Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, REUTERS/ALY SONG
आयफोन खरेदी केल्यानंतर त्याच्यासोबत येणाऱ्या लेबलवर लिहिलेलं असतं की, तो फोन अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये डिझाईन केलेला आहे.
या आयफोनचं डिझाईन जरी अमेरिकेत झालेलं असलं तरी सामान्यतः आपल्याकडे उपलब्ध असणारे आयफोन हे अमेरिकेपासून हजारो किलोमीटर दूरवर असणाऱ्या चीनमध्ये बनवलेले असतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे चीनवर सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे. चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या काही सामानांच्या बाबतीत तर हा टॅरिफ 245 टक्क्यांनी वाढलेला आहे.
अॅपल दरवर्षी 22 कोटींहून अधिक आयफोन विकतं, आणि दहापैकी नऊ आयफोन चीनमध्ये बनत असल्याचं अनेक अहवालांमधून समोर आलेलं आहे.
आयफोनच्या आकर्षक स्क्रीनपासून, बॅटरीपर्यंत अॅपलची अनेक उत्पादनं चीनमध्ये बनवली जातात. आयफोन असो, आयपॅड असो किंवा मग मॅकबुक या सगळ्या गोष्टींची जोडणी चीनमध्येच केली जाते.
चीनमध्ये बनणारे बहुतांश आयफोन हे अमेरिकेत पाठवले जातात. अॅपलसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मागच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरच्या टॅरिफवर सूट दिली आणि हे अॅपलच्या पथ्यावर पडलं.
असं असलं तरी हा कायमचा दिलासा नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी जास्त टॅरिफ लावण्याचा इशारा दिलेला आहे. त्यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, “यातून कुणीच वाचणार नाही,” कारण त्यांचं प्रशासन “सेमिकंडक्टर आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या सप्लाय चेन (पुरवठा साखळी)चा अभ्यास करत आहे.”
अॅपल त्यांची संपूर्ण जगभरातली सप्लाय चेन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता हेच त्यांच्यासाठी नवीन संकट बनलेलं आहे.
अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था अनेक बाबतीत एकमेकांवर अवलंबून आहेत. पण ट्रम्प यांनी अचानक सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे हे संबंध एका रात्रीत बिघडले आहेत.
यामुळे असा प्रश्नही उपस्थित होतो की, दोन्ही देशांपैकी कोणता देश दुसऱ्या देशावर जास्त अवलंबून आहे?
जीवनरेखा धोकादायक कशी बनली?
अॅपलची उत्पादनं चीनमध्ये बनवल्यामुळे चीनला मोठा फायदा होतो. पाश्चिमात्य देशांना चांगली उत्पादने बनवण्यासाठी चीन हे हक्काचं ठिकाण बनलेलं होतं.
यामुळेच स्थानिक पातळ्यांवर वेगवेगळे प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळालेलं आहे.
नव्वदच्या दशकात अॅपलने चीनच्या बाजारात प्रवेश केला. थर्ड पार्टी सप्लायरच्या माध्यमातून अॅपलने कॉम्प्युटर विकायला सुरुवात केली होती.
1997च्या सुमारास अॅपल इतर कंपन्यांच्या स्पर्धेत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन थांबली होती आणि त्याचवेळी या कंपनीचं चीनमध्ये पुनरुज्जीवन झालं.

फोटो स्रोत, Getty Images
याचकाळात चीनची अर्थव्यवस्था स्थानिक उद्योग वाढवण्यासाठी आणि नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी परदेशी कंपन्यांना खुली करून देण्यात आली होती.
2001 साली शांघायमधल्या एका कंपनीसोबत मिळून अॅपलने चीनच्या बाजारात अधिकृत प्रवेश केला आणि त्यांनी चीनमध्ये त्यांची उत्पादनं बनवायला सुरुवात केली.
त्यांनी आयपॉड, आयमॅक आणि नंतर आयफोन तयार करण्यासाठी चीनमधल्या तैवानच्या फॉक्सकॉनसोबत भागीदारी केली.
अमेरिकेच्या पाठिंब्याने चीनने जगभरातील देशांशी व्यापार करण्यास सुरुवात केल्यावर, अॅपलने चीनमध्ये आपली उपस्थिती वाढवली. यामुळे चीन हा जगातील उत्पादनांचा कारखाना म्हणून नावारूपास आला.
त्यावेळेस चीनमध्ये आयफोन बनवता येणं शक्यच नव्हतं. पण सप्लाय चेनचे तज्ज्ञ लिन शुइपिंग यांच्या मते अॅपलने काही विशिष्ट पुरवठादार निवडले आणि त्यांना ‘मॅन्युफॅक्चरिंग सुपरस्टार’ बनण्यासाठी मदत केली.

फोटो स्रोत, Getty Images
बीजिंग जिंगडियाओ या कंपनीचं उदाहरण त्यांनी दिलं. बीजिंग जिंगडियाओ ही कंपनी सध्या अशा मशिन्स बनवण्यासाठी ओळखली जाते ज्यांचा वापर आधुनिक यंत्रांच्या निर्मितीसाठी केला जातो.
लिन म्हणतात की, “एकेकाळी ही कंपनी अॅक्रेलिक कापण्यासाठी ओळखली जायची. मशीन टूल बनवणारी कंपनी अशी तिची ओळख नव्हती.पण नंतर त्यांनी काच कापण्यासाठी यंत्रसामग्री विकसित केली आणि अॅपलच्या मोबाईल फोन सर्फेस प्रोसेसिंगमध्ये ही कंपनी निष्णात बनली.”
2008 साली अॅपलने चीनच्या बीजिंगमध्ये त्यांचं पहिलं स्टोअर उघडलं. त्याच वर्षी या शहरात ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनचे पाश्चात्य देशांशी संबंधही त्यावेळी उत्तम होते.
लवकरच चीनमध्ये असणाऱ्या अॅपल स्टोअर्सची संख्या 50वर जाऊन पोहोचली. त्यानंतर दुकानांच्या दाराबाहेर अॅपलच्या ग्राहकांच्या रांगा दिसू लागल्या.

फोटो स्रोत, INDRANIL ADITYA/NURPHOTO VIA GETTY IMAGES
अॅपलच्या नफ्याचे प्रमाण वाढले, तसतसे चीनमधील त्याच्या असेंब्ली लाईन्स (उत्पादन केंद्रे) देखील वाढल्या. फॉक्सकॉनने चीनमधील झेंगझोऊ येथे जगातील सर्वात मोठा आयफोन बनवणारा कारखाना बांधला, तो तेव्हापासून ‘आयफोन सिटी’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
वेगाने विकसित होणाऱ्या चीनसाठी, अॅपल हे साध्या पण आकर्षक आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञानाचं प्रतिक बनलं.
आज, अॅपलचे बहुतेक महागडे आयफोन फॉक्सकॉनद्वारे बनवले जातात. तैवानमधली सर्वात मोठी चिप्स बनवणारी कंपनी तैवान सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (TSMC) ही आयफोनचे आधुनिक चिप्स बनवते.
या चिप्स बनवण्यासाठी अतिशय दुर्मिळ असणाऱ्या खनिजांची देखील आवश्यकता असते. याचाच वापर फोनच्या ऑडिओ उपकरणांमध्ये आणि कॅमेऱ्यांमध्ये वापरले जातात.
निक्केई एशियाच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये, अॅपलच्या टॉप 187 पुरवठादारांपैकी सुमारे 150 पुरवठादारांचे कारखाने चीनमध्ये होते. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत म्हटले होते की, “जगात चीनपेक्षा आपल्यासाठी महत्त्वाची कोणतीही पुरवठा साखळी नाही.”
टॅरिफचा अॅपलवर किती परिणाम होईल?
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात जेव्हा चिनी उत्पादनांवर टॅरिफ लादण्यात आलं तेव्हा अॅपलला त्यातून सूट देण्यात आली. पण यावेळी ट्रम्प प्रशासनाने काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील शुल्क मागे घेण्यापूर्वी अॅपलचे उदाहरण दिले आहे.
त्यांचा असा विश्वास आहे की, मोठ्या करांच्या धोक्यामुळे कंपन्यांना अमेरिकेत त्यांची उत्पादने तयार करण्यासाठी पावले उचलण्यास भाग पाडले जाईल.
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी महिन्याच्या सुरुवातीला एका मुलाखतीत सांगितलं की, “लाखो लोक आयफोन बनवण्यासाठी अमेरिकेत तयार होऊन बसले आहेत. अमेरिकेतही असंच घडणार आहे.”
दरम्यान, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी गेल्या आठवड्यात असं म्हटलं होतं की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की, अमेरिका सेमीकंडक्टर, चिप्स, स्मार्टफोन आणि लॅपटॉप यासारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तूंच्या निर्मितीसाठी चीनवर अवलंबून राहू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “ट्रम्प यांच्या सूचनेनुसार, या कंपन्या अमेरिकेत त्यांचे उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
पण अनेकांना या दाव्यावर शंका आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अॅपलच्या शैक्षणिक सल्लागार मंडळाचे माजी सदस्य एली फ्रीडमन यांच्या मते, अॅपल आपली असेंब्ली अमेरिकेत हलवू शकते ही कल्पना ‘पूर्णपणे काल्पनिक’ आहे.
एली फ्रीडमन 2013 मध्ये कंपनीच्या बोर्डात सामील झाले. तेव्हापासून, ते म्हणतात की, कंपनी चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्ये आपली पुरवठा साखळी वाढवण्याबद्दल बोलत आहे, परंतु अमेरिका यासाठी कधीही पर्याय नव्हती.
फ्रीडमन म्हणतात की, अॅपलने पुढील दहा वर्षे त्यावर फारसं काम केलं नाही. पण कोविड-19च्या महामारीनंतर, यासाठी प्रयत्न केले गेले. चीनमधील कडक लॉकडाऊनमुळे या उत्पादनावर परिणाम झाला होता.
एली फ्रीडमन म्हणाले की, ‘असेंब्लीच्या बाबतीत कंपनीसाठी भारत आणि व्हिएतनाम ही दोन महत्त्वाची ठिकाणं आहेत. पण अर्थातच अॅपलची बहुतेक असेंब्ली अजूनही चीनमध्ये होते.”
या संदर्भात बीबीसीच्या प्रश्नांना अॅपलने उत्तर दिले नाही, परंतु त्यांच्या वेबसाइटनुसार, अॅपलची पुरवठा साखळी 50 हून अधिक देशांमध्ये पसरलेली आहे.
आव्हानं काय आहेत?
कोविड-19 नंतर चीन त्यांचा विकासदर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे अॅपलने त्यांच्या सध्याच्या सप्लाय चेनमध्ये कोणताही बदल केला तर तो चीनसाठी मोठा धक्का असेल.
2000 च्या दशकाच्या सुरुवातीला चीनने पाश्चात्य कंपन्यांसाठी उत्पादन केंद्र बनण्याची आकांक्षा बाळगली होती, परंतु आजपर्यंत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण चीन हे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे लाखो नोकऱ्या निर्माण होतील आणि चीनला जागतिक व्यापारात मोठा फायदा होईल.
सप्लाय चेनचा अभ्यास असणारे जिगर दीक्षित म्हणतात की, “अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या केंद्रस्थानी अॅपल आहे आणि टॅरिफमुळे चीनसाठी निर्माण झालेले धोके प्रकाशात आले आहेत.”
कदाचित यामुळेच चीन ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकला नाही आणि अमेरिकेतून होणाऱ्या आयातीवर चीनने 125 टक्के टॅरिफ लादला.
चीनने आपल्या देशात असलेली अनेक महत्त्वाची दुर्मिळ खनिजं आणि चुंबकांच्या निर्यातीवरही नियंत्रणे लादली आहेत, ज्यामुळे अमेरिकेला धक्का बसला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेने चिनी उत्पादनांवर लावलेल्या शुल्काचा फटका इतर क्षेत्रांना बसेल यात शंका नाही.
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे फक्त चीनलावरच परिणाम होणार नाही. तर ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की ते चिनी पुरवठा साखळीचा भाग असलेल्या देशांना लक्ष्य करतील.
उदाहरणार्थ, अॅपलने एअरपॉड्सचे उत्पादन व्हिएतनामला हलवले आहे. पण ट्रम्प यांनी 90दिवसांची स्थगिती लागू करण्यापूर्वी त्यावर देखील 46 टक्के टॅरिफ लावण्यात आला होता. त्यामुळे, आशियातील कोणत्याही देशात उत्पादन हलवणे हा त्यांच्यासाठी सोपा पर्याय नाही.
“हजारो कामगारांसह फॉक्सकॉन असेंब्ली सेंटर्ससाठी सर्व संभाव्य ठिकाणं आशियामध्ये आहेत आणि या सर्व देशांना उच्च टॅरिफचा सामना करावा लागतो,” असं फ्रीडमन म्हणतात.
आता अॅपल काय करेल?
अमेरिकेशी स्पर्धा करण्यासाठी चीन सरकार प्रगत तंत्रज्ञानाच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत असल्याने अॅपलला चिनी कंपन्यांकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
लिन यांच्या मते, “अॅपलने चीनच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षमतांना चालना दिली आहे. आता हुआवेई, शाओमी, ओप्पो आणि इतर कंपन्या अॅपलच्या उत्कृष्ट पुरवठा साखळीचा वापर करू शकतात.”
सध्या आर्थिक मंदीमुळे चीनमधील लोकांनी त्यांचे खर्च कमी केले आहेत. अॅपल चीनमध्ये स्मार्टफोन विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होतं, पण गेल्या वर्षी हे स्थान त्यांनी गमावलं आहे. आता अॅपल हुआवेई आणि विवोच्याही मागे गेला आहे.
यासोबतच, चीनमध्ये चॅटजीपीटी (ChatGPT) वरही बंदी घालण्यात आली आहे आणि त्यामुळे एआयने चालणारे फोन हवे असणाऱ्या खरेदीदारांमध्ये अॅपलला त्यांचे फोन विकण्यातही आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
कंपनीने जानेवारीमध्ये विक्री वाढवण्यासाठी आयफोनवर सवलतीही दिल्या, जे सहसा चिनी बाजारपेठेत दिसून येत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, चीन राजकीय मेसेजेस पाठवण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असल्याने अॅपलला त्यांच्या उपकरणांमध्ये ब्लूटूथ आणि एअरडॉपचा वापर मर्यादित करावा लागला आहे.
येथील सरकारने तंत्रज्ञान उद्योगावर अशी कारवाई केली की ज्याचा परिणाम अलिबाबाचे संस्थापक आणि अब्जाधीश उद्योगपती जॅक मा यांच्यावरही झाला होता.
अॅपलने अमेरिकेत 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली असली तरी, ट्रम्प प्रशासनाला जास्त काळ आनंदी ठेवण्यासाठी हे पुरेसं असेल असं वाटत नाही.
ट्रम्प यांचे अनेक यू-टर्न आणि टॅरिफभोवतीची अनिश्चितता पाहता, त्यांच्याकडून अधिक आश्चर्यकारक टॅरिफ अपेक्षित आहेत.
अशा परिस्थितीत, अॅपलकडे पुन्हा खूप कमी संधी असेल आणि उपाय शोधण्यासाठी कमी वेळ असेल.
जिगर दीक्षित म्हणतात की, “जर स्मार्टफोनवर पुन्हा शुल्क लादले गेले तर ते अॅपलचे नुकसान करणार नाहीत, परंतु त्यांच्या सप्लाय चेनला ‘सुरु ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागेल.”
गेल्या आठवड्यात स्मार्टफोनसाठी देण्यात आलेल्या सवलतीचा संदर्भ देत फ्रीडमन म्हणतात, “या निर्णयामुळे या संकटाची तीव्रता स्पष्टपणे कमी झाली आहे. परंतु मला वाटत नाही की यातून अॅपलला कोणताही दिलासा मिळेल.”
फॅन वांग यांचे अतिरिक्त रिपोर्टिंग.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC