Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आई व्हायलाच हवं’ या दबावाची किंमत किती? मातृत्वासाठी ‘कोणताही मार्ग’ निवडण्यामागची कारणं...

‘आई व्हायलाच हवं’ या दबावाची किंमत किती? मातृत्वासाठी ‘कोणताही मार्ग’ निवडण्यामागची कारणं काय?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

सुरक्षित मातृत्व: स्तनपान सल्लागाराच्या डायरीतील नोंदी

फोटो स्रोत, Getty Images

(11 एप्रिलला ‘कस्तुरबा गांधी’ यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात ‘सुरक्षित मातृत्व दिवस’ साजरा होतो. या निमित्ताने हा लेख प्रकाशित करत आहोत.)

परवा विशीतली शाल्मली (नाव बदलेले आहे) क्लिनिकवर आली. सावळीशी, दिसायला चुणचुणीत.

सासुबाईंची ‘हिला दूधच नाही.’ अशी तक्रार. (‘आजकालच्या आया…’ सुरात!) ती म्हणाली “मलातर सुसाईडच करावीशी वाटते.”

बाळ दूध पीत नाही, फॉर्म्युलावर (आईच्या दुधासाठी पर्याय बाजारात उपलब्ध उत्पादनं) भरपूर खर्च होतो, घरच्यांचे टोमणे, म्हणून तिची ही मानसिक स्थिती झालेली.

तिला मूलभूत सल्ला देऊन, स्तनपान सुरळीत सुरू झालं. तरीही तिचा आत्मविश्वास वाढवायला पुढे अनेकदा भेटावं लागलं.

38 व्या आठवड्यात (बाळ फुलटर्म आहे मानून) तिचं सीजर झालेलं. बाळाला सुरुवातीला झोप जास्त, लॅच नीट न जमल्याने तत्काळ फॉर्म्युला दिला आणि सुरळीत स्तनपान प्रवासाचा धुव्वा उडला.

स्तनपान सल्लागार म्हणून माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक मातांची प्रसुती 37-38 आठवड्यातच झालेली असते.

तेव्हा बाळाची स्तनपान करण्याची तयारी नसणं आणि त्याला सोपा उपाय म्हणून फॉर्म्युला पुढे सरकवून, स्तनपानाचं संपूर्ण चक्र बिघडवण्यावरच होतो. त्याच्यामुळे बाळाच्या विकासावर आणि आई-बाळाच्या नात्यावरही त्याचे दुष्परिणाम होतात.

स्तनपान व्यवस्थित होत नसल्याने आईला दोष दिला जातो. त्यातून आईचे मानसिक खच्चीकरण होते.

गर्भाची संपूर्ण वाढ झाल्यावर निसर्गत: कळा येऊन योनीमार्गे प्रसूती होणे हे, बाळाच्या विकासामध्ये आणि आईचे शरीर पूर्वपदावर येण्याच्या प्रक्रियेसाठी सुयोग्य आहे.

सिझेरियन असो की साधारण प्रसुती त्या प्रसंगात आईला स्वतःच्या शरीराविषयी स्वायत्तता मिळणं, तिचा निर्णयप्रक्रियेत स-ज्ञान सहभाग असणं आणि तिच्याभोवती पुरेशी वैज्ञानिक (पुराव्यावर आधारित/इव्हिडन्स बेस) आरोग्य व्यवस्था उभी असणं, महत्वाचं.

सुरक्षित मातृत्व: स्तनपान सल्लागाराच्या डायरीतील नोंदी

फोटो स्रोत, Getty Images

“प्रसुतीचा दिवस प्रत्येक आईला कित्येक वर्षांनंतर दशकांनंतर तितकाच लख्ख आठवतो. त्याचा दूरगामी परिणाम तिच्या व्यक्तिमत्वावर आणि बाळाशी असलेल्या बॉण्डिंगवर आणि एकूण बाळाच्या सुरुवातीच्या दिवसातल्या संगोपनावर पडत असतो. प्रसुती सिझेरियन असो की सामान्य, आईला मातृत्वाच्या काळामध्ये आलेला अनुभव आणि आधार फार मोलाचा आहे.”

“सर्वच आरोग्य यंत्रणांनी आणि कुटुंबांनी सुरक्षित मातृत्वासाठी सर्वंकष विचार करत आईभोवती एक सुरक्षा कवच निर्माण केले पाहिजे. प्रत्येक आईला सुंदर आणि सुरक्षित प्रसुतीचा अनुभव आला पाहिजे,” हे उद्गार आहेत डॉक्टर विजया कृष्णन यांचे. त्या हैदराबादमध्ये ‘नैसर्गिक प्रसुती केंद्र’ चालवतात.

सुरक्षित मातृत्व म्हणजे, मातृत्वाच्या काळात स्त्रीला ‘शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या’ सुरक्षित वाटणे.

गर्भारपण, प्रसुती आणि बाळंतपण हा बाईच्या आयुष्यातला अतिशय आशादायी आणि सकारात्मक काळ असला पाहिजे.

परंतु आजही काही समाज अगदी मूलभूत – ‘मातृत्वाच्या प्रवासामध्ये मातेचा जीव वाचेल की नाही’ याच विवंचनेत अडकले आहेत. ‘जगभरात दर 2 मिनिटाला 1 आई मृत्युमुखी पडत असते.’ हा युनायटेड नेशन्सचा आजचा डेटा आहे.

नवमातेचा जीव अत्यंत मोलाचा आहे, आई म्हणूनही आणि बाई म्हणूनही. कोणत्या कुटुंब किंवा समाजासाठी नवमाता मृत्यूसारखी दुःखद आणि लांछनास्पद गोष्ट नाही.

देशातील नवमाता मृत्यूची स्थिती कशी?

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नवमाता मृत्यूचे प्रमाण 1 लाखामागे तब्बल 2000 एवढे होते.

1960 च्या दशकात ते लाखामागे 1355 पर्यंत आले. त्या त्या काळातल्या सरकारांनी घेतलेल्या ध्येयधोरणांमुळे; तसेच वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमुळे प्रत्येक दशकात मातामृत्यूचे प्रमाण घटत जाऊन 90 च्या दशकात ते 570 पर्यंत आलं.

2015 मध्ये 130 आणि आज ते 1 लाखामागे 88 एवढे खाली आलेले दिसते. याचे श्रेय वेळोवेळीच्या सरकारी योजना, आरोग्य यंत्रणेतील गावपातळीवर सुधारणा, इंस्टीट्युशनल सुरक्षित प्रसूती, जागरूकता, डॉक्टर- नर्सेस – आशावर्करचे जाळे यांना द्यायलाच हवे.

स्वातंत्र्यानंतर आपण बरीच संख्याशास्त्रीय मजल मारली असली, तरी आजही देशात सुमारे 25 हजार नवमाता दगावतात. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतात दररोज 52 महिलांना मातृत्वकाळात आपण गमावतो.

सुरक्षित मातृत्व: स्तनपान सल्लागाराच्या डायरीतील नोंदी

फोटो स्रोत, Getty Images

नवमातेचा मृत्यू होणे ही मेडिकल टीमसाठी हादरवून टाकणारी गोष्ट असते. सर्व यशस्वी केसेस एका बाजूला आणि नवमातेचा मृत्यू एका बाजूला इतकी गंभीर गोष्ट असते. योग्यवेळी हस्तक्षेप केल्यास तो मृत्यू टाळता येऊ शकतो. कदाचित याच भीतीने डॉक्टर सीझर करण्याचा ‘सोपा’मार्ग निवडतात.

WHO च्या सल्ल्यानुसार सीझरचे प्रमाण जास्तीतजास्त 10 ते 15 टक्के असावे. भारतात सीझरचे प्रमाण 22 टक्के आहे. काही शहरात तर 60 टक्के आहे. यात खासगी हॉस्पिटले आघाडीवर आहेत.

सिझर खरोखरच सुरक्षित उपाय आहे का? असला तर कोणासाठी? असा प्रश्न राहतोच.

आणीबाणीच्या प्रसंगी सिझरने प्राण वाचू शकतात, हे खरेच. पण आई आणि बाळाला नैसर्गिक प्रसूतीची संधी दिली जाते का? त्यासाठीची तयारी केली जाते का, याचे उत्तर फारसे सकारात्मक दिसत नाही.

‘उगाच रिस्क नको!’ म्हणून 37 व्या आठवड्यापासूनच प्रसूतीसाठी हस्तक्षेप केला जातो. त्याचे परिणाम बाळाच्या स्तनपानावर होतात.

सीजर हा अखेरचा उपाय आहे आणि तो दुर्गम भागातील प्रत्येक मातेसाठीही उपलब्ध असावाच. पण तो सर्रासपणे वापरण्याची खरच गरज आहे का? हा विचार आरोग्ययंत्रणांनी करणेही गरजेचे आहे.

‘आजकाल ‘नॉर्मली’ बहुतांशी प्रसुती सिझेरियनच’

आजकाल मी ‘नॉर्मल’ प्रसूती हा शब्द संकोचानेच वापरते. कारण योनीमार्गे प्रसुती ‘नॉर्मल’ असेल तरी आजकाल ‘नॉर्मली’ बहुतांशी प्रसुती सिझेरियनच होतात असं दिसतं.

सामान्य प्रसुती व्हायला आई आणि डॉक्टर दोघांची तयारी लागते, तीही शारीरिक आणि मानसिक! सतत निरीक्षण करत सुरक्षितपणे वाट पाहणे यासाठी पेशन्स तर कमालीचा लागतो.

गेली 5-6 वर्षे मी अनेक नर्सिंग होम्स खूप जवळून बघते तेव्हा लक्षात येतं की, डॉक्टरला योनीमार्गे प्रसूती करायची इच्छा असेल, तरी आईचे शरीर त्याला साथ देईलच असं नाही.

डॉ. प्रविणा बिरबल-जैन या नैसर्गिक प्रसूतीसाठी आग्रही असणाऱ्या प्रसूतीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, “बहुतांश सिझरची काही कारणे- आज-काल आई होण्याचा निर्णय मुळात तिशीनंतर घेतला जातो. तोपर्यंत शरीराची लवचिकता कमी झालेली असते. एकूणच शारीरिक हालचाली कमी, स्थूलत्व वाढलेलं.”

“गरोदरपणात पोषक आहाराच्या नावाने अतिकॅलरीज खालेल्या आणि अतिविश्रांती घेतलेली. त्यातून आजकाल आयव्हीएफ, आययूएफचं प्रमाणही वाढत आहे. ‘एक या दो बस!’ असताना प्रत्येक प्रसूती ही मौल्यवान आहे.”

डॉक्टरांना सिझेरियनचा मार्ग अधिक सुरक्षित वाटतो. कारण हॉस्पिटलबद्दलचे मत ‘किती नैसर्गिक प्रसुती होतात.’ यापेक्षाही ‘किती माता – बालकांचे मृत्यू झाले’ यातून बनणार असतं. एक मृत्यूही डॉक्टरांचा करिअर आणि हॉस्पिटलची पत उद्ध्वस्त करणारा असू शकतो.

परंतु वैद्यकीय गरज नसताना अतिरिक्त भीती या कारणाने 37 आठवड्यानंतरच, प्रसुतीचे दिवस पूर्ण भरू न देताच, सिझेरियनचा पर्याय निवडला जातोय. बाळाचा विकास पुरेसा झालेला नसताना त्याला नवीन जगात प्रवेश दिला जातोय. तब्बल 86 टक्के बाळांचे जन्म हे 37-39 आठवड्यांदरम्यान झालेले असतात. त्याचे परिणाम बाळाच्या स्तनपानावर होतात, हे मी खूप जवळून बघते.

सुरक्षित मातृत्व: स्तनपान सल्लागाराच्या डायरीतील नोंदी

फोटो स्रोत, Getty Images

खरंतर ‘मातृत्व’ अवस्थेची व्याख्या आणखीन व्यापक आहे. मातृत्व म्हणजे कोणत्याही वयातील गर्भधारणा व त्यासाठीचे प्रयत्न, गर्भारपण, प्रसूती, बाळंतपण आणि गर्भपातही. मातृत्वाच्या या सर्वच टप्प्यांवर स्त्रीला शारीरिक, मानसिक, भावनिक सुरक्षित अनुभव मिळायला हवा.

मातृत्वाची सुरुवात गर्भधारणेआधीच होते. गरोदर राहायचं की नाही, हा निर्णय एकट्या आईचा नसतो. अनेकदा बापाचाही नसतो. समाजाचा अदृश्य दबाव अगदी सुशिक्षित जोडप्यांवरही असतो.

आई होण्यासाठी काहीही किंमत मोजायला स्त्रिया स्वतःहून तयार झाल्यासारख्या भासतात. त्यातून हॉर्मोनल ट्रीटमेंट, आययूएफ, आयव्हीएफ, सरोगसी – परवडेल तो कोणताही मार्ग ‘निवडला’ जातो.

पुत्रप्राप्ती हा फॅक्टर वेगळाच. मुलासाठी स्वत:च्या ‘इच्छेने’ 6-7 वेळा गर्भारपण स्वीकारलेल्या आया मी 2025 मध्येही प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. गर्भधारणेपूर्वीच स्त्री शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुस्थित असावी.

कोणत्या वयात, पूर्वव्याधी असताना मातृत्व स्वीकारायचे हा स्त्रीचा निर्णय असला तरी; तिच्या फिटनेसविषयी, गुंतागुंतीविषयी तिला संपूर्ण माहिती द्यायला हवी. त्यासाठीची आधारप्रणाली तयार व्हावी.

गर्भारपणा आणि अतिरिक्त रक्तस्त्राव हे खूप धोकादायक समीकरण आहे. सकीना (नाव बदलले) ’15 दिवसानेही दूधच नाही.’ ही तक्रार घेऊन आली. चेहरा निस्तेज, डोळे खोल गेलेले. स्तन मऊ होते. मला शंका आली, म्हणून मी तिला “अजूनही रक्तस्राव होतोय का?” विचारलं.

दिवसभरात तिला 4-5 पॅड्स घ्यावे लागत होते. मी तिला लगेच डॉक्टरकडे जायचा सल्ला दिला. तिने हो म्हटले, पण डॉक्टरकडे जाणे टाळले. आठवडाभराने तिचा फोन आला, “profuse रक्तस्त्राव झाल्याने मला इमरजेंसीमध्ये ऑपरेशन करावे लागले. तुम्ही धोक्याची सूचना दिली म्हणून मी जागरूक राहिले आणि गडबड वाटली म्हणून लगेच दवाखान्यात गेले.”

त्यानंतर तिचे स्तनपानही सुरळीत झाले, मुख्य म्हणजे तिचे आरोग्य सुधारले. प्रसूतीनंतर गर्भाशयात वारेचे तुकडे राहिल्याने असा रक्तस्त्राव होऊ शकतो. कोणताही रक्तस्राव ही धोक्याची घंटा असून त्यावर तत्काळ उपचार केला जावा. असा रक्तस्राव हॉर्मोन्समुळे होत असल्यामुळे तो अचानक वाढू शकतो आणि नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो.

सुरक्षित मातृत्व: स्तनपान सल्लागाराच्या डायरीतील नोंदी

फोटो स्रोत, Getty Images

प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव (PPH) हे नवमातामृत्युचे प्रमुख कारण आहे. म्हणून प्रसूती हॉस्पिटलमध्येच करणे, प्रसूतीनंतर पुरेसा काळ डॉक्टरच्या देखरेखीखाली राहणे आणि नंतर 45 दिवसांपर्यंत कधीही जास्त रक्तस्त्राव होत असल्याचे आढळल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाणे, हे अनेक जीव वाचवू शकते.

अशाच एका रक्तस्त्रावाची भयकथा देवकीची (नाव बदलेले). देवकी एका सुखी संयुक्त परिवारातली आनंदी सुशील सदस्य. तिला 2 गोड मुली. घरात लग्न, त्यामुळे तिची धावपळ. पाळी चुकलेली तिला कळली नाही. लक्षात आले तेव्हा 7 आठवडे झाले होते. 2 अपत्यांवर थांबायचे ठरलेले, पण घरच्यांना मुलगा झाला तर चांगले वाटेल अशी स्थिती. त्यामुळे घरी सांगायचा संकोच.

नवऱ्याला सांगितले, डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित गोळ्या घेऊन गर्भपात केला. पुन्हा रोजच्या कामात ती व्यग्र झाली. तब्बल महिनाभर चाललेल्या थोड्याथोड्या रक्तस्त्रावाकडे तिने दुर्लक्ष केले आणि एक दिवस अचानक धोधो रक्तस्त्राव सुरू झाला.

लगेच हॉस्पिटल एडमिशन, गर्भपातामध्ये झालेले कॉम्प्लिकेशन, गुंतागुंतीचे ऑपरेशन, या सगळ्याला घरच्या मंडळींचे अप्रिय प्रतिसाद, अशा कारणांमुळे तिची स्थिती खूप गंभीर झाली. पण तिने योग्य वेळी हॉस्पिटलकडे धाव घेतली आणि या सगळ्यातून ती बाहेर पडली.

‘मातृत्वा’तील लपवाछपवीचा भाग म्हणजे नको असलेले गर्भारपण. कोणत्याही वयात, कोणत्याही वैवाहिक परिस्थितीत सुरक्षित ‘गर्भपात’ हा महिलेचा अधिकार आहे. त्यासाठीचे वैद्यकीय उपचार मात्र डॉक्टरच्या सल्ल्यानेच आणि देखरेखीखाली केले जावेत.

फार्मसीतल्या गोळ्या खाऊन, किंवा घरगुती उपचाराने गर्भपात करणे जिवावर बेतते. डॉक्टरकडून गोळ्या घेतल्यानंतरही पुनर्तपासणीसाठी गेलेच पाहिजे. अबॉर्शन केसेसमध्येही अचानक रक्तस्राव होऊन जीवास धोका निर्माण होतो.

UN च्या अहवालानुसार भारतात असुरक्षित गर्भपातामुळे दररोज 8 महिला दगावतात. महिलेसाठी गर्भपात शारीरिकदृष्ट्या जोखमीचा असतो. अशा स्थितीमध्ये जोडीदाराने, परिवाराने, वैद्यकीय यंत्रणेने महिलेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता संवेदनशीलतेने आधार द्यावा.

महत्त्वाचे, गर्भपात हा गर्भनियोजनाचा उपाय नाही. तर डॉक्टरांच्या समुपदेशनाने योग्य ते गर्भनिरोधक वापरले जावेत. यात पुरुष जोडीदारानेही जबाबदारी घ्यावी. पुन्हा, सुरक्षित गर्भपात शक्य आहे आणि तो महिलेचा अधिकारही आहे. त्यामुळे अशावेळी निसंकोचपणे योग्य डॉक्टरकडे जाऊन तो सुरक्षितपणे करून घ्यावा.

शेवटचा पण ‘किमती’ मुद्दा म्हणजे ‘मातृत्वाचे अर्थकारण.’ महिला स्वतःच्या आरोग्याविषयी अनास्था दाखवतात. त्याचे खूप मोठे कारण म्हणजे त्यावर होणारा खर्च.

बाळंतपणासाठी पैसा बाजूला ठेवला तरी ऐनवेळी खर्च अव्वाच्या सव्वा येतो, तेव्हा धावपळ उडते. मातृत्वाविषयी विमा कंपन्या विशेष असंवेदनशीलता दाखवतात. बहुतांश इन्शुरन्स गर्भारपण, प्रसूती कव्हर करत नाहीत. अबॉर्शन तर दूरचीच गोष्ट.

खर्चापायी स्त्री आरोग्याची हेळसांड होत असताना भरपूर प्रीमियम भरूनही मातृत्वाला सुरक्षा देत नाहीत हे खेदजनक आहे.

सुरक्षित मातृत्व ही स्त्रीचीच नाही, तर संपूर्ण समाजाचीच गरज आणि जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन मातृत्वाभोवती जोडीदार, परिवार, आरोग्य व्यवस्था, समुपदेशक, शासन-प्रशासन, आरोग्यविमा योजना या सर्वांनी सुरक्षित कोश करायला हवा.

(लेखात मांडलेली मते लेखकांची वैयक्तिक मते आहेत.)

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC