Home LATEST NEWS ताजी बातमी रितू तावडे : एकेकाळच्या काँग्रेस कार्यकर्त्या, आता मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार; असा...

रितू तावडे : एकेकाळच्या काँग्रेस कार्यकर्त्या, आता मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार; असा आहे प्रवास

18
0

Source :- BBC INDIA NEWS

रितू तावडे

फोटो स्रोत, FB/ritu.tawde184

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून भाजपने रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे, तर शिवसेनेकडून (शिंदे गट) संजय घाडी यांना सव्वा वर्षासाठी उपमहापौरपदी उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये महापौरपद हे भाजपकडेच राहील हे स्पष्ट होतं. परंतु, तब्बल 25 वर्षांनंतर शिवसेनेच्या हातातून महापौर पद गेल्यानंतर महायुतीतल्या शिवसेनेकडून नेमक्या काय वाटाघाटी केल्या जातात, याकडेही सर्वांचं लक्ष होतं.

अखेर भाजपने रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करून पाच वर्षांसाठी भाजपचाच महापौर असेल हे स्पष्ट केलं.

महापौर पद हे खुल्या प्रवर्गात महिला राखीव असल्याने भाजपने निवडून आलेल्या महिलांपैकी नेमकी कोणाला संधी देतं याचीही चर्चा होती. यात रितू तावडे, शीतल गंभीर, राजश्री शिरवाडकार, आशा मराठे, अशी काही नावं स्पर्धेत असल्याची चर्चा होती.

शनिवारी (7 फेब्रुवारी) मुंबई महानगरपालिकेत रितू तावडे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेकडून संजय घाडी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.

शिवसेना ठाकरे गटाकडून किंवा आघाडीकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात न आल्याने रितू तावडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

11 फेब्रुवारी रोजी याची औपचारिक घोषणा केली जाईल.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि तब्बल जवळपास 74 हजार कोटी अर्थसंकल्प असलेल्या मोठ्या महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड कशी करण्यात आली आणि रितू तावडे कोण आहेत? जाणून घेऊया.

कोण आहेत रितू तावडे?

भाजपने मुंबईच्या महापौरपदी निवड केलेल्या रितू तावडे घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 मधील नगरसेविका आहेत. त्या दोन टर्म नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून ही त्यांची तिसरी टर्म आहे.

53 वर्षीय रितू तावडे यांनी 2012 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या. त्यांना महापालिकेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपदही देण्यात आलं.

तसंच, त्या मुंबई महानगरपालिका उपनगरे स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत.

रितू तावडे

फोटो स्रोत, FB/ritu.tawde184

भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या कार्यक्रम समितीच्या संयोजिका, ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा म्हणूनही रितू तावडे यांनी काम केलेलं आहे. तर सहारा जनरल कामगार कर्मचारी संघटनेच्या त्या संस्थापिका आहेत.

दुकानांबाहेर महिलांचे कमी कपडे किंवा अंतर्वस्त्र परिधान केलेल पुतळे दर्शनी भागात उभे करण्याच्या विरोधात रितू तावडे यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळी त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यावेळी पालिकेत या मुद्यावरून त्यांनी नोटीस ऑफ मोशनद्वारे दाद मागितली होती.

तसंच,वीज दरवाढी विरोधात आंदोलन आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी संबंधित ठेकेदार लहान मुलांचा वापर करत असल्याचं निदर्शनास आल्यावर, त्यांनी बाल कामगारांची मुक्तता केल्याचा मुद्दाही चर्चेत आला होता. अशी त्यांची अनेक आंदोलने चर्चेत राहिलेली आहेत.

रितू तावडे यांचीच निवड का?

मुंबई महानगरपालिका निवडणूक ही बऱ्यापैकी मराठी अस्मितेच्या मुद्यावर लढवली गेली. यातलाच महत्त्वाचा मुद्दा होता मुंबईचा महापौर मराठीच असला पाहिजे. शिवसेना ठाकरे गट असो वा मनसे यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये वारंवार ही भूमिका स्पष्ट केली की मुंबईचा महापौर मराठीच असेल.

या संपूर्ण निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद आणि राजकारण रंगल्याचंही दिसलं होतं. याला प्रत्युत्तर देत महायुतीने आपल्या सभांमध्ये मुंबईचा महापौर हा मराठी-हिंदू असेल असं जाहीर केलं.

यामुळे हे स्पष्ट होतं की, महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी महापौर हा मराठी भाषिकच द्यावा लागणार होता. महापौर पदाच्या सोडतीत ही जागा खुला प्रवर्ग आणि महिला राखीव अशी जाहीर करण्यात आली.

रितू तावडे

फोटो स्रोत, FB/ritu.tawde184

यामुळे भाजप आपल्या महिला नगरसेवकांमधून मराठी चेहरा देणार हे स्पष्ट असलं तरी खुल्या प्रवर्गातून संधी देणार की अन्य प्रवर्गातून निवड करणार हे अस्पष्ट होतं. भाजपने यानिमित्ताने महिला आणि मराठी म्हणून रितू तावडे यांची निवड केली आहे.

दुसरीकडे भाजपने गुजराती ‘व्होट बँक’लाही धक्का लागू दिलेला नाही. कारण त्या घाटकोपर या गुजराती बहुल भागातून निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. गुजराती बहुल मतदारसंघातल्या मराठी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. यामुळे भाजपने गुजराती आणि मराठी असा समतोल साधल्याचं म्हटलं जात आहे.

रितू तावडे यांच्यासमोरील आव्हानं काय?

रितू तावडे यांना यापूर्वी शिक्षण समितीचा आणि बीएमसीच्या कामकाजाचा अनुभव असला तरी गेली चार वर्ष महानगरपालिकेची निवडणूक झालेली नव्हती. यामुळे प्रशासनाच्या माध्यमातूनच पालिकेचं कामकाज झालेलं आहे.

अशा परिस्थितीत रितू तावडे यांच्यासमोर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि मनसे हे तीन पक्ष मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहेत.

गेल्या 25 वर्षांपासून जी मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिली अशी मुंबईची पालिका भाजपकडे गेल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहे.

यावेळी विरोधकांमध्ये चार महापौर आणि एक उपमहापौर आहे. तर विरोधी बाकावरच्या नगरसेवकांची संख्याही मोठी आहे. यामुळे रितू तावडे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या हे एक मोठं आव्हान ठरू शकतं.

रितू तावडे

फोटो स्रोत, FB/ritu.tawde184

माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मराठी महापौर दिला आहे तर आम्ही अपशकुन करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणितं मान्य. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या भूमिकेत पद्धतशीरपणे आणि दबावाला बळी न पडता पार पाडू. कुठल्याही अमिषाला बळी न पडता, प्रत्येक नगरसेवक सक्षमपणे आपले प्रश्न मांडतील.”

तर महापौरपदी नावाची घोषणा झाल्यानंतर रितू तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “44 वर्षांनंतर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मुंबईकरांनी महायुतीला कौल दिलेला आहे. 25 वर्षांचा भ्रष्टचाराचा कारभार होता. तिन्ही पक्ष एकत्र येऊनही मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आहे.”

शिवाय, मुंबईतील महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न हाताळण्याचं आव्हान रितू तावडे यांच्यासमोर आहे.

विशेषत: मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी आणि प्रदुषणाचा प्रश्नही मोठा आहे.

रितू तावडे

फोटो स्रोत, FB/ritu.tawde184

पावसाळ्यात मुंबई महानगर पालिकेवर तीव्र टीका होताना दिसते. यामुळं पाण्याचा निचरा, गाळ आणि मिठी नदीची स्वच्छता हे प्रश्नही त्यांना वेळीच हाताळावे लागणार आहेत.

शिवाय, मुंबईतील वाहतूक कोंडी, फेरीवाले, फुटपाथ, हॉस्पिटल्सची दुरावस्था, अनधिकृत बांधकामे अशा अनेक प्रश्नांवर त्यांना येत्या काळात आपलं काम आणि उत्तरं द्यावी लागणार आहेत. यामुळे हे प्रश्न त्या कशापद्धतीने हाताळतात हे पहावं लागेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीने अद्याप स्थायी समितीच्या अध्यक्षपदाबाबत भाष्य केलेलं नाही.

महापौरपदाव्यतिरिक्त स्थायी समितीचे अध्यक्षपद हे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं पद मानलं जातं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC