Home LATEST NEWS ताजी बातमी काबाच्या पवित्र ‘किसवा’चा तुकडा जेफ्री एपस्टीनला पाठवण्यात आला होता का?

काबाच्या पवित्र ‘किसवा’चा तुकडा जेफ्री एपस्टीनला पाठवण्यात आला होता का?

7
0

Source :- BBC INDIA NEWS

इस्लाममध्ये काबा हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते.

फोटो स्रोत, EPA

जगभरातील मुस्लीम समाज त्या कागदपत्रांमुळे संताप व्यक्त करत आहे, ज्यातून असा दावा केला जातोय की इस्लाममधील सर्वात पवित्र स्थळ असलेल्या काबाचा कपडा (किसवा) याचे काही तुकडे लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याला पाठवले गेले होते.

पवित्र ‘किसवा’ आणि एपस्टीन प्रकरणातील माहिती

30 जानेवारी रोजी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने ‘एपस्टीन फाइल्स’चा जो नवीन भाग जाहीर केला, त्यामध्ये 2017 सालचे काही ईमेल्स समोर आले आहेत.

या ईमेल्समध्ये गिलाफ-ए-काबा (ज्याला ‘किसवा’ म्हटले जाते) च्या 3 तुकड्यांच्या एका खेपेचा उल्लेख आहे. हे तुकडे सौदी अरेबियातून कॅरेबियनमधील एपस्टीनच्या घरी पाठवण्यात आले होते.

यावर एका ‘X’ (ट्विटर) युजरने आपली प्रतिक्रिया देताना लिहिले, “जरा विचार करा, जगातील सर्वात पवित्र ठिकाणचा एक भाग जगातील सर्वात घाणेरड्या ठिकाणी पाठवला गेला.”

2014 सालच्या एका फोटोमध्ये दिसते की, एपस्टीन एका माणसासोबत जमिनीवर पडलेल्या कापडाच्या तुकड्याची पाहणी करत आहे. हे कापड काबाच्या दरवाजाला झाकणाऱ्या ‘किसवा’च्या सर्वात नक्षीदार भागासारखे दिसते.

एका दुसऱ्या ट्विटर युजरने लिहिले, “पवित्र ‘किसवा’ला चटईसारखे जमिनीवर अंथरलेले पाहून माझे मन सुन्न झाले.”

तथापि, या फोटोचा आणि 2017 मध्ये एपस्टीनला पाठवलेल्या ‘किसवा’च्या तुकड्यांच्या कागदपत्रांचा थेट संबंध असल्याचे दिसत नाही. तसेच, फोटोमध्ये दिसणारे ते कापड खरोखरच ‘किसवा’चा भाग आहे की नाही, हे देखील स्पष्ट झालेले नाही.

या फोटोमध्ये जेफ्री एपस्टाईन एका व्यक्तीसोबत जमिनीवर ठेवलेल्या कापडाच्या तुकड्याची पाहणी करताना दिसत आहे. हे कापड काबाच्या दरवाजावर असलेल्या 'किसवा'च्या सर्वात नक्षीदार भागासारखे दिसत आहे

फोटो स्रोत, Source: US Department of Justice

मशीद

गिलाफ-ए-काबा तयार करण्यासाठी काळ्या रंगाच्या रेशमी कापडाचा वापर केला जातो, ज्यावर सोनेरी आणि चांदीच्या तारांनी कुराणमधील आयत विणले जातात.

मक्का येथील मशीद अल-हरामच्या मध्यभागी असलेल्या काबाच्या चारही भिंतींना या ‘किसवा’ने झाकले जाते.

दरवर्षी लाखो भाविक याला स्पर्श करतात आणि नवीन इस्लाम धर्माच्या वर्षाच्या सुरुवातीला एका विशेष कार्यक्रमात हे कापड बदलले जाते.

दरवर्षी इस्लामिक नवीन वर्षाच्या निमित्ताने एका विशेष सोहळ्यात 'किसवा' बदलला जातो

फोटो स्रोत, Reuters

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांनुसार, 2017 मध्ये एपस्टीनची माणसं आणि ‘अजीज अल-अहमदी’ नावाच्या व्यक्तीमध्ये ईमेल्सद्वारे चर्चा झाली होती. यामध्ये एपस्टीनला ‘किसवा’चे 3 तुकडे पाठवण्याची सोय करण्यात आली होती.

यामध्ये एक हिरव्या रंगाचा तुकडा होता, जो काबाच्या आत वापरला जातो असं सांगितलं गेलं. दुसरा तुकडा बाहेरून लावल्या जाणाऱ्या काळ्या कापडाचा होता, तर तिसरा तुकडा नक्षीकाम केलेलं पण कधीही न वापरलेलं कापड होतं.

1 फेब्रुवारी 2017 च्या एका ईमेलनुसार, ‘अहमदी’च्या असिस्टंटने एपस्टीनच्या माणसांना असं सांगितलं होतं की, ते ‘मशिदीसाठी’ काबाचे काही तुकडे पाठवतील. पण ते ‘मस्जिद ‘ हा शब्द एपस्टीनच्याच कोणत्या तरी जागेसाठी वापरत होते का, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.

आतापर्यंत समोर आलेल्या ‘एपस्टीन

फाईल्स’मध्ये त्या बेटावर कोणत्याही मशिदीचा उल्लेख नाही. पण अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांनुसार, एका छोट्या ‘मंदिरा’चा उल्लेख मात्र आढळतो. ईमेलमध्ये नेमकं कशाबद्दल बोललं जात होतं, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हे ‘मंदिर’ लिटिल सेंट जेम्स बेटाच्या दक्षिण भागात असून, त्याला सोनेरी घुमट असलेली एक छोटी इमारत म्हटलं गेलं आहे.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, कागदपत्रांमध्ये ज्या ‘मशिदी’चा उल्लेख आहे, ती मक्का येथील ‘मस्जिद अल-हराम’ नाही जिथे काबा आहे.

कागदपत्रांनुसार, 4 मार्च 2017 रोजी हे सामान पाम बीच येथील एपस्टीनच्या घरी पोहोचलं होतं आणि तिथून ते अमेरिकन व्हर्जिन आयलंड्समधील ‘सेंट थॉमस’ला पाठवण्यात आलं.

हे ठिकाण एपस्टीनच्या ‘लिटिल सेंट जेम्स’ या खासगी बेटाजवळ आहे. अनेक पीडित महिलांनी असा आरोप केला आहे की, त्यांना याच बेटावर चोरून आणलं गेलं होतं आणि त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं.

14 मार्च 2017 च्या अमेरिकन कस्टम्स फॉर्मवर या सामानाचे वर्णन ‘पेंटिंग्स, ड्रॉइंग्स आणि पेस्टल्स’ असे करण्यात आले होते. त्यानंतर 21 मार्चच्या एका ईमेलमध्ये किसवाचे तुकडे एपस्टीनच्या घरी पोहोचल्याची खात्री करण्यात आली.

त्यानंतर अहमदीने पाठवलेल्या एका ईमेलमध्ये एपस्टीनला असे सांगितले गेले की, त्या काळ्या कापडाला “सुन्नी, शिया आणि इतर पंथांच्या किमान 1 कोटी मुस्लिमांनी स्पर्श केला आहे.”

ईमेलमध्ये असे ही होते की , “ते काबाभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर प्रत्येकजण या कापडाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या तुकड्यावर आपली प्रार्थना, इच्छा, अश्रू आणि आशा व्यक्त करतो.”

ईमेलमध्ये 'किसवा'च्या 3 तुकड्यांचे सविस्तर वर्णन देण्यात आले आहे

फोटो स्रोत, Source: US Department of Justice

एपस्टीनला हे किसवाचे तुकडे भेट म्हणून मिळाले होते का आणि ते खरे होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अमेरिकन रेकॉर्डनुसार, सौदी अरेबियातून एपस्टीनला सामान पाठवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.

27 जानेवारी 2017 च्या ईमेल्सवरून असं समजतं की, ‘अहमदी’चा असिस्टंट असलेल्या एका व्यक्तीनं एपस्टीनच्या घरी ‘मशिदीच्या आतील फोटोंची’ मागणी केली होती. मशिदीच्या आत काही तरी नवीन काम करायचं होतं, त्यासाठी हे फोटो हवे होते.

त्या आधीच्या एका ईमेलमध्ये एपस्टीनच्या माणसानं त्याच्या घरी ‘तंबू आणि घरगुती सामान’ पोहोचल्याचं सांगितलं होतं. अमेरिकन न्याय विभागाच्या फाईल्समध्ये काही फोटो आहेत, ज्यात अरबी लोकरीचे तंबू, चटया, कॉफीचे भांडे, कप आणि टोपल्या दिसतात. पण हीच ती वस्तूंची खेप होती का, हे मात्र नक्की सांगता येत नाही.

महत्त्वाचं म्हणजे, ही सगळी देवाणघेवाण 2007 मध्ये एपस्टीनला लैंगिक गुन्हेगार म्हणून शिक्षा झाल्यानंतर झाली होती. एपस्टीनने देहविक्रीचे दोन गुन्हे मान्य केले होते, ज्यातलं एक प्रकरण तर अल्पवयीन मुलीशी संबंधित होतं.

बीबीसीने याबद्दल प्रश्न विचारले असता ‘अहमदी’ने कोणतंही उत्तर दिलं नाही. तसंच, तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, केवळ कागदपत्रात नाव आलं म्हणून ती व्यक्ती गुन्ह्यात सामील आहेच असं म्हणता येत नाही.

‘धार्मिकदृष्ट्या पवित्र नाही’

गिलाफ-ए-काबा तयार करण्यापासून ते तो बदलण्यापर्यंत आणि जुन्या कापडाच्या वापरापर्यंतच्या सर्व गोष्टींवर सौदी सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. मात्र, जुना ‘किसवा’ वाटण्याबाबत कोणताही स्पष्ट कायदा उपलब्ध नाही.

बीबीसीने या संदर्भात सौदी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

हज आणि उमरा प्रकरणांचे लेखक अहमद अल-हलाबी यांनी बीबीसीला सांगितले की, “सोने आणि चांदीचे नक्षीकाम असलेले भाग (ज्याला बेल्ट किंवा समादी म्हटले जाते), ते फक्त सौदी रॉयल कोर्टचे अधिकारीच कोणाला तरी भेट म्हणून देऊ शकतात.”

आधी 'किसवा' इजिप्तमध्ये तयार केला जायचा, पण नंतर हे सर्व काम सौदी अरेबियामध्ये हलवण्यात आलं

फोटो स्रोत, EPA

ते पुढे म्हणाले, “हे खास भाग केवळ मुस्लीम देशांचे प्रमुख किंवा सरकारी अधिकाऱ्यांनाच दिले जातात.”

त्यांनी पुढे सांगितले की, उरलेले काळे कापड सहसा छोट्या तुकड्यांमध्ये कापले जाते आणि खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले जाते.

लंडनच्या SOAS युनिव्हर्सिटीमधील इस्लामिक आर्टचे इतिहासकार डॉ. सायमन ओमीरा म्हणतात की, किसवा हा ‘धार्मिकदृष्ट्या पवित्र’ मानला जात नाही, पण मुस्लीम जगतात त्याचा प्रचंड आदर केला जातो.

“काबाच्या इमारतीवर हे कापड एखाद्या बादशहाच्या पोशाखासारखे असते. एकदा का किसवा काबावरून उतरवला, तरीही त्याचा अपमान केला जाऊ शकत नाही. तुम्ही त्यावर पाय ठेवू शकत नाही.”

दुसरीकडे, हलाबी यांनी अमेरिकन न्याय विभागाने जारी केलेल्या ईमेल्समधील तुकड्यांच्या खरेपणावर शंका घेतली आहे. त्यांच्या मते, बिगर मुस्लिमांना किसवा भेट म्हणून देण्याची परवानगीच नाही.

सौदीचा संबंध

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांनुसार, 2016 ते 2019 या काळात एपस्टीन आणि अहमदी यांनी एकमेकांना अनेक विषयांवर ईमेल्स पाठवले होते. काही ईमेल्समध्ये एपस्टीनचा उल्लेख ‘बॉस’ किंवा ‘मास्टर’ असा करण्यात आला होता. या कागदपत्रांवरून असेही समजते की, हे दोघे न्यूयॉर्क आणि पॅरिसमध्ये एकमेकांना भेटले होते.

न्याय विभागाने जाहीर केलेल्या कागदपत्रांतून असेही समोर आले आहे की, एपस्टीनने अहमदीच्या माध्यमातून सौदी सरकारवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला होता.

जुलै 2016 च्या एका ईमेलवरून असे संकेत मिळतात की, एपस्टीन आणि ‘HE राफत’ नावाच्या एका व्यक्तीमध्ये भेट घडवून आणण्याची तयारी सुरू होती. ही व्यक्ती एपस्टीनच्या कंपनीच्या माध्यमातून काही फायदा मिळवू इच्छित होती.

येथे ‘HE’ चा अर्थ ‘हिज एक्सलन्सी’ असा असू शकतो, जो सौदी अरेबियामध्ये मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी मानवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांनुसार, 2016 ते 2019 या काळात एपस्टीन आणि अहमदी यांनी एकमेकांना अनेक विषयांवर ईमेल्स पाठवले होते.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकन न्याय विभागाने जाहीर केलेल्या कागदपत्रांनुसार, ऑगस्ट 2016 च्या एका ईमेलमध्ये एपस्टीनने ‘अहमदी’ नावाच्या व्यक्तीला सौदी की तेल कंपनी ‘अरामको’ (Aramco) चे शेअर्स सार्वजनिकरीत्या विक्रीला न काढण्याचा सल्ला दिला होता.

त्यानंतर अहमदी यावर विचार करू असे म्हणतात आणि उत्तरात ‘रफत अल-सिबाग’ यांचा ईमेल आयडी कॉपी करतात. अनेक ईमेल्समध्ये एपस्टीनने रफत अल-सिबाग यांचा उल्लेख ‘सौदी क्राउन प्रिन्सचे सल्लागार’ असा केला आहे. सौदी प्रेस एजन्सीने देखील 2017 मध्ये त्यांना ‘शाही दरबारातील सल्लागार’ म्हणून संबोधले होते.

न्याय विभागाच्या फाईल्समधील ईमेल्सवरून असे दिसते की, सिबाग नावाची ही व्यक्ती एपस्टीनशी वारंवार ईमेल्सद्वारे संपर्कात होती.

2016 मधील एका टेक्स्ट मेसेजमध्ये ‘रफत अल-सिबाग’ नावाच्या अकाउंटवरून एपस्टीनला पाठवले होते की, “मला तुमची मैत्री आवडते.”

‘रफत अल-सिबाग’च्या नावाने एपस्टीनला पाठवलेल्या एका दुसऱ्या ईमेलमध्ये एका बातमीची लिंक होती. त्या बातमीनुसार, 17 वर्षांची एक रशियन ‘ब्यूटी क्वीन’ दुबईला गेल्याची आणि तिने स्वतःचा सौदा केल्याची (वर्जिनिटी विकल्याची) चर्चा होती.

यावर उत्तर देताना लैंगिक गुन्हेगार एपस्टीनने लिहिले, “शेवटी तुम्ही मला काहीतरी मौल्यवान पाठवलंत.”

दुसरीकडे, या फाईल्समध्ये स्वतः ‘अहमदी’बद्दल खूप कमी माहिती मिळते. पण सप्टेंबर 2018 च्या एका ईमेलमध्ये या नावाचा कोणीतरी माणूस आपल्या मोबाइल गेम कंपनीबद्दल एपस्टीनकडे सल्ला मागताना दिसतो.

किसवा पाठवणे आणि या ईमेल्समध्ये उल्लेख असलेल्या लोकांचे एपस्टीनशी असलेले संबंध, यावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संपूर्ण मुस्लिम जगतात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC