Home LATEST NEWS ताजी बातमी रिंकू सिंगचा पार पडला साखरपुडा; फरशी पुसण्याची नोकरी ते क्रिकेटमधला उगवता तारा,...

रिंकू सिंगचा पार पडला साखरपुडा; फरशी पुसण्याची नोकरी ते क्रिकेटमधला उगवता तारा, जाणून घ्या प्रवास

5
0

Source :- BBC INDIA NEWS

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज

फोटो स्रोत, X/Priya Saroj

9 एप्रिल 2023

अपडेटेड 2 तासांपूर्वी

भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कालच (8 जून) रिंकू सिंग आणि त्याची होणारी जोडीदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडला.

प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांनी रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज

फोटो स्रोत, X/Akhilesh Yadav

प्रिया सरोज कोण आहेत?

प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या नेत्या आहेत. त्या उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत.

प्रिया सरोज या पेशानं वकील आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी वयाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार होत्या. त्यांचा या निवडणुकीत विजय झाल्यानं सर्वात तरुण खासदारांपैकी एक म्हणून त्यांचं नाव नोंदवलं गेलं. त्याचं वय 26 वर्षे आहे.

उत्तर प्रदेशातून तीनवेळा खासदार राहिलेल्या आणि विद्यमान आमदार असलेल्या तुफानी सरोज यांची प्रिया सरोज या कन्या आहेत.

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज

फोटो स्रोत, X/Priya Saroj

रिंकू सिंग : क्रिकेटमधला उगवता तारा

भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार होऊ घातलेल्या रिंकू सिंगसाठी इथपर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता.

सर्वसाधारणपणे माणूस आपल्या भवितव्याचा विचार करताना काय विचार करतो? ज्याच्याकडे पर्याय नसतो त्याला काहीही काम करावं लागतं.

ज्या माणसाचे दोर कापले गेलेले असतात ते पडेल ते काम स्वीकारतात आणि त्यात स्वत:ला झोकून देतात. उत्तर प्रदेशातल्या अलिगढच्या रिंकू सिंगचा प्रवास असाच स्तिमित करणारा. निर्धार पक्का असेल, कामाप्रति अतीव निष्ठा असेल, विजिगीषु वृत्ती असेल तर काय भरारी घेता येऊ शकते याचं उदाहरण म्हणजे रिंकू सिंग. रिंकूची कहाणी ऐकून तुम्हालाही असं वाटू शकतं.

रिंकूचा आतापर्यंतचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. क्रिकेट हेच आपलं भविष्य असेल हे रिंकूला कळलं होतं पण परिस्थिती साथ देत नव्हती पण त्याने हार मानली नाही.

रिंकू सिंग

फोटो स्रोत, Facebook

अलीगढमधील गॅसव्हेंडरच्या पाच मुलांपैकी एक रिंकू. शाळेपासूनच रिंकू क्रिकेट खेळत असे. कोलकाता नाईट रायडर्सने रिंकूच्या वाटचालीबाबतचा व्हीडिओ शेअर केला होता. त्यात रिंकू सांगतो, “क्रिकेट खेळून वेळ फुकट घालवावा असं वडिलांना वाटे. मी क्रिकेट खेळून येत असे तेव्हा ओरडा आणि मारही पडे. मी कधी घरी येतो आणि चोपतो असं त्यांना होत असे. पण भावांनी साथ दिली. त्यांच्यामुळेच मी क्रिकेटचा ध्यास सोडला नाही. चेंडू खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. पण या वाटचालीदरम्यान काही लोकांनी मदत केली”.

एका स्पर्धेदरम्यान शानदार खेळासाठी रिंकू सिंगला मोटारसायकल गिफ्ट म्हणून मिळाली. रिंकूने ही बाईक वडिलांना गिफ्ट म्हणून दिली.

रिंकू सिंग, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

अलिगढमध्ये व्यापारी-उद्योगपतींच्या घरी वर्षानुवर्ष गॅससिलेंडर पोहोचवण्याचं काम करुनही त्यांना कधी मोटारसायकल घेता आली नव्हती. पण रिंकूने क्रिकेटच्या जोरावर हे शक्य करुन दाखवलं. या घटनेनंतर रिंकूला पडणारा ओरडा बंद झाला. पण कुटुंबापुढे आर्थिक अडचणी खूप होत्या.

अशाच एका दिवशी रिंकू कामाच्या शोधात होता. “मला लादी पुसायचं काम मिळालं. एका कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसण्याचं काम मिळालं. त्यांनी सांगितलं की सकाळी येऊन लादी पुसत जा. भावाच्या माध्यमातून हे काम मिळालं. पण मी हे काम करु शकलो नाही. नोकरी सोडली. मला हे योग्य वाटलं नाही. अभ्यासतही फार गती नव्हती. तेव्हा मला वाटलं क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करावं. कारण जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर क्रिकेटवाचून मला तरणोपाय नाही”, रिंकू सांगतो.

कोणी केली मदत?

पण फक्त वाटून रिंकूचा प्रवास सुकर झाला नाही. U16 ट्रायलमध्ये काय करायचं असतं हे रिंकूला माहिती नव्हतं. दोनवेळा पहिल्या फेरीतूनच त्याची गच्छंती झाली. अलीगढच्या मोहम्मद झीशान मदतीला धावून आले.

रिंकूला अगदी सुरुवातीच्या काळापासून अलीगढच्या मसूद अमीनचं यांचं मार्गदर्शन लाभलं. ते आजही रिंकूला मार्गदर्शन करतात. मोहम्मद झीशान यांनी केलेली मदत रिंकू विसरलेला नाही.

शाहरुख खान सहमालक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2018 मध्ये रिंकू सिंगला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. कोलकाताना रिंकूला 80 लाख रुपये देऊन समाविष्ट केलं. त्यावेळी रिंकू सिंह हे नाव कुणाला ठाऊकही नव्हतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी खेळताना त्याची कामगिरी चांगली होत होती.

रिंकू सिंहच्या मते, आयपीएलमध्ये खेळणारा अलीगढचा मी पहिलाच खेळाडू ठरलो. इतकं मानधन मिळालं की घरी कुणी इतके पैसे कधी पाहिलेही नव्हते. घरातल्या आर्थिक अडचणी एकदम दूर झाल्या. जमीन घेतली आणि घर बांधलं. जी कर्ज डोक्यावर होती ती चुकती केली.

रिंकू सिंग

फोटो स्रोत, Facebook

हे सगळं झालं पण खरा चमत्कार बाकी होता. आयपीएल स्पर्धेत आपल्या खेळाच्या बळावर त्याला चाहत्यांना जिंकून घ्यायचं होतं. या प्रयत्नात हंगामामागोमाग हंगाम निघून जात होते. ज्या संधी रिंकूला मिळत होत्या त्यात तो चमकदार कामगिरी करु शकला नाही.

डावखुरा फलंदाज आणि उपयुक्त फिरकीपटू असलेल्या रिंकूने गेल्या वर्षी लखनौविरुद्ध खेळताना अशाच स्वरुपाची खेळी केली होती. त्या सामन्यात रिंकूला कोलकाताला जिंकून देता आलं नव्हतं. पण रविवारी झालेल्या लढतीत रिंकूने कोलकाताला दिमाखदार विजय मिळवून दिला.

भारतासाठी खेळणं हे रिंकूचं स्वप्न आहे. यासाठी त्याला आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत राहावी लागेल. 2016 पासून रिंकू उत्तर प्रदेश कडून खेळत आहे.

शाहरुखने म्हटलं होतं अपना बच्चा

गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या लढतीनंतर शाहरुख खान सामन्यानंतर बोलत होता. त्यावेळी त्याने रिंकूचा उल्लेख ‘अपना बच्चा’ असा केला होता.

या सामन्यात कोलकाताने बंगळुरूवर 81 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्याचा शिल्पकार शार्दूल ठाकूर ठरला होता. शार्दूल आणि रिंकूच्या भागीदारीने सामन्याचं पारडं कोलकाताच्या बाजूने फिरवलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. ‘गोष्ट दुनियेची’, ‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

SOURCE : BBC