Source :- BBC INDIA NEWS
3 तासांपूर्वी
नियमित व्यायामामुळे आपले आरोग्य निरोगी राहते हे सर्वांना माहीत आहेच. डॉक्टर, घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी आपल्याला व्यायामाचे महत्त्व पटवून देत असतात.
व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहते. आपल्या शरीरात विकसित होणारा समृद्ध मायक्रोबायोटा व्यायामामुळे सुधारतो.
आपल्या पचनसंस्थेमध्ये सुमारे 100 ट्रिलियन बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी, आर्किया व प्रोटोजो आणि इतर एकल कोशिकीय जीवाणू शरीरात जागा मिळावी आणि अन्नासाठी एकमेकांशी स्पर्धा करत असतात.
प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. ते आपल्या आहारातील फायबर्सचे किण्वन करण्यास किंवा आंबवण्यास मदत करणे, जीवनसत्त्वे तयार करणे आणि आपल्या चरबीच्या चयापचयाचे (मेटाबॉलिजम) नियमन करणे. ते शरीरातील नको असलेल्या गोष्टींपासून आपले संरक्षण करण्यास मदत करतात.
ते आपल्या प्रतिकारशक्ती प्रणालीसोबत संवाद साधतात. आपल्या आतड्यांमध्ये आणि शरीरातील इतर भागांमध्ये किती सूज आहे, यावरही परिणाम करतात.
या आतड्यांमध्ये राहणारे निवासी जीव लठ्ठपणा, हृदयविकारजन्य मेटाबॉलिक आजार आणि ऑटोइम्यून स्थिती असलेल्या रुग्णांमध्ये दिसून आले आहे.
काही आजार हे विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरियांची संख्या कमी आहे की, अधिक याच्याशी संबंधित असतात.
फॅकॅलिबॅक्टेरियम प्रॉस्निट्झी (Faecalibacterium prausnitzii) नावाचा सूजजनक आजार रॉडच्या आकाराच्या बॅक्टेरियाशी संबंधित आहे. हा बॅक्टेरिया सामान्यपणे निरोगी प्रौढांच्या आतड्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
आपले जीन, आपण घेतलेली औषधे, आपल्यावर असलेला ताण, आपण धुम्रपान करतो का आणि आपण काय खातो म्हणजे आपल्या सवयी काय अशा अनेक घटकांचा आपल्या आतड्यातील मायक्रोऑर्गॅनिजम्सच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो.
व्यायामाचा बॅक्टेरियासाठी फायदा
साधी जीवनशैली आपल्या आतड्यांमधील मायक्रोब्समध्ये बदल घडवू शकते. तसेच आपण अशा काही सवयी अंगीकारु शकतो ज्याची आरोग्यपूर्ण वाढीस मदत होऊ शकते.
दर आठवड्याला 30 पेक्षा अधिक वेगवेगळ्या वनस्पतींच्या अन्नपदार्थांचा समावेश असलेला आहार घेतल्यास याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.
चांगली झोप आणि कमी तणावही फायदेशीर ठरू शकतो. महत्त्वाचं म्हणजे निसर्गात वेळ घालवण्याचाही सकारात्मक प्रभाव पडू शकतो.
व्यायाम आपल्या आतड्यांमधील बॅक्टेरियावर परिणाम करू शकतो. याशिवाय व्यायाम आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही फायदेशीर ठरतो.
व्यायामानंतर जॉगिंग करण्याचा आपल्या आतड्यांमधील मायक्रोब्सवर काय परिणाम होतो हे समजून घेऊयात.
“व्यायामाचा आतड्यांमधील मायक्रोब्सवर परिणाम होतो. व्यायामामुळे शॉर्ट चेन फॅटी अॅसिड्स (SCFAs) तयार करणाऱ्या बॅक्टेरियाची वाढ होते,” अशी माहिती युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइस अॅट अर्बाना-चॅम्पेन येथील काइनेसियोलॉजी आणि कम्युनिटी हेल्थचे प्रोफेसर जेफ्री वूड्स यांनी दिली. वूड्स हे व्यायामाचा मानवी शरीरावर पडणाऱ्या प्रभावांचा अभ्यास करतात.
“शॉर्ट चेन फॅटी अॅसिड्स (SCFAs) हा फॅटी अॅसिड्सचा एक प्रकार आहे. तो प्रामुख्याने मायक्रोब्सद्वारे तयार केला जातो आणि हे आपल्या चयापचय, प्रतिकारशक्ती आणि इतर शारीरिक क्रियांमध्ये बदल घडवतात,” असे युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइस येथील शरीरविज्ञान शास्त्राचे सहाय्यक प्रोफेसर जेकोब अॅलन यांनी सांगितले. ते वूड्स यांच्यासोबत काम करतात.
व्यायाम आणि आतड्यातील मायक्रोबियल घटकातील बदल यामधील संबंध किती प्रभावी आहे, हे मागील 10 वर्षांत प्राण्यांवर आणि माणसांवर केलेल्या संशोधनाने उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे बदल प्रत्यक्षात आपल्याला कसे फायदेशीर ठरू शकतात, हेही या संशोधनाने दाखवून दिले आहे.
प्राण्यांवरील संशोधन
प्राण्यांवर केलेल्या अभ्यासांमध्ये सुरुवातीला काही गोष्टी समोर आल्या. चाकावर धावणाऱ्या उंदरांमध्ये एक विशिष्ट बॅक्टेरिया ट्युरिसिबॅक्टरची (Turicibacter) संख्या लक्षणीयपणे कमी दिसून आली.
या बॅक्टेरियाचा संबंध आतड्यांच्या रोगांच्या वाढलेल्या धोक्याशी आहे, असे या अभ्यासाचे नेतृत्त्व करणारे वूड्स आणि अॅलन यांनी सांगितले.
जे उंदीर निष्क्रिय होते किंवा ज्यांना धावण्यासाठी थोडीशी उत्तेजना द्यावी लागली, त्यांच्यामध्ये या बॅक्टेरियांची संख्या खूप जास्त होती. उंदरांना धावण्याची सक्ती केल्यामुळे त्यांच्यात ताण निर्माण झाला. त्यामुळे व्यायामाचे फायदे न होण्याची शक्यता निर्माण झाली.
स्वेच्छेने चाकावर धावल्यामुळे उंदरांच्या आतड्यांमधील मायक्रोब्सलाही फायदा होतो असे दिसून आले.
व्यायामामुळे शॉर्ट चेन फॅटी अॅसिड, ब्युटिरेटचा एक विशिष्ट उच्च स्तरही दिसून येतो. तो बॅक्टेरियाच्या माध्यमातून फायबर्सच्या किण्वन प्रक्रियेद्वारे आतड्यात तयार होतो आणि याचा आरोग्याला फायदा होतो, असं संशोधकांना आढळून आलं.
ब्युटीरेट स्वतः शरीरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, ते आपल्या आतड्याच्या पेशींसाठीचे इंधन आहे. आतड्यातील कार्याचे नियंत्रण करण्यास मदत करतात आणि सूज तसेच प्रतिकारशक्ती पेशींचेही नियमन करतात.
आतड्यातील मायक्रोब फॅकॅलिबॅक्टेरियम प्रॉस्निट्झी हे ब्युटीरेटचं उत्पाद करणाऱ्या प्रमुख बॅक्टेरियांपैकी एक मानले जातात.
ब्युटीरेट निर्माण करणारे बॅक्टेरिया हे माकड आणि माणूस दोन्हींच्या चयापचयासाठी उपयोगी असतात. विशेषतः, फॅकॅलिबॅक्टेरियम प्रॉस्निट्झीच्या संख्येत घट होण्याचा संबंध सूजजनक आतड्यांच्या आजाराशी आहे. कारण ते सूजविरोधी क्रियांसाठी आवश्यक असतात.
व्यायाम उंदरांच्या आतड्यात या बॅक्टेरियाची संख्या वाढवू शकतो, हे अलीकडील काही प्राण्यांवरील अभ्यासातून समोर आले आहे.
व्यायामाचे प्रशिक्षण दिलेल्या उंदरांच्या आतड्यांमधील मायक्रोब्सचे ‘जर्म फ्री’ उंदरांमध्ये ट्रान्सप्लांट केले, तर त्या मायक्रोब्स तयार झालेल्या उंदरांच्या आतड्यांमधील सूजेची मात्रा कमी होऊ शकते, असे 2018 मध्ये अमेरिकेतील संशोधकांना आढळून आले होते.
असं असलं तरी प्राण्यांमधील या अभ्यासामुळे आतड्यांमधील सूक्ष्मजंतूंचे संतुलन चांगल्या पद्धतीने कसे बदलू शकते याबद्दल काही माहिती मिळते. आता आपण उंदीर नाही, मग माणसांवरील अभ्यास काय सांगतो? जाणून घेऊयात.
व्यायामाने मायक्रोब्स बदलू शकतात?
माणसांवरील संशोधनांमध्ये निश्चितच काही कमतरता नसल्याचे दिसून येते. धावणे, सायकलिंग आणि प्रतिकार प्रशिक्षण (रेझिस्टन्स ट्रेनिंग) यासारख्या मध्यम ते तीव्र व्यायामामुळे आतड्यांमधील बॅक्टेरियाचे वैविध्य वाढू शकते.
हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणेशी संबंधित आहे. अॅरोबिक व्यायाम फक्त 18 ते 32 मिनिटे आणि आठ आठवड्यांसाठी दर आठवड्यात तीन वेळा प्रतिकार प्रशिक्षण केल्याने फरक पडू शकतो.
निष्क्रिय (बैठे काम असणारे किंवा कमी हालचाल करणारे) लोकांशी तुलना केली, तर खेळाडूंच्या आतड्यांमध्ये मायक्रोबियल विविधता वाढलेली दिसते. यात काही बदल स्पर्धकांच्या विशेष आहारामुळे देखील होऊ शकतो. परंतु व्यायाम आणि आहारामुळे फॅकॅलिबॅक्टेरियम प्रॉस्निट्झीच्या संख्येत आणि ब्युटीरेटच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.
विशेष म्हणजे सक्रिय असणाऱ्या महिलांच्या आतड्यांच्या कार्यात यामुळेच सुधारणा होऊ शकते, असे अनेक अभ्यासात आढळून आले आहे.
फॅकॅलिबॅक्टेरियमच्या संख्येत व्यायामामुळे वाढ होऊ शकते, असे काही अभ्यासांमध्ये दिसून आल्याचे वूड्स यांनी सांगितले. “अशा प्रकारच्या बॅक्टेरियाची कमी पातळी असलेल्या लोकांना सूजजनक आतड्यांचा रोग, लठ्ठपणा आणि नैराश्याचा धोका जास्त असतो,” असेही ते पुढे म्हणतात.
30 ते 60 मिनिटे धावल्याने किंवा जिममधील ट्रेडमिलवर व्यायाम केल्याने आतड्यात फॅकॅलिबॅक्टेरियम सारख्या ब्युटीरेट-निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो, असे वूड्स आणि अॅलन यांच्या संशोधनातून समोर आले आहे.
एका अभ्यासात 20 महिला आणि 12 पुरुषांमध्ये विविध बॉडी मास इंडेक्स (BMI) असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.
सहा आठवड्यांपर्यंत एरोबिक व्यायाम केल्याने पूर्वी निष्क्रिय असलेल्या मानवी प्रौढांच्या आतड्यांमधील मायक्रोब्स बदलू शकतात का, हे वूड्स आणि अॅलन यांनी शोधण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी प्रत्येक सहभागी झालेल्या व्यक्तीला प्रत्येक आठवड्यात तीन मध्यम ते तीव्रतेच्या एरोबिक व्यायामाच्या सत्रांमध्ये भाग घ्यायला लावला. या व्यायाम सत्रांमध्ये ट्रेडमिलवर 30 ते 60 मिनिटांसाठी धावणे किंवा सायकलिंग करणे याचा समावेश होता.
या अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या मल (स्टूल) आणि रक्ताचे नमुने गोळा केले गेले. तीन दिवसांच्या आहार नियंत्रणांसह त्यांच्या आहारात सातत्य ठेवत हे नमुने गोळा करण्यात आले. या नियंत्रित आहारामुळे आतड्यांमधील मायक्रोब्सवर होणारे बदल कमी होऊ शकतात का हे शोधण्यात आले.
बॉडी मास इंडेक्स काहीही असले तरी भरपूर व्यायामामुळे ‘ब्युटीरेट प्रोड्युसर’ वाढल्याचे त्यांच्या निष्कर्षातून समोर आले.
मायक्रोब समुदायातील या बदलाबरोबरच सडपातळ सहभागींच्या मल नमुन्यात ब्युटीरेटसारख्या फॅटी अॅसिडची संख्या वाढली.
या अभ्यासात भाग घेतलेल्या व्यक्ती पुढील सहा आठवड्यांमध्ये पुन्हा पूर्वीच्या निष्क्रिय जीवनशैलीकडे वळले, त्यावेळी त्या व्यक्तींच्या पोटातील मायक्रोब्स परत पूर्ववत झाल्याचं आढळलं.
म्हणजेच व्यायामामुळं पोटातील मायक्रोबच्या आरोग्यात सुधारणा होत असली, तरी हे बदल तात्पुरते असतात.
आजारांशी संबंध आणि फायदा
फिनलंडमधील टुर्कू युनिव्हर्सिटीच्या क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहायक प्राध्यपक जर्ना हनुकाइनेन यांच्या नेतृत्वातील टीमनं 2019 मध्ये एक शोधनिबंध प्रकाशित केला. त्यात अशा 18 निष्क्रिय सहभागींच्या आतड्यांतील मायक्रोऑर्गॅनिझम्समध्ये विशिष्ट बदल दिसले.
हे सर्व टाइप 2 डायबिटीज किंवा प्रीडायबिटीज असलेले होते. सहभागींनी हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (30 सेकंद वेगाने सायकलिंग, चार मिनिटांच्या विश्रांतीसह चार सत्रांनंतर पाच आणि नंतर सहा सत्रे) किंवा मध्यम तीव्रतेचे प्रशिक्षण (40-60 मिनिटे सायकलिंग) हे आठवड्यातून तीन वेळा असे सलग दोन आठवडे केले.
दोन्ही प्रशिक्षणामुळं बॅक्टेरॉइड्स बॅक्टेरियाची संख्या वाढल्याचं संशोधकांना आढळलं. बॅक्टेरॉइड्स हा आतड्यातील महत्त्वाचा जीवाणू समूह आहे. साखर आणि प्रथिनांचं विघटन करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते.
तसेच रोग प्रतिकारशक्तीला सूजविरोधी तत्वं तयार करण्यात मदत करतात. या जीवाणूची पातळी कमी असल्यास लठ्ठपणा आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) चा धोका संभवतो.
या प्रशिक्षणामुळे क्लोजट्रिडियम आणि ब्लाऊटिया बॅक्टेरियांची पातळी देखील कमी झाली. उच्च पातळीवर असताना प्रतिकारशक्तीच्या काही भागांना उत्तेजन देण्याचे आणि सूज वाढवण्याचे हे एक कारण मानले जाते.
प्रत्यक्षात, हनुकाइनेन आणि त्यांच्या टीमला सहभागींमध्ये रक्त आणि आतड्यांमध्ये सूजेचे संकेत देणाऱ्या घटकाच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचं दिसलं.
लिपोपॉलिसॅकॅराइड्स हे शरीराच्या भागांमध्ये किरकोळ सूज निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. तसंच इन्सुलिनला प्रतिरोध करण्यासच एथेरोस्क्लेरोसिस वाढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
व्यायामामुळं लठ्ठपणाशी संबंध असलेल्या पोटातील जीवाणूचं प्रमाण कमी होत असल्याचंही हनुकाइनेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं.
“याबाबत अनेक सिद्धांत असले तरी, व्यायाम आपल्या आतड्यांमधील मायक्रोऑर्गॅनिजम्सच्या समुदायात कसा बदल घडवतो, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही,” असे वूड्स म्हणतात.
वूड्स यांच्या मते, “व्यायाम करताना लॅक्टेटची निर्मिती होते. ते काही विशिष्ट बॅक्टेरिया प्रजातींसाठी इंधन म्हणून काम करत असतात.”.
दुसरी संभाव्य प्रक्रिया सांगताना ते म्हणाले की, व्यायामामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीत आणि विशेषत: आतड्याच्या प्रतिकारशक्ती प्रणालीमध्ये होणारे बदल असू शकतात. कारण आतड्यांमधील मायक्रोब्स थेट आतड्याच्या प्रतिकारशक्ती पेशींच्या संपर्कात असतात.
व्यायामामुळं आतड्यातील रक्ताभिसरणातही बदल होतो. त्याचा आतड्याच्या भोवतीच्या पेशींवर परिणाम होतो. त्यामुळं मायक्रोब्समध्ये बदल होऊ शकतात. व्यायामामुळं होणारे हार्मोनल बदलही आतड्यांमधील बॅक्टेरियामध्ये बदल घडवतात.
पण वूड्स यांच्या मते, या सर्व संभाव्य प्रक्रियांची “निश्चितपणे चाचणी झालेली नाही”.
काही उच्च दर्जाचे खेळाडू कठोर प्रशिक्षणामुळे व्यायामाशी निगडीत ताण-तणावाचा सामना करतात. काही अभ्यासानुसार, 20 ते 60% खेळाडूंना अतिरिक्त प्रशिक्षण आणि अपुऱ्या रिकव्हरीमुळे तणावाचा सामना करावा लागतो.
परंतु, आपल्या आतड्यांमधील बॅक्टेरिया व्यायामाशी संबंधित ताणामुळे निर्माण होणाऱ्या हार्मोनवर नियंत्रण ठेवू शकतात.
तसंच ते मूड सुधारण्यासाठी मदत करणारे घटक निर्माण करण्यात आणि आतड्याच्या समस्या सोडविण्यात मदत करू शकतात. पण यात अजूनही अधिक संशोधनाची गरज आहे.
आपल्याला शारीरिक हालचालींचा आतड्यातील जीवाणूंवर कसा परिणाम होतो, याबद्दल अजूनही खूप अभ्यास व्हायचा आहे.
पण प्रत्येक व्यक्तीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात. आतड्यातील सध्याचे मायक्रोब्स, बीएमआय आणि इतर जीवनशैलीचे घटक त्याला जबाबदार असतात. त्यात आहार, ताण-तणावाची पातळी आणि झोप याचा समावेश असतो.
शास्त्रज्ञ आपल्या पचनसंस्थांमध्ये लपलेल्या रहस्यांना अधिक उलगडत असतात. त्यामुळं आपल्याला आरोग्य अधिक सुदृढ राहण्याचा मार्ग सापडू शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC