Source :- ZEE NEWS
Sunita Williams: तब्बल 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विलियम्स पृथ्वीवर परतल्या. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे नासाच्या वतीनं अवकाशात गेलेल्या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर सुनीता विलियम्स तिथंच अडकल्या. काही आठवड्यांचा त्यांचा हा मुक्काम पाहता पाहता तब्बल 9 महिन्यांपर्यंत पोहोचला आणि अखेर नासासह स्पेसएक्स, अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांनंतर विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर पृथ्वीवर परतले. भारतीय वंशाच्या सुनिता यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. दरम्यान अंतराळातून भारत कसा दिसतो? असा प्रश्न सुनिता विलियम्स यांना विचारण्यात आला. यावर सुनिता यांनी दिलेलं उत्तर खूप चर्चेत आलंय.
1984 मध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळ प्रवासाला गेले होते. तेव्हा अंतराळातून भारत कसा दिसतो? असा प्रश्न त्यांना इंदिरा गांधींनी विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी मुहम्मद इक्बालची ‘सारे जहाँ से अच्छा’ ही ओळ बोलून दाखवली. त्याकाळी या प्रश्न आणि उत्तराची खूप चर्चा झाली. आता हाच प्रश्न भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना विचारण्यात आला. सुनिता विलियम्स यांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकल्यानंतर सर्वांना आनंद झाला.
काय म्हणाल्या सुनीता विलियम्स?
India is indeed incredible even from Space
Must Watch: How Sunita Williams Sees India from Space.. #SareJahanSeAcha pic.twitter.com/daKJc4E6WA
— Rushikesh Patel (@irushikeshpatel) April 1, 2025
286 दिवस अंतराळात घालवून परतलेल्या सुनीता यांनी सोमवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘वरून भारत कसा दिसतो?’, असा प्रश्न त्यांना एका पत्रकाराने विचारला. तेव्हा त्यांनी कोणताही संकोच न करता या प्रश्नाचे उत्तर दिले. अवकाशातून दिसणाऱ्या हिमालयाच्या चित्तथरारक दृश्याचे वर्णन त्यांनी केले. ‘भारत अद्भुत आहे, अद्भुतच आहे’. आम्ही जेव्हा जेव्हा हिमालयावरून गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला अविश्वसनीय फोटो मिळाले. जणू काही एक लाट आली आणि संपूर्ण भारतात पसरली’, असे उत्तर त्यांनी दिले.
‘प्लेट्स आदळल्याने निर्माण झालेली ही लाट भारतात वाहत असताना अनेक रंगांमध्ये दिसते. तुम्ही पूर्वे गुजरात आणि मुंबई पाहता तेव्हा किनाऱ्याजवळ मासेमारीचे ताफे दिसतात. तेव्हा तुम्ही इथं पोहोचलाय,असा सिग्नल मिळतो. संपूर्ण भारतात मोठ्या शहरांपासून लहान शहरांमधील दिव्यांची लाट दिसते. दिवसा तसेच रात्री हा नजारा पाहणे अद्भूत असते. भारतात खालच्या बाजूला जाणाऱ्या या लाटेचा पुढचा पुढचा भाग हिमालयावरुन पाहणे अविश्वसनीय असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
सुनिता विलियम्सना किती आर्थिक मोबदला मिळणार?
विलियम्स यांना या मोहिमेतून नेमका किती आर्थिक फायदा/ मोबदला दिला जाणार हा प्रश्नसुद्धा अनेकांच्याच मनात घर करत आहे. नासाचेच माजी अंतराळयात्री कॅडी कोलमॅन यांच्या माहितीनुसार अंतराळयात्रींसाठी वाढीव तासांच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या मोबदल्याची कोणतीही तरतूद नाही. हे अंतराळवीर सरकारी कर्मचारी असल्यामुळं त्यांनी अवकाशात व्यतीत केलेला वेळ हा पृथ्वीवर काम करणाऱ्या कोणत्याही सामान्य सरकारी कर्मचाऱ्याच्या कार्यालयीन तासांइतकाच असल्यामुळं त्यांना एक दैनंदिन भत्ता मात्र लागू केला जाणार आहे. जी रक्कम असेल दर दिवसाचे $4 (जवळपास 347 रुपये). उदाहरणार्थ 2010-11 मध्ये अंतराळातील एका 159 दिवसांच्या मोहिमेदरम्यान कोलमॅन यांना जवळपास $636 (साधारण 55,000 रुपये) इतका आर्थिक मोबदला देण्यात आला होता. याच हिशोबानं पाहिल्यास बुच विल्मोर आणि विलियम्स यांना अवकाशात 287 दिवसांहून अधिक दिवसांचा कालावधी लागल्यानं त्यांना याबदल्यात $1148 (साधारण 1 लाख रुपये) इतकी किंवा याहून जास्त रक्कम दिली जाऊ शकते.
SOURCE : ZEE NEWS