Home LATEST NEWS ताजी बातमी थायरॉईडचा त्रास ओळखण्यात चूक का होते? ‘ही’ लक्षणं थायरॉईडची की मानसिक आरोग्याची?

थायरॉईडचा त्रास ओळखण्यात चूक का होते? ‘ही’ लक्षणं थायरॉईडची की मानसिक आरोग्याची?

11
0

Source :- BBC INDIA NEWS

थायरॉईड आहे का? हे ओळखण्यात का चुक होते? ही लक्षणं थायरॉईडची की मानसिक आरोग्याची? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

  • 2 तासांपूर्वी

  • वाचन वेळ: 11 मिनिटे

थायरॉईड ही शरीराची ‘मास्टर रेग्युलेटर’ ग्रंथी असूनही तिच्या लक्षणांची ओळख अनेकदा चुकते. काही चिन्हं मानसिक आजारांसारखी दिसतात, काही प्रजननावर परिणाम करतात, तर काही साध्या जीवनशैलीतल्या बदलांसारखी वाटतात. हा गोंधळ का निर्माण होतो? तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात? ते आपण इथं पाहू

थायरॉईड ही केवळ एक छोटी ग्रंथी नाही तर शरीराचा ‘मास्टर रेग्युलेटर’ मानली जाते. गळ्याच्या समोर असलेली ही आंतरस्राविकी ग्रंथी (एंडोक्राईन) T₃ आणि T₄ हे हार्मोन्स तयार करते आणि त्यावर आपल्या शरीराचं चयापचय, तापमान नियंत्रित करणं, वाढ‑विकास, ऊर्जा वितरण, प्रजनन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जैविक प्रक्रिया अवलंबून असतात.

गेल्या दोन दशकांत निदान पद्धती सुधारल्यामुळे साध्या क्लिनिकमध्येही थायरॉईड तपासणी उपलब्ध झाली आहे, परंतु जागरूकता वाढूनही थायरॉईडविषयीचे गैरसमज मात्र तितक्याच वेगाने समाजात पसरत आहेत.

आजही अनेकांना वाटतं की थायरॉईडचा त्रास सुरू झाला म्हणजे कर्करोग, औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात, हा आजार पुढच्या पिढीला होणारच, वजन वाढलं म्हणजे हेच कारण असणार… अशा गैरसमजांमुळे लोक तपासणी टाळतात किंवा उलट किरकोळ बदलांवरून अनावश्यक औषधं सुरू करतात.

तज्ज्ञांच्या मते, भीती आणि अज्ञान यांचं हे मिश्रण रुग्णांना योग्य वेळी निदान व उपचारापासून दूर नेतं आणि नेमक्या याचवेळेला गैरसमज डोकं वर काढतात.

समाजातले थायरॉईडविषयी सर्वात पक्के गैरसमज नैसर्गिक लक्षणांशी गल्लत करण्यापासून सुरू होतात. वजन वाढणं, सततचा थकवा, चिडचिड, मानसिक तणाव ही लक्षणं दिसली की लोक सरळ थायरॉईडकडे बोट दाखवतात. पण तज्ज्ञ सांगतात की ही लक्षणं चयापचय बदलांपासून ते जीवनशैलीपर्यंत अनेक कारणांनी होऊ शकतात.

उलट या भीतीमुळे लोक योग्य तपासणी करण्याऐवजी स्वतःच्या अंदाजांवर थांबतात आणि निदान लांबणीवर जातं.

थायरॉईडचं प्रजननाशी असलेलं नातंही अनेक गैरसमजांनी वेढलेलं आहे. Hypothyroidism किंवा Hyperthyroidism दोन्ही अवस्थांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे गर्भधारणा उशिरा होणं किंवा गर्भाची वाढ मंदावणं असे परिणाम दिसू शकतात, हे खरं. पण याचा अर्थ असा नाही की थायरॉईड असला तर गर्भधारणा अशक्यच आहे.

डॉक्टर सांगतात की गर्भधारणेपूर्वी आणि सुरुवातीच्या महिन्यांत थायरॉईड नियंत्रणात ठेवले तर मातेला आणि बाळाला दोघांनाही फायदा होतो; अगदी बाळाच्या बुध्यांकावरही याचा सकारात्मक परिणाम दिसतो. तरीही अनेक स्त्रिया “गर्भावस्थेत औषध घेतल्याने बाळावर परिणाम होईल” या गैरसमजामुळे उपचार टाळतात आणि हा निर्णय अधिक धोकादायक ठरतो. या सर्व समजांची माहिती पुढे घेऊ.

थायरॉईड आहे का? हे ओळखण्यात का चूक होते? ही लक्षणं थायरॉईडची की मानसिक आरोग्याची? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

मानसिक आरोग्याबाबतही गैरसमज तितकेच खोल आहेत. मूड बदल, चिडचिड, विस्मरण, anxiety किंवा depression दिसलं की लोक तणावाला जबाबदार ठरवतात. त्यांच्या डोक्यात थायरॉईड तपासणी डोक्यातही येत नाही. आणि उलट, काहींना वाटतं कोणतीही मानसिक समस्या थायरॉईडमुळेच होते. खरं तर दोन्ही टोकाच्या या समजुती चुकीच्या आहेत.

थायरॉईडचे आजार गुंतागुंतीचे नाहीत पण त्याच्याबाबतीत गोंधळ मात्र समाजाने निर्माण केलेला आहे. योग्य वेळी साध्या रक्ततपासणीतून निदान होतं, उपचार उपलब्ध आहेत आणि बहुतेकदा ती नियंत्रित राहू शकतात. त्यामुळे यात भीती नव्हे तर योग्य माहिती हेच थायरॉईडवरील सर्वात महत्त्वाचं ‘औषध’ आहे.

थायरॉईडच्या सगळ्या आजारांवर आयोडिन मीठ हेच औषध?

आयोडिन मिठाबद्दल लोकांमध्ये बरीच चर्चा असते. तोच प्रश्न आम्ही मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात आंतरस्राविकी विभागात कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट आणि इन्डोक्रायनोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. व्यंकटेश शिवणे यांना विचारला.

डॉ. शिवणे म्हणाले, “केवळ आयोडीनयुक्त मीठच थायरॉइडच्या सगळ्या आजारांवर औषध आहे असे नाही. Hypo किंवा Hyperthyroid च्या पेशंट्सना थायरॉइडच्या गोळ्यांची आवश्यकता असते म्हणून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक वेळा थायरॉईडची लक्षणे रुग्णांमध्ये असतीलच असे नाही. तसेच प्रत्येक वेळी थायरॉईडचा अभाव किंवा अतिरेक रक्तात असल्यास त्याला उपचारांची गरज असेलच असे नाही. थायरॉईडची पातळी जर थोडीफार वाढली किंवा घटली असेल तर डॉक्टर लगेच उपचार न करता दर तीन महिन्यांनी चेक करून नंतर ठरवतात.”

थायरॉईडच्या सगळ्या आजारांवर आयोडिन मीठ हेच औषध?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. शिवणे आयोडिन मिठाबद्दल सांगतात, “आयोडीन हे थायरॉइडच्या ग्रंथींसाठी आणि थायरॉइडच्या हार्मोन्ससाठी आवश्यक घटक आहे. पूर्वी खडे मीठ खाणाऱ्या लोकांमध्ये (जे मीठ आयोडीनयुक्त नव्हते) गलगंडाचे प्रमाण अधिक होते. असे मीठ खाणाऱ्या गर्भवतींची मुलेही मतिमंद जन्माला येण्याची शक्यता असे. भारत सरकारने 1992 पासून National Salt Iodinisation Program च्या माध्यमातून आयोडीनयुक्त मीठ खाणे बंधनकारक केले आहे.”

ते पुढे सांगतात, “आता बाजारात आयोडीनयुक्त मीठ सहज उपलब्ध आहे. यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी आयोडीनची पातळी सहज पूर्ण होते, गर्भवतींनी आपल्या बाळाच्या वाढीसाठी आणि जन्माला येणाऱ्या बाळाच्या बुध्यांकासाठी (IQ) आयोडीनयुक्त मीठच वापरावे.”

थायरॉईड गाठी आणि कर्करोगात काय फरक?

थायरॉईडच्या गाठींबद्दल अनेकदा लोकांमध्ये एक भीती असते. त्याबद्दल अनेक गैरसमजही पसरलेले असतात. तसेच भीतीमुळे डॉक्टरांकडे जाणं टाळलं जातं आणि निदान लांबतं.

थायरॉइडची माहिती तुमचे थायरॉईड तज्ज्ञ किंवा फिजिशियन तुम्हाला योग्य प्रकारे देऊ शकतात. Autoimmune थायरॉईड आजार हे आपल्याला टाळता येत नाहीत परंतु योग्य वेळी त्याचे निदान आणि उपचार केले तर ते नियंत्रणात राहू शकतात.

जर आपल्या परिवारातील रक्ताच्या नात्यामध्ये कुणाला थायरॉईड असेल तर अशा लोकांनी तात्काळ थायरॉइडची चाचणी करून घ्यावी.

डॉ. व्यंकटेश शिवणे सांगतात, “जर थायरॉइडच्या ग्रंथींमध्ये गाठी असतील ज्याला आपण गलगंड म्हणतो त्यावेळी डॉक्टर थायरॉइडची सोनोग्राफी आणि थायरॉइडच्या ग्रंथींमध्ये सुई टाकून FNAC (fine needle aspiration cytology) किंवा Biopsy करण्याचा सल्ला देतात.”

थायरॉईड गाठी आणि कर्करोगात काय फरक?

फोटो स्रोत, Getty Images

या गाठी कर्करोगाच्या असल्या तर काय केलं जातं असा प्रश्न डॉ. शिवणे यांना विचारल्यावर ते म्हणाले,

“थायरॉइडच्या गाठी कधीकधी कर्करोगाच्या असू शकतात. FNAC / Biopsy अशा प्रकारच्या चाचण्या कर्करोगाविषयीची शक्यता समजण्यासाठी पुरेशा असतात. Hypothyrodism किंवा Hyperthyrodism या प्रकारचे आजार गोळ्यांनी नियंत्रणात येऊ शकतात आणि या गोळ्यांनी आजारावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.”

“कर्करोगाच्या विषयी शक्यता असल्यास थायरॉइडच्या ग्रंथींची शस्त्रक्रिया करून गाठ काढून टाकणे हितावह असते. विशेष म्हणजे तुम्ही जितक्या लवकरात लवकर या चाचण्या करून घेऊन उपचार करता तितके योग्य ठरेल. म्हणून थायरॉइडच्या आजाराविषयी कुठलीही भीती न बाळगता थायरॉईड स्पेशालिस्ट किंवा तुमचे डॉक्टर यांच्याशी संपर्क साधावा,” असंही डॉ. व्यंकटेश शिवणे सुचवतात.

थायरॉईडमुळे गर्भधारणेवर काय परिणाम होतो?

थायरॉईडचे आजार प्रजननक्षमता आणि गर्भधारणेवर परिणाम करू शकतात, पण योग्य वेळी निदान आणि उपचार झाले तर बहुतेकांना निरोगी गर्भधारणा शक्य असते.

मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील आयव्हीएफ कन्सल्टंट डॉ. हितेशा रामनानी रोहिरा यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. यासंदर्भात काही मुख्य गैरसमज आणि प्रश्न यांच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती विचारली.

थायरॉईडचा आजार झाला म्हणजे नेहमीच वंध्यत्व येते का?

डॉ. हितेशा रामनानी रोहिरा म्हणतात की,”नाही. थायरॉईडचा आजार म्हणजे वंध्यत्वच येते असे नाही. थायरॉईड नियंत्रित असेल तर अनेक स्त्रिया नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करू शकतात. आपण थायरॉईडचा त्रास निदान न होता किंवा उपचार न घेता दीर्घकाळ राहतो तेव्हाच समस्या येते.”

हायपोथायरॉईडिझमवर उपचार न केल्यास स्त्री-पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर कसा परिणाम होतो?

याबद्दल डॉ. रोहिरा सांगतात-

स्त्रियांमध्ये:

  • ओव्युलेशनमध्ये अडथळा
  • अनियमित मासिक पाळी
  • गर्भपाताचा धोका वाढणे

असे परिणाम दिसून येतात. तर

पुरुषांमध्ये:

  • शुक्राणूंची संख्या कमी होणे
  • गतिशीलता (motility) कमी होणे
  • लैंगिक इच्छा कमी होणे

असे परिणाम होऊ शकतात. त्या पुढे सांगतात की, “एकदा थायरॉईडचे प्रमाण योग्य उपचारांनी नियंत्रणात आलं की प्रजननक्षमतेत लक्षणीय सुधारणा दिसते.”

थायरॉईडमुळे गर्भधारणेवर काय परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images

गर्भधारणेदरम्यान थायरॉईडचे आजार गुंतागुंत वाढवतात का?

डॉ. हितेशा रोहिरा यांच्या मते, थायरॉईडचे आजार उपचार न केले असेल तर समस्या वाढू शकतात.

त्यात पुढील धोके येऊ शकतात:

  • गर्भपात
  • प्री-एक्लॅम्प्सिया
  • अकाली प्रसूती
  • बाळाच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम

म्हणून गर्भवतींनी नियमित तपासण्या आणि थायरॉईड औषधांमध्ये वेळोवेळी बदल आवश्यक असतात. गर्भधारणेदरम्यान शरीराला जास्त थायरॉईड हॉर्मोन्सची गरज भासते.

गर्भधारणेदरम्यान थायरॉईडचे आजार गुंतागुंत वाढवतात का?

फोटो स्रोत, Getty Images

थायरॉईड आणि प्रजनन आरोग्याबद्दल सर्वात मोठे गैरसमज कोणते?

डॉ. रोहिरा सांगतात, “एक मोठा गैरसमज म्हणजे थायरॉईड असेल तर गर्भधारणा करू नये. दुसरा गैरसमज म्हणजे थायरॉईडची औषधे बाळाला हानिकारक असतात. हे दोन्ही गैरसमज समाजात पसरलेले आहेत.”

त्या म्हणतात की, “प्रत्यक्षात उपचार न केलेला थायरॉईडच बाळासाठी जोखमीचा असतो, औषधे नाहीत. योग्य उपचार आई आणि बाळ दोघांचेही संरक्षण करतात.”

गर्भधारणेचं नियोजन करताना थायरॉईड चाचणी कधी करावी?

डॉ. हितेशा रामनानी रोहिरा यांच्या मते, गर्भधारणेच्या आधीच थायरॉईड तपासणी करणे उत्तम.

विशेषतः जर

  • कुटुंबात थायरॉईडचा इतिहास असेल
  • मासिक पाळी अनियमित असेल
  • वंध्यत्वाचा त्रास असेल
  • आधी गर्भपात झाला असेल

लवकर निदान झालं की हॉर्मोन्स संतुलित करण्यासाठी वेळ मिळतो आणि त्यामुळे गर्भधारणेतील धोकाही कमी होतो.

थायरॉईड तपासणी, उपचार आणि सोशल मीडियावरील गैरसमज

थायरॉईडचे आजार भारतात मोठ्या प्रमाणावर दिसतात, पण त्यांच्याभोवती पसरलेली माहिती आणि गैरसमज आजही कायम आहेत. रक्ततपासणी, औषधोपचार आणि जीवनशैलीबाबत वेगवेगळे दावे सोशल मीडियावर फिरतात, त्यामुळे रुग्ण गोंधळून जातात. योग्य चाचण्या, उपचार आणि विश्वासार्ह माहिती यांची गरज अधिक वाढली आहे.

डॉ. अर्चना जुनेजा, कन्सल्टंट एंडोक्रिनॉलॉजिस्ट, कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, मुंबई यांनी बीबीसी मराठीनं विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली आहेत.

थायरॉईड तपासणी, उपचार आणि सोशल मीडियावरील गैरसमज

फोटो स्रोत, Getty Images

रूटीन थायरॉईड टेस्ट सर्व थायरॉईड विकार ओळखण्यासाठी पुरेशा असतात का?

डॉ. अर्चना जुनेजा सांगतात, “रूटीन तपासणी म्हणून केली जाणारी TSH टेस्ट महत्त्वाची असली तरी ती पुरेशी नसते. काही वेळा TSH सामान्य दिसते, पण रुग्णाला तरीही थायरॉईडचा विकार असू शकतो.”

अशा वेळी डॉक्टर पुढील तपासण्या सुचवतात:

  • Free T3 आणि Free T4
  • थायरॉईड अँटीबॉडीज (विशेषतः ऑटोइम्यून रोगांसाठी)
  • अल्ट्रासाऊंड किंवा इतर इमेजिंग टेस्ट्स

म्हणून थायरॉईडचे निदान फक्त एका आकड्यावर नाही, तर लक्षणं, रुग्णाचा इतिहास आणि तपासण्या यांच्या एकत्रित माहितीवर अवलंबून असतं.

थायरॉईडची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते, हा गैरसमज का पसरतो?

हा सर्वात मोठा गैरसमज आहे, असं डॉ. अर्चना जुनेजा सांगतात.

त्या म्हणतात, “काही विकार उदाहरणार्थ ऑटोइम्यून हायपोथायरॉईडिझमला दीर्घकाळ उपचार लागू शकतात. परंतु प्रत्येक थायरॉईड बिघाड कायमस्वरूपी नसतो.”

थायरॉईडची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते, हा गैरसमज का पसरतो?

फोटो स्रोत, Getty Images

“कधी कधी थायरॉईडचे काम तात्पुरते बिघडते. ताण, गर्भधारणा, इन्फेक्शन, काही औषधांचा परिणाम यांमुळे त्रास होऊ शकतो. अशा वेळी काही काळ निरीक्षण आणि लहान बदल केल्यानंतर स्थिती सुधारते.”

‘गोळी आयुष्यभर लागेल’ या भीतीमुळे अनेक रुग्ण आवश्यक असतानाही औषध सुरू करत नाहीत, यामुळे विकार अधिक गंभीर होऊ शकतो.

थायरॉईडविषयी सोशल मीडियावर कोणते लाइफस्टाईल ‘गैरसमज’ पसरलेले असतात?

सोशल मीडियावर नैसर्गिक उपायांनी थायरॉईड संदर्भातील आजार ‘बरा होतो’ असे दावे खूप असतात, पण बहुतांश दाव्यांना पुरावा नसतो असं डॉ. अर्चना जुनेजा सांगतात.

त्या पुढे म्हणतात, “सर्वांनी ग्लुटन बंद करणे, स्वतःहून आयोडिन सप्लिमेंट्स घेणे, योगा/डिटॉक्स ड्रिंक्स/हर्बल उपाय म्हणजेच थायरॉईडची पूर्ण चिकित्सा असे गैरसमज असतात. औषधे ‘वाईट’ असतात, म्हणून टाळावीत. असाही समज असतो.”

त्या सांगतात, ” जीवनशैली सुधारणा उपयुक्त असल्या तरी हार्मोन कमी-जास्त असेल तर औषधांची जागा कोणताच उपाय घेऊ शकत नाही.”

फक्त डाएटमुळे थायरॉईड बरा होतो, हा गैरसमज धोकादायक का आहे?

डॉ. अर्चना जुनेजा सांगतात, “डाएट थायरॉईडसाठी नक्की मदत करते पण थायरॉईड विकार फक्त डाएटने बरे होत नाहीत. विशेषतः हायपोथायरॉईडिझममध्ये समस्या पोषकघटकांमुळे नसून ही ग्रंथी पुरेसे हार्मोन तयार करत नाही हे मूळ कारण असते.”

फक्त डाएटमुळे थायरॉईड बरा होतो, हा गैरसमज धोकादायक का आहे?

फोटो स्रोत, Getty Images

त्या सांगतात, फक्त डायटवर अवलंबून राहणे धोकादायक कारण:

  • निदान आणि योग्य औषधोपचार उशिरा मिळतात
  • थकवा, वजनवाढ, नैराश्य, मेटाबॉलिझम कमी होणे यांसारखी लक्षणे वाढतात
  • रोग दीर्घकाळ टिकतो

योग्य पुराव्यांनिशी तपासणी, उपचार करणं आणि दीर्घकाळ टिकेल अशी जीवनशैली हीच सर्वोत्तम पद्धत आहे असं डॉ. अर्चना जुनेजा सांगतात.

थायरॉईडबद्दलचे सर्वत्र चर्चेत असणारे गैरसमज

थायरॉईडचे विकार हे सर्वाधिक आढळणारे हार्मोनल आजार आहेत, पण त्यांच्याभोवती गैरसमजांची मोठी दाटी झालेली दिसते. योग्य माहितीमुळे लवकर निदान, योग्य उपचार आणि दीर्घकालीन आरोग्य दोन्ही शक्य होते.

चुकीच्या समजुतीमुळे रुग्ण उपचार उशिरा घेतात किंवा चुकतात. म्हणून आम्ही काही गैरसमजांबद्दल डॉ. चैतन्य कुलकर्णी, कन्सल्टंट इंटर्नल/जनरल मेडिसिन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, नवी मुंबई, यांना विचारलं. त्यांनी पुढील उत्तरं दिली आहेत.

थायरॉईड झालं की वजन खूप वाढतं

फोटो स्रोत, Getty Images

गैरसमज 1 : थायरॉईडचे आजार झाले की वजन खूप वाढतं

उत्तर: “वजनात बदल बहुतांश वेळा सौम्य असतो. हायपोथायरॉईडिझममध्ये वजन 2–5 किलोपर्यंत वाढू शकते आणि त्यातलं बऱ्याच प्रमाणात वजन हे शरीरात द्रव धरुन ठेवल्यामुळे असतं. अनेक रुग्णांचे वजन सामान्यही राहते”, असं डॉ. चैतन्य कुलकर्णी सांगतात.

गैरसमज 2 : थायरॉईडचे आजार फक्त महिलांनाच होतात

उत्तर: महिलांमध्ये प्रमाण जास्त असलं तरी पुरुष आणि मुलांनाही थायरॉईडचे विकार होऊ शकतात. म्हणजेच हा लिंग-नियंत्रित विकार नाही.

गैरसमज 3 : आयोडिन सप्लिमेंट घेतल्याने थायरॉईड बरा होतो

उत्तरः केवळ आयोडिन-अभावामुळे झालेले विकारच आयोडिनने सुधारतात. बहुतेक थायरॉईड विकार हे ऑटोइम्यून स्वरूपाचे असतात (उदा. हाशिमोटो किंवा ग्रेव्हज् डिसीज), त्यात आयोडिनने काही फायदा होत नाही. उलट काहीवेळा परिस्थिती बिघडू शकते.

गैरसमज 4 : थायरॉईडचा आजार दिसण्यातून सहज ओळखता येतो

उत्तरः “अनेक रुग्ण दिसायला अगदी सामान्य असतात. त्यांची लक्षणे सूक्ष्म असतात आणि ताण, थकवा किंवा वयानुसार होणाऱ्या बदलांसारखी वाटू शकतात. त्यामुळे अशी गल्लत करू नये”, असा सल्ला डॉ. कुलकर्णी देतात.

गैरसमज 5 : औषधे लक्षणे कमी झाली की थांबवली तरी चालतात

उत्तरः बहुतेक थायरॉईड विकार विशेषतः हायपोथायरॉईडिझमला दीर्घकालीन उपचार लागतात.

औषधे स्वतःहून थांबवल्यास हार्मोन्स अनियमित होतात आणि समस्या परत गंभीर होते.

डॉ. कुलकर्णी सांगतात, “या आजारांची लक्षणे अस्पष्ट असतात थकवा, मूड बदल, वजनातील चढ-उतार ही सर्व रोजच्या आयुष्यासारखीच लक्षणे वाटतात. तसेच सोशल मीडियावरील चुकीचे सल्ले अंमलात आणले जातात. एखाद्या व्यक्तीचा अनुभव सर्वांवर लागू होत नाही. त्यात सरसकटीकरण करता येत नाही. त्यामुळे या आजारांबाबत स्वतः निर्णय घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले, “गैरसमजांचे दुष्परिणाम रुग्णांवर होतात. उपचार घेण्यात विलंब होतो. काही रुग्ण स्वतःहून आयोडिन/हर्बल सप्लिमेंट घेतात. काही लोक डॉक्टरांनी दिलेली औषधे अर्धवट थांबवतात. लोकांना लक्षणांबद्दलची भीती आणि मानसिक ताण येतो. तसेच थायरॉईड विकारांबद्दल अनावश्यक गोंधळ तयार होतो. त्यामुळे हे टाळलं पाहिजे.”

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. थायरॉईडच्या आजारांमुळे मुळे नेहमीच मोठ्या प्रमाणात वजन वाढते का?

नाही. वजनातील बदल सौम्य असतात आणि जीवनशैलीवरही अवलंबून असतात.

2. आयोडिन सर्व थायरॉईड विकारांवर उपयोगी आहे का?

नाही. आयोडिन-अभाव असल्यासच मदत होते. जास्त आयोडिन उलट हानीकारक ठरू शकते.

3. थायरॉईड नेहमीच बाहेरून दिसतो का?

नाही. काही रुग्णांच्या सर्व लक्षणांचे एकमेव संकेत रक्ततपासणी असतात.

4. थायरॉईड टाळता येतो का?

नेहमी नाही. ऑटोइम्यून विकारांमध्ये आनुवंशिकतेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. पण लवकर निदान आणि उपचारांमुळे नियंत्रण उत्तम ठेवता येते.

थायरॉईड आणि मानसिक आरोग्य

थायरॉईडचे हार्मोन्स आणि मानसिक आरोग्य यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. हार्मोनमधील चढ-उतार मूड, भावनिक स्थैर्य आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे थायरॉईडची लक्षणे आणि मनोविकारांची लक्षणे एकमेकांमध्ये मिसळल्याने अनेक गैरसमज पसरतात असं डॉ. अपर्णा रामकृष्णन सांगतता.

त्या मुंबईतल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात मनोविकार विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीबीसी मराठीनं विचारलेल्या यासंदर्भातील प्रश्नांना विस्तृत उत्तर दिली आहेत.

थायरॉईड आणि मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

1) थायरॉईड बिघाड आणि चिंता–नैराश्य यांचं नातं कसं आहे?

डॉ. अपर्णा सांगतात, “थायरॉईड हार्मोन्स (T3 आणि T4) हे सेरोटोनिन, डोपामिन, नॉरएड्रेनालिन यांसारख्या न्यूरोट्रान्समीटरवर प्रभाव टाकतात. ही हार्मोन्स मेंदूतील रक्तप्रवाह, ऊर्जा वापर, झोप, ताणतणाव प्रक्रिया आणि मूड नियंत्रणावर देखील प्रभावित करतात. त्यामुळे थायरॉईडमधील कोणताही बदल मूडमध्ये अडथळे निर्माण करू शकतो किंवा सध्याची समस्या वाढवू शकतो.”

  • सबक्लिनिकल डिसफंक्शन — सौम्य चिंता किंवा नैराश्य वाढते
  • क्लिनिकल डिसफंक्शन — मध्यम ते तीव्र मनोविकार लक्षणे दिसतात

अशी लक्षणं दिसतात.

हायपोथायरॉईडिझममध्ये दिसणारी सामान्य मानसिक लक्षणे

  • नैराश्य
  • एकाग्रतेचा अभाव / ब्रेन फॉग
  • थकवा
  • निरुत्साह, आनंद न वाटणे
  • चिडचिड
  • काहीवेळा ‘ट्रीटमेंट रेझिस्टंट डिप्रेशन’मध्येही हायपोथायरॉईडिझम आढळू शकतो.

हायपरथायरॉईडिझममध्ये दिसणारी लक्षणे

  • तीव्र चिंता
  • पॅनिक अटॅक्स
  • चिडचिड, रागाच्या भरात प्रतिक्रिया
  • मूड स्विंग्स
  • बेचैनी, निद्रानाश
  • ‘वायर्ड’ किंवा ओव्हरअॅक्टिव्ह वाटणे
  • कधी कधी हायपोमेनिया किंवा सायकोसिस
  • अनेकदा मनोविकार लक्षणे शारीरिक लक्षणांआधी दिसतात आणि चुकीने पॅनिक डिसऑर्डर किंवा बायपोलर म्हणून निदान होते.
  • ऑटोइम्यून थायरॉईड (हाशिमोटो)च्या रुग्णांमध्ये नैराश्य, मूड बदल आणि चिंता अधिक प्रमाणात दिसतात.

जेव्हा मूड आणि पुढील शारीरिक लक्षणे एकत्र दिसतात तेव्हा TFT टेस्ट करणं आवश्यक आहे असं डॉ. अपर्णा सांगतात.

  • अकारण वजनात बदल
  • उष्णता/थंडी असह्य होणे
  • केस गळणे
  • हृदयाचे ठोके वाढणे / कंप
  • विश्रांती घेतली तरी सुधारत नाही असा थकवा
  • मासिक पाळीतील बदल

ट्रीटमेंट रेसिस्टंट डिप्रेशनमध्ये थायरॉईड सप्लिमेंट्सही उपचाराचा पर्याय मानला जातो.

मानसिक आरोग्याची लक्षणे अनेकदा थायरॉईडच्या समस्यांशी गल्लत होते का?

फोटो स्रोत, Getty Images

2) मानसिक आरोग्याची लक्षणे अनेकदा थायरॉईडच्या समस्यांशी गल्लत होते का?

याला डॉ.अपर्णा रामकृष्णन हो असं उत्तर देतात आणि हे दोन्ही बाजूंनी घडू शकते असं त्या म्हणतात.

त्या पुढे सांगतात. “थायरॉईड आणि मानसिक आरोग्य विकारांच्या लक्षणांत मोठे साम्य असते.”

“थकवा, वजनातील बदल, झोपेची समस्या, चिडचिड, एकाग्रतेत घट, मानसिक गती बदल, माईल्ड TSH वाढ आणि मूड लक्षणे असतील तर रुग्ण व कुटुंबीय थायरॉईडलाच दोष देऊ शकतात, विशेषतः कुटुंबात थायरॉईडचा इतिहास असल्यास समान लक्षणं दोन्हीकडे दिसू शकतात.”

“लक्षणे दीर्घकाळ टिकलेली असल्यास आधीही आधीही अशा एपीसोड्सचा इतिहास असेल तसंच त्रास होण्यासाठी स्पष्ट ट्रिगर असेल आणि Free T3 आणि T4 सामान्य असेल तर मानसिक त्रासाची शक्यता असू शकते”, असं डॉ. अपर्णा सांगतात.

“तर लक्षणे अचानक सुरू होणे, वेगवान हृदयगती, कंप, उष्णता असह्य होणं अशी ऑटोनॉमिक चिन्हं दिसणं तसेच पूर्वी मानसिक आजाराचा इतिहास नसेल, लॅब रिपोर्टमध्ये स्पष्ट बिघाड दिसत असेल आणि थायरॉईड उपचारानंतर जलद आणि जवळजवळ पूर्ण सुधारणा दिसत असेल तर ही लक्षणं थायरॉईडची असतात”

मानसिक आरोग्याची लक्षणे अनेकदा थायरॉईडच्या समस्यांशी गल्लत होते का?

फोटो स्रोत, Getty Images

मानसिक आरोग्याची प्रत्येक समस्या थायरॉईडमुळे होते असं लोकांना का वाटतं? असं विचारल्यावर डॉ. अपर्णा सांगतात, “थायरॉईड आणि मानसिक विकाराचींची लक्षणं यात साम्य असल्यामुळे हे होतं. थायरॉईडच्या आजारांवर उपचार झाले की मूड सुधारतो त्यामुळे हेच समस्यांचं कारण असावं असं अनेकांना वाटतं. तसेच मानसिक आजारांना आजही सामाजिकदृष्ट्या स्विकारलेलं नाही त्यामुळे थायरॉईडची शारीरिक कारणं लोक स्वीकारतात. समाजात मानसशास्त्रीय निदानापेक्षा वैद्यकीय कारण अधिक स्वीकारले जाते.”

त्या पुढे सांगतात, “नैराश्य, चिंता असे त्रास होत असेल तर ते दरवेळेस थायरॉईडमुळेच होतात असं नाही. आता मूड बरा नाही किंवा चांगला आहे म्हणून स्वतःच थायरॉईडचा डोस कमी-जास्त करणं हे धोकादायक आहे. त्यामुळे अँग्झायटी वाढू शकते. तसेच थायरॉईड ठिक झाला म्हणून मानसोपचाराची गरज नाही, असं समजू नये. दोन्ही उपचार एकत्रितरित्या उत्तम काम करतात. थायरॉईड आणि मानसिक आरोग्य हे परस्परांवर प्रभाव टाकतात. पण उपचार बहुधा दोन्ही बाजूंनी आवश्यक असतात, एकाच कारणावर सर्वकाही ढकलणे चुकीचे आहे.”

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC