Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, @IsraelinUSA
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी या शहरात एका ज्यू संग्रहालयाच्या बाहेर इस्रायलच्या दूतावासामध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
हा हल्लेखोर ‘आझाद पॅलेस्टाईन’ अशा घोषणा देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एकमेकांचे जोडीदार असलेले हे दोन कर्मचारी ज्यू संग्रहालयात झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते बाहेर येत होते तेव्हाच त्यांना गोळ्या मारल्या गेल्या, असं वॉशिंग्टन डीसीमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
घटनाक्रम बघता हा एक सुनियोजित कट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी हा गोळीबार झाला. या भागात एफबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासोबतच अनेक पर्यटन स्थळं, संग्रहालयं आणि सरकारी इमारती आहेत.
दोघांचा होणार होता साखरपुडा
मेट्रोपोलिटन पोलीस प्रमुख पामेला स्मिथ यांनी अटकेत असलेल्या संशयिताबद्दल माहिती देताना सांगितलं की, गोळीबार केल्यानंतर तो संग्रहालयात गेला. तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं.
अटकेत असलेल्या या संशयिताचं नाव एलियास रोड्रिगेज आहे. गोळीबारापूर्वी तो संग्रहालयाच्या बाहेर फिरताना दिसत होता. 30 वर्षांचा रोड्रिगेज शिकागोचा रहिवासी आहे.
त्याने चार लोकांवर गोळ्या झाडल्या. त्यातल्या दोघांचा मृत्यू झाला.
“संशयिताबाबत आमच्याकडे यापूर्वी कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे तो आमच्या रडारवर येऊ शकला नाही,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
या गोळीबारात मारल्या गेलेल्या जोडप्याचे फोटो अमेरिकेतल्या इस्रायल दूतावासाने सार्वजनिक केले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर इस्रायल दूतावास कार्यालयाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली की, “यारोन आणि सारा आमचे मित्र आणि सहकारी होते.”

फोटो स्रोत, CBS
“आज संध्याकाळी दहशतवाद्यांनी राजधानी डीसीत ज्यू संग्रहालयात एका कार्यक्रमातून बाहेर येत असताना त्यांची गोळ्या मारून हत्या केली. त्यांच्या हत्येनं दुतावासातील कर्मचारी दुःखी आणि स्तब्ध आहेत. आमच्याकडे व्यक्त व्हायला शब्द नाहीत.”
अमेरिकेतले इस्रायलचे राजदूत याहिएल लायटर यांनी सांगितलं की, या गोळीबारात मारल्या गेलेल्या जोडप्यापैकी यारोन यांनी एक आठवड्यापूर्वीच अंगठी विकत घेतली होती. जेरुसलेमच्या यात्रेत दोघे जण साखरपुडा करणार होते.”
गोळीबाराच्या घटनेच्या साक्षीदार केटी केलिशर बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, “आम्ही गोळ्यांचा आवाज ऐकला आणि त्यानंतर संग्रहालयात एक व्यक्ती आला. तो फार अस्वस्थ वाटत होता. त्याला मदतीची गरज असेल, असं म्हणून आम्ही त्याला पाणीही दिलं.”
याच व्यक्तीला पुढे पोलिसांनी अटक केली.
द्वेष आणि कट्टरतावादाला अमेरिकेत जागा नाही : ट्रम्प
कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या ज्यू समिती मंडळाचे सदस्य जोजो कॉलिन यांनी प्रत्यक्ष गोळीबार पाहिला नाही. पण घडलेल्या घटनेबद्दल त्यांना अपराधीपणाची भावना वाटत असल्याचं त्या म्हणाल्या.
“या घटनेमुळे मी माझ्यातलं माणूसपण गमावणार नाही किंवा ते कमीही होणार नाही. इस्रायल आणि पॅलेस्टिन लोक त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि आपण त्याचीच चर्चा करत आहोत हे किती उपरोधिक आहे.”
ही हत्या ज्यूविरोधी भावनेतून करण्यात आली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर बोलताना ते म्हणाले, “डीसीमध्ये झालेली ही हत्या खूप भयानक आणि ज्यूविरोधी भावनेने भरलेली आहे. हे आता संपायला हवं. द्वेष आणि कट्टरतावाद यांना अमेरिकेत काहीही जागा नाही.”
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक्सवर म्हटलं, “यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शोधून आम्ही शिक्षा देणार आहोत.”
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “आता जगभरातल्या इस्रायली दुतावासांच्या सुरक्षेत वाढ केली जाईल.”
संयुक्त राष्ट्र संघातले इस्रायलचे राजदूत याला “ज्यूविरोधी दहशतवादाची घटना” म्हणाले आहेत.
राजदूत डॅनी डेनन एक्सवर यांनी एक्स वर लिहिलं, “ज्यू समाजाला नुकसान पोहोचवणं हे धोक्याची लाल रेष पार करण्यासारखं आहे. अमेरिकेतले अधिकारी या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करतील अशी आम्हाला खात्री आहे.”
शहरातले मुख्य मार्ग बंद
या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत शहरातले अनेक मुख्य रस्ते बंद केले.
या घटनेबद्दल बोलताना इस्रायल दुतावासाचे प्रवक्ते म्हणाले की, दोन कर्मचारी संग्रहालयातल्या कार्यक्रमात सहभागी होत असताना त्यांना “खूप जवळून” गोळी मारली.
प्रवक्ते ताल नॅम कोहेन म्हणाले, “अमेरिकेच्या स्थानिक आणि केंद्रीय अधिकाऱ्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते हल्लेखोरांना पकडतील आणि संपूर्ण अमेरिकेतल्या इस्रायलच्या प्रतिनिधींचं आणि ज्यू समाजाचं संरक्षण करतील.”

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकन माध्यमांनुसार या गोळीबारावेळी इस्रायलचे राजदूत संग्रहालयातल्या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते. सीबीएस या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार, या घटनेनंतर जॉर्जटाऊन विद्यापीठही तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे.
घटनेमुळे जवळपास एक तास विद्यार्थी आतमध्ये अडकले होते. त्यातल्या एका विद्यार्थ्याने सांगितलं, “आम्ही जाऊ लागलो तेव्हा पायऱ्यांखाली उभ्या असलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला अडवलं. ते अजूनही इथेच आहेत आणि आम्ही आत्ता इथून जाऊ शकत नाही, असंच आम्हाला सांगत आहेत.”
आधीपासून होता संशय
या कॅपिटल ज्यू संग्रहालयाप्रमाणेच अमेरिकेतल्या इतर अनेक ज्यू समाजाच्या संस्थांना ज्यू विरोधी विचारांचा सामना करावा लागत आहे.
संग्रहालयाचे कार्यकारी निर्देशक बीट्राइस गुरविट्ज या हल्ल्याआधी बुधवारी (21 मे) एनबीसी न्यूजशी बोलताना म्हणालेले, “आपल्या सुरक्षेबाबत शहरातल्या आणि देशातल्या ज्यू संस्थांना काळजी वाटते. काही संस्थांमध्ये भयावह घटना घडल्या आहेत आणि ज्यूविरोधी वातावरणही पसरत आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
एलजीबीटीक्यूए समुदायातली एक रॅली संग्रहालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्याला झालेला विरोध पाहिल्यानंतर संग्रहालयाची सुरक्षा वाढवण्यासाठी नुकतीच परवानगी मिळाली होती, असंही गुरविट्ज पुढे सांगत होत्या.
“या घटनेमुळे धोका आणखी वाढला आहे याची आम्हाला कल्पना आहे. तरीही त्यांच्या पूर्वजांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथं येणाऱ्या सगळ्यांना ही जागा सुलभ आणि सुरक्षित वाटावी अशी आमची इच्छा आहे.”
इस्रायलमधले अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी यांनी एक्सवर लिहिलं, “आज सकाळी इस्रायलचे लोक उठले तेव्हा त्यांना या भयानक घटनेची माहिती मिळाली.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC