Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, FACEBOOK/PRATEEK YADAV
मुलायम सिंह यादव यांचे धाकटे पुत्र प्रतीक यादव यांचे बुधवारी निधन झाले आणि गुरुवारी लखनौमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिकृत पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार प्रतीक यादव यांचा मृत्यू शरीरात रक्ताच्या गाठी जमल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे.
डॉ. मौसमी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली 3 डॉक्टरांच्या टीमने प्रतीक यादव यांचे पोस्टमॉर्टम केले. अहवालानुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण ‘मॅसिव्ह पल्मोनरी थ्रोम्बोम्बोलिझममुळे झालेले कार्डिओरेस्पिरेटरी कोलॅप्स’ असे देण्यात आले आहे.
याचा अर्थ असा की, फुफ्फुसांच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये रक्ताची मोठी गाठ जमल्यामुळे श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके अचानक थांबले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, मृत्यूपूर्वी प्रतीक यादव यांच्या शरीरावर 6 ठिकाणी जखमा होत्या.
अहवालानुसार, त्यांच्या छातीवर, उजव्या हाताच्या वरच्या आणि खालच्या भागात तीन जखमा होत्या. तर कोपर आणि डाव्या मनगटावरही जखमांच्या खुणा आढळल्या आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांचे हृदय आणि रक्ताच्या गाठी पुढील तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
तसेच, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी शरीराचा ‘व्हिसेरा’ (विविध अवयवांचे नमुने) देखील सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
तपासावर प्रश्नचिन्ह: सिव्हिल हॉस्पिटलचा मोठा खुलासा
प्रतीक यादव यांना बुधवारी लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले.
सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेश चंद्र पांडेय यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या माहितीनुसार प्रतीक यादव यांना बुधवारी पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी मृत अवस्थेतच रुग्णालयात आणले होते.
यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
प्रतीक यादव यांच्या निधनानंतर आता समाजमाध्यमांवर त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. काही लोक या मृत्यूला संशयास्पद मानत असून त्यावरून मोठी चर्चा सुरू आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार रविदास मेहरोत्रा यांच्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या विधानानंतर प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रतीक यादव यांच्या मृत्यूबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार रविदास मेहरोत्रा म्हणाले, “ते मानसिक तणावाखाली होते की नाही याची मला कल्पना नाही. मात्र त्यांचा मृत्यू अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झाला आहे.” सामान्य परिस्थितीत पोस्टमॉर्टम करण्याची वेळ येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.”
फोटो स्रोत, Prateek Yadav Facebook
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये प्रतीक यादव यांच्या शरीरावरील विविध जखमांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
यात त्यांची छाती, उजव्या हाताचा खालचा भाग, उजवे मनगट, कोपराचा सांधा, कोपराच्या वरचा भाग आणि डावे मनगट अशा ठिकाणी जखमा असल्याचे नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, अहवालानुसार यातील 3 जखमा सुमारे 5 ते 7 दिवस जुन्या आहेत तर उर्वरित 3 जखमा केवळ एक दिवस जुन्या आहेत.
बीबीसी हिंदीशी बोलताना रविदास मेहरोत्रा यांनी म्हटलं की, “अनेक कारणांमुळे या मृत्यूबाबत संशय निर्माण होत आहे. प्रतीक यादव यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा कशा आल्या याची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.”
“मी हत्या झाली आहे असे म्हणत नाही. परंतु पोस्टमॉर्टम झाल्यानंतरही मृतदेह 4 तास का ठेवला गेला? तसेच प्रतीक यांना रुग्णालयात आणण्यास उशीर झाला होता का की नाही? याचीही चौकशी व्हायला हवी. कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत अवस्थेतच आणले गेले होते,” असं आमदार रविदास मेहरोत्रा म्हणाले.
दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पोस्टमॉर्टम रिपोर्टवर तज्ज्ञांचे मत
लखनौचे ज्येष्ठ डॉक्टर दायम रझा खान यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना स्पष्ट केले की, या प्रकरणातील नेमकी स्थिती पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.
पोस्टमॉर्टम अहवालाचे वैद्यकीय मूल्यमापन करताना डॉ. खान म्हणाले, “अहवालावरून असे दिसून येते की, प्रतीक यांच्या शरीराच्या विविध भागांवर अनेक गंभीर जखमा आणि ओरखडे होते.”
त्यांच्या मते, “प्रतीक यादव यांच्या डोक्याला बसलेला मार अत्यंत गंभीर होता ज्यामुळे त्यांच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंना (टेम्पोरो-पॅरिएटल भागात) रक्तस्राव झाला होता.
तसेच, शरीरावरील जखमांचे स्वरूप, त्यांची संख्या आणि ज्या पद्धतीने त्या ठिकठिकाणी आढळल्या आहेत त्यावरून हा एखादा हिंसक शारीरिक हल्ला असावा असे संकेत मिळत आहेत.”
फोटो स्रोत, FACEBOOK/PRATEEK YADAV
डॉक्टरांच्या मते, समोर आलेले वैद्यकीय तथ्य हे प्रकरण अत्यंत गंभीर बनवतात. “या प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्याची निष्पक्ष आणि वैज्ञानिक पद्धतीने चौकशी होणे गरजेचे आहे,” असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, फॉरेन्सिक सायन्सच्या संशोधक मीनाक्षी शुक्ला यांच्या मते, “पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील नोंदी पाहता प्राथमिक स्तरावर हा फॉरेन्सिक तपासाचा विषय असल्याचे स्पष्टपणे जाणवते.”
त्यांचा असा दावा आहे की, फॉरेन्सिक सायन्सच्या नियमांनुसार केवळ पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालावरून मृत्यूचे खरे स्वरूप किंवा कारण ठरवता येत नाही.
मीनाक्षी शुक्ला यांनी स्पष्ट केले की, टॉक्सिकोलॉजी म्हणजेच शरीरातील विष, औषधे, अल्कोहोल किंवा कोणत्याही विषारी रसायनांच्या तपासणीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. जोपर्यंत हा अहवाल येत नाही तोपर्यंत मृत्यू एखाद्या विषारी पदार्थामुळे, ड्रग्समुळे, औषधांच्या चुकीच्या रिॲक्शनमुळे किंवा रासायनिक कारणामुळे झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो स्रोत, FACBOOK/PRATEEK YADAV
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, केवळ उपलब्ध अहवालाच्या आधारावर या मृत्यूला नैसर्गिक, अपघाती, आत्मघाती किंवा हत्या यापैकी कोणत्याही एका श्रेणीत ठेवणे वैज्ञानिकदृष्ट्या घाईचे ठरेल.
व्हिसेरा म्हणजेच फॉरेन्सिक विज्ञानात सुरक्षित ठेवलेले शरीराचे नमुने सामान्यतः तेव्हाच महत्त्वाचे मानले जातात जेव्हा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असतो किंवा विषाची चाचणी करणे आवश्यक असते.
मीनाक्षी शुक्ला यांच्या मते, या नमुन्यांच्या आधारे शरीरात काही विषारी घटक होते का याची रासायनिक आणि जैविक तपासणी केली जाते. ज्यामुळे मृत्यूमागील नेमकी कारणे स्पष्ट होण्यास मदत होते.
त्यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा (FSL) अहवाल येत नाही तोपर्यंत मृत्यूचे नेमके कारण काय होते हे अधिकृतपणे सांगता येणार नाही. सध्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा प्राथमिक असून लॅबच्या तपासणीनंतरच मृत्यूचे खरे सत्य समोर येईल.”
मेदांता रुग्णालयात सुरू होते उपचार
प्रतीक यादव यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, मेदांता रुग्णालयातील डॉ. रूचिता शर्मा त्यांच्यावर उपचार करत होत्या.
डॉ. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार फुफ्फुसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यांच्या हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला होता.
त्यांनी माहिती दिली की, “काही आठवड्यांपूर्वी ते श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार घेऊन आमच्याकडे आले होते. त्यावेळी ते रक्त पातळ करण्याची औषधे घेत होते.”
प्रतीक यादव यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच माझी त्यांची भेट झाली होती. तेव्हाही मी त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचा आणि व्यवसाय पुढे नेण्याचा सल्ला दिला होता.
कधीकधी आर्थिक व्यवहारांत होणारे नुकसान माणसाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकते. ते आता आपल्यात नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कुटुंब जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही राहू.”
प्रतीक यादव हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अपर्णा यादव यांचे पती होते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे ते चिरंजीव होते. साधना गुप्ता यांचे निधन सन 2022 मध्ये झाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



