Home LATEST NEWS ताजी बातमी एपस्टिनच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणत्या गोष्टी आढळल्या, कोणती माहिती नव्याने आली समोर?

एपस्टिनच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणत्या गोष्टी आढळल्या, कोणती माहिती नव्याने आली समोर?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

जेफ्री एपस्टिन

(इशारा: या लेखात विचलित करणारी माहिती आहे, ती काही वाचकांना अस्वस्थ करू शकते)

एपस्टिन फाईल्स अंतर्गत, जेफ्री एपस्टिनचे मृत्यूनंतरचे यापूर्वी कधीही समोर न आलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. एपस्टिनचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच, त्याचा मृतदेह स्ट्रेचर असल्याचं आणि वैद्यकीय स्टाफकडून त्याची तपासणी केली जात असल्याचं दाखवणारे फोटो अमेरिकेच्या सरकारनं प्रसिद्ध केले आहेत.

हे 20 फोटो आहेत. यातील अनेक फोटो इतके विचलित करणारे आहेत की ते दाखवता येणं शक्य नाही. जेफ्री एपस्टिनचा तुरुंगात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूशी संबंधित एफबीआयचा गोपनीय अहवाल उघड करण्यात आला आहे. हे फोटो या उघड करण्यात आलेल्या (डीक्लासिफाईड) अहवालाचा भाग आहेत.

तसंच एपस्टिनचा शवविच्छेदन अहवाल आणि तुरुंगातील अंतर्गत कागदपत्रंही त्याबरोबर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

अमेरिकेच्या न्याय विभागानं शुक्रवारी (6 फेब्रुवारी) आणखी कागदपत्रं उघड केली आहेत. ही कागदपत्रं एपस्टिन फाइल्सचाच भाग आहे. नव्याने उघड करण्यात आलेल्या कागदपत्रांची संख्या लाखांच्या घरात आहे.

एपस्टिन, 10 ऑगस्ट 2019 ला तुरुंगातील त्याच्या कोठडीत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्यावर खटल्यापूर्वी न्यूयॉर्कमधील मेट्रोपोलिटन करेक्शनल सेंटरमध्ये लैंगिक तस्करी करणं आणि कट करण्याचे आरोप ठेवण्यात आले होते.

‘जेफ्री एपस्टिनच्या मृत्यूचा तपास’ (जेफ्री एपस्टिन डेथ इन्व्हेस्टिगेशन) असं नाव असलेला एफबीआयचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल एफबीआयच्या न्यूयॉर्कमधील क्षेत्रीय कार्यालयानं (फील्ड ऑफिस) एपस्टिनच्या मृत्यूबाबत केलेल्या तपासाशी संबंधित असल्याचं दिसतं.

हा अहवाल 23 पानांचा असून, त्याच्या प्रत्येक पानावर ‘अनक्लासिफाईड’ म्हणजे ‘गोपनीय नसलेला’ असा स्टॅम्प मारण्यात आलेला आहे.

कोणतीही माहिती वगळण्यात न आलेली ही कागदपत्रं बीबीसी व्हेरिफायनं पाहिली आहेत. या कागदपत्रांमध्ये एपस्टिनच्या मानेचे जवळून काढलेले फोटो आणि जखमांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

यामध्ये एपस्टिनच्या शवविच्छेदन अहवालातील तपशील आणि एपस्टिनच्या मानसिक आरोग्याचा मानसशास्त्रीय अहवालदेखील (मानसोपचारतज्ज्ञानं दिलेला) आहे. एपस्टिननं आत्महत्या करण्यापूर्वीच्या दिवसांमध्ये हा अहवाल तयार करण्यात आला होता.

फोटोंमधून काय दिसतं?

अनेक फोटोंमध्ये दिसतं की एपस्टिन स्ट्रेचरवर आहे, तर वैद्यकीय कर्मचारी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फोटो 10 ऑगस्ट 2019 चे असून, त्यावर स्थानिक वेळेनुसार 06:49 वाजताची वेळ आहे. जेफ्री एपस्टिन त्याच्या कोठडीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर साधारण 16 मिनिटांनंतर ते घेण्यात आले आहेत.

या फोटोंचं लोकेशन स्पष्ट नाही. एपस्टिनला सकाळी 06:39 वाजता जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्यानुसार, हे फोटो तिथेच काढण्यात आल्याचं दिसतं.

जेफ्री एपस्टिन

फोटो स्रोत, Department of Justice

इतर 3 फोटोंवरील तपशीलांवरून (नोट्स) ते हॉस्पिटलमध्ये काढण्यात आल्याचं दिसतं. हे फोटो जवळून काढण्यात आले असून त्यात एपस्टिनचं डोकं दिसतं, तसंच त्या फोटोंमध्ये त्याच्या मानेवरील जखम स्पष्ट दिसते आहे.

प्रत्येक फोटोवर एपस्टिनचं नाव आहे. मात्र काही फोटोंमध्ये ‘जेफ्री’ या त्याच्या नावाचं चुकीचं स्पेलिंग दिल्यानं, ते ‘जेफरी’ असं झालं आहे.

बीबीसीकडून पडताळणी

बीबीसी व्हेरिफायनं एपस्टिनच्या मृतदेहाच्या नव्यानं प्रसिद्ध झालेल्या फोटोंचं रिव्हर्स इमेज सर्च केलं. हे पाहिलं असता, बीबीसी व्हेरिफायला, 30 जानेवारीपूर्वी ऑनलाइन प्रकाशित झालेल्या या फोटोंच्या जुन्या आवृत्ती म्हणजे जुने फोटो सापडले नाहीत. या फाईल्समध्ये प्रसिद्ध झालेली पुष्टी करणारी इतर माहिती किंवा तपशीलदेखील आम्हाला सापडले.

यात अमेरिकेच्या न्याय विभागानं आणि न्यूयॉर्कमधील मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयानं (ऑफिस ऑफ चीफ मेडिकल एक्झामिनर) एपस्टिनबाबत दाखल केलेला 89 पानांच्या शवविच्छेदन अहवालाचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यात एफबीआयच्या न्यूयॉर्कमधील क्षेत्रीय कार्यालयाच्या (फील्ड ऑफिस) ईमेल्सचा देखील समावेश आहे. या ईमेलमध्ये तेच फोटो कव्हर करण्यात आलेले आहेत.

बीबीसी व्हेरिफायनं एपस्टिनच्या मृतदेहाच्या नव्यानं प्रसिद्ध झालेल्या फोटोंचं रिव्हर्स इमेज सर्च केलं.

या अहवालात, मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाच्या (ओसीएमई) एपस्टिनच्या शवविच्छेदन अहवालाचा काही भागदेखील आहे. यात एपस्टिनच्या मानेतील थायरॉईड कार्टिलेजवरील 2 फ्रॅक्चरच्या स्कॅनचा समावेश आहे.

एपस्टिनला अटक झाल्यापासून मृत्यूपर्यंत काय घडलं?

एफबीआयच्या अहवालात, एपस्टिनच्या न्यूयॉर्क मेट्रोपोलिटन करेक्शनल सेंटर येथील अटकेसंदर्भातील 6 पानांच्या टाईमलाईन किंवा घटनाक्रमाचा समावेश आहे. एपस्टिनला केंद्रीय यंत्रणांनी दाखल केलेल्या लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या (सेक्स ट्रॅफिकिंग) आरोपांखाली 6 जुलै 2019 ला अटक झाल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा हा घटनाक्रम आहे.

त्यातून समोर आलं आहे की एपस्टिननं 23 जुलै 2019 ला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, हे टाळण्यासाठी त्याच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती.

एपस्टिनच्या कोठडीत त्याच्यासोबत निकोलस टार्टाग्लिओन नावाचा कैदी होता. निकोलस हा एक माजी पोलीस अधिकारी होता आणि त्याच्यावर हत्येचा आरोप होता. निकोलसनं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एपस्टिननं त्यावेळी केला होता.

दुसऱ्या दिवशी मानसोपचारतज्ज्ञाशी (सायकॉलॉजिस्ट) एपस्टिनची भेट झाल्यावर एपस्टिन म्हणाला होता की त्याला ‘आत्महत्या करण्यात कोणताही रस नाही’ आणि आत्महत्या करणं ‘वेडेपणाचं ठरेल’, असं त्या कागदपत्रात म्हटलं आहे.

जेफ्री एपस्टीन आणि गिलीन मॅक्सवेल

फोटो स्रोत, Getty Images

मानसोपचारतज्ज्ञाच्या अहवालानुसार, एपस्टिन 25 जुलैला म्हणाला होता की “या प्रकरणात माझा खूप वेळ, ऊर्जा गेली आहे. मला माझं आयुष्य आहे आणि मला पुन्हा माझं सामान्य आयुष्य जगायचं.”

अमेरिकेच्या न्याय विभागानं प्रसिद्ध केलेल्या इतर कागदपत्रांमधून दिसतं की, तुरुंग अधीक्षकांनी सल्ला दिला होता की एपस्टिनला कोठडीत एकट्यानं ठेवू नये. त्यांनी एपस्टिनच्या कोठडीची ’30 मिनिटांनी तपासणी’ करण्याची आणि तिथे ‘अचानक राऊंड’ घेण्याची गरज अधोरेखित केली होती.

एपस्टिनच्या कोठडीत असणाऱ्या आरोपीची एपस्टिनच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच सुटका झाली होती. तुरुंगातील कागदपत्रांनुसार, 9 ऑगस्टच्या रात्री, तुरुंगातील सुरक्षा रक्षकांनी एपस्टिनच्या कोठडीची पहाटे 03:00 आणि 05:00 वाजता करायची नियोजित तपासणी केली नाही.

तसंच त्या युनिटमधील कॅमेरा प्रणालीदेखील बंद होती. सकाळी कर्मचारी एपस्टिनच्या कोठडीची तपासणी करायला गेल्यावर, त्यांना एपस्टिनचा मृतदेह आढळला.

एपस्टिन फाईल्सचा भाग म्हणून एफबीआयचा जो अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, तोच अहवाल काही माहिती कव्हर करून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात फक्त 17 पानं आहेत.

या अहवालात मानसोपचारतज्ज्ञाचा अहवाल किंवा एपस्टिनला अटक केल्यानंतरच्या घटनाक्रमाची माहिती यांचा समावेश नाही. तसंच या फाईलमधील फोटोदेखील वगळण्यात आले आहेत.

कव्हर केलेला अहवाल आणि कव्हर न केलेला अहवाल, अशा दोन्हींचा या फाईल्समध्ये समावेश का करण्यात आला आहे, हे स्पष्ट नाही.

यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी अमेरिकेच्या न्याय विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. एफबीआयनं यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

जॉश चीथम यांचं अतिरिक्त वार्तांकन.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC