Home LATEST NEWS ताजी बातमी तुर्कीनं भारताविरोधात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा का दिला?

तुर्कीनं भारताविरोधात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा का दिला?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच अर्दोआन  पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. मात्र दोन्ही देशांमधील संघर्षात तुर्की उघडपणे पाकिस्तानच्या बाजूला होता तर इस्रायल भारताच्या बाजूनं.

अर्थात शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर तुर्कीनं या निर्णयाचं स्वागत केलं. तुर्कीनं म्हटलं की, दोन्ही देशांनी या संधीचा वापर थेट आणि निकोप चर्चेसाठी करावा.

मात्र जेव्हा जगभरातील बहुतांश देश भारत-पाक संघर्षाबाबत तटस्थ दिसत होते, तेव्हा तुर्कीनं पाकिस्तानची आणि इस्रायलनं भारताची उघडपणे बाजू घेतली होती.

भारतानं शुक्रवारी (9 मे) म्हटलं होतं की, पाकिस्तान तुर्कीच्या ड्रोनचा वापर हल्ले करण्यासाठी करतो आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानं म्हटलं होतं की, भारत इस्रायलच्या ड्रोनचा वापर करून हल्ले करतो आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन गुरुवारी (8 मे) म्हणाले होते की, पाकिस्तानातील लोक भावंडांसारखे आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो आहोत.

या आठवड्यात, तुर्की हवाई दलाचं सी-130 विमान पाकिस्तानात उतरलं होतं. अर्थात, हे विमान इंधन घेण्यासाठी उतरल्याचं तुर्कीचं म्हणणं होतं. याशिवाय गेल्या आठवड्यात तुर्कीची युद्धनौका देखील कराची बंदरात आली होती. तुर्कीनं याचा संबंध दोन्ही देशातील सद्भवानेशी जोडला होता.

शुक्रवारी (9 मे) भारतीय सैन्यानं म्हटलं होतं की, गुरुवारी (8 मे) पाकिस्ताननं 300 ते 400 तुर्कीश ड्रोनचा वापर करून भारताच्या वेगवेगळ्या शहरांवर हल्ला केला होता.

भारत आणि तुर्कीमधील संबंधांमधील अवघडलेपण या गोष्टीतून देखील समजू शकतं की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कधीही तुर्कीच्या दौऱ्यावर गेले नाहीत.

पाकिस्तानची तुर्कीशी असलेली वैचारिक जवळीक

सौदी अरेबियात भारताचे राजदूत राहिलेल्या तलमीज अहमद यांना प्रश्न विचारला की, तुर्की उघडपणे पाकिस्तानची मदत का करत आहे?

त्यावर तलमीज अहमद म्हणतात, “इस्लामच्या संदर्भात पाकिस्तानबरोबर तुर्कीची वैचारिक जवळीक आहे. याशिवाय शीतयुद्धाच्या काळात तुर्की आणि पाकिस्तान अमेरिकेच्या सोबत होते. संरक्षण क्षेत्रात त्यांचे खूप जवळचे संबंध राहिले आहेत.”

“पाकिस्तानातील अनेक जनरल किंवा लष्करी अधिकाऱ्यांचे तुर्कीबरोबर वैयक्तिक स्वरुपाचे संबंध राहिले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य खूपच वाढलं आहे.”

“मला वाटतं की, अर्दोआन पाकिस्तानबरोबरच्या जुन्या संबंधांना आणखी दृढ करत आहेत. अर्दोआन स्वत: इस्लामिक नेते देखील झाले आहेत. ते इस्लामिक गोष्टींना महत्त्व देतात. अर्दोआन अनेकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतात आणि याला इस्लामिक मुद्दा म्हणून मांडतात. तुर्कीनं हे स्पष्ट केलं आहे की, ते पाकिस्तानसोबत आहेत.”

तलमीज अहमद म्हणतात, “यातील महत्त्वाची बाब अशी आहे की मध्य-पूर्वेत दोन महत्त्वाच्या शक्ती आहेत. त्या म्हणजे तुर्की आणि इस्रायल. तुर्की पूर्णपणे पाकिस्तानबरोबर आहे आणि इस्रायल भारतासोबत आहे. तुर्की आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये इस्लामच्या मुद्द्याचा उदय अर्दोआन आल्यानंतर झाला आहे.”

“म्हणजेच दोन्ही देशांमध्ये 1950 पासून घनिष्ठ संबंध आहेत. मात्र यात इस्लामचा मुद्दा अर्दोआन आल्यानंतर आला आणि आता तो प्रमुख मुद्दा झाला आहे.”

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्यासोबत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ

फोटो स्रोत, Getty Images

दोन्ही देशांमधील संबंध कोणत्याही फायद्याशिवाय फक्त धर्म आणि वैचारिक जवळीक यांच्या आधारे राहू शकतात का?

यूएई आणि इजिप्तमध्ये भारताचे राजदूत राहिलेल्या नवदीप सूरी यांना हाच प्रश्न विचारला, तर ते म्हणाले, “तुर्की आणि पाकिस्तानात फक्त वैचारिक जवळीकच नाही, तर तुर्कीला पाकिस्तानची संपूर्ण संरक्षण बाजारपेठ देखील मिळते आहे.”

“याचबरोबर इस्लामिक जगतात तुर्की असं दाखवण्याचा प्रयत्न करेल की, ते पाकिस्तानसारख्या एका इस्लामिक देशासोबत उभे आहेत. प्रदीर्घ काळापासून तुर्कीचा इस्लामिक जगताचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न आहे, मात्र त्यांच्यासमोर सौदी अरेबियाचं आव्हान आहे.”

इस्लामिक जगताचं नेतृत्व

सौदी अरेबियाकडे मक्का आणि मदिनाच्या पवित्र मशीद आहेत, तर तुर्कीकडे उस्मानिया किंवा ऑटोमन साम्राज्याचा मोठा वारसा आहे. ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) या इस्लामिक देशांच्या संघटनेत सौदी अरेबियाचं वर्चस्व आहे. अर्दोआन यांनी प्रयत्न केले होते की त्यांच्या प्रभावाखाली काम करणारी एखादी संघटना उभी राहावी.

म्हणूनच डिसेंबर 2019 मध्ये अर्दोआन यांनी मलेशिया, इराण आणि पाकिस्तानला सोबत घेत सुरूवात केली होती. मात्र सौदी अरेबियानं पाकिस्तानला अडवलं. पाकिस्तान तुर्कीसोबत तितकाच पुढे जातो, जितकं सौदी अरेबियाला मान्य असतं.

सप्टेंबर 2023 मध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन, जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

इस्लामी किंवा मुस्लिम बहुल देशांमध्ये पाकिस्तान हा एकमेव अण्वस्त्रधारी देश आहे. अशा परिस्थितीत इस्लामी जगतात पाकिस्तानचं महत्त्व वाढतं. तलमीज अहमद यांना वाटतं की, पाकिस्तान आणि तुर्कीमधील लष्करी पातळीवरील सहकार्य याआधीदेखील होतं, मात्र आता त्यात इस्लामचा मुद्दादेखील आला आहे.

अहमद म्हणतात, “इस्लामचा वापर संधीसाधू विचार म्हणून केला जातो. जेव्हा फायद्याची गोष्ट असते तेव्हा इस्लामचा उल्लेख करतात. जेव्हा भूराजकीय परिस्थितीत हित साधण्याची वेळ येते तेव्हा इस्लाम मागे पडतो.”

“मला वाटतं की तुर्कीला पश्चिम आशियामध्ये उस्मानिया किंवा ऑटोमन साम्राज्याच्या वेळचं प्रभुत्व हवं आहे. त्यांची प्राथमिक इच्छा हीच आहे. या महत्त्वाकांक्षेत तुर्की पाकिस्तानकडे महत्त्वाचा सहकारी म्हणून पाहतो.”

तुर्कीनं पाकिस्तानची साथ देणं भारतासाठी धक्का आहे का? तलमीज अहमद म्हणतात,

“तुर्की कधीही भारताच्या बाजूनं नव्हता. काश्मीर मुद्द्यावरून तुर्की नेहमीच भारताला चिथावणी देत आला आहे. मध्य-पूर्व आणि आखातात भारताचे हितसंबंध इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि इराणशी जोडलेले आहेत. या देशांबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत.”

पाकिस्तानसाठी कोण महत्त्वाचं सौदी अरेबिया की तुर्की?

तलमीज अहमद म्हणतात की सौदी अरेबिया हा देश पाकिस्तान आणि भारत दोघांसाठी महत्त्वाचा देश आहे. भूतकाळात सौदी अरेबियानं पाकिस्तानला अनेकवेळा संकंटातून बाहेर काढलं आहे.

सौदी अरेबियानं पाकिस्तानची जितकी मदत केली आहे, तितक्या प्रमाणात तुर्कीनं कधीही पाकिस्तानची मदत केलेली नाही. सौदी अरेबियाला देखील माहित आहे की तो पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचा आहे.

भारताबरोबर देखील सौदी अरेबियाचे मोठे व्यापारी संबंध आहेत. यात सर्व गोष्टींचा समावेश आहे.

तलमीज अहमद म्हणतात की, सौदी अरेबिया आणि भारताच्या संबंधांमध्ये एका गोष्टीचा अभाव आहे. बहुधा भारत त्यात कधीही सहभागी होणार नाही. ती गोष्ट म्हणजे, आपण सौदी अरेबियाच्या सुरक्षेची कोणतीही खात्री दिलेली नाही.

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन

फोटो स्रोत, Getty Images

नवदीप सुरी तुर्की आणि पाकिस्तानच्या घनिष्ठ संबंधांना फारस महत्व देत नाहीत. ते म्हणतात, “जगभरात जवळपास 200 देश आहेत. त्यातील एक देश असलेला तुर्की पाकिस्तानसोबत असणं हे धक्का देणारं मानलं जाऊ शकत नाही. इस्लामसंदर्भात अर्दोगान यांची एक भूमिका राहिली आहे आणि ती स्पष्टपणे दिसते आहे.”

ओआयसी, या इस्लामिक देशांच्या संघटनेनं दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र काश्मीर मुद्द्याबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. बुधवारी (7 मे) भारतानं पाकिस्तानात लष्करी कारवाई केली, तेव्हा ओआयसीनं वक्तव्यं देत चिंता व्यक्त केली होती.

ओआयसीनं म्हटलं होतं की भारतानं पाकिस्तानवर जे आरोप केले आहेत, त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओआयसीनं काश्मीर हा दोन्ही देशांमधील महत्त्वाचा मुद्दा आहे.

इस्लामचा संबंध

आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्की आणि पाकिस्तानची एकजूट कित्येक दशकांपासून स्पष्टपणे दिसते आहे. दोन्ही देश एकमेकांच्या अंतर्गत प्रश्नांना एकमेकांना पाठिंबा देत आले आहेत. अझरबैजान वरून देखील दोन्ही देश सोबत आहेत.

तुर्की, पाकिस्तान आणि अझरबैजानची मैत्री आर्मेनियाला जड जाते. पाकिस्तान जगातील एकमेव देश आहे, ज्यानं आर्मेनियाला सार्वभौम राष्ट्राचा दर्जा दिलेला नाही.

नागोर्नो-काराबाख या वादग्रस्त प्रदेशावर अझरबैजान दावा सांगतो. पाकिस्तानदेखील त्याला पाठिंबा देतो. याबाबतीत तुर्कीची देखील तीच भूमिका आहे. त्याबदल्यात तुर्की काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देतो.

फेब्रुवारी 2020 मध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोगान, पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मोठ्या अभिमानानं सांगितलं होतं की तुर्कीनं भारतावर 600 वर्षे राज्य केलं होतं.

इमरान खान म्हणाले होते, “तुमच्या येण्यानं आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. कारण जनतेला वाटतं की तुर्कीबरोबर आमचे खूप जुने संबंध आहेत. तुर्कीनं हिंदुस्तानवर 600 वर्षे राज्य केलं होतं.”

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोगान

फोटो स्रोत, Getty Images

इमरान खान यांच्या अभिमानाबद्दल पाकिस्तानातील प्रसिद्ध इतिहासकार मुबारक अली यांना विचारलं होतं.

ते म्हणाले होते, “एकतर इमरान खान यांना इतिहासाचं आकलन नाही. ते जेव्हा इतिहासाचा संदर्भ देतात तेव्हा धर्माच्या दृष्टीकोनातूनच पाहतात. आजच्या काळात कोणीही एखाद्या साम्राज्यवादी व्यवस्थेचं कौतुक कसं करू शकतं? हे राज्यकर्ते मुस्लिम होते, म्हणून इमरान खान असं करत आहेत का?”

1980 च्या दशकात पाकिस्तानमध्ये सत्तेत असणारे लष्करी हुकुमशहा जिआ उल-हक म्हणाले होते, “पाकिस्तान एक वैचारिक भूमिकेच्या आधारे बनलेलं राष्ट्र (आयडिओलॉजिकल स्टेट) आहे. जर इस्लामला बाजूला ठेवून तुम्ही सेक्युलर राष्ट्र बनलात, तर हा देश मोडकळीस येईल.”

तुर्की आणि पाकिस्तानमधील घनिष्ठ संबंधांना या वैचारिक दृष्टीकोनातून देखील पाहिलं जातं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

हेही वाचलंत का?

SOURCE : BBC