Home LATEST NEWS ताजी बातमी ‘एपस्टिनला 3-4 वेळाच भेटलो’, हरदीप पुरींचं स्पष्टीकरण; काँग्रेसने विचारले ‘हे’ 6 प्रश्न

‘एपस्टिनला 3-4 वेळाच भेटलो’, हरदीप पुरींचं स्पष्टीकरण; काँग्रेसने विचारले ‘हे’ 6 प्रश्न

6
0

Source :- BBC INDIA NEWS

लोकसभेत राहुल गांधींनी एपस्टिन फाइलचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यावर आरोप केला. त्यानंतर हरदीपसिंह पुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिलं.

फोटो स्रोत, Getty Images

4 तासांपूर्वी

वाचन वेळ: 6 मिनिटे

गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या कामकाजावेळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये गदारोळ होत होता.

मोठ्या अडथळ्यानंतर बुधवारी (11 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका-भारत व्यापार करारावरून मोदी सरकारवर अनेक आरोप केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर पूर्णपणे ‘शरणागती’ पत्करली आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

राहुल गांधी यांनी जेफ्री एपस्टिन फाइल्स, अनिल अंबानी आणि अदानींशी संबंधित प्रकरणांवर भाष्य केलं. त्यांनी अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावरही आरोप केले.

राहुल गांधींनी हे मुद्दे उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाला.

हरदीप पुरी म्हणाले की, “एपस्टिनशी त्यांची भेट फारच मोजक्या प्रसंगी झाली होती. तेही शिष्टमंडळाचा भाग म्हणूनच, आणि त्यांच्यात फक्त एकदाच ई-मेलची देवाणघेवाण झाली होती.”

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी ‘निराधार आरोप’ करत असल्याचं म्हटलं. राहुल गांधींच्या भाषणातील ‘चुकीचे मुद्दे’ कार्यवाहीतून काढून टाकले जातील, असंही त्यांनी सांगितलं.

माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख केल्यानंतर त्यांच्या नेत्यांना बोलू दिलं गेलं नाही, असा आक्षेप या भाषणाआधी विरोधकांनी घेतला होता.

मागील आठवड्यात लोकसभेत भाषण करताना राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकातील काही भाग वाचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यावरून राजकीय वाद निर्माण झाला होता.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अप्रकाशित मजकूर सभागृहात वाचून दाखवता येऊ शकत नाही, असं म्हटलं होतं. यानंतर विरोधकांनी त्यांच्या नेत्याला बोलू दिलं जात नाही, असा आरोप केला होता.

वाद वाढल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.

या वादानंतर बुधवारी (11 फेब्रुवारी) लोकसभेचं कामकाज सुरू होताच अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराचा उल्लेख केला आणि पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर ‘शरणागती’ पत्करली असल्याचं म्हटलं.

त्याचबरोबर त्यांनी एपस्टिन फाइल्सचा उल्लेख केला. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनीच अनिल अंबानी यांची ओळख अमेरिकन गुंतवणूकदार आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिनशी करून दिल्याचा आरोपही केला.

राहुल गांधी म्हणाले की, “अनिल अंबानी हे एक उद्योगपती आहेत, मग त्यांचं नाव एपस्टिन फाइल्समध्ये असूनही ते तुरुंगात का नाहीत, असा सवाल त्यांनी केला. यासोबतच अनिल अंबानी यांची एपस्टिनशी ओळख करून देणारे हरदीप पुरी यांनाही त्यांनी प्रश्न विचारला. ओळख कोण करून दिली, हे मला माहिती आहे आणि हरदीप पुरी यांनाही ते माहिती आहे.”

राहुल गांधींच्या वक्तव्यावर हरदीप पुरी काय म्हणाले?

त्यांनी सांगितलं की, “एपस्टिनशी संबंधित 30 लाख फाइल्स जाहीर झाल्या आहेत. मी न्यूयॉर्कमध्ये आठ वर्षे होतो. 2009 मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचा राजदूत म्हणून तिथे गेलो आणि 2017 मध्ये मंत्री झालो. या 8 वर्षांत कदाचित तीन-चार बैठकींचा संदर्भ आहे.”

हरदीप पुरी म्हणाले की, “गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी माझ्याकडे आले आणि म्हणाले की ‘काही नावे मनोरंजक ठिकाणी आली आहेत.’ त्यानंतर मी युवा नेते राहुल गांधी यांना सांगायचं ठरवलं आणि म्हटलं की त्यांना एक चिठ्ठी पाठवेन.”

त्यांनी सांगितलं की, “या चिठ्ठीमध्ये मी लिहिलं होतं की, अमेरिकेत भारतीय राजदूतपदावरून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांनी मला इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटमध्ये (आयपीआय) आमंत्रित केलं होतं. मी आयसीएममध्ये महासचिव होतो आणि त्याचे अध्यक्ष ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान होते.”

“आइसीएम हा आइपीआय प्रोजेक्टचा भाग होता. आयपीआयमध्ये माझे बॉस टेरियल रोड लार्सन कुख्यात एपस्टिनला ओळखत होते. मी आयपीआय आणि आयसीएमच्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून काही वेळा एपस्टिनला भेटलो, कदाचित 3 किंवा जास्तीत जास्त 4 वेळा. आयपीआय आणि आयसीएम आंतरराष्ट्रीय प्रकरणांवर काम करत असत आणि एपस्टिन त्याचा भाग नव्हता.”

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी एपस्टिन फाइल्सवर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

फोटो स्रोत, ANI

हरदीप पुरी म्हणाले की, एपस्टिनशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांचा काही संबंध नाही आणि ई-मेलद्वारे जे बोलणे झाले आहे ते सर्व सार्वजनिक आहे.

हरदीपसिंह पुरींच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने पुन्हा त्यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी एक्सवर पोस्ट करताना पुरी यांना सहा प्रश्न विचारले.

पवन खेरा यांनी लिहिलं की, हरदीपसिंह पुरी म्हणाले की त्यांच्या ‘संपर्कांमुळे’ (कॉन्टक्ट्स) त्यांची रीड हॉफमॅनशी भेट झाली. पण त्यांनी जे सांगितलं नाही, ते खूप महत्त्वाचं आहे.

4 ऑक्टोबर 2014 रोजी एपस्टिनने हरदीपसिंह पुरी यांना ई-मेल केला: “रीडशी भेट झाली का?”

हरदीप यांनी काही तासांतच उत्तर दिलं : “मी आज दुपारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका मीटिंगसाठी आहे. मित्रा, तू तर गोष्टी घडवून आणतो. काही सल्ला आहे का?”

1) हरदीप हे रीडला भेटणार आहेत?, हे एपस्टिनला आधीच कसं कळलं?

2) एपस्टिनच तो ‘संपर्क’ (कॉन्टक्ट) होता का, की ज्याने रीड हॉफमॅनशी भेट घडवून आणली होती?

3) हरदीप त्यांच्याशी झालेल्या भेटीच्या तपशीलांची चर्चा का करत होते?

4) एपस्टिनला त्यांनी ‘मित्र’ म्हणून संबोधित का केलं?

5) एपस्टिन हरदीप यांच्यासाठी काय व्यवस्था करत होता?

6) जर त्यांचा संबंध फक्त योगायोगाने किंवा वरवरचा असेल, तर हरदीप हे एपस्टिनला ‘सल्ला’ का मागत होते?

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टिनशी संबंधित आपली मोठी नवीन माहिती जाहीर केली.

एपस्टिनने अल्पवयीन मुलींचे केलेले लैंगिक शोषण आणि श्रीमंत व प्रभावशाली लोकांशी त्याच्या संबंधाची माहिती किती होती हे समजून घेण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे त्या विशिष्ट कायद्याअंतर्गत हा खुलासा केला जात आहे.

या नवीन खुलाशात 30 लाखाहून अधिक पानांचे दस्तऐवज जाहीर केले जात आहेत, असं अमेरिकेचे डेप्युटी अॅटर्नी जनरल टॉड ब्लँचे यांनी सांगितलं.

किरेन रिजिजू म्हणाले, ‘राहुल गांधींचे आरोप निराधार’

हरदीप पुरी यांच्यावरील आरोपानंतर आणि राहुल गांधींच्या भाषणावर वाद वाढल्यावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधी ‘निराधार आरोप’ करत आहेत. त्यांच्या भाषणातील ‘चुकीचे मुद्दे’ कामकाजातून काढून टाकले जातील.

रिजिजू म्हणाले, “अर्थसंकल्पावर भाषण देताना राहुल गांधी कोणताही पुरावा न दाखवता, कोणताही तर्क न वापरता आणि नोटीस न देता आरोप करत आहेत. ते भाषणात जे चुकीचं बोलले आहेत, ते सर्व हटवलं जावं. असंसदीय शब्द आणि खोट्या गोष्टींचाही उल्लेख व आरोप काढले पाहिजेत.”

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

फोटो स्रोत, ANI

त्यांनी सांगितले, “मी राहुल गांधींना आठवण करून दिली की, या देशाला कोणी विकू शकत नाही, कोणी खरेदीही करू शकत नाही. त्यावर राहुल गांधी म्हणाले की कोणी भारत विकला आणि कोणी खरेदी केला. भारत विकण्याची किंवा खरेदी करण्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.”

राहुल गांधी यांनी संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते.

राहुल गांधी यांनी आणखी काय म्हटलं?

लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी हे अमेरिकेला ‘पूर्णपणे शरण’ गेल्याचे म्हटले.

“हे दुःखद आहे की, 140 कोटी लोकांचं भविष्य ‘भाजपच्या आर्थिक रचनेचे रक्षण करण्यासाठी धोक्यात टाकलं गेलं आहे,'” असं गांधी म्हणाले.

भारत-अमेरिका व्यापार करारावर बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर पूर्णपणे 'शरणागती' पत्करल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI

राहुल गांधी म्हणाले, “मजेची गोष्ट म्हणजे मला माहित आहे की, सामान्य परिस्थितीत पंतप्रधान भारताला विकणार नाहीत. त्यांनी भारत विकला, कारण त्यांचा गळा घोटला जात आहे. मी म्हटलं होतं की, जेव्हा तुमचा श्वास गुदमरतो, तेव्हा डोळ्यांत भीती दिसते. तुम्ही हे पंतप्रधानांच्या डोळ्यांत पाहू शकता.”

राहुल गांधी म्हणाले की, “भारताने टॅरिफप्रकरणी गुडघे टेकले आहेत. आपला डेटा दिला आहे आणि डिजिटल व्यापाराच्या नियमांवरील आपलं नियंत्रण सोडलं आहे.”

त्यांनी पुढे सांगितलं, “भारताच्या डेटाचे कोणतेही स्थानिक संरक्षण (लोकलायजेशन) नाही, अमेरिकेला सतत डेटा मिळत आहे. आपली सर्वात मौल्यवान संपत्ती त्यांना दिली गेली आहे.”

राहुल गांधी खोटं बोलत आहेत, भाजपचा आरोप

भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे.

“खोटं बोला आणि नंतर परदेशात निघून जा,” असं त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटलं.

त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधी आक्रमक पद्धतीने खोटं बोलत आहेत. त्यांनी विरोधकांवर ‘संसदेत सडकछाप वर्तणूक’ केल्याचा आरोप केला.

त्यांनी सांगितलं की, पूर्वी संसदेचं अधिवेशन हे लोकशाहीचे सर्वोच्च दर्जाचं प्रतीक मानलं जात होतं, पण आज राहुल गांधींच्या वागणुकीने, भाषेनं आणि शैलीनं संसदीय मर्यादा खालच्या पातळीवर नेली आहे.

भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधींनी संसदीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, ANI

त्रिवेदी म्हणाले की, “इशारा देऊनही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा खोटे आरोप केले आणि आक्षेपार्ह शब्द वापरले. संसदेत बोलण्याची एक सभ्यता आणि शालीन भाषा असते, ज्याचे पालन प्रत्येक सदस्याने करणं आवश्यक आहे.”

त्रिवेदी म्हणाले, “राहुल गांधींचं वर्तन आणि ‘संसदीय शिष्टाचार’ न पाळणे यावरून काँग्रेस राजकीय पराभवानंतर अस्वस्थ आहे, हे दिसून येतं. राहुल गांधींनी मानसिक संतुलन गमावलं आहे.”

“राहुल गांधींना कदाचित ते कोणत्या पदावर आहेत, ते काय बोलत आहेत, हेही लक्षात नसेल.”

जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावरही सुधांशू त्रिवेदी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी खोटं कोण बोलत आहे, असा सवाल करत होते. पण या प्रकरणात आधी पुस्तकाच्या प्रकाशकाने आणि नंतर स्वतः लेखकाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हे स्पष्ट झालं की राहुल गांधी यांनीच चुकीचं विधान केलं होतं, असं त्यांनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC