Home world news marathi कोरोनाची नवी लाट! ‘या’ आशियाई देशांतील रुग्णसंख्येत मोठी वाढ; आता संसर्ग हवेमार्फत...

कोरोनाची नवी लाट! ‘या’ आशियाई देशांतील रुग्णसंख्येत मोठी वाढ; आता संसर्ग हवेमार्फत नाही तर…

2
0

Source :- ZEE NEWS

Covid-19 New Wave In South East Asian Countries: संपूर्ण जगाला जवळपाच अडीच वर्ष वेठीस धरणाऱ्या कोरोनाची नवी लाट पुन्हा एकदा आशिया खंडातील देशांमध्ये पसरली आहे. सन 2019 साली चीनमधील वुहान येथून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची नवी लाट आता हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, चीन आणि इतर आग्नेय आशियामधील इथर देशांमध्ये पसरली असून यामुळे घबराट निर्माण झाली आहे. कोरोनाने जवळपास दोन वर्षानंतर डोकं वर काढलं आहे. 

कोणकोणत्या देशांमध्ये वाढली रुग्णसंख्या?

हाँगकाँग, सिंगापूर, चीन आणि थायलंडमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने आशियामध्ये कोविड-19 लाट परतल्याचं सांगितलं जात आहे. कोविड-19 आशियामध्ये सायलेंट किलर म्हणून पुनरागमन करत असल्याचं आरोग्य विषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाचा काळ सरला असून अनेकांना इम्युनिटी प्राप्त झाल्याने कोरोना संसर्गाचा सर्वात वाईट कालावधी मागे पडल्याचा समज या नव्या लाटेने खोडून काढला आहे. नव्याने समोर आलेल्या आकडेवारीमध्ये कोरोना-19 आजही अत्यंत सक्रीय असून कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

आरोग्य अधिकारी सतर्क

साधारणपणे उन्हाळ्यामध्ये श्वसनाचे आजार सहसा कमी होतात अशा कालावधीमध्येही कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होतोय. हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या प्रमुख शहरांमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच आता संसर्ग वाढत असलेल्या देशांमधील आरोग्य अधिकारी अधिक सतर्क झाले आहेत. चीन आणि थायलंडमध्ये कोरोना उद्रेकाची चिन्हं दिसत आहेत. या ठिकाणी अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. 

सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट

हाँगकाँगमध्ये सध्या गेल्या वर्षभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हिटी दर दिसून येत आहे. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या कम्युनिकेबल डिसीज ब्रँचचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटीव्ह अहवालांची संख्या नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात, शहरात 31 गंभीर संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांची नोंद झाली. मागील वर्षभरातील ही एका आठवड्यातील सर्वोच्च नवी रुग्णसंख्या आहे.

कोरोना का वाढतोय शोध सुरु

आरोग्य अधिकारी सध्या कोरोना पुन्हा का वाढतोय याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे आता श्वसनावाटे होणाऱ्या या संसर्गाचा मूळ स्रोत सांडपाणी आहे का अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या सांडपाण्याच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय का याबद्दलची चाचपणी सुरु आहे. कोविडशी संबंधित लक्षणं असलेल्या रुग्णांची रहिवासी रुग्णालयांबरोबरच स्थानिक क्लिनिकमधील संख्याही वाढली असून हे रुग्ण याचा ठिकाणी उपचार घेत असल्याने सार्वजनिक आरोग्यविषय चिंता अधिक वाढली आहे.

प्रसिद्ध गायकाला कोरोनाची लागण

हाँगकाँगमधील लोकप्रिय गायक इसन चॅनला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तैवानमधील त्याचे नियोजित संगीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रसिद्ध व्यक्तींनाही कोरोनाची पुन्हा लागण होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

SOURCE : ZEE NEWS