Home LATEST NEWS ताजी बातमी वैभव सूर्यवंशी : लहान वयात मैदान गाजवणारे क्रिकेटर्स

वैभव सूर्यवंशी : लहान वयात मैदान गाजवणारे क्रिकेटर्स

4
0

Source :- BBC INDIA NEWS

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं आयपीएलमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला आणि अगदी लहान वयात रेकॉर्ड बुक्सपासून दिग्गज विश्लेषकांपर्यंत सर्वांना आपली दखल घ्यायला लावली.

वैभवची ही खेळी अतिशय महत्त्वाची आहे कारण आयपीएल ही देशांतर्गत स्पर्धा असली, तरी त्यात देश-विदेशातले सर्वोत्तम क्रिकेटर्स खेळतात.

वैभवनंही रशिद खान, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मासारख्या गोलंदाजांसमोर चौकार-षटकारांची बरसात करत हे शतक ठोकलं आहे. त्याआधी आयपीएल पदार्पणात पहिल्याच चेंडूवर त्यानं शार्दूल ठाकूरला षटकार ठोकला होता.

इतक्या लहान मुलानं असा खेळ करताना पाहणं जितकं रंजक होतं, तितकंच ते थक्क करणारं होतं.

कारण ज्या वयात एरवी बाकीचे ‘टीनएजर्स’ मोबाईल, मित्र-मैत्रिणी, अभ्यास आणि मौजमस्तीत रमतात, त्या वयात वैभव मैदान दणाणून सोडतो आहे.

खरं तर पुरुष क्रिकेटच्या दुनियेत असा कुणी किशोरवयीन मुलगा पराक्रम गाजवू लागला, की सगळ्यांना जणू नवा हुरूप चढतो.

त्यांच्यातली निरागसता, ‘रॉ टॅलेंट’ म्हणजे नैसर्गिक गुणवत्ता भावणारी असते. थंड पहाटे सूर्याची पहिली उबदार किरणं मनाला सुखावतात ना, तशीच.

या खेळाडूंमध्ये क्रिकेटचं भविष्य सुरक्षित असल्यासारखं वाटतं, आणि थोडी काळजीही वाटते, कारण हे वयच असं जरा धोक्याचं असतं.

करियरला लवकर सुरुवात झाली, म्हणजे जास्त खेळण्याची संधी खेळाडूला मिळू शकते. पण कधी लहान वयात जबाबदारीचं ओझं बनतं, थकवा येतो म्हणजे ‘बर्न आऊट’ होऊ शकतं तर कधी यश आणि प्रसिद्धीचा विपरीत परिणामही होऊ शकतो.

या दोन्हीतला ताळमेळ सगळ्यांनाच साधतो असं नाही. काही खेळाडूंना मात्र ते अगदी उत्तम जमलं आहे. लहानपणीच म्हणजे अठरा वर्षांचे होण्यापूर्वीच त्यांनी मोठी झेप घेऊन क्रिकेटचं मैदान गाजवलं आहे.

1. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी

लहान वयातल्या क्रिकेटर्सची चर्चा सुरू झाली की, सर्वात पहिलं नाव नजरेसमोर येतं ते अर्थात सचिन तेंडुलकर.

हे समीकरण आजही लोकांच्या मनात इतकं फिट्ट बसलंय, की ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीचं उदाहरण द्या म्हटलं की अनेकजण सचिनचं उदाहरणच देतील.

मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये विनोद कांबळीच्या साथीनं सचिननं 664 धावांची भागीदारी रचली होती, तेव्हापासूनच त्याच्या नावाची चर्चा आंतराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचली होती.

मग मुंबईसाठी पदार्पण सचिननं केलं तेव्हा त्याचं वय होतं 15 वर्ष 232 दिवस. त्यानंतर 16 वर्षांच्या वयात त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

पहिल्याच सामन्यात सचिनला मोठी खेळी करता आली नाही, पण पुढे जे घडलं ते आता सगळ्यांना ठाऊक आहे.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी

फोटो स्रोत, TWITTER

लहान वयात आत्मविश्वासानं कसं खेळावं यापेक्षाही कसं वागावं याचा वस्तुपाठ त्यावेळी सचिननं घालून दिला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

असं म्हणतात, तुम्ही काय करू शकता, याचं सचिन हे उदाहरण असेल, तर विनोद हे ‘कदाचित काय घडू शकलं असतं’ याचं उदाहरण आहे.

सचिनपेक्षा विनोद केवळ वर्षभरानं मोठा आहे आणि मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये दोघं एकत्र नावारुपाला आले.

विनोदला मुंबई रणजी संघातही लवकर स्थान मिळालं, पण भारतीय संघाचे दरवाजे उघडेपर्यंत त्याला थोडी वाट पाहावी लागली. तेव्हा तो 19 वर्षांचा होता.

संधी मिळाली, तेव्हा विनोदनं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. पण त्याची क्रिकेटमधील वाटचाल काहीशी अडखळती होती. तरुण वयात सावरणारं कुणी असणं का गरजेचं असतं आणि ते नसेल तर काय होतं, हे विनोदची कहाणी सांगते.

2. पार्थिव पटेल

लहान चणीच्या पार्थिव पटेलनं 17 वर्ष 153 दिवसांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं. तेव्हा अनेकांना त्याची तुलना सचिनशी करण्याचा मोह झाला.

पार्थिवनं भारतीय संघात यष्टीरक्षकाची जबाबदारी बराच काळ सांभाळली, पण तो पुढे महेंद्रसिंग धोनीच्या छायेतच वावरला.

पार्थिव पटेल

फोटो स्रोत, Getty Images

3. मणिंदर सिंग

मणिंदर सिंग यांनी 17 वर्ष 222 दिवसांच्या वयात भारताकडून पदार्पण केलं होतं. एक लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून 1980 च्या दशकात त्यांनी अनेकदा भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

मणिंदर सिंग

फोटो स्रोत, Getty Images

4. हरभजन सिंग

1990च्या दशकाच्या मध्यावर हरभजन सिंगनं वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धा आणि मग रणजी ट्रॉफीमध्ये आपला ठसा उमटवला होता.

1998 साली भारताच्या कसोटी संघात स्थान मिळालं तेव्हा हरभजनचं वय होतं 17 वर्षे आणि 288 दिवस. अर्थात पदार्पणानंतर सुरुवातीची काही वर्ष त्यालाही संघर्ष करावा लागला.

पण 2001 साली जेमतेम 21 वर्षांच्या वयात हरभजननं ऐतिहासिक कोलकाता कसोटीत स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलिया संघला लोळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय क्रिकेटलाच ऊर्जेचा नवा डोस दिला.

हरभजन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

5. पृथ्वी शॉ, सरफराझ आणि प्रणव धनावडे

तसं पाहिलं तर मुंबई क्रिकेटमध्ये ‘वंडर बॉय’ म्हणून समोर आलेल्या खेळाडूंची कमी नाही.

2013 साली पृथ्वी शॉ हॅरीस शील्ड या शालेय क्रिकेट स्पर्धेत 546 धावांची खेळी केल्यामुळे चर्चेत आला होता. पृथ्वीनं पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केलं, पण त्याच्या गाडीनं अजूनही वेग घेतलेला नाही.

त्याआधी सरफराझ खाननंही 2009 साली हॅरिस शील्डमध्ये 439 धावांची खेळी करून शालेय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. पण त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करेपर्यंत पंधरा वर्ष वाट पाहावी लागली.

पृथ्वी शॉ, सरफराझ आणि प्रणव धनावडे

फोटो स्रोत, Getty Images

शालेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम प्रणव धनावडेच्या नावावर आहे, ज्यानं 2016 साली 1009 धावांची खेळी केली होती. पण अजून तरी त्याला मुंबईच्या रणजी संघापर्यंत पोहोचता आलेलं नाही.

वय आणि प्रगल्भता

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण वयात पदार्पणाचा विक्रम पाकिस्तानच्या हसन राजाच्या नावावर आहे. 1996 साली 14 वर्षे 227 दिवसांचा असताना त्यानं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

हसनच्या वयाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. पण मैदानावर त्याला फारसं कर्तृत्व दाखवता आलं नाही.

वेस्ट इंडीजचे महान फलंदाज गारफील्ड सोबर्स यांनीही 17 वर्षे आणि 245दिवसांच्या वयात कसोटी पदार्पण केलं होतं.

इथे एक गोष्ट लक्ष वेधून घेते.

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण वयात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर त्यात भारतीय उपखंडातल्या खेळाडूंची संख्या जास्त असल्याचं दिसून येतं.

याउलट इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू मात्र किशोरवयात नाही तर साधारण विशी पार केल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकतात. त्याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते तावून सुलाखून निघालेले असतात.

शाहिद आफ्रिदीचं वय आणि वाद

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचं वय हा विषय अनेकदा विनोदाचा आणि ट्रोलिंगचा भाग बनलं आहे. तो सांगतो त्यापेक्षा जास्त वयाचा आहे, अशी शंका त्याच्या पदार्पणानंतर घेतली गेली.

अधिकृत रेकॉर्डनुसार आफ्रिदीनं 16 वर्षे 215 दिवसांच्या वयात केनियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मॅचमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

मग आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि पहिल्याच खेळीमध्ये आफ्रिदीनं वन डे क्रिकेटमधलं तेव्हाचं सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. आफ्रिदीनं तेव्हा श्रीलंकेविरुद्ध केवळ 37 चेंडूंमध्ये शंभर धावा केल्या होत्या.

शाहिद आफ्रिदी

फोटो स्रोत, Getty Images

पुढे आपल्या आत्मचरित्रात आफ्रिदीनं वयाविषयी खुलासा केला. आपलं वय तेव्हा 19 वर्षांचं होतं, असं तो म्हणाला. पण जन्मतारीख सांगताना त्यानं पुन्हा काहीतरी गोंधळ केला.

आफ्रिदीनं जाणूनबुजून वय चोरलं की खरंच त्याला माहिती नव्हतं हा विषय मात्र चर्चेत राहिला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC