Source :- BBC INDIA NEWS

तुम्ही प्रवास करत असताना रात्रभर सुरू असलेले हॉटेल्स पाहिले असतील. तिथं अनेक कर्मचारी काम करतात. तुम्हाला टेबलवर जेवण आणून देतात.
पण 24 तास सुरू असणाऱ्या आणि स्टाफलेस म्हणजे एकही कर्मचारी नसलेल्या दुकानांविषयी तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल? पण असा ट्रेंड एका देशात वाढतोय. या देशाचं नाव आहे दक्षिण कोरिया.
याठिकाणी अनेक दुकाने 24 तास सुरू असतात आणि त्याठिकाणी एकही कर्मचारी दिसत नाही.
अगदी मध्यरात्री जरी तुम्ही तिथे गेला, तर तुम्हाला आईसक्रिम, स्टेशनरी, पाळीव प्राण्याचे अन्न आणि अगदी सुशीची दुकाने खुली दिसतील.
तुम्हाला हवी ती वस्तू उचलायची आणि जवळच्या स्वयंचलित मशीनसमोर वस्तू स्कॅन करून त्याचं पेमेंट करायचं.
इतकंच नाही तर दक्षिण कोरियाची राजधानी सोलच्या मध्यवर्ती भागात बारमध्येही कर्मचारी नाहीत.
असाच एक स्टाफलेस बार किम सुंग-रे यांच्या मालकीचा आहे. त्या बारचं नाव आहे ‘सूल 24’. ‘सूल 24’ म्हणजे 24 तास सुरू असलेला बार.
“एवढ्या मोठ्या बारमध्ये नफा कमविण्यासाठी मला 12 ते 15 कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते, पण मी इथे फक्त दोनच लोकांना नोकरीवर ठेवलं आहे,” असं किम सांगतात.
याआधी, किम यांच्याकडे आणखी एक बार होता. पण तो त्यांना परवडेनासा झाला. म्हणून त्यांनी आता स्टाफलेस म्हणजेच कर्मचाऱ्यांशिवाय चालवता येणारा बार सुरू केला. त्यामुळे त्यांच्या नफ्यातही वाढ झालीय.
दक्षिण कोरियात गेल्या काही वर्षांपासून जन्मदर घटत आहे. त्यासोबत लोकांच्या वेतनात वाढ होतेय. या सगळ्या कारणांमुळे दुकानांमध्ये ऑटोमेशन वाढत आहे.
देशातला घटता जन्मदर
जगातील सर्वात कमी जन्मदर असलेल्या देशांमध्ये दक्षिण कोरियाचा समावेश आहे. 2023 च्या आकडेवारीनुसार, इथला सरासरी प्रजनन दर 0.72 पर्यंत घसरला आहे.
स्थिर लोकसंख्या राखण्यासाठी, प्रजनन दर किमान 2.1 असावा. दक्षिण कोरियामध्ये यापूर्वी 1982 मध्ये अखेरचा एवढा प्रजनन दर होता.
कमी मुलं जन्माला येत असल्यानं साहजिकच देशात काम करणाऱ्या लोकांची संख्याही कमी होत आहे. 2000 सालापासून या देशात किमान वेतनात सातत्याने वाढ होतेय. पण तिथं काम करायला लोकच कमी आहेत.
बार चालवणारे किम आता त्यांच्या कामगारांना प्रति तास 600 रुपये ($7) देतात.

फोटो स्रोत, Getty Images
“किमान वेतन सतत वाढत असल्याने मी कर्मचारी नसलेला बार सुरू केला,” असं किम सांगतात.
“या आव्हानाला तोंड देण्यासाठी माझ्याकडे फक्त दोनच मार्ग आहेत. एक, रोबोटचा वापर आणि दुसरं, ऑटोमेशन.”
रोबोट वापरणे महागडं झालं असतं, म्हणून किम यांनी कर्मचारी नसलेल्या बारची कल्पना निवडली. कोरोना काळानंतर या देशात ऑटोमेशनकडे जाण्याचा कल आणखी वाढला आहे.
‘तरुण पिढीला 3D नोकऱ्या नको’
काही लोक म्हणतात की नवीन पिढी तथाकथित “3D नोकऱ्या” करू इच्छित नाही. याचा अर्थ Dirty, Dangerous, Difficult म्हणजे ‘घाणेरडे, धोकादायक आणि कठीण’ कामे करणे टाळतात.
आताच्या पिढीला उत्पादन, शेती आणि आता दुकानांमध्ये काम करायला आवडत नाही.
चो जंग-हुन हे दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय असेंब्लीमध्ये सत्ताधारी पक्ष पीपल्स पॉवरचे सदस्य आहेत.
जंग-हुन म्हणतात, “तरुण पिढीला फक्त मोठ्या शहरांमध्येच काम करायचं आहे. त्यांना तिथे स्वतःचे व्यवसाय आणि उद्योग सुरू करायचे आहेत किंवा त्यांना चांगला पगार पाहिजे. तसंच त्यांचा कल उच्च-तंत्रज्ञानाच्या व्यवसायांमध्ये जास्त आहे.”
“अशा प्राधान्यांसाठी मी आपल्या तरुण पिढीला दोष देत नाही. आताच्या आकडेवारीनुसार येत्या काळात आपल्याला काम करणाऱ्या लोकांच्या घटत्या संख्येचा सामना करावा लागेल.”

फोटो स्रोत, Getty Images
या देशातील थिंक टँक कोरिया इकॉनॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या एका माहितीनुसार, पुढील 20 वर्षांत देशातील 43% नोकऱ्या स्वयंचलित होतील. याचा काही कंपन्यांना फायदा होणार आहे.
क्वॉन मिन-जे हे क्वान या कंपनीचे मालक आहेत. ते या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. कारण त्यांची कंपनी दुकानाचं ऑटोमेशन करण्यासाठी मदत करते. कोरोना काळात त्यांनी ही कंपनी सुरू केली.
“आम्ही कर्मचारी नसलेली आईस्क्रीम दुकाने, किराणा दुकाने आणि कॅफे सुरू करण्यासाठी लोकांना मदत करतो,” असं क्वॉन म्हणतात.
क्वान यांच्या मते, सध्या कर्मचाऱ्यांना दुकानातील वस्तू स्वच्छ करून लावण्याचं काम मिळू शकतं. कोरोना काळानंतरच्या सुरुवातीला हे काम मालक स्वतः करायचे. आता क्वॉन यांची कंपनी दुकानांची देखभाल करू शकतील असे कर्मचारी पुरवत आहे.
याबद्दल बोलताना क्वॉन म्हणाले, “आमचे कर्मचारी दिवसभर अनेक दुकानांना भेट देतात. दुकानांचे व्यवस्थापन करण्यासाठी मालक आम्हाला दरमहा अतिरिक्त 9 ते 19 हजार रुपये ($100 ते $200) देतात.”
क्वॉन यांची कंपनी 100 हून अधिक दुकानांची देखभाल करते.
चोरीच्या घटना फार कमी
या सगळ्या संदर्भात तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो. तो म्हणजे दुकानातील वस्तू चोरीला गेल्या तर? पण गंमत अशी आहे की दक्षिण कोरियामध्ये चोरीच्या घटना खूप कमी होतात.
त्यामुळेच या देशात स्टाफलेस दुकानांचा ट्रेंड वाढत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उलट किम सांगतात की, इथे लोक बारमध्ये पैसे द्यायला विसरून बाहेर पडले तर ते फोन करून बिल भरतात. त्यांच्या बारमध्ये अनेकजण खिशातील पाकीट आणि फोन कोणत्याही काळजीशिवाय टेबलावर ठेवतात.
चोरीची शक्यता 100 टक्के दुर्लक्षित करून चालणार नाही. पण किम यांच्यामते, अशा घटना इतक्या गंभीर नसतील की त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त होईल.
किम यांना चोरीची फार काळजी वाटत नाही. ते सांगतात, “ऑटोमेशनद्वारे पैसे वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक ही तोट्यापेक्षा जास्त आहे. कधीकधी होणाऱ्या चोरींना तोंड देण्यासाठी सिक्युरिटी गार्ड ठेवणं हे संभाव्य चोरींपेक्षा जास्त खर्चाची बाब आहे.”
(ही बातमी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या बिझनेस डेली कार्यक्रमातील एका भागातून घेतली आहे.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC