Home LATEST NEWS ताजी बातमी इरफान खान यांचं फार्महाऊस असलेल्या महाराष्ट्रातील गावाचं नाव खरंच ‘हिरोची वाडी’ करण्यात...

इरफान खान यांचं फार्महाऊस असलेल्या महाराष्ट्रातील गावाचं नाव खरंच ‘हिरोची वाडी’ करण्यात आलंय?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

इरफान खान

फोटो स्रोत, Getty/Rahul Ransubhe

इरफान खानचं फार्म हाऊस असलेल्या गावाचं नाव बदलून ‘हिरोची वाडी’ केलंय, असं सांगणारे व्हीडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

खरंच या गावानं इरफान खानच्या नावावरून गावाचं नाव बदललं का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्या गावात पोहोचलो; तेव्हा मात्र वेगळंच चित्र दिसलं.

ही ‘हिरोची वाडी’ नव्हे, तर ‘हिरूची वाडी’ असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

मुंबईपासून साधारण 128 किलोमीटरवर असलेल्या इगतपुरीजवळ त्रिंगलवाडी गाव आहे. इगतपुरी स्टेशनपासून डावीकडे वळल्यानंतर दोन डोंगरांमधून त्रिंगलवाडीच्या दिशीनं एक वाट जाते.

गावाजवळ पोहोचण्यापूर्वी त्रिंगलवाडी किल्ला दुरूनच दिसतो. एका तलावाजवळच हे त्रिंगलवाडी वसलेलं आहे. याच गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर इरफान खानचं फार्महाऊस आहे.

फार्महाऊसवर जायला तलावाला वळसा घालून जावं लागतं. आम्ही फार्म हाऊसकडे गेलो तेव्हा ‘हिरोची वाडी’ अशी पाटी कुठेही दिसली नाही. इतकंच नाहीतर इरफान खानचा फोटोही दिसत नव्हता. आम्हाला वाटलं, आम्ही रस्ता चुकलो की काय? पण तसं नव्हतं.

त्रिंगलवाडीतली ‘हिरूची वाडी’

त्रिंगलवाडी आणि पारदेव या दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्रिंगलवाडीत जवळपास 12-13 वाड्या आहेत. यापैकीच एक वाडी म्हणजे ‘हिरूची वाडी.’

या वाडीत 20-25 घरं आहेत. इथंच इरफान खानने 2012 मध्ये फार्महाऊस बांधलं. यावेळी इरफानसोबत गावातल्या लोकांचा नेहमी संपर्क यायचा.

इरफान खान यांचं हिरुची वाडीतलं फार्महाऊस

हा संपूर्ण आदिवासी पट्टा असल्याने इथे चित्रपट थिएटर वैगेरे काही नाही. अगदी मोबाईलला देखील फक्त टेकडीवरचं नेटवर्क मिळतं. त्यामुळे इंटरनेटपासून हे गाव दूर आहे.

इरफान हे हिरो आहेत हे आम्हाला पहिले माहित नव्हतं, असं गावकरी सांगतात. ते अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे आमच्या घरी यायचे, आमच्याशी बोलायचे. तसेच काही लोकांना आर्थिक मदतही केल्याचं ग्रामस्थ सांगतात.

इरफान आणि ग्रामस्थांची मैत्री

इरफान आणि या गावाचे नातेसंबंध जाणून घेण्यासाठी आम्ही गावाचे सरपंच अशोक पिंगळे यांना भेटलो.

ते म्हणतात, “इरफान सरांनी इथं जागा घेतली, फार्महाऊस बनवलं. त्यांचं नाव ऐकून आनंद झाला होता. हा पूर्ण आदिवासी भाग आहे. सगळ्या लोकवस्त्या आदिवासींच्या आहेत. पण, ते आमच्यासोबत मिळून मिसळून राहायचे. आम्हा ग्रामस्थांना त्यांच्यासोबत फक्त एक वर्ष घालवता आलं. पण, इतक्या दिवसातच त्यांनी ग्रामस्थांचं मन जिंकलं. तो हिरो आहे असं कधी वाटलंच नाही. लोक न घाबरता त्यांच्यासोबत प्रेमानं बोलायचे.”

इरफान यांचं फार्म हाऊस बांधायला येथील स्थानिकांनी खूप मदत केल्याचं आम्हाला कळलं. यापैकी एक म्हणजे दामू पिंगळे.

दामू यांनी इरफान यांच्या घरातील पडदे तसेच फार्म हाऊस सभवोतालच्या झोपड्या बांधल्या आहेत. इरफान दामू यांना कागदावर डिजाईन काढून देत आणि त्यानुसार ते बांधत होते. यामुळे ते इरफान यांच्या खूपच जवळचे झाले होते.

गावाचे सरपंच अशोक पिंगळे यांना भेटलो.

अशोक सांगतात की, दामू हे इरफान यांचे मित्र झाल्याचं पाहून आम्हीसुद्धा दामू यांना ‘गावचा इरफान’ म्हणत होतो.

इरफान जेव्हा हिरूची वाडीला येत होता तेव्हा दामू यांची भेट घ्यायचा.

दामू सांगतात, “इरफान यांना त्यांच्या फार्महाऊसचं काही तरी काम करुन घ्यायचं होतं, तेव्हा त्यांनी गावातल्या लोकांना बोलावलं. त्यामध्ये मी देखील होतो. तेव्हा पहिल्यांदा माझी आणि इरफान यांची भेट झाली. ते हिरो आहेत हे मला माहित नव्हतं. त्यांच्यासोबत त्यांचा भाचा होता. त्याने मला सांगितलं.”

“तेव्हा मी खूप खूश झालो. ते आमच्या घरीही आले होते. तेव्हा आमचं कुडाचं घर होतं. आमची गरीब परिस्थिती पाहून इरफान यांनी मला हजार रुपये दिले होते. त्यांना मटन आवडायचं. ते स्वतः घेऊन यायचे आणि चुलीवर स्वतःच बनवून घ्यायचे.”

इरफान जेव्हा हिरूची वाडीला येत होता तेव्हा दामू यांची भेट घ्यायचा.

हिरुची वाडीपासून जवळपास अर्धा किलोमीटरवर पत्र्याची वाडी आहे. व्हायरल व्हीडिओमध्ये या वाडीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आम्ही त्या वाडीतील शाळेवर गेलो. आम्ही गेलो होतो तेव्हा शाळेची मधली सुट्टी झाली होती. आम्ही काही शिक्षकांना भेटलो.

त्यापैकी एक भाऊराव बांगर यांना इरफानबद्दल विचारताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

भाऊराव बांगर यांना इरफानबद्दल विचारताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

इरफान गावात राहायला आले हे समजलं तेव्हा भाऊराव त्यांना भेटायला गेले होते. तो दिवस आजही त्यांना स्पष्टपणे आठवतो.

ते सांगतात, “मी साहेबांना सांगितलं की, तुम्ही आमच्या शाळेत थोड्या वेळासाठी यावं अशी आमच्या मुलांची इच्छा आहे. मला वेळ मिळाला की येतो असं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यादिवशी वाट पाहिली. पण ते आले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाची शाळा असताना ते साडेनऊ वाजेपासून शाळेच्या बाहेर आमची वाट बघत उभे होते. एवढी मोठी व्यक्ती आपल्या विद्यार्थ्यांची वाट बघत हे हे बघून आम्ही भारावून गेलो.”

हिरूची वाडी हे नाव कसं पडलं?

त्रिंगलवाडी गावाचं नाव हे जवळच असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्यावरून पडलं. ग्रामस्थ सांगतात, या किल्ल्याभोवती अनेक वाड्या, वस्त्या आहेत.

ग्रामस्थांचे मित्र बनलेल्या इरफान खानचं 29 एप्रिल 2020 ला कॅन्सरनं निधन झालं.

फोटो स्रोत, Subhash Mengal

या प्रत्येक वाडीतून एक-दोन व्यक्ती ही शिवरायांच्या मावळ्यांमध्ये होते. नंतर हीच परंपरा पुढे इंग्रजांची सत्ता आली तेव्हाही सुरू राहिली.

याच व्यक्तींपैकी एक होते हिरू पिंगळा. गावकरी त्यांना क्रांतीकारी मानत. त्यामुळेच या वाडीचं नाव हिरू पिंगळा पडल्याचं सांगतात.

हिरूची वाडी की हिरोची वाडी?

याच प्रश्नाचं उत्तर शोधत आम्ही माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांना भेटायला गेलो. ज्या सोशल मिडियावर बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यांच्यामध्ये गोरख यांचे नाव होतं.

गोरख बोडके यांनी इरफान यांना त्रिंगलवाडीत जागा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते असं ते सांगतात. पण, ते स्वतः इथं राहत नाहीत.

गोरख यांचीच मागणी आहे की गावाचं नाव बदलायला हवं आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

गोरख बोडके यांनी इरफान यांना त्रिंगलवाडीत जागा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते असं ते सांगतात.

गोरख सांगतात, “इरफान खान सरांनी जागा घेतल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शाळांना संगणक असो, शाळेच्या मुलांना कपडे असो आणि कोणत्याही सुख दुःखासाठी, कोणत्याही समाजसेवेसाठी नागरिकांनी इरफान सरांकडे मदत मागितली तर ते त्यासाठी लगेच तयार असायचे. त्यामुळे आमच्या आदिवासी समाजात ते अतिशय लोकप्रिय झाले होते. त्यांची आठवण आयुष्यभर राहावी म्हणूनत्रिंगलवाडी ग्रामपंचायतमध्ये एका कमानीवर इरफान यांचा फोटो लावून हिरोची वाडी नाव द्यावं अशी मागणी आहे. त्यांच्या आठवणी कायम राहाव्या हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे.”

हिरूची वाडीऐवजी हिरोची वाडी असं गावाचं नाव बदलण्याची इच्छा गोरखं यांनी व्यक्त केली होती. पण, ग्रामस्थांनी त्याला विरोध केला असून त्यांना हिरूची वाडी हेच नाव हवं आहे.

ग्रामस्थांचे मित्र बनलेल्या इरफान खानचं 29 एप्रिल 2020 ला कॅन्सरनं निधन झालं. त्याचं दुःख ग्रामस्थांनाही आहे. त्यामुळे हिरूची वाडीऐवजी हिरोची वाडी असं गावाचं नाव बदलण्याची इच्छा गोरखं यांनी व्यक्त केली होती. पण, ग्रामस्थांनी त्याला विरोध केला असून त्यांना हिरूची वाडी हेच नाव हवं आहे.

काही गावकरी नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्यासोबत बोलले.

ते म्हणतात, “इरफान खान चांगले अभिनेते तर होतेच. परंतु ते चांगले व्यक्तीही होते. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहेच. पण, गावाचं नाव बदलून त्यांचं नाव देणं आम्हाला पटत नाही. इरफान सर 10-12 वर्षांपूर्वी गावात आले होते. पण, आमचे हिरू पिंगळा हे गावासाठी लढले आहेत. ते आमच्या गावाचा अभिमान आहेत. त्यामुळे वाडीचं नाव आहे तेच हिरूची वाडी राहू द्यावं.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC