Home LATEST NEWS ताजी बातमी कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शाह कोण आहेत?

कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शाह कोण आहेत?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

सोफिया कुरैशी आणि विजय शाह

फोटो स्रोत, ANI

भारत पाकिस्तान सैन्य संघर्षावेळी भारतीय लष्करातर्फे ब्रिफिंग करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळातील आदिवासी विकास मंत्री असलेल्या विजय शाह यांना सुप्रीम कोर्टाने देखील फटकारले आहे.

विजय शाह यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश हायकोर्टाने दिले होते. त्या आदेशाविरोधात विजय शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी सुप्रीम कोर्टानेच शाह यांना सुनावले आहे.

विजय शाह हे मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री आहेत. मध्यप्रदेश राज्यातील आदिवासी समुदायाच्या विकासासाठी वेगळे खाते आहे. त्या खात्याचा पदभार विजय शाह यांच्याकडे आहे.

कर्नल सोफिया यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली. 14 मे रोजी मध्यप्रदेश हायकोर्टाने त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली आणि विजय शाह यांच्याविरोधात FIR दाखल करा असे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कार्यालयाने बुधवारी माहिती दिली की, हायकोर्टाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री यादव यांनी देखील शाह यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा वाद चिघळल्यानंतर विजय शाह यांनी माफी मागितली आहे.

शाह म्हणाले, “नुकतेच मी जे वक्तव्य केले, त्यामुळे प्रत्येक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यामुळं केवळ मी मनाने मी व्यथितच झालो नाही तर दुःखी देखील झालो आहे. मी माफी मागत आहे.”

विजय शाह यांनी सोफिया कुरेशी या देशाच्या भगिनी आहेत असे म्हटले आहे. ते म्हणाले, “त्यांनी राष्ट्र धर्माचे पालन करताना जात आणि समाजाच्या वर जाऊन काम केले आहे. आपल्या सख्ख्या बहिणीहून त्या अधिक सन्मानास पात्र आहेत.”

विजय शाह

फोटो स्रोत, Vijay Shah/Twitter

विजय शाह म्हणाले, “आज मलाच माझ्या वक्तव्याची लाज वाटत आहे. मी सर्व समाज आणि समुदायाची माफी मागतो. भगिनी सोफिया आणि देशाच्या सन्माननीय सेनेचा मी नेहमीच सन्मान करत आलो आहे. आज हात जोडून मी सर्वांची मनापासून मागत आहे.”

त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरनंतर हायकोर्टाने मध्यप्रदेश पोलिसांना देखील खडे बोल सुनावले आहेत.

हायकोर्टाने म्हटले आहे की, विजय शाह यांच्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये वादग्रस्त वक्तव्यासाठी लावणे अपेक्षित असलेली कलमं नाहीत. पुढं कोर्टानं म्हटलं की, पोलीस तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली होईल.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्या. बी. आर. गवई यांनी एका दिवसापूर्वीच पदभार स्वीकारला. आज त्यांच्या पीठासमोरच ही सुनावणी झाली.

हायकोर्टाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. हा आदेश रद्द करण्याची विनंती विजय शाह यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्ट

न्या. बी. आर. गवई यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, तुम्ही कशा प्रकारे वक्तव्य करत आहात? घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून मर्यादाशील वर्तणुकीची अपेक्षा केली जाते. जेव्हा देश या गंभीर परिस्थितीतून जात आहे तेव्हा प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलला गेला पाहिजे.

विजय शाह यांच्या वकिलाने युक्तिवादावेळी म्हटले ‘एफआयआर स्थगित करण्यात यावे. हायकोर्टाने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन काम केले आहे. जोपर्यंत शाह यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही तोपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई व्हायला नको.’

त्यावर सुरुवातीला सरन्यायाधीशांनी हायकोर्टात जाण्यास सांगितले, पण नंतर या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणीस तयार झाले.

विजय शाह काय म्हणाले होते?

भाजप नेते आणि मंत्री विजय शाह रविवारी इंदोर जिल्ह्यातील महूतील रायकुंडा गावात एका कार्यक्रमात संबोधित करत होते.

त्यांचे वक्तव्य समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. त्यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांना ‘दहशतवाद्यांची बहीण’ म्हटले होते.

विजय शाह

त्यांच्या या वक्तव्याचा केवळ मध्य प्रदेशातच नाही तर सर्व देशभरातील लोकांनी निषेध झाला.

विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. विजय शाह यांचे विधान चिथावणीखोर असून भाजपने त्यांची हकालपट्टी करावी असे म्हटले आहे.

काँग्रेस नेते अरुण यादव ट्विटरवर म्हणाले, “विजय शाह यांच्याविरोधात FIR नोंदवून तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.”

कोण आहेत विजय शाह ?

विजय शाह यांचे पूर्ण नाव कुंवर विजय शाह आहे. ते 8 वेळा आमदार झाले आहेत. पहिल्यांदा 1990 मध्ये भाजपच्या तिकिटावरुन ते निवडून आले.

मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील हरसूद विधानसभा मतदारसंघात त्यांचे राजकीय वर्चस्व राहिले आहे. हा भाग गोंड आदिवासी बहुल आहे.

याआधी ते शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत.

राजकीय पत्रकार सचिन श्रीवास्तव सांगतात, “विजय शाह हे मकडाई राजघराण्याचे वंशज आहेत. हे राजघराणे गोंड राजघराणे आहे. आणि शाह हे आदिवासी समुदायातील आहेत.”

विजय शाह यांचे भाऊ संजय शाह हे टिमरीन मतदारसंघाचे आमदार होते.

शिवराज सिंह चौहानांच्या पत्नीबाबतही केले होते वक्तव्य

विजय शाह यांनी महिलांशी संबंधित आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

विजय शाह यांनी यापूर्वीही अशी वक्तव्ये केली असल्याचं भोपाळमधील ज्येष्ठ पत्रकार गिरिजा शंकर यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.

त्यांनी सांगितलं की, 2013 मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान झाबुआ येथील एका कार्यक्रमात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नीबाबत दुहेरी अर्थ निघणारं वक्तव्य केलं होतं.

त्यावर शिवराज सिंह चौहान एवढे संतापले होते की, शाह यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण चार महिन्यांनी पुन्हा शिवराज सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला.

महिलांबाबतच्या वक्तव्यांची अशी इतरही प्रकरणं असल्याचं ज्येष्ठ पत्रकार सचिन श्रीवास्तव यांनी सांगितलं.

बीबीसीबरोबर बोलताना ते म्हणाले की, “आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला भेट देताना त्यांनी टी शर्ट बाबत केलेल्या एका वक्तव्यावर मोठी टीका झाली होती.”

त्यांनी आणखी एक घटना सांगितली. 2018 मध्ये शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री विजय शाह म्हणाले होते की, “तुम्ही आज गुरुंच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या नाहीत, तर पुढच्या जन्मी तुम्हाला घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील. त्यांच्या या वक्तव्याचा ट्रान्सजेंडर समुदायाने निषेध नोंदवला होता.

“सप्टेंबर 2022 मध्ये खंडवातील एका सभेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एखादा मुलगा 50-55 वर्षांचा झाला आणि त्याचं लग्न झालं नाही तर लोक त्याला काही, कमतरता आहे का? असं विचारतात,” असं ते म्हणाले होते.

विजय शाह सुरुवातीपासूनच भाजपशी संलग्न आहेत. त्यांचे भाऊ संजय शाह हे आधी काँग्रेसमध्ये होते. नंतर ते भाजपमध्ये गेले. तेही आमदार होते.

सचिन श्रीवास्तव यांच्या मते, अनेक प्रयत्नांनंतरही भाजपमध्ये आदिवासी नेतृत्व उदयास आलं नाही, त्यामुळं विजय शाह यांचा दावा अद्याप कायम आहे.

गिरिजा शंकर याच्या मते, हा भारतीय राजकारणातील नाईलाज आहे. “जातीय आणि सामाजिक आधार असलेले नेते ही भारतीय राजकारणाची गरज आहे. काँग्रेस, भाजप किंवा इतर सर्व पक्षांबाबत हे सारखंच आहे. आदिवासी नेतृत्वाच्या अभावामुळे, विजय शाह स्वतःला सर्वात ज्येष्ठ आदिवासी नेता म्हणतात.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC