Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलनं उत्तर गाझामध्ये रात्रीच्या वेळेस केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 48 पॅलेस्टिनी लोक मारले गेल्याची माहिती एका स्थानिक हॉस्पिटलनं दिली आहे.
गाझातील एका इंडोनेशियन हॉस्पिटलनं माहिती दिली आहे की जबालिया शहरातील अनेक घरं आणि निर्वासितांच्या छावणीवर हल्ला झाल्यानंतर 22 मुलं आणि 15 महिला मृत्यूमुखी पडल्या आहेत. ऑनलाईन पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हीडिओमध्ये जमिनीवर किमान डझनभर मृतदेह दिसत आहेत.
इस्रायलच्या सैन्यानं म्हटलं आहे की ते या वृत्तांबद्दल माहिती घेत आहेत. पॅलेस्टिनी सशस्त्र गटानं इस्रायलमध्ये रॉकेटचा मारा केल्यानंतर मंगळवारी (13 मे) रात्री इस्रायली सैन्यानं जबालिया आणि त्याच्या आसपासच्या भागातील रहिवाशांना तो भाग सोडून इतरत्र जाण्याचा इशारा दिला होता.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवतावादी काम करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना गाझामधील ‘नरसंहार थांबवण्यासाठी’ कारवाई करण्याचं आवाहन केलेलं असतानाच हे घडलं आहे.
मंगळवारी (13 मे) न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका बैठकीत बोलताना, टॉम फ्लेचर यांनी आरोप केला की “इस्रायल जाणूनबुजून आणि निर्लज्जपणे गाझातील नागरिकांवर अमानवीय स्थिती लादतो आहे.”
टॉम यांनी इस्रायलला गाझाची 10 आठवड्यांची नाकेबंदी उठवण्याचं आवाहन केलं. तसंच त्यांनी या भूप्रदेशातील मानवीय मदत पुरवण्याच्या इस्रायल-अमेरिकेच्या योजनेवर टीकादेखील केली.
इस्रायलचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत डॅनी डॅनन यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला सांगितलं की परदेशातून येणाऱ्या मदतीचा वापर हमास करत असलेल्या युद्धाला मदत करण्यासाठी केला जातो आहे.
दरम्यान अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि अॅडम बोहलर म्हणाले की इस्रायल-गाझामधील संभाव्य शस्त्रसंधीबाबत आणि ओलिसांच्या सुटकेच्या करारावर नव्यानं वाटाघाटी करण्यासाठी ते कतारला जातील.
इस्रायलकडून हल्ले वाढवण्याची धमकी
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, हमास अजूनही त्यांच्याकडे असलेल्या 58 ओलिसांची सुटका करण्यास तयार झालं नाही तर या आठवड्यात गाझातील लष्करी कारवाईची व्याप्ती वाढवण्याची धमकी दिली आहे.
मंगळवारी (13 मे), इस्रायलनं दक्षिण गाझामधील युरोपियन हॉस्पिटलच्या परिसरात केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यात किमान 28 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इस्त्रायलमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हटलं आहे की मोहम्मद सिनवार हे त्यांचं लक्ष्य होते. ऑक्टोबरमध्ये इस्रायली सैन्याकडून मोहम्मद सिनवार यांचा भाऊ याह्या मारला गेल्यानंतर ते गाझातील हमासचे नेते झाल्याचं मानलं जातं.

फोटो स्रोत, Reuters
इस्रायलच्या सैन्यानं या कारवाईला “हमासचे दहशतवादी जे हॉस्पिटलखाली त्यांचं कमांड अँड कंट्रोल सेंटर चालवत होते, त्यांच्यावर केलेला अचूक हल्ला, असं म्हटलं आहे.”
हमासनं 7 ऑक्टोबर 2023 ला इस्रायलमध्ये अभूतपूर्व हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास 1,200 लोक मारले गेले होते आणि 251 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून इस्रायलच्या सैन्यानं हमासला संपवण्यासाठी लष्करी मोहीम सुरू केली.
इस्रायलच्या सैन्यानं तेव्हापासून केलेल्या कारवाईत गाझामध्ये किमान 52,908 जण मारले गेले आहेत, अशी माहिती हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC