Home LATEST NEWS ताजी बातमी जम्मू, पठाणकोट, उधमपूरमधील लष्करी तळांवर पाकिस्तानचा हल्ला, कोणतंही नुकसान नाही

जम्मू, पठाणकोट, उधमपूरमधील लष्करी तळांवर पाकिस्तानचा हल्ला, कोणतंही नुकसान नाही

3
0

Source :- BBC INDIA NEWS

जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याची सूत्रांची माहिती, संपूर्ण शहरात ब्लॅकआऊट

फोटो स्रोत, ANI

8 मे 2025, 21:17 IST

अपडेटेड 3 मिनिटांपूर्वी

डीडी न्यूज या सरकारी वाहिनीने भारतीय संरक्षण खात्यातील सूत्रांच्या हवाल्यानं, “पाकिस्ताननं सतवारी, सांबा, आरएसपुरा आणि अर्निया इथं 8 क्षेपणास्त्रं डागल्याची माहिती दिली.

ही सर्व क्षेपणास्त्रं भारतीय हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीनं पाडण्यात आली. तर सध्या जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीमध्ये असलेल्या बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी त्याठिकाणी पूर्णपणे ब्लॅकआऊट झाल्याची माहिती दिली.

गेल्या काही तासांत पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेले सर्व लोक याच भागातील आहेत. पुंछमध्येही पूर्ण ब्लॅकआऊट असून त्याठिकाणीही सायरनचे आवाज येत आहेत.

भारतीय लष्करानं दिलेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरमधील लष्करी तळांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून हल्ला केला. यात कोणतंही नुकसान झाले नाही. भारतीय सशस्त्र दलांनी एसओपीनुसार हा धोका परतवून लावला, असं एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

याबरोबरच चंदिगढ शहरातही सायरन वाजवण्यात आले असून तात्काळ ब्लॅकआऊटचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुजरातच्या कच्छ भागातील भुजमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

@HQ_IDS_India

फोटो स्रोत, @HQ_IDS_India

क्रिकइन्फोच्या माहितीनुसार धर्मशालामध्ये सुरू असलेला आयपीएलचा पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना थांबवण्यात आला आहे.

त्याआधी, गुरुवारी बीसीसीआयनं धरमशालामध्ये होणारा 11 मे रोजीचा IPL सामना रद्द केला. हिमाचल प्रदेशातील कांगडा इथला विमानतळ बंद असल्यानं खेळाडू धरमशालामध्ये पोहोचू शकणार नसल्यामुळे हा सामना रद्द झाल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, एका सूत्रानं एएफपी वृत्तसंस्थेला जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याचं सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितले की, बाजारपेठा बंद होत्या आणि त्यांनी लोकांना पळताना पाहिले. सायरन वाजून शहरात वीज गेल्याचंही ते म्हणाले.

एशियन न्यूज इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान जम्मूला दारुगोळ्याचा मारा करून लक्ष्य करत आहे. शस्त्र वाहून नेणाऱ्या ड्रोनचा वापर ते करत आहेत.ही ड्रोन्स किंवा loitering munitions (लॅायटरिंग म्युनिशन्स) आहेत. कामिकाझे ड्रोन्स म्हणूनही ओळखली जातात. टार्गेट शोधून मग त्याला धडकतात. यासाठीच जम्मूत ब्लॅकआऊट केलं आहे.

भारतीय हवाई संरक्षण दलाची सुरक्षा यंत्रणा प्रत्युत्तर देत असल्याचंही वृत्त वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

रात्री 8.45 च्या सुमारास जम्मू शहरातून हवाई हल्ल्यांची माहिती येऊ लागली होती.

राजौरीमध्ये असलेल्या बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य म्हणाल्या की,”सकाळी आम्ही जम्मूमध्ये होतो. तिथं ज्या गावांना भेट दिली तिथून लोक सामानासह सुरक्षित ठिकाणी निघून गेले होते. त्या भागात आणि जम्मू शहरात अनेक स्फोट ऐकू आले. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलं पाऊने नऊच्या सुमारास अनेक स्फोट झाले.”

त्यांनी पुढं म्हटलं की, “त्यानंतर संपूर्ण परिसरात वीजपुरवठा बंद करण्यात आला. फक्त व्हॉट्सअॅप कॉल सेवा उपलब्ध आहे. स्थानिक रहिवाशांनी पाठवलेल्या काही व्हीडिओमध्ये ब्लॅकआउट दरम्यान आकाशात लहान दिव्यांसारखा प्रकाश दिसला. त्यामुळं ते ड्रोन असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.”

दिव्या यांच्या माहितीनुसार, जम्मूपासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या कठुआ परिसरातही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. इथंही किमान दोन स्फोट झाल्याची माहिती मिळाली. स्थानिक रहिवाशांनी ड्रोन उडत होते याची पुष्टी केली आहे. सध्या परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण आहे. तसंच लोकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मू शहरातील ज्या रहिवाशांशी आम्ही बोललो त्यांच्यामध्ये खूप दहशत होती. कारण हा एक शहरी भाग असून आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे.

(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC