Home LATEST NEWS ताजी बातमी ‘क्षेपणास्त्र आदळल्यानंतर संपूर्ण आकाश लाल झालं असं वाटलं,’ पाकिस्तानातील प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

‘क्षेपणास्त्र आदळल्यानंतर संपूर्ण आकाश लाल झालं असं वाटलं,’ पाकिस्तानातील प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

हसन, आतिफ आणि मोहम्मद बिलाल.

“मी गच्चीवर झोपलो होतो, त्याचवेळी दोन क्षेपणास्त्रं आमच्यावरून गेली. त्यापैकी एक क्षेपणास्त्र जमिनीवर आदळले आणि त्यानंतर संपूर्ण परिसरातले लाईट मिनिटभरासाठी बंद झाले. वीज पूर्ववत झाली, तेव्हा दुसरं क्षेपणास्त्रंही पडलं. एकच गोंधळ उडाला होता. क्षेपणास्त्रं आदळल्यानंतर आकाश लाल झाल्यासारखे वाटले”.

“त्यानंतर असेच जवळपास चार हल्ले झाले. एक क्षेपणास्त्र मरकझ तय्यबा मशिदीच्या मध्यभागी पडलं. त्यानंतर लोक बाहेर आले आणि नेमकं काय झालं ते पाहण्यासाठी मशिदीकडं धावले. त्यानंतर समजलं की भारतानं हल्ला केला आहे,” प्रत्यक्षदर्शी आतिफ यांनी बीबीसी ऊर्दूशी बोलताना ही माहिती दिली.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहराजवळच्या नांगल सहादान गावातील रहिवासी आतिफ हे भारतानं केलेल्या हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत.

भारतीय लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील अनेक ठिकाणी ‘दहशतवादी’ तळांवर हल्ले केले.

पाकिस्तानी लष्करानं यात नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला आहे. बीबीसीने पाकिस्तान प्रशासित काश्मीर आणि पंजाबमधील मुरीदके भागातील हल्ल्यांतील काही प्रत्यक्षदर्शींशी बोलून याबाबत माहिती घेतली.

त्यावेळी आतिफ यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, ‘क्षेपणास्त्रं मरकझ तय्यबातील मुख्य मशिदीवर पडली. त्यावेळी मशिदीमध्ये एका वयस्कर व्यक्तीशिवाय दुसरं कोणीही नव्हतं.’

मग हल्ला झाला तेव्हा इथे कोणी नव्हते का?

बीबीसीच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना आसिफ म्हणाले की, “आठवडाभरापूर्वी समजले होते की, याठिकाणी हल्ला होऊ शकतो. त्यावेळी लोक तिथून निघून गेले आणि हा परिसर रिकामा झाला होता.”

“पूर्वी सामान्य लोक याठिकाणी जाऊन अन्न मिळवायचे. पण आता कोणी जात नाही. याठिकाणी आत लोकांची घरंही होती, पण ही समस्या निर्माण झाली तेव्हापासून लोकांनी हा भाग रिकामा केला आहे.”

तर, हसन नावाच्या दुसऱ्या प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीबरोबर बोलताना याठिकाणी एक मदरसा, एक रुग्णालय आणि एक शाळा होती असं सांगितलं.

“प्रार्थनेवेळी मशिदींमधून घोषणा करण्यात आली होती की, उद्यापासून सर्व शाळा सुरू होतील त्यामुळं सर्वांना शाळेत यावं लागेल. पण 12.35 वाजता एक स्फोट झाला.”

मरकझ तय्यबा

घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आम्ही छतावर झोपलो होतो. त्यावेळी चार क्षेपणास्त्रं आली. पहिल्याचा खूप मोठा आवाज आला. चारपैकी तीन मध्यभागी पडले. एक त्यानंतर आले, पण त्याचा आवाज आला नाही. अत्यंत वेगात ते छतावरून गेले.”

हे अंतर मुरीदकेपासून दोन ते तीन किलोमीटरवर असल्याचं त्यांनी बीबीसीनं विचारलं असता सांगितलं. स्फोटानंतर खूप गोंधळ उडाला आणि लोक घराबाहेर पडले. मग काही लोक आपली घरं सोडून मुरीदकेकडे निघून गेले, असंही ते म्हणाले.

सलग तीन क्षेपणास्त्रं कोसळली

मोहम्मद बिलालही या हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींपैकी एक असून ते नांगल सहादानमधील रहिवासी आहेत. क्षेपणास्त्रं गावात धडकली तेव्हा ते गावातील घरात एकटेच होते.

“मी रात्री हाक छतावर गेलो होतो तेव्हा अचानक एक क्षेपणास्त्र येताना आणि स्फोट होताना दिसले.मी लगेच घर सोडले आणि इथल्या मशिदीत आलो.”

“त्यांनी सलग तीन क्षेपणास्त्रं डागली आणि मी त्यांच्या स्फोटांचे आवाज ऐकले. ते फारच भीतीदायक होतं”, असंही ते म्हणाले.

मुरीदकेमधील रहिवासी असलेले मोहम्मद युनूस शाह यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, “भारतानं डागलेली चार क्षेपणास्त्रं नांगल सहादान येथील शैक्षणिक संकुलावर पडली. तिथं एक मशीदही होती, तीही उध्वस्त झाली.”

मरकझ तय्यबामध्ये हल्ल्यानंतर आलेली सुरक्षा दलं आणि बचाव पथकाचे कर्मचारी.

मोहम्मद युनूस पुढं म्हणाले की, “इथं मुलांसाठी शाळा आणि महाविद्यालयं, वसतीगृहं आणि वैद्यकीय संकुल आहे. त्यावर हल्ला झाला. पहिली तीन क्षेपणास्त्रं एकापाठोपाठ आली, तर चौथं पाच ते सात मिनिटांच्या नंतर आलं.”

त्यांच्या मते, “तिथं एक रहिवासी परिसर असून तिथं काही कुटुंब राहत होती. तसंच त्यांनी एक मशीदही उद्ध्वस्त केली.”

“या परिसरात अजूनही दहशत आहे. सर्व लोक इथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. सरकारी यंत्रणा इथं आहे. मदत कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलीसही इथं आहेत,” असंही त्यांनी म्हटलं.

‘स्फोटाने माझे घर हादरले’

मुझफ्फराबादमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात लक्ष्य झालेल्या बिलाल मशिदीजवळ घर असलेले मोहम्मद वाहीद हेदेखील घटनेच्या प्रत्यक्षदर्शींपैकी एक आहेत.

ते म्हणाले की, “पहिल्या स्फोटाने माझे घर हादरले. तेव्हा मी गाढ झोपेत होतो. मी रस्त्यावर पळत गेलो, तिथं लोक आधीच बाहेर आलेले होते. काय चाललंय समजण्याआधीच, आणखी तीन क्षेपणास्त्रं डागण्यात आली. त्यामुळं प्रचंड भीती आणि गोंधळ निर्माण झाला.”

मोहम्मद वाहीद यांच्या मते, या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा दलं घटनास्थळी पोहोचली.

भारताने स्थानिक मशिदीला का लक्ष्य केलं? असा प्रश्नही वाहीद यांनी उपस्थित केला.

मुझफ्फराबादमधील बिलाल मशीद.

मुझफ्फराबादचे रहिवासी अब्दुल बासीत अवान यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना म्हटलं की, “लोक नेहमीप्रमाणे झोपायला गेले होते. आमच्याकडे लोक दहा किंवा साडेदहाला झोपत्ता. अचानक गॅस सिलेंडरच्या स्फोटासारखा आवाज आला. त्यानंतर, मिनिटभरानंतर सहा ते सात स्फोटांचे मोठे आवाज आले. ती क्षेपणास्त्रं होती. सुरुवातीला काय चाललंय ते मला समजलंच नाही.”

अवान म्हणाले की, त्यांचं घर हल्ला झालेल्या मशिदीजवळ आहे. हल्ला रात्री 12.30 च्या सुमारास सुरू झाला आणि ते बाहेर गेले तेव्हा त्यांना मशिदीवर मॉर्टर शेलचा हल्ला होत असल्याचं दिसलं.

शेल म्हणजे तोफगोळ्याच्या कवचाच्या धातूचे तुकडे.

बिलाल मशिदीचा कोसळलेला भाग.

“माझी मुलगीही शेलमुळं जखमी झाली. या भागात माझ्या कुटुंबाची अनेक घरं आहेत आणि आम्ही पिढ्यानपिढ्या इथं राहत आहोत. आमच्या भागात हल्ला झाला ती जामा मशीद होती.

“घराची भिंत दाखवत ते म्हणाले की, हल्ल्यामुळं त्यांच्या घरांचंही नुकसान झालं आहे. या भागात पिढ्यानपिढ्या लोक राहत आहेत आणि इथं दहशतवादी नाहीत,” असंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC