Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील सॅन डिएगो शहरात एक लहान प्रवासी विमान कोसळलं. यात विमानातील सर्व 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मानलं जात आहे, अशी माहिती फेडरल अधिकाऱ्यांनी दिली.
विमान कोसळ्यानं जमिनीवर असलेल्या 8 नागरिकांना दुखापत झाली असून एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिवाय, 100 हून अधिक नागरिकांना त्या परिसरातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
या विमान अपघातात सुप्रसिद्ध म्युझिक एजंट डेव्ह शापिरो यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या टॅलेंट एजन्सीकडून देण्यात आली.
सुप्रसिद्ध म्यूझिशियनचा मृत्यू
सुप्रसिद्ध म्युझिक एजंट डेव्ह शापिरो हे साउंड टॅलेंट ग्रुप या संस्थेचे सहसंस्थापक होते.
त्यांच्याकडे सम 41, स्टोरी ऑफ द इअर आणि पीअर्स द व्हेल यासारख्या प्रसिद्ध रॉक बँड्सचं प्रतिनिधित्व होतं.
द डेव्हिल वेअर्स प्राडा या बँडमध्ये पूर्वी काम करणारे ड्रमर डॅनिअल विलिअम्स हेही या अपघातात सापडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माध्यमांत आलेल्या माहितीनुसार, त्यांनी या प्लेनमधून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकली होती.
फेडरल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानात प्रवास करणारे सर्व 6 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत, असं मानलं जात आहे.
मर्फी कॅनीन परिसरात हे विमान कोसळल्यामुळं तिथलं एक घर जमिनदोस्त झालं, तर आणखी 10 घरं आणि काही गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
“आमचा सहसंस्थापक, सहकारी आणि मित्र डेव्ह याचं निधन झाल्यानं आम्ही फार दुःखी झालो आहोत,” साऊंड टॅलेंट ग्रुपचे प्रवक्ते बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.
“या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याप्रती आम्ही आमची सहवेदना व्यक्त करतो. या प्रसंगी त्यांच्या खासगीपणाचा आदर केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.”
शापिरो यांच्यासमवेत या विमान अपघातात तीन कर्मचारी गमावल्याचं कंपनीनं सांगितलं. मात्र इतर दोन कर्मचाऱ्यांच्या नावाचा खुलासा त्यांनी केला नाही.
या विमान अपघातात कमीतकमी 2 जणांचा मृत्यू झाला असल्याचं स्थानिक प्रशासनाने नक्की केलं. मात्र अपघाताचा सखोल तपास करणाऱ्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डानुसार, मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. अधिकार्यांनी मृतांची नावंही अजून जाहीर केलेली नाहीत.
ज्याचा अपघात झाला ते सेसना 500 हे विमान होतं. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 3 वाजून 45 मिनिटांनी ते परिसरात कोसळलं.
या पद्धतीच्या विमानात चालकासह 10 लोक बसू शकतात, अशी माहिती फेडरल एव्हिएशन प्रशासनाने दिली. अपघातावेळी मात्र त्यात 6 लोकांचा समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
संगितातील अनुभवासोबतच, शापिरो स्वतः विमानचालक होते. त्यांना 15 वर्षांचा वैमानिक प्रशिक्षक म्हणून काम करण्याचाही अनुभव होता, अशी माहिती त्यांच्या व्हेलॉसिटी ॲव्हिएशन या कंपनीनं दिली.
या विमानात ज्यांच्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या विल्यम्स यांनी अपघाताच्या काही तास आधी इंस्टाग्रामवर काही पोस्ट्स शेअर केल्या होत्या. त्यात ते शापिरो यांच्यासोबत सह-चालकाच्या जागेवर बसलेले दिसत होते, अशी माहिती सॅन डिएगो युनियन ट्रीब्युन या वृत्तपत्रानं दिली.
त्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये दाखवलेला विमानाचा नंबर आणि कोसळलेल्या विमानाचा नंबर एकच असल्याचं वृत्तपत्रानं म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
विल्यम्स हे द डेव्हिल वेअर्स प्राडा या ख्रिस्ती मेटल बँडचे संस्थापक सदस्य होते. 2016 पर्यंत त्यांनी या बँडसोबत 10 पेक्षा जास्त वर्षं काम केलं.
या बँडनं इंस्टाग्रामवर विल्यम्सच्या काही छायाचित्रांची मालिका पोस्ट केली आहे. त्यात त्यांचे ड्रमस्टिक सोबतचे, विमानातले आणि बँडसोबतचे काही फोटो आहेत.
“आमच्याकडे शब्द नाहीत. आम्ही तुझं मोठं देणं लागतो. तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहू,” असं पोस्टमध्ये लिहिलंय.
8 नागरिकांना दुखापत
विमान कोसळ्यानं जमिनीवर असलेल्या 8 नागरिकांना दुखापत झाली असून एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय, 100 हून अधिक नागरिकांना त्या परिसरातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाचे तपास अधिकारी एलियट सिम्पसन यांनी सांगितलं की, विमान बुधवारी (21 मे) रात्री सव्वा अकरा वाजता न्यू जर्सीहून निघालं आणि त्यानंतर इंधन भरण्यासाठी कॅन्सासमधील विचिटा इथं थांबलं होतं.
त्यानंतर सॅन डिएगोच्या विमानतळाकडे जात असताना ते विजेच्या दोन तारांना धडकले आणि नंतर खाली कोसळले. मात्र, अपघातामागचं हेच कारण आहे, असं आत्ताच सांगता येणं अवघड आहे, असं सिम्पसन यांनी सांगितलं.
एनटीएसबीकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असून त्यांना वीजवाहिन्यांच्या खाली विमानाचे काही तुकडे आणि जवळच्याच रस्त्यावर विमानाचा एक भाग सापडला, असंही सिम्पसन पुढे म्हणाले.
गुरुवारी (22 मे) सकाळी, अग्निशमन विभागाचे सहाय्यक प्रमुख डॅन एडी यांनी दृश्याचे वर्णन करताना सांगितले, “सर्वत्र विमानाचे तुकडे पसरलेले होते.”
“अपेक्षेप्रमाणेच एखादी इतक्या मोठ्या आकाराची गोष्ट इतक्या वेगाने येऊन धडकते तेव्हा त्याचे तुकडे सर्वत्र पसरतातच,” ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
काही व्हीडिओमध्ये घटनास्थळी रस्त्यावर आगीत जळालेल्या गाड्या दिसतात.
विमान कोसळण्याच्या मोठ्या आवाजाने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला झोपेतून जाग आली असल्याचं स्थानिक रहिवासी ख्रिस्तोफर मूर सांगत होते. खिडकीबाहेर धूर दिसताच ते त्यांची दोन लहान मुलं घेऊन बाहेर पडले. त्यावेळी त्यांना रस्त्यावर एक कार जळताना दिसली.
“ते दृष्य फार भयानक होतं. पण कधी कधी फक्त डोकं खाली करून सुरक्षित ठिकाणी जाणं गरजेचं असतं,” ते म्हणाले.
सैन्यातील एका जवानाने फॉक्स न्युजला सांगितलं की, त्यांना आधी एक शिट्टीसारखा आवाज आला. नंतर कोसळण्याचा आवाज आला आणि त्यांच्या घरात भुंकपासारखे धक्के जाणवू लागले.
सॅन डिएगोच्या शहराच्या उत्तरेला सुमारे 10 किमी अंतरावर असलेल्या मोंटगोमेरी फील्ड या विमानतळाकडे हे विमान जात होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC