Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात शक्तिशाली राजकारणी या दोघांमध्ये जोरदार असं भांडण सुरु होतं, तेव्हा ते चित्र कसं दिसतं?
डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात सुरु झालेला संघर्ष हे त्याचं उत्तम असं उदाहरण आहे.
या दोघांमध्येही जे सुरू आहे, ते संपूर्ण जगाला दिसतंय आणि हे काही फारसं सुखद चित्र नाहीये. खरं तर डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क हे दोन्हीही प्रचंड प्रभावशाली अशी व्यक्तिमत्त्वं आहेत, यात काहीच वाद नाही.
विशेष म्हणजे या दोघांकडेही स्वत:च्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ‘ट्रुथ सोशल’ आहे, तर इलॉन मस्क यांच्याकडे ‘एक्स’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. मात्र, त्यांच्यातील मतभेदांचं आता एकप्रकारे शाब्दिक युद्धात रुपांतरण झालं.
दोघेही आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन एकमेकांवर कोरडे आसूड ओढत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना थेट धमकी दिली आहे. ही धमकी मस्क यांच्या अमेरिकन सरकारसोबतच्या अनेक व्यावसायिक करारांशी संबंधित आहे. हे करार खरं तर मस्क यांच्या कंपन्यांसाठी खूप महत्वाचे आहेत.
विशेषतः त्यांच्या ‘स्पेसएक्स प्रोग्राम’साठी ते महत्वाचे आहेत. ‘स्पेसएक्स’चा सर्व कारभार हा सरकारी करारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया साइटवरुन इलॉन मस्क यांच्याविरोधात एक जोरदार असं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं, “इलॉन मस्क यांचं सरकारी अनुदान आणि करार रद्द करणं, हा अर्थसंकल्पातील अब्जावधी डॉलर्स वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.”
खरं तर त्यांची ही पोस्ट एखाद्या धमकीसारखी वाटते.

फोटो स्रोत, Truth Social
जर डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्याविरुद्ध सरकारची शक्ती वापरली, तर ते निश्चितच इलॉन मस्क यांना नुकसान पोहोचवू शकतात. जर असं खरंच झालं, तर इलॉन मस्क यांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (5 जून) टेस्लाच्या शेअरच्या किमतीत 14 टक्के घसरण झाली. यावरून असं दिसून येतं की, या दोघांच्या खडाजंगीमुळे गुंतवणूकदार आधीच चिंतेत पडलेले आहेत.
या दोघांमधील हा संघर्ष खरं तर एकतर्फी नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इलॉन मस्क यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट महाभियोग चालवण्याची मागणी केली.
इतकंच नाही, तर इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एकप्रकारे आव्हान दिलं. “ट्रम्प यांनी आमच्या कंपन्यांच्या निधीमध्ये कपात करावी. आम्हीही ‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’चं काम जलदगतीने बंद करू,” असं मस्क यांनी म्हटलं.
अमेरिका आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर आणि साहित्य पाठवण्यासाठी या ‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’वर अवलंबून आहे.

फोटो स्रोत, Getty Images
खरं तर इलॉन मस्क यांच्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांना प्रतिकार करण्यासाठी प्रचंड संसाधनंही आहेत आणि विविध मार्गही आहेत. येत्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना आव्हान देण्यासाठी ते नवीन राजकीय उमेदवारांना निधी देखील देऊ शकतात.
गुरुवारी (5 जून) दुपारी, इलॉन मस्क यांनी आणखी एक धाडसी पाऊल उचललं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यांनी असा दावा केला की ते “खरोखरच एक मोठा बॉम्ब” टाकणार आहेत.
लैंगिक गुन्हेगार असलेल्या जेफ्री एपस्टाईनबद्दलच्या गुप्त फायलींमध्ये ट्रम्प यांचंदेखील नाव येऊ शकतं, असा एक नवा दावा इलॉन मस्क यांनी केला. मात्र याबाबतचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीविट यांनी इलॉन मस्क यांच्या दाव्यांवर फारच कमकुवत वाटावी, अशी प्रतिक्रिया दिली.
कॅरोलिन लीविट यांनी म्हटलं, “इलॉन मस्क यांच्याकडून सुरू असलेला हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर इलॉन मस्क हे नाराज आहेत. कारण ‘वन बिग ब्युटीफुल बिल’मध्ये त्यांना हव्या असलेल्या धोरणांचा समावेश नाहीये.”
इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपूर्ण सरकारला पराभूत करू शकणार नाहीत. पण तरीही ते गंभीर नुकसान नक्कीच पोहोचवू शकतात.
मस्क हे ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षासाठी राजकीयदृष्ट्या कठीण अडथळे नक्कीच निर्माण करू शकतात. ते वैयक्तिक पातळीवरही त्यांना दुखावू शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित परिस्थिती खूपच तापत चालली आहे, हे लक्षात आलं असेल. गुरुवारी (5 जून) दिवसअखेर, ते निर्माण झालेल्या परिस्थितीत थोडीशी का होईना शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसून आलं.
पोलिसांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी इलॉन मस्क यांचा उल्लेख केला नाही. त्यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर एक मेसेजदेखील पोस्ट केला.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, त्यांना इलॉन मस्क यांच्या ‘विरोधात’ जाण्यास खरं तर काहीच हरकत नाहीये, पण इलॉन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वीच सरकारी सेवा सोडली असती, तर बरं झालं असतं.
त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं लक्ष दुसऱ्या गोष्टीवर वळवलं. त्यांनी त्यांच्या ‘बिग, ब्युटीफूल’ टॅक्स आणि ‘स्पेंडींग बिला’चा प्रचार करण्यास सुरुवात केली. असं असूनही, हा सगळा तणाव लवकरच कमी होईल, अशी लक्षणं दिसत नाहीयेत. कारण, परिस्थितीमधला तणाव अद्यापही कायम आहे.
अपमान आणि धमक्यांची सरबत्ती
डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद गेल्या आठवड्यात हळूहळू सुरू झाला. बुधवारी तो अधिक तीव्र झाला. गुरुवारी दुपारपर्यंत, ओव्हल ऑफिसमध्ये त्या दोघांमध्ये झालेला वाद एकदमच वरच्या टप्प्यावर पोहोचला होता. खरं तर त्यावेळी जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ अमेरिकेला भेट देत होते. या सगळ्यामुळे, ते एका विचित्र शांततेत अस्वस्थ बसलेले दिसत होते. दुसऱ्या बाजूला, या बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प भावनिकपणे बोलत होते. एखाद्या नाकारलेल्या जोडीदारासारखे ते भासत होते.
इलॉन मस्क यांनी त्यांच्या कायद्यावर टीका केल्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी त्यांना इलॉन मस्क यांच्या आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता भासली, ही कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांनी झिडकारुन टाकली.
त्यांनी सांगितलं की इलॉन मस्क यांनी त्यांना शेकडो दशलक्ष डॉलर्स दिले खरे, परंतु म्हणून काही त्यामुळे हा निकाल लागलेला नाही. पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, इलॉन मस्क आता नाराज आहेत, कारण, टेस्ला कंपनीला पैसे गमवावे लागणार आहेत. ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टॅक्स क्रेडिट्स’ बंद करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या योजनेमुळे टेस्ला कंपनी दुखावली जाऊ शकते, यामुळे इलॉन मस्क एवढे चरफडले आहेत, असं ट्रम्प यांना वाटतं.
इलॉन मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लगेचच प्रतिसाद दिला. त्यांच्या 220 दशलक्ष फॉलोअर्ससमोर त्यांनी दिलेलं उत्तर अगदी थोडक्यात होतं आणि ते उत्तर म्हणजे “काहीही असो.”
त्यांनी सांगितलं की, त्यांना कार सबसिडीची पर्वा नाही. त्याऐवजी, त्यांचं लक्ष राष्ट्रीय कर्ज कमी करण्यावर आहे आणि राष्ट्रीय कर्ज हा देशासाठी एक गंभीर धोका आहे, असंही त्यांनी सांगितलं. इलॉन मस्क पुढे असेही म्हणाले की, त्यांनी पाठिंबा दिला नसता तर गेल्या वर्षीच्या निवडणुकीत डेमोक्रॅट्स जिंकले असते. त्यांनी ट्रम्प यांच्यावर आता “अशी कृतघ्नता” दाखवत असल्याचाही आरोप केला. त्यानंतर, इलॉन मस्क यांनी दुपारभर ट्रम्प यांच्यावर जोरदार आणि वारंवार हल्ले करण्यास सुरुवात केली. यामुळे, त्यांच्या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आणि गंभीर अशा एका सार्वजनिक कलहाची अधिकृतपणेच सुरुवात झाली.

फोटो स्रोत, Getty Images
पूर्वी, इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी मिळून एक शक्तिशाली परंतु, अशक्य वाटावी अशी पार्टनरशीप तयार केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात इलॉन मस्क यांची महत्त्वाची भूमिका होती. इलॉन मस्क हे ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’ अर्थात ‘DOGE’ चे प्रमुख होते. या डिपार्टमेंटमुळे, त्यांच्याकडे बजेट कपात करण्याबाबतच्या निर्णयांचे अधिकार होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदभार स्वीकारण्याच्या पहिल्या 100 दिवसांत ‘DOGE’ हा चर्चेतला मुद्दा बनला होता. कारण, या विभागाने अनेक सरकारी संस्था बंद केल्या. यामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढूनही टाकण्यात आलं.
त्यामुळे, लोकांना प्रश्न पडू लागला की ट्रम्प आणि मस्क कधी आणि कसे एकमेकांशी भिडतील. अनेकांना वाटलं होतं की दोघांच्याही अशा व्यक्तिमत्त्वांमुळे नक्कीच वाद निर्माण होतील. काही काळासाठी, असंही वाटलं की ही भाकितं कदाचित चुकीचीही ठरतील. कारण, ट्रम्प मस्क यांना पाठिंबा देत राहिले होते. मस्क यांची लोकप्रियता कमी झाली तरीही ते मस्क यांच्या पाठीशी उभे राहिले. इलॉन मस्क यांचे इतर अधिकाऱ्यांशी भांडण असूनही ट्रम्प यांनी त्यांना पाठिंबा दिला. या वर्षाच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये मस्क देखील जबाबदार ठरले होते. तरीही, ट्रम्प यांनी त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा जेव्हा असं वाटलं की, आता त्यांचं नातं संपेल की काय, तेव्हा तेव्हा मस्क पुन्हा दिसू लागले. ते अनेकदा ओव्हल ऑफिसमध्ये, कॅबिनेट रूममध्ये किंवा एअर फोर्स वनमध्येही दिसले. तर ते कधी ट्रम्पसोबत मार-ए-लागोलाही गेले. “विशेष सरकारी कर्मचारी” म्हणून मस्क यांची भूमिका 130 दिवस चालली. गेल्या आठवड्यात त्यांची ही भूमिका संपुष्टात आली. ओव्हल ऑफिसमध्ये त्यांना मैत्रीपूर्ण निरोप देण्यात आला. ट्रम्प यांनी मस्क यांना व्हाईट हाऊसची सोन्याची चावी दिली. भविष्यात मस्क परत येऊ शकतात, असे संकेत त्या कृतीत होते.
या वादाच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट आहे की मस्क यांच्यासाठी हे दरवाजे आता तितकेसे स्वागतार्ह राहिलेले नाहीत. त्यांच्याकडे सोन्याची प्रतिकात्मक किल्ली असली तरीही दरवाजाचं कुलूपचं बदललेलं आहे, असं म्हणता येईल. गुरुवारी ट्रम्प म्हणाले की, “इलॉन आणि माझे खूप चांगले नाते होते.” त्यांचं हे भाष्य महत्त्वाचं ठरतं कारण, त्या वाक्यामध्ये त्यांनी ‘होते’ या शब्दाचा वापर केला आहे. हा शब्द त्यांच्यातील संबंध संपुष्टात आल्याचेच सूचित करतो.
काही लोकांना असं वाटतं की, ट्रम्प यांनी बुधवारी रात्री मस्क यांच्या टीकेपासून लक्ष विचलित करण्यासाठी अनेक आश्चर्यकारक घोषणा केल्या आहेत. यामध्ये अमेरिकेतील प्रवेशास बंदी घालणारा निर्णय देखील समाविष्ट आहे. त्यांनी हार्वर्डवर नवे निर्बंध देखील जाहीर केले. ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबद्दल कट रचण्याच्या सिद्धांतांनी भरलेली चौकशी सुरू केली. मस्क यांच्यासोबत झालेल्या वादापासून लक्ष हटवणं, हे या सगळ्या धडाधड घेतलेल्या निर्णयांमागचं ध्येय असू शकतं. व्हाईट हाऊस आणि काँग्रेसमधील त्यांचे सहयोगी सावधगिरी बाळगत होते. त्यांना मस्क यांच्या आधीच्या टिप्पण्यांनंतर अधिक वितुष्ट वाढवायचं नव्हतं. पण, नंतर ट्रम्प पुन्हा जोरदारपणे बोलले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC