Home LATEST NEWS ताजी बातमी शिळा भात खाल्ला तर पोटाचं आरोग्य सुधारतं? गॅस, अल्सर होऊ नये म्हणून...

शिळा भात खाल्ला तर पोटाचं आरोग्य सुधारतं? गॅस, अल्सर होऊ नये म्हणून काय टाळायचं?

11
0

Source :- BBC INDIA NEWS

शिळा भात खाऊन पोटाचं आरोग्य सुधारतं का? आतड्यांचे आरोग्य, पोटदुखी, गॅस आणि अल्सरबद्दल सर्वकाही

फोटो स्रोत, Getty Images

बहुतांश भारतीय घरांत दररोज भात तयार होतो. पण उरलेला शिळा भात हा अनेकांच्या मते, साधा, स्वस्त आणि ‘उरलेलं अन्न’ असला, तरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, तो पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकतो.

रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेल्या या भातात नैसर्गिक प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात तयार होतात. ते आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ वेगानं करतात आणि पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे वारंवार होणारा गॅस, फुगलेपणा किंवा सकाळची अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळू शकते.

काही लोकांना वाटते की शिळा भात खाल्ला की पोटात गॅस होतो; पण डॉक्टर सांगतात की, योग्य प्रमाणात खाल्ल्यास उलट आतड्यांतील बॅक्टेरियांचे संतुलन सुधारते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आतड्यांच्या चांगल्या बॅक्टेरियांमुळे अल्सर होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो, कारण हे ‘प्रोबायोटिक’ जीवाणू वाईट बॅक्टेरियांची वाढ रोखतात.

अर्थात, ज्यांना आधीच अल्सर, तीव्र गॅस किंवा पचनासंबंधी विकार आहेत, त्यांनी शिळ्या भाताचे सेवन मर्यादेत आणि शरीराला सुसह्य असेल तितकेच करावे.

आपले शरीर फिट ठेवण्यासाठी पोट आणि आतड्यांचे आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पोटाच्या काही ना काही तक्रारी असतात. या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्या कशामुळे होतात, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी तमिळने पोटाचे विकारतज्ज्ञ डॉ. पासुमणी यांच्याशी खास चर्चा केली.

पोटदुखी झाल्यास डॉक्टरांकडे कधी जावे?

डॉ. पासुमणी सांगतात, “पोटाच्या आत नेमके काय आहे हे आपल्याला माहिती नसते. आदल्या रात्री खूप जास्त जेवण केले असेल किंवा हॉटेलमधील जेवण पचले नसेल तर अपचनामुळे पोटाच्या वरच्या भागात दुखू शकते.

“तसेच, भूक लागत नाही. या दोन्ही गोष्टी सामान्य आहेत. अशा वेळी सोडा, लिंबू सरबत, ताक, जिरे किंवा आले यांचा वापर करण्यास हरकत नाही. परंतु, पोटदुखीची 100 पेक्षा जास्त कारणे असू शकतात, जसे की आतड्यांमधील जखमा किंवा अल्सर.”

ते सांगतात की, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :

  • झोप मोड होईल इतक्या तीव्र वेदना
  • कोणतेही विशेष पदार्थ न खाताही होणाऱ्या तीव्र वेदना
  • 4-5 तास सतत होणारी वेदना
  • 4-5 आठवडे सतत जाणवणारी वेदना
  • दिवसेंदिवस वाढत जाणारी वेदना
  • वेदना पाठीच्या भागापर्यंत पसरणे
  • भूक न लागणे आणि उलट्या होणे
  • थकवा आणि चक्कर येणे
  • रक्त तपासणीत हिमोग्लोबिन कमी येणे
  • लोहखनिजाची (Iron) कमतरता
  • स्कॅन रिपोर्टमध्ये पोट किंवा यकृतामध्ये समस्या दिसणे

ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा

जेवणानंतर धूम्रपान केल्यामुळे काय समस्या उद्भवू शकते?

डॉ. पासुमणी यांनी सांगितले की, “तंबाखूचा डोक्यापासून पायापर्यंत शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम होतो. निकोटीनमुळे पोटाचे स्नायू शिथिल होतात. ते शिथिल झाल्यामुळे भूक कमी होऊ शकते, पण ‘स्फिंक्टर’ स्नायू सैल झाला तर आम्लपित्त वाढू शकते. म्हणूनच, जेवणानंतर धूम्रपान करणे चांगले नाही.”

अन्न

फोटो स्रोत, Getty Images

सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ गिळली तर चालते का?

लाळ ही बॅक्टेरियाविरोधी असते. त्यामध्ये नैसर्गिकरीत्या वेदनाशामक गुणधर्म असतात. लहान मुलाला जखम झाल्यावर तिथे लाळ लावणे चांगलेच आहे, कारण त्याचा अँटिबायोटिक आणि वेदनाशामक म्हणून उपयोग होतो. लाळेमध्ये अनेक चांगले बॅक्टेरिया असतात, जे अँटिबायोटिकसारखे काम करतात आणि वाईट बॅक्टेरियांना वाढू देत नाहीत.

याला ‘कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन’ असे म्हणतात. बॅक्टेरियांच्या बाबतीत बोलायचे झाले तर तोंडात त्यांचे एक मोठे जगच असते. झोपेच्या वेळी त्यांचे प्रमाण बदलते. कोरडेपणामुळे वाईट बॅक्टेरियांची संख्या बदलू शकते, कारण रात्रीच्या वेळी लाळेची निर्मिती कमी होते.

सकाळी तोंडात असलेले बॅक्टेरिया हे चांगले बॅक्टेरिया नसतात. तरीही ते गिळण्यात कोणतीही अडचण नाही. जर आपल्या शरीरात पुरेसे ॲसिड असेल, तर ते गिळल्याने आपल्या पोटावर कोणताही परिणाम होत नाही. ते बॅक्टेरिया पोटात गेल्यावर मरून जातात.

पोट आणि तोंडातील अल्सर यांचा काही संबंध आहे का?

पोट म्हणजे केवळ पोटाचा वरचा भाग नाही, तर त्यापुढे 8 मीटरपर्यंत विस्तारलेला भाग आहे. लहान आतड्याच्या शेवटच्या भागात जरी एखादी छोटी जखम किंवा अल्सर असला, तरी तोंडातील बॅक्टेरियामुळे त्यावर परिणाम होऊ शकतो.

तोंडातील अल्सरची अनेक कारणे असू शकतात. पोटाच्या समस्यांव्यतिरिक्त, ‘सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस’ सारखे ‘ऑटोइम्युन’ आजार आणि ‘लायकेन प्लॅनस’ यांसारख्या स्थितींमध्येही तोंडात अल्सर येऊ शकतात. अशा परिस्थितीत, पोटातील बिघाडामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

आतड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

आपल्या आतड्यांचे आरोग्य हे पूर्णपणे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. जर आपण या गोष्टी नीट पाळल्या, तर आपले आतडे स्वतःची काळजी स्वतःच घेतात.

रात्रीच्या वेळी आपले आतडं एखाद्या ‘सफाई कामगारा’प्रमाणे काम करतं. म्हणजे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं आतडं स्वतःची स्वच्छता स्वतःच करत असतं. जर आपण सलग 3 तास काहीही खाल्ले नाही, तर लहान आतड्यात काहीच शिल्लक राहत नाही, ते पूर्णपणे रिकामे होते. या स्थितीला ‘जेजुनम’ (Jejunum) असे म्हणतात. ‘जेजुनम’ म्हणजे ‘रिकामे आतडे’

आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

आतड्यांच्या आरोग्यासाठी काय करावे?

  • मानसिक तणाव न घेता चांगली झोप घ्यावी.
  • प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नये.
  • संतुलित आहार जसे आहारात पुरेसे प्रथिने, व्हिटॅमिन डी, लोह आणि वनस्पतींपासून मिळणारे तंतूमय पदार्थ यांचा समावेश असावा.

बिस्किट, बर्गर आणि पिझ्झा यांसारख्या पदार्थांमध्ये फायबर्स कमी असतात. यात तंतूमय पदार्थ नसल्यामुळे हे पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. अशा आहारामुळे खालील व्याधी जडण्याची शक्यता वाढते जसे की :

  • इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) – आतड्यांच्या कार्यामध्ये बिघाड होणे
  • जेवताना मळमळणे, आतड्यांना सूज येणे, आतड्यांचा कर्करोग, पार्किन्सन सारखे मज्जासंस्थेचे आजार, मानसिक नैराश्य, त्वचेचे विकार आणि ॲलर्जी,
  • सांधेदुखी
  • यांसारखे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

दुर्गंधीयुक्त वायू बाहेर पडण्याचे कारण काय?

तंतूमय पदार्थांचे (फायबर) पचन होताना शरीरात वायूची निर्मिती होते. सामान्यतः हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड आपल्या शरीरातून बाहेर पडतात. मात्र, जेव्हा मिथेन आणि सल्फाइड हे वायू दाबाने आतड्यांमधून बाहेर पडतात, तेव्हा दुर्गंधी येते.

काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया, जे काही रसायने तयार करतात, ते आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटात असू शकतात. काही ठराविक पदार्थांमुळे निश्चितच दुर्गंधी येते. त्याचबरोबर आपले आतड्यांचे आरोग्य, झोप, मानसिक ताण आणि बॅक्टेरियांचे प्रमाण या सर्व गोष्टी दुर्गंधीला कारणीभूत ठरतात.

सकाळी उठल्यावर गॅस बाहेर पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

परंतु, जर दिवसातून 20-30 पेक्षा जास्त वेळा मोठ्या आवाजासह गॅस बाहेर पडत असेल, तर आतड्यांमधील बॅक्टेरियांचे संतुलन का बिघडले आहे हे तपासणे गरजेचे आहे. हे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे झाले आहे की इतर काही अज्ञात कारणामुळे हे शोधून त्यावर उपचार करता येतात.

शिळे अन्न (पाणी घातलेला रात्रीचा भात) खरोखरच आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो का?

या पदार्थाला आपण 10 पैकी 10 गुण देऊ शकतो.

हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे, कारण यात ‘प्रोबायोटिक्स’ म्हणजेच चांगले बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असतात.

जे लोक खूप जास्त प्रमाणात जेवतात त्यांना कदाचित ते पचवणे कठीण जाईल.

या भातात कॅलरीज आणि स्टार्च देखील असतात. त्यामुळे हे एक उत्तम अन्न असले, तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC