Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, UGC
महाराष्ट्रातील अनेक महानगर पालिकांमध्ये भाजपनं अगदी एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत काय होणार? याबाबत तशी फारशी उत्सुकता नव्हती. त्याचं कारण म्हणजे, अनेक ठिकाणची सत्ता समीकरणं जवळपास स्पष्टच होती.
पण एका महानगरपालिकेकडं अनेकांच्या नजरा लागलेल्या होत्या आणि अपेक्षेप्रमाणं तिथं चांगलंच नाट्यही पाहायला मिळालं. ती म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अगदी महापौरांच्या निवडीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.
काँग्रेसनं अंतर्गत वाद आणि शिवसेनेबरोबरच्या वाटाघाटीतील अपयशामुळे याठिकाणची सत्ता हातून गमावली, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
या राजकीय नाट्यात भाजपनं बाजी मारली आणि सत्ताही मिळवली. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यानं भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विजयी झाल्या आहेत.
पण चंद्रपुरात काँग्रेसनं हाती आलेली सत्ता नेमकी कशी गमावली? प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादामुळे काँग्रेसला कसा फटका बसला? भाजप आणि ठाकरे यांच्या युतीचा अर्थ नेमका काय? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.
भाजपनं शेवटच्या क्षणी खेळी केली…
चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 जागा आहेत. यापैकी काँग्रेस आणि मित्र पक्ष मिळून 30 नगरसेवक आहेत, तर भाजपकडे मित्रपक्ष मिळून 24 नगरसेवक आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा नगरसेवक आपल्याकडे येईल अशी अपेक्षा काँग्रेसला होती. त्यासाठी बोलणीही सुरू होती. पण महापौरपद दिल्याशिवाय आम्ही काँग्रेससोबत सत्तेत जाणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपुरातील पदाधिकारी संदीप गिऱ्हे यांनी घेतली होती.
चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीला अर्धा तास शिल्लक असतानाही विजय वडेट्टीवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरुच होती. अखेर त्यांच्यातील ही चर्चा फिस्कटली आणि गिऱ्हे यांनी भाजपला पाठिंबा दिला.
सत्तास्थापनेसाठी सव्वा वर्ष भाजपचा महापौर असेल, तर नंतरचा सव्वा वर्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद दिलं जाईल, असा फार्म्युला ठरला. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 6 नगरसेवक आणि काँग्रेसचे 2 बंडखोर अपक्ष नगरसेवक अशा 32 नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा मिळाला.
फोटो स्रोत, FB/CMCchandrapur
पण, बहुमत गाठण्यासाठी आणखी 2 नगरसेवकांची गरज होती. त्यातही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. तसंच, एमआयएमचा एक नगरसेवक काँग्रेससोबत येईल, अशी अपेक्षा असतानाही तटस्थ राहिला.
त्यामुळे बहुमताचा आकडा आणखी कमी झाला आणि हीच गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडली.
भाजपला 32 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला, तर काँग्रेसला मित्रपक्ष मिळून 30 आणि बसपच्या एका उमेदवारानं पाठिंबा दिला.
परिणामी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांचा फक्त एक मतानं विजय झाला.
भाजपनं यासाठी आधीपासूनच तयारी केली होती. भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा महापौर होईल असं जाहीर केलं होतं.
त्यासाठी त्यांनी ठाकरेंच्या सेनेला महापौरपदाची ऑफरही दिली होती. पण, ठाकरेंच्या सेनेची काँग्रेससोबत चर्चा सुरू होती. काँग्रेसमधील वाद संपत नसल्यानं आणि नेते महापौर पदावर अडून बसल्यानं ठाकरे गटानं भाजपसोबत जाणं पसंत केलं.
काँग्रेसनं हाती आलेली सत्ता कशी गमावली?
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 27 जागा मिळाल्या होत्या. त्यांनी जनविकास सेना पक्षासोबत निवडणूक लढवली होती. त्यांचे 3 मिळून एकूण 30 नगरसेवक काँग्रेसकडे होते. त्यामुळे इथं आपलीच सत्ता येईल अशी अपेक्षा काँग्रेसला होती.
पण, हातात आलेली ही सत्ता काँग्रेसला शेवटच्या क्षणी गमवावी लागली. असं का घडलं? हे समजून घेण्यासाठी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात नेमका कसा वाद रंगला होता? हेही महत्त्वाचं आहे.
महापालिकेचे निकाल 16 जानेवारीला लागले आणि दुसऱ्या दिवसापासूनच महापौर पदावर विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दावा केला. आपल्याच गटाचा महापौर व्हावा यासाठी दोन्ही नेते अडून होते.
फोटो स्रोत, FB/VijayWadettiwarOfficial
इतकंच नाही तर टोकाचं राजकारण या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळालं.
वडेट्टीवारांनी नगरसेवक पळवून नेल्याचा आरोप धानोरकरांनी केला, तर नगरसेवकांची बस थांबवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप धानोरकर गटावर झाले.
नगरसेवकांनी आपली साथ सोडू नये यासाठी महापौर कोण होईल हे ठरत नाही तोपर्यंत दोन्ही नेत्यांनी नगरसेवक पर्यटनाला पाठवले होते. विजय वडेट्टीवार तर आपले नगरसेवक थेट दिल्लीला घेऊन गेले होते.
वाद इतक्यावरच थांबला नाही. तर दोन्ही नेत्यांनी विभागीय आयुक्तांकडे आपआपल्या गटाची वेगवेगळी नोंदणी केली होती. एकाच पक्षातील नगरसेवकांची दोन वेगवेगळी गटनोंदणी केल्यानं विभागीय आयुक्तांनी आक्षेपही घेतला होता.
गल्लीतला वाद दिल्लीत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी करूनही दोन्ही नेत्यांमधला वाद सुटला नाही. या नाट्यात ते एखाद्या हतबल नेतृव्वासारखे दिसले. शेवटी गल्लीतला वाद सोडवण्यासाठी दिल्लीत के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक झाली आणि धानोरकर गटाचा महापौर होईल असं ठरलं.
एका ‘ड’ वर्गाच्या महापालिकेच्या महापौरपदाचा तोडगा काढण्यासाठी थेट दिल्ली गाठावी लागली. राज्यातील नेतृत्वालाही तो वाद सोडवता आला नाही आणि एवढा 25 दिवसांचा वाद, नाट्य रंगूनही काँग्रेसनं चंद्रपुरात सत्ता गमावली.
फोटो स्रोत, FB/VijayWadettiwarOfficial
हे काँग्रेस नेतृत्वाचं अपयश असल्याचं लोकसत्ता विदर्भ आवृत्तीचे संपादक देवेंद्र गावंडे यांना वाटतं.
ते म्हणतात, “काँग्रेस पक्षाला आपली स्थिती खराब आहे, आपल्याला परिस्थितीशी जुळवून वागावं लागेल याचं भान आलेलं नाही. त्यामुळे पक्षाला थोडंस यश मिळालं की, नेते लगेच हुरळून जातात आणि मग असे तोंडावर आपटतात. काँग्रेस पक्षात इतकी जास्त लोकशाही आहे की त्यांचेच नेते त्याचा गैरफायदा घेतात.”
धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वाद भोवला?
खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद या महापौरपदाच्या निवडणुकीत भोवल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकमत विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या मते, “धानोरकर आणि वडेट्टीवार दिल्लीत गेल्यामुळे नाराज झालेल्या वडेट्टीवारांनी शेवटच्या टप्प्यात निवडणुकीतून लक्ष काढलं. तसेच छोटे पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रतिभा धानोरकर ताकद लावू शकल्या नाही.
“बसप, एमआयएम, वंचित, ठाकरे गट यांना सोबत आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करू शकले असते. त्यांना ती मतं मिळाली असती. पण, अंतर्गत वादामुळे त्या गोष्टी झाल्या नाहीत. त्याचा फायदा भाजपला झाला.”
महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएमचा एक उमेदवार तटस्थ राहिला. त्याचाही फायदा भाजपला झाला.
पण, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत याच एमआयएमच्या उमेदवारानं काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या जनविकास सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळं उपमहापौर पदाची निवड ईश्वरचिठ्ठीनं झाली. त्यामध्ये भाजपला पाठिंबा दिलेल्या नगरसेवकाची निवड झाली.
फोटो स्रोत, FB/MPpratibhadhanorkar
“वेळेवर वंचितचे उमेदवार गैरहजर राहणे, एमआयएमचा उमेदवार महापौरदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून काँग्रेस आघाडीतील उपममहापौराला पाठिंबा देणं या सगळ्या गोष्टींवरून ही स्क्रीप्ट आधीच लिहिलेली होती. काँग्रेसमधूनच ही स्क्रीप्ट लिहिली गेली होती,” असं चंद्रपुरातील पत्रकार प्रमोद काकडे यांना वाटतं.
त्यांच्या मते, “ठाकरे गटासह इतर नगरसेवक काँग्रेसला सोबत आणता आले नाही. प्रतिभा धानोरकर अंधारात राहिल्या. इतर लोक आपल्यासोबत येतील असं त्यांना वाटलं. त्यांनी स्वतःची यंत्रणा उभारून इतर नगरसेवकांना आपल्याकडे आणलं नाही.
काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार काँग्रेसच्या बाजूनं असताना ते वडेट्टीवारांचे समर्थक असताना ते अचानक भाजपसोबत कसे काय गेले? अचानक वंचितचे नगरसेवक गैरहजर कसे राहिले?”
आता काँग्रेसला त्यांचा महापौर का बसवता आला नाही? यासंबंधी काँग्रेसकडून चौकशी केली जाणार आहे. त्यासंबंधीचा अहवाल निरीक्षकाकडून मागवला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
तसेच ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळंही नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचा भाग असताना त्यांनी काँग्रेससोबत येणं अपेक्षित होतं. पण, ते थेट भाजपसोबत गेले. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील असंही ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



