्य शेवटच्या सत्रात गाठलं. भारताने फक्त थोडासा संयम दाखवत 20 मिनिटे अजून फलंदाजी केली असती तर हा सामना अनिर्णित राखता आला असता. पण भारताच्या हलगर्जीपणामुळे हा सामना त्यांना गमवावा लागला.

अगदी शेवटच्या षटकांमध्ये जिंकलेल्या या रोमांचक सामन्यामुळे ही मालिका आता 1 – 1 अशा बरोबरीत उभी होती.

कपिल देवची आक्रमक फलंदाजी त्या दिवशी भारताच्या अंगलट आली. या हलगर्जीपणामुळे कपिल देववर‌ टीकेचा भडिमार झाला.

फोटो स्रोत, Getty Images

हा हलगर्जीचे पडसाद अर्थातच पुढच्याच सामन्यावर पडलेले दिसून आले. भारताच्या या मानहानीकारक पराभवाचं खापर कपिल देववर फोडण्यात आलं. संघ व्यवस्थापनाने सुद्धा कपिल देववर उघड नाराजी व्यक्त केली.

कोलकाता येथे होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीतून कपिल देवला डच्चू देण्यात आला. भारताच्या आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूलाच विश्रांती दिली गेली.

हा सामना सुरू होण्याआधी इंग्लंडला या मालिकेत कोणी खिजगणतीतही पकडत नव्हतं. पण दुसऱ्या कसोटीमुळे हे चित्र बदललं. या पराभवाच्या झटक्यानं भारताला जमिनीवर आणलं. ही मालिका आपल्यासाठी वाटते तितकी सोपी नाही, याची जाणीव भारताला झाली.

यानंतरचा तिसरा कसोटी सामना अतिशय निरस झाला. त्याचं कारण होतं खेळपट्टी. भारतानं या सामन्यासाठी अतिशय निर्जीव खेळपट्टी बनवून घेतली जिच्यात गोलंदाजांसाठी कुठल्याच प्रकारचं सहाय्य नव्हतं.

कर्णधार सुनील गावसकर यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चौथ्या दिवशीपर्यंत भारतानेच अतिशय संथ गतीने फलंदाजी केली.

पहिल्या डावातंच सामना अनिर्णित राहणार हे स्पष्ट झालं होतं. सामना इतका निरस आणि कंटाळवाणा झाला होता की इंग्लंडचा फिरकी गोलंदाज एडमंड्सनं भारताची फलंदाजी चालू असतानाच मैदानात वर्तमानपत्र वाचायला घेतलं.

सामना इतका निरस झाल्यामुळे मैदानातील प्रेक्षकही वैतागले होते. एकतर त्यांच्या आवडत्या खेळाडूला (कपिल देव) बाहेर बसवण्यात आलं होतं. त्यात कर्णधार सुनील गावसकरनं इतका बचावात्मक खेळ केला. जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न सुद्धा करत नाहीये हे दिसल्यावर या प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरू केली. खेळाडूंवर फळं फेकून मारली. तसेच चालू सामन्यात खेळाडूंना शिवीगाळही केली.

हा सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला. आता चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघ दक्षिणेकडील मद्रासला (आताचं चेन्नई) जाणार होते. मालिका अजूनही 1 – 1 अशा बरोबरीत होती.

कोलकातामधील निर्जीव खेळपट्टी आणि कपिल देवला बाहेर बसवण्याचा प्रयोग फसल्यानंतर भारताने या सामन्यासाठी नवीन योजना बनवली‌. संघातही बदल झाले. कपिल देवचं संघात पुनरागमन झालं. शिवाय धडाकेबाज सलामीवीर क्रिष्णम्माचारी श्रीकांतचा संघात समावेश करण्यात आला.

लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि कृष्णम्माचारी श्रीकांत

फोटो स्रोत, Getty Images

सामना अनिर्णित न राहता वेगाने धावा करून जिंकण्याच्या उद्देशाने भारताचा संघ आता मैदानात उतरला होता. इंग्लंडच्या संघाने सुद्धा एक मोठा बदल केला. एलिसनच्या ऐवजी इसेक्सचा जलदगती गोलंदाज फॉस्टरला संघात आणलं.

हा सामना कोलकाताच्या अगदी उलट झाला. गोलंदाजांना अनुकूल जिवंत खेळपट्टी आणि आक्रमक फलंदाजीमुळे हा सामना किमान अनिर्णित तरी राहणार नाही, हे स्पष्ट झालं.

भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी घेतली. पण फॉस्टर आणि कॉवेन्सच्या भेदक माऱ्यापुढे पहिल्याच डावात भारताची अवस्था 45 – 3 अशी नाजूक झाली. त्यानंतर अमरनाथ आणि अझरुद्दीन यांनी चांगली भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पण ही भागीदारी अतिशय वेगवान होती. धावा काढण्याचा त्यांचा वेग 21 व्या शतकातील आधुनिक क्रिकेटची साक्ष देणारा होता. कसोटी नव्हे तर एकदिवसीय सामना चालू आहे काय, अशी शंका वाटावी या पद्धतीने भारत फलंदाजी करत होता.

“एका अवघड खेळपट्टीवर भारताने वेगाने धावा करायला सुरुवात केली. सततच्या अंतराने एका बाजूला विकेट पडत होत्या. पण भारताने आपला धावांचा वेग काही कमी होऊ दिला नाही. त्यामुळे एका बाजूला वेगाने धावा आणि दुसऱ्या बाजूला सतत पडणाऱ्या विकेट्स. सामना अतिशय उत्कंठावर्धक आणि वेगवान गतीने पुढे सरकत होता,” अशी आठवण मार्क्स यांनी सांगितली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

एका पराभव आणि एका ड्रॉनंतर भारताने आपली खेळण्याची पद्धत अगदी उलट केली. याचं कारण काय असावं? इंग्लंडच्या संघाने भारताला हरवून अनपेक्षित धक्का दिला होता. त्यामुळे भारतीय संघ मुळापासून हादरला. त्यात कपिल देवला बाहेर बसवण्याचा निर्णय चांगलाच अंगलट आला.

कारण काहीही असो पण भारताचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 272 धावांवर गुंडाळला गेला. फॉस्टरला संघात आणण्याचा इंग्लंडचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. पहिल्याच डावात सहा फलंदाजांना माघारी पाठवत त्याने भारताचं कंबरडं मोडलं.

इंग्लंड फलंदाजीला उतरल्यानंतर समजलं की खेळपट्टी फलंदाजीसाठी इतकीही प्रतिकूल नव्हती. भारताने हाराकिरी करत विकेट्स फेकल्या. पुढचे दोन‌ दिवस फलंदाजी करत इंग्लंडने भारताच्या 272 धावांच्या बदल्यात 652 धावांचा डोंगर रचला. फॉवलर आणि गॅटिंग यांनी इंग्लंडतर्फे द्विशतक झळकावली. तरीही भारतीय गोलंदाजांना सगळे बळी पटकावता आले नाहीत. 7 फलंदाज बाद झालेले असताना इग्लंडने डाव घोषित करत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. एकाच डावात दोन फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती. या दोघांनी 241 धावांची विक्रमी भागीदारी रचत भारताकडून सामना अक्षरशः हिरावून घेतला.

मार्क्स त्यावेळी मैदानात हजर होता. त्याने सांगितलं की, “फॉवलर सुरुवातीला थोडा अडखळत खेळत होता. पण त्याने विकेट फेकली नाही. तो टिकून राहिला. खेळपट्टीवर थोडा वेळ टिकाव धरल्यानंतर त्याने हळूहळू फटके खेळायला सुरुवात केली. बघता बघता त्याने शतकं आणि नंतर द्विशतकाकडे आगेकूच केली. पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या शिवरामक्रिष्णनचा यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला. त्याला विकेट मिळवणं तर दूर धावा रोखणंही आता जड जात होतं. मालिकेतील पहिल्या तीन डावांमध्ये शिवरामक्रिष्णननं तब्बल 18 बळी पटकावले होते. मात्र चौथ्या सामन्यात तब्बल 145 धावा खर्चून त्याला अवघा एक बळी मिळवता आला. इंग्लंडच्या फलंदाजांनी आता त्याच्या फिरकीचं कोडं सोडवलं होतं.

इंग्लंडनं पहिल्याच डावात 380 धावांची आघाडी मिळवली. भारताचा पहिला डाव पहिल्याच दिवशी आटोपल्यामुळे सामना संपायला अजून बराच अवधी बाकी होता. इंग्लंडला जिंकण्याची आता पूर्ण संधी होती. ही संधी त्यांनी दवडणं शक्यच नव्हतं.

दुसऱ्या डावात भारताने 412 धावा रचल्या. पण 380 धावांनी आधीच मागे असल्यानं 35 धावांचं लक्ष्य इंग्लंडच्या संघाने आरामात अवघ्या आठ षटकांमध्ये पार केलं. इंग्लंडने मालिकेत 2 – 1 अशी आघाडी मिळवली होती. इतिहास रचायच्या अगदी जवळ इंग्लंड येऊन पोहचला होता. आता मालिकेतील एक सामना बाकी होता. हा सामना अनिर्णित राखणंही मालिका जिंकण्यासाठी इग्लंडला पुरेसं होतं. आणि झालंही अगदी तसंच.

कानपूर मधील शेवटचा सामना जिंकून भारताचा संघ किमान मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल, असा कयास बांधला जात होता. इंग्लंडकडून घरात हार पत्करण्याची नामुष्की टाळण्यासाठी भारताला आतातरी आक्रमक होणं भाग होतं. त्यामुळे फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवून भारत इंग्लंडला मात देण्याच्या पूर्ण तयारीने उतरेल, असं सर्वांना वाटत होतं.

इंग्लंड संघातील खेळाडू पॉल ॲलॉट याला पाठीच्या दुखापतीमुळे दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. बदली खेळाडू म्हणून जोनाथन ॲग्नू याला भारतात बोलावलं गेलं. जोनाथन याने बीबीसीशी बोलताना या ऐतिहासिक दौऱ्यातील किस्से रंगवून सांगितले. “आम्हाला अपेक्षित होतं की खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल. पण प्रत्यक्षात अतिशय पाटा विकेट कानपूरला बनवण्यात आली होती,” असं जोनाथन म्हणाला.

पाटा विकेट बनवण्यामागचं अतिशय चटपटीत कारण मार्क्सनं आम्हाला सांगितलं‌. “खेळपट्टी बनवणाऱ्या क्यूरेटरचा चुलत भाऊ हा स्वतः एक चांगला क्रिकेटपटू होता. पण सुनिल गावसकरने त्याला कधी संधी दिली नाही. त्यामुळे हा क्यूरेटर सुनील गावसकरवर दात ओठ खाऊन होता. गावसकरने गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनवण्याची विनंती केल्यानंतर त्याने मुद्दाम उलट फलंदाजांना अनुकूल पाटा खेळपट्टी बनवली,” असं गॉसिप त्यावेळी फिरत असल्याची आठवण मार्क्सनं आम्हाला करून दिली.

आता ही गोष्ट खरी होती की, अफवा हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण या बातमीने या आधीच उत्कंठावर्धक बनलेल्या मालिकेला आणखी मसालेदार बनवलं आणि क्यूरेटरचा गावसकरवर असलेला कथित राग इंग्लंडच्या पथ्यावर पडला.

कानपूरमधील कसोटी सामना अनिर्णित राखल्यानंतर मैदानातच मालिका विजय साजरा करताना

फोटो स्रोत, Getty Images

पाटा खेळपट्टीवर भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली. अझरुद्दीन आणि वेंगसकर यांच्या शतकांच्या बळावर भारताने धावांचा डोंगर रचला. हे अझरूद्दीनचं मालिकेतील सलग तिसरं शतक होतं. भारताने 552 धावांवर 8 विकेट्स पडलेले असताना पहिला डाव घोषित केला.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने 417 धावा केल्या. खरंतर पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी कोसळलीच होती. भारत इंग्लंडला फॉलो ऑन देऊन जिंकण्याच्या स्थितीत होता. पण कर्णधार गोव्हरनं चिवट फलंदाजीचं प्रदर्शन करत तळाच्या फलंदाजांना सोबत घेत इग्लंडला नाजूक परिस्थितीतून बाहेर काढलं. एडमंड्सनं त्याला तितकीच तोलामालाची साथ दिली. या दोघांनी केलेल्या 100 धावांच्या भागीदारीमुळे भारताचे सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे मनसुबे उधळून लावले.

मार्क्स सांगतो की, “खरंतर आत्तापर्यंत गोव्हरनं या मालिकेत तितकी चांगली फलंदाजी केली नव्हती. पण कर्णधार म्हणून त्याने आपली चुणूक वेळोवेळी दाखवली होती. आणि वेळ आल्यावर शेवटच्या सामन्यात अगदी मोक्याच्या क्षणी धावा करत इंग्लंडला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढणारा गोव्हरच होता. त्यानेच आग्रह धरत फिल एडमंड्सला संघात घेतलं. एडमंड्सनं हा विश्वास सार्थ ठरवत उत्कृष्ट गोलंदाजी तर केलीच शिवाय कर्णधारासोबत शतकी भागीदारी रचत फलंदाज म्हणूनही आपली उपयुक्तता सिद्ध केली. इंग्लंडच्या या ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करणारी शेवटच्या सामन्यातील या दोघांची प्रभावी कामगिरी गोव्हरच्या कर्णधारपदाखाली येऊ घातलेल्या इंग्लिश क्रिकेटमधील नव्या युगाची नांदी होती.”

शेवटच्या दिवशी 417 धावांवर इंग्लंडचा पहिला डाव संपला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. सामना जिंकणं आता भारताच्या आवाक्याबाहेर होतं. हा सामना अनिर्णित राखत इंग्लंडनं भारतात मालिका जिंकून इतिहास रचला. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत नव्या कर्णधाराखाली खेळत असलेल्या या नवख्या इंग्रजी संघाने अभूतपूर्व परिस्थितीत अशक्य ते शक्य करून दाखवलं.

इतक्या सगळ्या राजकीय आणि सामाजिक उलथापालथी, शेकडो अडचणींतून मार्ग काढत अखेर हा दौरा संपन्न झाला. ही कसोटी मालिका एक आठवडा देखील टिकेल काय असा प्रश्न उपस्थित होत असताना तब्बल 98 दिवस हा दौरा चालला.

सगळ्या 5 कसोट्या खेळून काढत भारताला भारतात मात दिल्यानंतरच इंग्लंडचा संघ विजयी मुद्रेनं मायदेशी परतला. पंतप्रधानाची हत्या, धार्मिक दंगली, औद्योगिक अपघात, हाय कमिशनरचा मृत्यू असे एकामागोमाग एक धक्के पचवत अक्षरक्ष: आणीबाणीच्या परिस्थितीत खेळली गेलेली ही कसोटी मालिका अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC