Home LATEST NEWS ताजी बातमी चेहऱ्याची सूज एका मिनिटात गायब? ‘व्हायरल ट्रिक्स’ खरंच उपयोगी आहेत का?

चेहऱ्याची सूज एका मिनिटात गायब? ‘व्हायरल ट्रिक्स’ खरंच उपयोगी आहेत का?

18
0

Source :- BBC INDIA NEWS

चेहऱ्यावरची सूज कशी घालवायची?

फोटो स्रोत, Getty Images

इंटरनेटवर दिसणारे ‘फेस डी-पफ’ हॅक्स दिसतात भारी, पण खरंच ते इतके जादुई आहेत का?

तज्ज्ञ सांगतात, हे ट्रेंड्स फक्त तात्पुरता ग्लो देतात, आणि बाकी सगळं फक्त इंटरनेटचा इफेक्ट!

चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवणं असो किंवा थंड रोलर्स फिरवणं सध्या सोशल मीडियावर चेहऱ्याची सूज झटपट घालवणाऱ्या उपायांचा नुसता पाऊस पडतोय.

हे उपाय व्हीडिओमध्ये बघायला खूप प्रभावी वाटत असले, तरी त्वचातज्ज्ञांच्या मते यातले बरेचसे उपाय फक्त दाखवण्यापुरते आहेत. लोक त्यांचा चुकीचा अर्थ काढतात.

अनेकांना वाटतं हे उपाय कायमचे आहेत पण खरंतर यांचा परिणाम अगदी तात्पुरता असतो आणि याबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत.

त्वचातज्ज्ञ डॉ. आयझा जमील सांगतात की, चेहऱ्यावर सूज येण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीरात पाणी साठून राहणं. जास्त मीठ खाणं, मद्यपान, ॲलर्जी किंवा पुरेशी झोप न मिळणं यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

त्वचातज्ज्ञ डॉ. टीना टियान सांगतात की, इंटरनेटवर गाजणारे हे उपाय साधारणपणे तीन प्रकारचे असतात

  • थंड पाण्याचा वापर
  • मसाज
  • त्वचेला तात्पुरता दिलेला ताण

त्यांच्या मते, “या उपायांमुळे चेहऱ्याची सूज नक्कीच कमी होते आणि छानही वाटतं, पण हा बदल फक्त काही काळासाठीच असतो. याने तुमच्या चेहऱ्याची मूळ ठेवण कायमची बदलत नाही.”

मग चेहऱ्याची सूज घालवण्यासाठी नक्की काय कामाचं आहे आणि कोणत्या फक्त अफवा आहेत? चला तर मग, या तीन लोकप्रिय उपायांमागचं सत्य काय ते जाणून घेऊया.

1. थंड पाण्याचा किंवा बर्फाचा वापर

बर्फाच्या पाण्यात तोंड बुडवू की नको? असा विचार तुम्ही कधी केला असेल, तर काळजी करू नका. तुम्ही एकटेच नाही आहात. आजकाल सोशल मीडियावर हा ‘आईस फेशियल’चा ट्रेंड खूप गाजत आहे. हा उपाय सौंदर्यासाठी आणि स्वतःची सहनशक्ती तपासण्यासाठी केला जातो.

डॉ. टीना सांगतात की, “लोकांना हे का आवडतं याचं साधं कारण आहे ते म्हणजे खूप थंडाव्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे चेहऱ्यावरची सूज कमी व्हायला मदत होते.”

चेहऱ्यावरची सूज कशी घालवायची?

फोटो स्रोत, Getty Images

आईस फेशियल, ‘क्रायो ग्लोब्स’ म्हणजे थंड गोळे किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले शीट मास्क या सगळ्यांमागे हेच शास्त्र आहे.

पण डॉ. टीना असंही म्हणतात की, “हा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला बर्फाच्या पाण्यात डोकं बुडवायची गरज नाही. थंड पाण्याचा हबका मारला किंवा एखाद्या थंड कापडाने चेहरा शेकला तरीही काम होतं.”

डॉ. आयझा यांच्या मते, “यामुळे विशेषतः सकाळी उठल्यावर चेहरा थोडा तजेलदार आणि ओढल्यासारखा वाटू शकतो. पण हा परिणाम फक्त काही तासांसाठीच असतो.”

डॉ. टीना शेवटी एक मोलाचा सल्ला देतात की, “खूप जास्त बर्फ वापरला तर नाजूक त्वचेला त्रास होऊ शकतो किंवा चेहरा लाल पडू शकतो. म्हणूनच, कोणताही उपाय करताना ‘अति तिथे माती’ करू नका. अगदी हलक्या हाताने आणि जपूनच हे करा.”

2. फेस रोलर्स आणि मसाज

एकेकाळी फक्त मोठ्या पार्लरमध्ये दिसणारे ‘फेस रोलर्स’ आणि ‘गुआ शा’ म्हणजेच चेहऱ्याचा मसाज करण्यासाठी वापरला जाणारा एक खास दगड

आता आपल्या प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळतात. अनेकांना असं वाटतं की हे वापरल्यामुळे चेहरा कायमचा बारीक होतो किंवा चेहऱ्याचा आकार बदलतो.

पण डॉ. आयझा स्पष्ट सांगतात की, “याने चेहऱ्यावरची चरबी कायमची कमी होत नाही किंवा चेहऱ्याची ठेवण बदलत नाही.” याकडे फक्त ‘चेहऱ्याला आराम देणारं साधन’ म्हणून बघणं जास्त योग्य ठरेल.

चेहऱ्यावरची सूज कशी घालवायची?

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात, यामुळे चेहऱ्याची सूज तात्पुरती नक्कीच कमी होऊ शकते. डॉ. टीना म्हणतात, “जर तुम्ही रोज हलक्या हाताने मसाज केला, तर चेहऱ्यात साठलेलं पाणी नैसर्गिकरीत्या बाहेर पडायला मदत होते.”

जेव्हा तुम्ही हे रोलर्स चेहऱ्यावर फिरवता तेव्हा त्वचेखाली एका जागी साठलेलं पाणी वाहून जातं आणि सूज उतरते. हे रोलर्स फ्रीजमध्ये ठेवून थंड करून वापरले, तर त्याचे रिझल्ट्स आणखी छान मिळतात.

या उपायाचा तसा काहीच तोटा नाही, पण डॉ. टीना याची दुसरी बाजू ही सांगतात की “खूप जोरात दाब देऊन मसाज करू नका. उगाच जास्त जोर लावला तर चेहऱ्यावर निळे डाग पडू शकतात किंवा त्वचेखालच्या बारीक नसा फुटू शकतात. त्यामुळे हे अगदी हळूवार करा.”

3. कॅफिन क्रीम्स

तुम्ही सोशल मीडियावर किंवा दुकानांमध्ये ‘कॅफिन आय क्रीम’ नक्कीच पाहिलं असेल. “सकाळी उठल्यावर हे क्रीम लावा आणि डोळे लगेच टवटवीत करा,” असं सांगणारे अनेक व्हीडिओ पाहण्यात आले असतील.

खरंतर आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा खूप पातळ असते त्यामुळे तिथे पाणी साठून लगेच सूज येते. म्हणूनच या क्रीम्स तिथे जास्त प्रभावी ठरतात.

इतर अनेक फॅन्सी उपायांसारखं हे केवळ मनाचं समाधान नाही; डॉ. टीना सांगतात की या क्रीममागे खरोखर शास्त्रीय आधार आहे.

त्या म्हणतात, “कॅफिनमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे ही क्रीम लावल्याने डोळ्यांखालील फुगीरपणा किंवा सूज खरोखरच कमी होते.”

चेहऱ्यावरची सूज कशी घालवायची?

फोटो स्रोत, Getty Images

थोडक्यात काय, तर कॅफिनमुळे डोळ्यांच्या नसा थोड्या आकुंचन पावतात आणि तिथली सूज कमी दिसते. डॉ. आयझा असंही सांगतात की, यामुळे डोळ्यांखाली साठलेलं पाणी कमी होतं आणि काळपटपणाही थोडा कमी दिसायला मदत होते.

डॉ. टीना असा सल्ला देतात की, “जर तुम्ही डोळ्यांसाठी क्रीम वापरणार असाल, तर त्यात कॅफिनसोबतच त्वचेला ओलावा देणारे घटकही असायला हवेत, ज्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली राहील.”

त्या म्हणतात की, “तुम्ही हे क्रीम फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता किंवा थंड चमच्याच्या मागच्या बाजूने देखील लावू शकता.”

डॉ. आयझा यांच्या मते, घरगुती उपाय जसे की थंड चमचा किंवा थंड केलेले टी-बॅग्ज वापरणे हे देखील तेवढेच प्रभावी ठरते. यामुळे डोळ्यांखालील सूज तात्पुरती कमी होते आणि त्वचेला थंडावा मिळतो.

डॉ. टीना यावर सहमत आहेत. त्या म्हणतात की, “हे घरगुती उपायसुद्धा त्याच पद्धतीने काम करतात, “पण त्यांचा परिणाम क्रीमच्या तुलनेत थोडा कमी असू शकतो.”

चेहऱ्यावरची सूज कशी घालवायची?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. टीना म्हणतात की, जरी क्रीममुळे सूज कमी होत असली, तरी ती येतेच का यावर उपाय करणं जास्त महत्त्वाचं आहे.

त्या काही सोप्या टिप्स देतात की, रात्रीच्या वेळी जेवणातलं मीठ कमी करा, मद्यपान टाळा, ॲलर्जीवर नीट इलाज करा, भरपूर झोप घ्या आणि झोपताना डोकं थोडं उंचावर ठेवा.

बहुतेक वेळा ही सूज काही गंभीर नसते आणि ती आपोआप उतरते. पण डॉ. टीना याविषयी एक महत्वाचं सांगतात की, “जर ही सूज सारखी येत असेल, वाढत असेल, दुखत असेल किंवा त्यासोबत श्वास घ्यायला त्रास होणं किंवा अंगावर इतरत्र सूज येणं असे त्रास होत असतील, तर मात्र घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांना नक्की दाखवा.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC