Home LATEST NEWS ताजी बातमी दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे अँथनी अल्बानीज कोण आहेत?

दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे अँथनी अल्बानीज कोण आहेत?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

अँथनी अल्बानीज.

फोटो स्रोत, Getty Images

ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोठा विजय मिळवला आहे. लिबरल नॅशनल कोएलिशनच्या पीटर डटन यांचा पराभव करत अल्बानीज यांनी दुसऱ्यांदा निवडणुकीत विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियातील मतमोजणी आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. पण तसं असलं तरी या निवडणुकीत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधील 85 जागांवर त्यांचा विजय स्पष्ट झाला आहे. तर विरोधी आघाडीचा 41 जागी विजय निश्चित झाला. एबीसीच्या वृत्तानुसार 65 टक्के मतमोजणीपर्यंतची ही स्थिती होती.

निवडणुकीनंतर विजयी रॅलीमध्ये भाषण करताना अँथनी अल्बानीज म्हणाले की, “जागतिक अस्थिरतेच्या या काळामध्ये ऑस्ट्रेलियन नागरिकांनी आशावाद आणि ठाम निर्धार असलेल्या पर्यायाची निवड केली आहे.”

विरोधी पक्षांसाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक ठरला आहे. कारण विरोधी आघाडीचे नेते असलेले पीटर डटन हे स्वतः त्यांच्या जागेवरून पराभूत झाले आहेत. 24 वर्षांपासून त्यांनी ही जागा राखली होती. निकालानंतर त्यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या काही सर्वेक्षणांमध्ये अल्बानीज यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय घट दिसून आली होती. मात्र निकालात वेगळं चित्र समोर आलं आहे.

पाच आठवड्यांच्या निवडणूक प्रचारात आरोग्य सेवा, हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय संबंध यासारख्या मुद्द्यांवर जोर होता. यापैकी बहुतेक मुद्द्यांमध्ये अल्बानीज आघाडी घेण्यात यशस्वी झाले.

कोण आहेत अँथनी अल्बानीज?

अँथनी अल्बानीज 61 वर्षांचे आहेत. सामाजिक संस्थांच्या मदतीने मिळालेल्या घरात त्यांचं बालपण गेलं. एकल माता (सिंगल मदर) असलेल्या आईनं त्यांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या आधारे लहानाचं मोठं केलं. ते सातत्यानं लोकांसमोर याचा उल्लेख करत असतात.

त्यांना सुरुवातीला असं वाटायचं ती त्यांच्या जन्माआधीच वडिलांचं निधन झालं. पण नंतर त्यांना सत्य समजलं होतं. किशोरवयात असताना त्यांच्या आई एका विवाहित पुरुषाकडून गर्भवती राहिल्या होत्या. ही गोष्ट आईने त्यांना नंतर सांगितलं. आपले वडील जिवंत आहेत असे समजल्यावर त्यांनी त्यांची भेट देखील घेतली.

जवळपास 30 वर्षांनी त्यांनी त्यांचे वडील कार्लो अल्बानीज यांचा शोध घेतला आणि त्यांना इटलीमध्ये जाऊन भेटले होते.

साध्या पण संघर्षमय असलेल्या बालपणामुळं राजकारणाकडं वळाल्याचं अल्बानीज सांगतात. ते 20 व्या वर्षापासून लेबर पार्टीशी जोडले गेले.

1996 मध्ये सिडनीच्या शहरांतर्गत मतदारसंघातून ते निवडून आले. त्या दिवशी त्यांचा 33 वा वाढदिवस होता.

अँथनी अल्बानीज

फोटो स्रोत, Getty Images

सध्या ऑस्ट्रेलियातील सर्वात जास्त काळ खासदार राहिलेल्या सदस्यांपैकी ते एक आहे. काही लोक त्यांना ‘कामगार वर्गाचा हिरो’ मानतात.

ऑस्ट्रेलियात मोफत आरोग्य सेवेसाठी त्यांनी संघर्ष केला. एलजीबीटी समुदायासाठीही त्यांनी आवाज उठवला आहे. तसंच ते रग्बीचे चाहते असून ऑस्ट्रेलियाने प्रजासत्ताकासाठी त्यांचा पाठिंबा आहे.

लेबर पक्ष 2007 मध्ये सत्तेत आल्यानंतर अल्बानीज वरिष्ठ मंत्री बनले. पक्षातील अस्थिरतेच्या काळातही नेते बदलत असतानाही ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यावेळी आधी केवीन रड यांना बदलत ज्युलिया गिलार्ड यांना पंतप्रधान बनवण्यात आलं आणि नंतर पुन्हा केवीन रड हे पंतप्रधान बनले.

पक्षाच्या डाव्या विचारसरणीतील प्रमुख असलेले अल्बानीज यांनी 2019 मध्ये ते नेते बनले तेव्हापासून काहीसं मध्यममार्गी धोरण स्वीकारलं आहे.

मुलगा नाथन याच्यासाठी चांगलं जग घडवण्याची प्रेरणा आजही त्यांना कामी येत असल्याचं ते म्हणतात. 19 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता ते लवकरत जोडी हेडन यांच्याशी लग्न करणार आहेत.

पंतप्रधान पदाचा कार्यकाळ

अल्बानीज यांच्या 2022 मधील विजयामुळं जवळपास 10 वर्षे सत्तेत असलेल्या लिबरल नॅशनल कोलिएशनची सत्ता संपुष्टात आली होती.

अल्बानीज यांनी सत्ता मिळवताना कोव्हिडनंतर आर्थिक स्थिती सुधारणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्ट्रेलियाला पुन्हा सन्मान मिळवून देणं, महागाई आणि स्थानिक आदिवासींच्या आदिवासींसंदर्भात जनमत घेण्याचं आश्वासन दिलं होतं.

अँथनी अल्बानीज

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळी हवामानबदल हाही मतदार आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी मोठा विषय होता. त्यामुळं त्यांच्या सरकारनं उत्सर्जन नियंत्रणासाठी कायद्यात कठोर तरतूद आणली.

मोठ्या प्रदूषक कंपन्यांवर कार्बन मर्यादा धोरण लागू केलं. पण काही तेल आणि वायू प्रकल्पांना परवानगीही दिली. त्यामुळं हवामान बदलासाठी बरंच काही करावं लागणार असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

चीनबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. संबंधांमध्ये स्थैर्य निर्माण करत व्यापारी निर्बंध उठवले आणि अनेक वर्षांनंतर उच्च स्तरीय चर्चाही केली. फ्रान्सबरोबरही त्यांनी संबंध सुधारले.

अल्बानीज यांच्यावरील टीका

अल्बानीज यांच्याबाबत माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी तुलना करता कमी वाद समोर आले असले तरीही, त्यांना एक महागडं घर खरेदी केल्यामुळं टीकेचा सामना करावा लागला. त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्यावर टीका केली होती.

पण त्यांचं सर्वात मोठं अपयश हे 2023 मध्ये ‘द व्हॉइस’ या जनमत चाचणीत झालेला पराभव होता. आदिवासी आणि टॉरेस स्ट्रेट बेटांवरील लोकांना संविधानात मान्यता देण्याचा आणि संसदेत त्यांचा सल्लागार गट तयार करण्यासाठी ही चाचणी होती.

अल्बानीज सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या धोरणांपैकी हे एक होतं. पण त्याचा निकाल त्यांच्या बाजूनं आला नाही. सुरुवातीला लोकांनी याला पाठिंबा दिला होता. तरीही ही जनमतचाचणी वादग्रस्त ठरली. 60% लोकांनी याला नकार दिला.

ऑस्ट्रेलिया निवडणूक.

फोटो स्रोत, Getty Images

इस्रायल-गाझा युद्धाबाबत मधल्या मार्गाची भूमिका घेण्याच्या त्यांच्या निर्णयावरही टीका झाली. सुरुवातीला त्यांच्या सरकारनं इस्रायलला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अधिकार असल्याचं म्हणत पाठिंबा दर्शवला. पण नंतर गाझामधील मृतांचा आकडा वाढल्यानंतर त्यांनी कायमस्वरुपी शस्त्रसंधीला पाठिंबा दिला.

निवडणुकीपूर्वी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळं बहुतांश लोकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळणार आहे. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांच्या कर्जात कपात आणि करसवलतींचं आश्वासनही दिलं होतं.

2025 च्या सुरुवातीला अल्बानीज यांची लोकप्रियता घसरल्याचं दिसून आलं. नंतर त्यात काही सुधारणा झाली तरी निवडणूकपूर्व अंदाजांमध्ये त्यांचा पराभव होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण या विजयानं ते अंदाज चुकीचे ठरले.

अल्बानीज यांनी विजयानंतर म्हटलं की, “लोकांनी दाखवलेला विश्वास कधीही गृहित धरणार नाही. सामाजिक सृदृढतेसह आदिवासी समाजाला पुन्हा एकत्र घेण्याचा प्रयत्न करू. कारण आपण सगळे एका वळणावर आहोत आणि एकत्रितपणे पुढे जाणार आहोत. कोणालाही मागे सोडणार नाही.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC