Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, PIB
3 तासांपूर्वी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात केलेली लष्करी कारवाई आणि त्यानंतर झालेला संघर्ष यामुळं अनेक शस्त्रास्त्रांची चर्चा झाली. त्या चर्चेत ‘आकाशतीर’ या भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमचाही समावेश होता.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख समीर व्ही. कामत म्हणाले, “भारताची देशी निर्मिती असलेल्या ‘आकाशतीर’ हवाई संरक्षण प्रणालीनं ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चांगली कामगिरी बजावली.”
त्याचवेळी, भारत सरकारनंही या संघर्षादरम्यान ‘आकाशतीर’च्या महत्त्वाबाबत माहिती दिली.
ही ‘आकाशतीर’ यंत्रणा नेमकी काय आहे आणि सरकारनं याबाबत काय म्हटलंय? ते जाणून घेऊयात.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ‘आकाशतीर’बाबत म्हटलं होतं, “शत्रूची (पाकिस्तान) क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचे हल्ले या यंत्रणेनं थोपवले.”
“पाकिस्ताननं भारतीय लष्कर आणि रहिवासी भागांमध्ये हल्ला केला. त्यावेळी ‘आकाशतीर’नं ही क्षेपणास्त्रं थोपवत निकामी केली होती.”

फोटो स्रोत, Getty Images
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतानं 6-7 मे दरम्यानच्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले.
भारत सरकारनं या हल्ल्यात कट्ट्ररवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं होतं, असं या हल्ल्याबाबत सांगितलं. त्यानंतर पाकिस्ताननंही हल्ले केले. दोन्ही देशांमध्ये हा संघर्ष 10 मेच्या सायंकाळपर्यंत सुरू होता.
‘आकाशतीर’चं वैशिष्ट्य
केंद्र सरकारनं एका निवेदनाद्वारे ‘आकाशतीर’ची अनेक वैशिष्ट्ये सांगितली.
सरकारनं म्हटलं, “आकाशतीर ही स्वयंचलित ‘एअर डिफेन्स आणि रिपोर्टिंग सिस्टिम’आहे. ही यंत्रणा शत्रूची विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची माहिती मिळवणे, ट्रॅक करणे आणि त्यांचा सामना करण्यात सक्षम आहेत.”

फोटो स्रोत, ANI
“पाकिस्तान त्यांनी आयात केलेले एचक्यू-9 आणि एचक्यू-16 यंत्रणांवर अवलंबून होता. ही यंत्रणा भारतीय हल्ल्यांची माहिती मिळवण्यात किंवा हे हल्ले थोपवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. ‘आकाशतीर’नं रियल टाईम माहितीच्या आधारे चालणाऱ्या स्वयंचलित हवाई संरक्षण संघर्षात केवळ भारताचं वर्चस्व दाखवलं नाही, तर प्रस्थापितही केलं,” असंही सरकारनं निवेदनात म्हटलं.
“जगातील कोणत्याही शस्त्राची लवकरात लवकर माहिती मिळवून त्याबाबत निर्णय घेत हल्ला थोपवण्यात सक्षम असल्याचं ‘आकाशतीर’नं दाखवून दिलं आहे.”
‘आकाशतीर’ यंत्रणा कशी काम करते?
भारत सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आकाशतीर सी-4 आईएसआर (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कंम्प्युटर, इंटलिजन्स, सर्व्हिलान्स आणि रिकॉनिसंस) फ्रेमवर्कचा भाग आहे. ही यंत्रणा इतर यंत्रणांच्या साथीनं काम करते.
सरकारच्या मते, आकाशतीरमध्ये असलेल्या सेंसरमध्ये टॅक्टिकल कंट्रोल रडार रिपोर्टर, 3-डी टॅक्टिकल कंट्रोल रडार, लो-लेव्हल लाइटवेट रडार आणि आकाश शस्त्र प्रणाली रडारचा समावेश आहे.
“आकाशतीरचा तिन्ही सैन्य दलांबरोबर (लष्कर, वायूदल आणि नौदल) समन्वय असतो. त्यामुळं याद्वारे स्वतःच्याच देशातील शस्त्रांवर हल्ला करण्याचा धोकाही कमी होतो. वाहनावर असल्यानं आकाशतीर अधिक वेगानं पुढं सरकू शकतं. त्यामुळं दुर्गम आणि युद्ध सुरू असलेल्या भागांसाठी ही यंत्रणा सर्वोत्तम ठरते,” असं भारत सरकारचं म्हणणं आहे.

ही यंत्रणा वेगानं लक्ष्य हेरून त्याबाबत निर्णय घेण्यात आणि हल्ला थांबवण्यात जगातील इतर कोणत्याही यंत्रणेपेक्षा अधिक वेगवान आहे, असा भारत सरकारचा दावा आहे.
एअर डिफेन्स सिस्टिम काय असते?
‘आकाशतीर’ ही एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ही यंत्रणा शत्रूची विमानं, क्षेपणास्त्रं, ड्रोन आणि इतर हवाई धोक्यांपासून देशाचं किंवा देशाच्या वायू सीमेचं संरक्षण करत असते.
या यंत्रणेत रडार, सेंसर, मिसाइल आणि गन सिस्टिम यांचा वापर केला जातो. त्याद्वारे आकाशातील धोक्यांची माहिती मिळवून, त्यांना ट्रॅक करत नष्ट करण्याची कारवाई केली जाते.
एअर डिफेन्स यंत्रणा अनेक टप्प्यांत काम करते. त्यात माहिती मिळवणे, शस्त्राला ट्रॅक करणे आणि त्यापासून नुकसान होण्याआधी ते नष्ट करणे यांचा त्यात समावेश असतो.
कोणत्याही देशाच्या एअर डिफेन्स सिस्टिमचा मुख्य उद्देश वायू हल्ल्यांपासून नागरिक आणि लष्करी ठिकाणांचं संरक्षण करणं हे असतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC