Home LATEST NEWS ताजी बातमी एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग कंपनीवर काय परिणाम होईल?

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग कंपनीवर काय परिणाम होईल?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

बोईंगचं 787 ड्रीमलायनर विमान 2011 मध्ये लाँच करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

बोईंग कंपनी हे जागतिक विमाननिर्मिती उद्योगातील एक महत्त्वाचं नाव असून या कंपनीला अनेक दशकांचा अनुभव आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांत या कंपनीने अनेक सुरक्षा आणि आर्थिक संकटांना तोंड दिलं आहे. एअर इंडिया अपघातानंतर बोईंगच्या सुरक्षिततेवर आणि कंपनीच्या भविष्यावर प्रश्न उभे राहिले आहेत.

गेल्या महिन्यात बोईंगनं आपल्या 787 ड्रीमलायनर विमानातून तब्बल एक अब्ज प्रवाशांची ने-आण करण्याचा विक्रम पूर्ण केला. केवळ 14 वर्षांपूर्वी हे मॉडेल लाँच करण्यात आलं होतं, त्यामुळे ही एक उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.

गुरुवारी (12 जून) अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडियाच्या दुर्दैवी अपघातापर्यंत हे मॉडेल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अत्यंत विश्वासार्ह मानले जात होते आणि त्यातील सुरक्षादेखील आदर्शवतच मानली जाते.

हे विमान बोईंग 737 मॅक्सपेक्षा वेगळं आहे. 737 मॅक्स विमान 2018 आणि 2019 मध्ये अनुक्रमे इंडोनेशिया आणि इथिओपियामध्ये झालेल्या जीवघेण्या अपघातांमुळे चर्चेत आलं होतं, ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.

या अपघातांना सॉफ्टवेअरमधील दोष कारणीभूत ठरला होता आणि त्या मॉडेलची उड्डाणं 18 महिन्यांसाठी बंद करण्यात आली होती.

मानवी चूक की विमान उत्पादक कंपनी जबाबदार?

आत्तापर्यंत तरी भारतातील गुरुवारच्या अपघातात बोईंगकडून काही त्रुटी झाल्याचं काहीही सुचवलेलं नाही. विमानाचे ब्लॅक बॉक्सेस, जे महत्त्वाची उड्डाण माहिती साठवणारे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहे, ते सापडल्यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

अहमदाबादमधील अपघाताचं कारण काय असू शकतं यावर अनेक शक्यता मांडल्या गेल्या आहेत, पण मी ज्या वैमानिकाशी बोललो, ते म्हणाले की, ‘सध्याच्या काळात उत्पादकाची चूक एखाद्या जीवघेण्या अपघाताचं कारण ठरणं दुर्मीळ आहे.’

अहमदाबादमध्ये कोसळलेले एअर इंडियाचे  बोईंग 787 विमान होते.

फोटो स्रोत, EPA

बोईंग 737 मॅक्स अपघातांचा अपवाद वगळता, बहुतांश अपघात कॉकपिटमधील मानवी चुकामुळेच होतात, असं त्यांनी सांगितलं.

हे लक्षात घेणंही महत्त्वाचं आहे की, जेव्हा तुम्ही व्यावसायिक विमान उड्डाण करता, तेव्हा जवळजवळ नेहमीच तुम्ही बोईंग किंवा एअरबस या दोन कंपन्यांपैकी कोणत्यातरी विमानात असता.

‘बोईंगच्या शेअर्समध्ये मोठी घसरण’

कारण विमाननिर्मिती उद्योगावर यांचं जवळपास एकाधिकारसारखं वर्चस्व आहे.

तरीही, बोईंगचं नाव आणखी एका दुःखद विमान अपघाताशी जोडलं गेलं आहे.

कंपनीने म्हटलं आहे की “आम्ही प्रवासी, कर्मचारी, आणि अपघातग्रस्तांसोबत आहोत” आणि त्यांनी विश्वास दिला की ते अपघाताविषयी अधिक माहिती गोळा करण्यासाठी एअर इंडियासोबत काम करत आहेत.

बोईंगचे मुख्य कार्यकारी केली ऑर्टबर्ग यांनी विमान दुर्घटनेप्रकरणी खंत व्यक्त केली आहे. त्यांनी, कंपनीच्या “प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून शोक व्यक्त करतो,” आणि बोईंग भारताच्या विमान अपघात तपास विभागाच्या नेतृत्त्वाखालील चौकशीला पूर्ण सहकार्य करेल, असं म्हटलं आहे.

गुरुवारी न्यूयॉर्कमधील स्टॉक मार्केट बंद झाले, तेव्हा बोईंगच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची घसरण झाली होती.

‘बोईंगसमोरील संकटं काही संपेनात…’

सुरक्षा संकट, गुणवत्ता नियंत्रण समस्या, तसेच सात आठवडे चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या वर्षी सुमारे एक अब्ज डॉलर्स गमावलेल्या या कंपनीसाठी ही शोकांतिका आणखी एक समस्या ठरली आहे.

2024 मध्ये अलास्का एअरलाइन्सच्या एका उड्डाणादरम्यान त्याचा एक दरवाजा उडाल्यानंतर, बोईंगला 160 दशलक्ष डॉलर्स (126 दशलक्ष पौंड) भरपाई द्यावी लागली होती.

त्यापूर्वी, कंपनीने साउथवेस्ट एअरलाइन्ससोबत 737 मॅक्स फ्लीटच्या दीर्घकालीन स्थगितीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानासाठी 428 दशलक्ष डॉलर्सची करार रक्कम दिली होती.

अहमदाबादमध्ये कोसळलेले एअर इंडियाचे  बोईंग 787 विमान होते.

फोटो स्रोत, Getty Images

गंभीर आर्थिक समस्यांव्यतिरिक्त, बोईंगला त्यांच्या सुरक्षा पद्धतींबाबतही कठीण प्रश्नांचा सामना करावा लागला आहे. एप्रिलमध्ये, कंपनीनं सांगितलं की “सुरक्षा आणि गुणवत्तेवर आम्ही सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे ऑपरेशनल कामगिरीत सुधारणा झालेली आहे.”

2019 मध्ये, एका माजी कर्मचाऱ्यानं बीबीसीला सांगितलं होतं की, दबावाखाली काम करणाऱ्या कामगारांनी विमानांत जाणूनबुजून कमी दर्जाचे पार्ट्स बसवले आहेत.

जॉन बर्नेट, जे बोईंगमध्ये 30 वर्षांहून अधिक काळ क्वॉलिटी कंट्रोल मॅनेजर म्हणून काम करत होते, त्यांनी मागील वर्षी मार्चमध्ये आत्महत्या केली. बोईंगने त्यांचे आरोप फेटाळले होते.

आणखी एक व्हिसलब्लोअर, अभियंता सॅम सालेहपूर यांनी अमेरिकन राजकारण्यांना सांगितलं की, बोईंग विमानांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांना त्रास दिला गेला आणि धमकावलंही गेलं.

‘ऑर्टबर्ग यांचे शर्थीचे प्रयत्न पण…’

बोईंगनं यावर खुलासा केला होता की, बदल्याची भावना ठेवणे हे अयोग्य आहे. परंतु काही कर्मचारी या हेतूने वागताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारींमध्ये 500 टक्क्यांनी वाढ झाली आहे, यातून असं दिसतं की काही लोकांना इतरांवर सूड घ्यायचा आहे. त्यातूनच कुणाची भीती न बाळगता सूड घेण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत असल्याचं कंपनीने म्हटलं होतं.

बोईंग कंपनी इंडोनेशिया आणि इथिओपियातील अपघातांशी संबंधित अनेक कायदेशीर लढाईमध्ये अडकली आहे. गेल्या महिन्यात, कंपनीने अमेरिकेच्या न्याय विभागाशी (डीओजी) करार करून गुन्हेगारी चौकशीपासून तटस्थपणे बचाव केला.

पीडित कुटुंबीयांच्या दुःखदायक स्थितीला, अमेरिकेच्या न्याय विभागानं सांगितलं की बोईंग कंपनी “अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या तपासणीमध्ये अडथळा आणण्याच्या आणि हस्तक्षेप करण्याच्या कटाची कबुली” देईल आणि 1.1 अब्ज डॉलर्सहून अधिक दंड भरेल.

गेल्या काही वर्षांत बोईंगच्या उच्च कार्यकारी टीममध्ये मोठा बदल झाला आहे, याचं आश्चर्य वाटत नाही.

त्यांचे नवीन प्रमुख, केली ऑर्टबर्ग हे एका वर्षापूर्वी कंपनीला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी निवृत्तीनंतर परत आले.

बोईंगच्या सुरक्षा संस्कृतीत सुधारणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यांना विमाननिर्मितीची ही दिग्गज कंपनी लवकरच नफ्यात परत येईल, याची खात्री असल्याचंही अलीकडेच म्हटलं होतं.

आज त्यांना आणखी काही भयंकर बातम्यांचा सामना करावा लागत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC