Home LATEST NEWS ताजी बातमी नर्स कसं बनता येतं? त्यासाठी काय शिकावं लागतं आणि नोकरी कशी मिळते?

नर्स कसं बनता येतं? त्यासाठी काय शिकावं लागतं आणि नोकरी कशी मिळते?

8
0

Source :- BBC INDIA NEWS

भारतात सध्या 39 लाखांहून अधिक नर्सेस आहेत (प्रतिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीत राहणाऱ्या स्वाती जेव्हा लहान होत्या, तेव्हा आपल्या मावशीला पांढऱ्या युनिफॉर्ममध्ये हॉस्पिटलला जाताना पाहून त्यांनाही वाटायचं की, आपणही असंच लोकांची सेवा करावी.

त्या डॉक्टर तर बनू शकल्या नाहीत. पण त्यांनी असा रस्ता निवडला ज्याशिवाय कोणताही डॉक्टर, हॉस्पिटल किंवा ऑपरेशन थिएटर पूर्ण होऊच शकत नाही. तो म्हणजे नर्सिंगचा मार्ग.

सध्या स्वाती एका मोठ्या आयटी (IT) कंपनीच्या क्लिनिकमध्ये नर्स म्हणून काम करत आहेत. आज भारतात 39 लाखांहून अधिक नर्स आहेत. ही संख्या ऐकायला मोठी वाटत असली, तरी आपल्या 140 कोटी लोकसंख्येसाठी ती अजूनही खूप कमी आहे

प्रसिद्ध कार्डियक सर्जन आणि ‘नारायणा हेल्थ’चे संस्थापक डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांच्या मते, अमेरिका आणि युरोपमध्ये एका डॉक्टरमागे साधारण 4-5 नर्स असतात. जर भारताला सुद्धा हेच प्रमाण गाठायचं असेल, तर आपल्याला अजून जवळपास 20 लाख नर्सेसची गरज भासणार आहे.

तर नर्सिंग ही केवळ एक ‘नोकरी’ आहे की येणाऱ्या काळातील ‘मोठी संधी’? 12 वी नंतर या क्षेत्रात पाऊल कसं टाकावं? आणि यात खरोखरच चांगलं करिअर होऊ शकतं का? याच विषयावर आज आपण ‘करिअर कनेक्ट’ मध्ये चर्चा करणार आहोत.

नर्सिंगमध्ये कोणते प्रोग्राम (कोर्सेस) उपलब्ध आहेत?

देशातील नर्सिंग शिक्षणावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ‘इंडियन नर्सिंग कौन्सिल‘ (INC) कडे असते. ही संस्था भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येते आणि ती एक स्वायत्त संस्था आहे.

भारतात नर्स बनण्यासाठी B.Sc. Nursing व्यतिरिक्त जो प्रोग्राम सर्वात जास्त लोकप्रिय आहे, तो म्हणजे GNM म्हणजेच ‘जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी’.

याव्यतिरिक्त ANM (ऑक्सिलरी नर्सिंग अँड मिडवाइफरी) हा सुद्धा एक कोर्स आहे, पण तो प्रामुख्याने आरोग्याशी संबंधित प्राथमिक गोष्टी शिकण्यासाठी आहे.

(प्रतिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

एम्स (AIIMS), दिल्लीचे नर्सिंग ऑफिसर कनिष्क यादव यांनी हे अगदी साध्या भाषेत समजावून सांगितलं आहे.

ते म्हणतात, “ANM हा कमी कालावधीचा डिप्लोमा कोर्स आहे. यात प्रामुख्याने आई आणि बाळाचं आरोग्य, लसीकरण आणि प्राथमिक उपचार यावर भर दिला जातो. हा कोर्स केलेले लोक जास्त करून ग्रामीण भागात किंवा समाजकल्याण केंद्रांमध्ये काम करतात.”

त्यांनी पुढे माहिती दिली की, “GNM किंवा B.Sc. Nursing हे कोर्सेस मात्र थोडे मोठे आणि सविस्तर अभ्यासाचे असतात. GNM चा कोर्स 3 वर्षांचा असतो, तर B.Sc. हा वर्षांचा.

विशेष म्हणजे हे दोन्ही कोर्सेस झाल्यावर ‘इंटर्नशिप’ (प्रत्यक्ष कामाचा सराव) सुद्धा करावी लागते. त्यामुळे हे कोर्सेस पूर्ण केलेले विद्यार्थी कामासाठी पूर्णपणे तयार आणि पक्के झालेले असतात.

ग्राफिक्स

B.Sc. Nursing साठी सुद्धा वयाची अट सारखीच आहे 17 ते 35 वर्षे. पण शिक्षणाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा-

12 वी सायन्स – तुम्ही 12 वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे विषय घेऊन किमान 45 टक्के गुणांनी पास होणं गरजेचं आहे.

प्रवेश परीक्षा – एम्स (AIIMS) दिल्लीचे नर्सिंग ऑफिसर कनिष्क यादव सांगतात की, आता केंद्र सरकारच्या सर्व हॉस्पिटलमध्ये नर्सिंगला प्रवेश घेण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. पण राज्य सरकारची कॉलेजं किंवा खासगी कॉलेजं त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षांनुसार ऍडमिशन देतात.

फी किती असते – सरकारी कॉलेजमध्ये वर्षाची फी साधारण 1 लाख रुपयांपर्यंत असते, तर खासगी कॉलेजेसमध्ये ही फी प्रत्येक कॉलेजप्रमाणे वेगवेगळी असू शकते.

नर्सिंग हे करिअरसाठी चांगलं क्षेत्र का आहे?

काही दिवसांपूर्वीच सरकारने आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबद्दल नवीन आकडेवारी जाहीर केली होती. त्यामध्ये असं समोर आलं की, भारतात दर 1000 रुग्णांमागे साधारण फक्त 2 नर्स आहेत. याचा अर्थ असा की या क्षेत्रात कामाच्या संधी खूप जास्त आहेत.

नर्सिंग शिकण्यासाठी आपल्या देशात एकूण 5,310 कॉलेजेस आहेत, ज्यापैकी 806 सरकारी आहेत. दरवर्षी साधारण 3.82 लाख विद्यार्थी नर्सिंगचं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात.

जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमधून नर्सिंग करायचं असेल, तर ही काही महत्त्वाची नावं आहेत, ती म्हणजे –

  • AIIMS, दिल्ली
  • CMC- वेल्लोर (ख्रिश्चन मेडिकल कॉलेज)
  • BHU- वाराणसी (बनारस हिंदू युनिव्हर्सिटी)
  • KGMU- लखनऊ (किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी)
  • PGIMER, चंदीगड ( पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च)
  • सेंट स्टीफन्स कॉलेज ऑफ नर्सिंग, दिल्ली
ग्राफिक्स

सरकारी आकडेवारीनुसार, सध्या भारतात B.Sc. Nursing साठी साधारण 1,20,000 जागा उपलब्ध आहेत. त्याशिवाय GNM, M.Sc. आणि PhD करणारे विद्यार्थीही खूप आहेत.

पण जाणकार लोक एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की, अनेकदा विद्यार्थी ‘नाइलाज’ म्हणून नर्सिंगकडे वळतात. म्हणजे ज्यांना MBBS किंवा BDS (डेंटिस्ट) ला ॲडमिशन मिळत नाही, ते विद्यार्थी मग नर्सिंगला प्रवेश घेतात. नर्सिंग हा त्यांच्यासाठी करिअरचा पहिला पर्याय नसून एक ‘बॅकअप’ प्लॅन असतो.

नर्सिंगमधील संधींबद्दल बोलताना कनिष्क यादव सांगतात, “दरवर्षी सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रांत मिळून हजारो नोकऱ्या निघतात. पण दुर्दैवाने आजही कित्येक जण नर्सच्या कामाला थोडं ‘कमी’ लेखतात.

खरंतर कोरोना काळानंतर परिस्थिती बरीच बदलली आहे, तरीही लोकांच्या मनात या कामाबद्दल आदर वाढवण्याची गरज आहे. नर्सिंग हा कोणताही छोटा-मोठा व्यवसाय नाही. तुम्ही फक्त एक दिवस नर्सशिवाय कोणतंही हॉस्पिटल किंवा हेल्थ सेंटर चालवून दाखवा, ते शक्य आहे का? मुळीच नाही.

त्यांच्या मते, “लोकांमध्ये या क्षेत्राबद्दल माहिती कमी असल्याचा एक फायदा विद्यार्थ्यांना मिळतो, तो म्हणजे इथे स्पर्धा तुलनेने कमी आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर शिक्षकाच्या एका जागेसाठी जिथे लाखो अर्ज येतात, तसं नर्सिंगच्या बाबतीत होत नाही. कारण या क्षेत्राकडे वळणाऱ्या उमेदवारांची संख्याच अजून तितकी मोठी नाही.”

नर्सिंगमध्ये भविष्यातील संधी आणि प्रगती

जर तुम्ही ANM, GNM किंवा B.Sc. Nursing करण्याचा विचार करत असाल, तर या क्षेत्रातील तज्ज्ञ काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात ज्यावर तुम्ही आतापासूनच काम करू शकता.

स्वाती यांनी सांगितलं की, “सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘संवाद’ म्हणजे पेशंट असो वा डॉक्टर, दोघांशीही तुम्हाला स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे ‘सहानुभूती’ जेणेकरून तुम्ही पेशंटचं दुःख समजू शकता

तुमच्याकडे ‘संयम’ असणंही खूप गरजेचं आहे, कारण कामाचे तास मोठे असू शकतात आणि रोज वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी तुमचा सामना होतो. शेवटी, तुमच्यात ‘निर्णयक्षमता’ हवी, कारण हॉस्पिटलमध्ये अचानक परिस्थिती बदलली तर तुम्हाला लगेच योग्य निर्णय घेता आले पाहिजेत.

भविष्यातील संधींबद्दल कनिष्क यादव सांगतात, “B.Sc. Nursing केलेले विद्यार्थी पुढे जाऊन नर्सिंग कॉलेजमध्ये शिकवू शकतात. आता तर अनेक मुलं M.Sc. आणि PhD सुद्धा करत आहेत. त्यामुळे पदवी पूर्ण केल्यावर तुम्ही मोठ्या सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वरच्या पदापर्यंत पोहोचू शकता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC