Home LATEST NEWS ताजी बातमी एम. एस. गोळवलकर : 33 वर्षे होते सरसंघचालक, गांधी हत्येनंतर संघाला संपण्यापासून...

एम. एस. गोळवलकर : 33 वर्षे होते सरसंघचालक, गांधी हत्येनंतर संघाला संपण्यापासून वाचवलं

4
0

Source :- BBC INDIA NEWS

माधव सदाशिवराव गोळवलकर

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक जरी केशव बळीराम हेडगेवार होते, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) आजची वैचारिक बैठक संघाचे दुसरे सरसंघचालक एम एस गोळवलकरांनीच दिली होती.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी देशभरात आरएसएसचा विस्तार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली आरएसएसनं भारतीय राजकारणात हिंदू राष्ट्रवादाला दिशा दिली.

गोळवलकरांनी संघाचं केलेलं नेतृत्व, केलेली वैचारिक मांडणी आणि त्यांच्याशी निगडीत विविध मुद्द्यांबद्दल या लेखात जाणून घेऊया.

सरदार पटेल यांच्या निधनाच्या काही महिने आधी कॅबिनेटमधून नुकताच राजीनामा दिलेले श्यामा प्रसाद मुखर्जी नागपूरला गेले.

तिथे ते प्लास्टर नसलेल्या घरात गेले. त्या घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक एम. एस. गोळवलकर त्यांची वाट पाहत होते.

भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्षांचा अवधी बाकी होता. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी गोळवलकरांना एक नवा राजकीय पक्ष सुरू करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एखाद्या राजकीय पक्षामागे जाऊ शकत नाही, असं म्हणत गोळवलकरांनी मुखर्जींची विनंती फेटाळली.

त्यानंतर काही महिन्यांनी गोळवलकरांनी त्यांच्या निर्णयावर फेरविचार केला आणि मग मुखर्जींना आश्वासन दिलं की या कामासाठी ते त्यांचे पाच सर्वात विश्वासू कार्यकर्ते देतील.

हे पाच जण म्हणजे, दीनदयाल उपाध्याय, सुंदर सिंह भंडारी, नानाजी देशमुख, बापूसाहेब सोहनी आणि बलराज मधोक.

अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी तोपर्यंत इतके अनुभवी झाले नव्हते की त्यांचा समावेश यात व्हावा.

काही महिन्यांनी 21 ऑक्टोबर 1951 ला याच पाच जणांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली होती. पक्षाचं निवडणूक चिन्ह होतं, ‘दिवा!’

गोळवलकरांचं वाराणसीतील शिक्षण

माधव सदाशिव गोळवलकर यांचा जन्म 1906 मध्ये नागपूरजवळ रामटेकमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता.

ते अतिशय सडपातळ शरीरयष्टीचे होते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) जीवशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘गोळवलकर द मिथ बिहाइंड द मॅन, द मॅन बिहाइंड द मशीन’ या धीरेंद्र के. झा लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं.

माधव सदाशिव गोळवलकर

फोटो स्रोत, www.golwalkarguruji.org

धीरेंद्र के. झा लिहितात, “गोळवलकर नेहमीच स्टार्च केलेलं पांढरं धोतर आणि कुर्ता परिधान करायचे. त्यांचे डोळे मोठे, चमकदार आणि बोलके होते. मात्र ते स्वभावानं लाजाळू होते.”

“त्यांचं इंग्रजी, हिंदी, मराठी, बांगला आणि संस्कृत या किमान पाच भाषांवर प्रभुत्व होतं.”

गंगाधर इंदुरकर यांनी गोळवलकरांचं चरित्र लिहिलं आहे. इंदुरकर त्यांच्या ‘गुरुजी माधव सदाशिव गोळवलकर’ या पुस्तकात लिहितात, “गोळवलकर खूप अभ्यासू होते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या ग्रंथालयातील हिंदू धर्म आणि अध्यात्माशी निगडित प्रत्येक महत्त्वाचं पुस्तक वाचलं होतं.”

हेडगेवारांनी केली उत्तराधिकारी म्हणून निवड

वाराणसीत शिक्षण घेत असतानाच गोळवलकर यांची आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी पहिली भेट झाली होती. मात्र, त्यांना आरएसएसमध्ये आणण्याचं श्रेय त्यावेळेस बीएचयूमध्ये शिकत असलेले भैय्याजी दानी यांना जातं.

1939 मध्ये गोळवलकरांना आरएसएसचा सह-कार्यवाह करण्यात आलं.

त्यादरम्यान त्यांनी बाबाराव सावरकर यांच्या ‘राष्ट्र मीमांसा’ या पुस्तकातून प्रेरणा घेत ‘वी आर अवर नेशनहुड डिफाईन्ड’ नावाचं पुस्तक लिहिलं होतं. हे पुस्तक 1939 मध्ये प्रकाशित झालं होतं.

आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी गोळवलकरांना एक कागद दिला होता.

त्यावर लिहिलं होतं, “मला तुला सांगायचं आहे की आतापासून तू संघटनेची सर्व जबाबदारी सांभाळशील.” (गोळवलकर, मिथ बिहाइंड द मॅन, मॅन बिहाइंड द मशीन)

सरसंघचालक म्हणून गोळवलकरांची नियुक्ती झाल्यामुळे आरएसएसच्या अनेक नेत्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना वाटत होतं की या पदासाठी हेडगेवार एखाद्या वरिष्ठ आणि जास्त अनुभवी व्यक्तीची निवड करतील.

केशव बळीराम हेडगेवार

फोटो स्रोत, rss.org

वरिष्ठ पत्रकार आणि लेखक धीरेंद्र झा म्हणतात, “सुरुवातीला उत्तराधिकारी म्हणून हेडगेवार बालाजी हुद्दार यांच्याकडे पाहत होते. हेडगेवारांनी त्यांना आरएसएसचा सह-कार्यवाह केलं होतं. बालाजी हुद्दार आरएसएसच्या संस्थापकांपैकी एक होते.”

“1936 मध्ये बालाजी शिक्षणासाठी लंडनला गेले होते. तिथे ते कम्युनिस्टांच्या संपर्कात आले. लंडनहून ते स्पेनला गेले आणि तिथे त्यांनी स्पेनच्या यादवी युद्धात भाग घेतला होता.”

झा सांगतात, “1938 मध्ये बालाजी जेव्हा स्पेनहून भारतात परतले, तेव्हा त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली होती. हेडगेवार ब्रिटनचे समर्थक होते, तर बालाजी हुद्दार पूर्णपणे ब्रिटिश साम्राज्यवादाचे विरोधक झाले होते.”

“इथूनच हेडगेवार आणि हुद्दार यांच्यात दरी निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हेडगेवारांनी गोळवलकरांना फक्त आरएसएसचा सह-कार्यवाहच केलं नाही तर, ते गोळवलकरांकडे त्यांचा उत्तराधिकारी म्हणून पाहू लागले.”

‘भारत छोडो’ आंदोलन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

ज्याप्रमाणे हेडगेवारांनी त्यांच्या कॅडरला सविनय कायदेभंग चळवळीपासून (1930) दूर ठेवलं, त्याचप्रमाणे गोळवलकरांनी देखील त्यांच्या लोकांना अशा प्रत्येक कामापासून दूर ठेवलं, ज्यामुळे ब्रिटिश सरकारची नाराजी ओढवली असती.

‘भारत छोडो’ आंदोलनापासून (1942) देखील आरएसएसच्या कार्यकर्ते लांबच राहिले.

सावरकरांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला ‘तुरुंगात जाण्याचा हास्यास्पद कार्यक्रम’ म्हटलं आणि हिंदूंना त्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं.

(ऑल इंडिया हिंदू महासभा, एंड ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया, पान क्रं. 55)

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी ‘गांधी: द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, “एकीकडे जिन्ना मुस्लिमांना काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी न होण्याचं आवाहन करत होते, तर दुसरीकडे सावरकर देखील हिंदूंना या चळवळीत सहभागी न होण्याचं आवाहन करत होते, हे पाहण रंजक होतं.”

पंडित नेहरू आणि महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

धीरेंद्र झा म्हणतात, “आरएसएसची स्थापना ब्रिटिश सरकारच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला अनुसरून होती. या धोरणाचा उद्देश होता हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडणं. हिंदूंना सांगितलं जात होतं की तुमचा मुख्य शत्रू ब्रिटिश सरकार नाही, तर मुस्लीम आहेत.”

“या विचारसरणीतून जेव्हा संघटना उभी राहिली, तेव्हा त्यांनी ब्रिटिश विरोधी भूमिका घेतली नाही. त्यांना वाटत होतं की जर कोणत्याही कारणामुळे इंग्रज नाराज झाले तर त्यांच्या हिंदू एकजुटीच्या ध्येयामध्ये अडथळा येईल.”

या मुद्द्याबाबत वरिष्ठ पत्रकार आणि इंदिरा गांधी सेंटर ऑफ आर्ट्सचे प्रमुख राम बहादूर राय यांचं मात्र वेगळं मत आहे.

ते म्हणतात, “गोळवलकर यांनी भलेही आरएसएसच्या लोकांना ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं नाही, मात्र, त्यांनी कोणाला रोखलं देखील नाही. अशीही उदाहरण आहेत की जेव्हा आरएसएसशी संबंधित लोकांनी मुजफ्फरपूर, सातारा आणि पुण्यात भारत छोडो आंदोलनात भाग घेतला.”

“मला वाटतं की गुरुजी संघटनेला वाचवू पाहत होते, त्यामुळे त्यांनी या आंदोलनात भाग घेतला नाही. दुसरी गोष्ट ते जाहीरपणे बिगरराजकीय व्यक्ती होते.”

गांधीजी आणि गोळवलकरांची भेट

फाळणीपूर्वी आरएसएसला देशाला अनेक भागांपर्यंत पोहोचवण्यात गोळवलकरांना यश आलं होतं.

त्यांना उत्तर भारतातील अलवर आणि भरतपूरसारख्या अनेक संस्थानिकांकडून मदत मिळत होती.

आरएसएसनं अलवरमध्ये अनेक प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं होतं. त्यातील एका शिबिरात स्वत: गोळवलकरांनी भाषण केलं होतं.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 दिवसांपर्यंत दिल्ली शांत होती. मात्र, नंतर तिथे जातीयवादी हिंसाचार पसरू लागला होता.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

8 सप्टेंबर 1947 ला दिल्लीला अशांत क्षेत्र जाहीर करण्यात आलं होतं.

9 सप्टेंबरला गांधीजी दिल्लीत पोहोचले होते. 12 सप्टेंबरला गांधीजी आणि गोळवलकरांची भेट झाली होती.

या भेटीत गांधीजींनी गोळवलकरांना स्पष्ट सांगितलं की, “आरएसएसचे हात रक्तानं माखलेले आहेत.”

गोळवलकर म्हणाले होते की “आरएसएस कोणाचाही शत्रू नाही. मुस्लिमांची हत्या करावी, असं तो म्हणत नाही. त्याचा उद्देश जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत हिंदूंचं संरक्षण करणं हे आहे.”

(कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, पान क्रं. 177)

गांधीजी आणि गोळवलकरांमधील मतभेद

महात्मा गांधी यांचे सचिव राहिलेले प्यारेलाल यांनी ‘महात्मा गांधी, द लास्ट फेज’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात प्यारेलाल लिहितात, “गांधीजींनी गोळवलकरांना सांगितलं की त्यांनी एक वक्तव्य जारी करून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचं खंडन करावं आणि दिल्लीत होत असलेल्या मुस्लिमांच्या हत्यांचा स्पष्ट शब्दांत निषेध करावा. मात्र गोळवलकरांना हा प्रस्ताव मान्य नव्हता.”

“त्यांनी सांगितलं की आम्ही वक्तव्यं देण्याऐवजी गांधीजींनी स्वत: या आशयाचं वक्तव्यं जारी करावं. गांधीजी म्हणाले की ते असं नक्कीच करतील, मात्र जर ते (गोळवलकर) याबद्दल खरोखरंच प्रामाणिक असतील तर त्यांनी हे स्वत: सांगितलं पाहिजे.”, असंही ते लिहितात.

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

चार दिवसांनी 16 सप्टेंबरला गांधीजींनी दिल्लीतील वाल्मिकी मंदिरात आरएसएसच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं.

त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “जर हिंदूंना वाटत असेल की भारतात मुस्लिमांना बरोबरीचं स्थान नाही आणि जर मुस्लिमांना वाटत असेल की पाकिस्तानात हिंदू फक्त शासित लोकांप्रमाणेच राहू शकतात, तर ते हिंदू आणि इस्लाम या दोघांच्या पतनाचं कारण ठरेल.”

उत्तर प्रदेशातील जातीयवादी हिंसाचार आणि गोळवलकर

पश्चिम उत्तर प्रदेशात जातीयवादी हिंसाचार वाढतच चालला होता.

उत्तर प्रदेशचे त्यावेळचे गृह सचिव राजेश्वर दयाल यांनी ‘अ लाईफ ऑफ अवर टाइम’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे.

त्यात राजेश्वर लिहितात, “पश्चिम रेंजचे डीआयजी जेटली माझ्याकडे कुलूप असलेल्या दोन मोठ्या ट्रंका घेऊन आले. जेव्हा त्या ट्रंका उघडल्या तेव्हा त्यात उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात जातीयवादी दंगल घडवण्याची पूर्ण ब्ल्यू प्रिंट होती. मी हे सर्व पुरावे घेऊन लगेचच प्रीमीयर गोविंद वल्लभ पंत यांच्या घरी गेलो.”

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पुढं ते लिहितात, “मी आणि जेटली दोघांनी या सर्व गोष्टींच्या मागे असलेल्या गोळवलकरांच्या अटकेचा आग्रह धरला. ते अजूनही याच भागात होते. मात्र पंतांनी गोळवलकरांना लगेच अटक करण्याऐवजी सर्व प्रकरण मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत ठेवण्याचा निर्णय घेतला.”

दयाल लिहितात, “गोळवलकरांना या गोष्टीचा सुगावा लागला आणि ते या भागातून लगेचच निघून गेले.”

अनेक वर्षांनी गांधी हत्येच्या कटाचा तपास करणाऱ्या कपूर आयोगासमोर जेटली यांनी राजेश्वर दयालांच्या दाव्यांना दुजोरा दिला.

दयालांनी सांगितलं की राजेश्वर आणि ते पंतांना भेटले होते. (कपूर आयोगाचा अहवाल, पान क्रं. 62)

गांधी हत्येवर गोळवलकरांची प्रतिक्रिया

30 जानेवारी 1948 ला नथूराम गोडसेनं महात्मा गांधीजींची हत्या केली.

त्यावेळेस गोळवलकर मद्रासमध्ये (आताचं चेन्नई) होते. त्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून नेहरू, पटेल आणि गांधीजींच्या मुलाला तारेद्वारे शोकसंदेश पाठवला.

त्यानंतर त्यांनी आरएसएसच्या सर्व शाखांना आदेश दिला की, “आदरणीय महात्माजींच्या दु:खद निधनामुळे सर्व शाखांमध्ये 13 दिवस शोक पाळला जाईल आणि सर्व दैनंदिन कार्यक्रम स्थगित केले जातील.”

(श्रीगुरुजी समग्र, खंड-10, पेज क्रं.5)

दुसऱ्याच दिवशी ते नागपूरला रवाना झाले. मुंबईत जवळपास एक हजार लोकांनी सावरकरांच्या घरावर हल्ला चढवला.

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

संपूर्ण देशभरात आरएसएस आणि हिंदू महासभेच्या कार्यालयांवर जमाव हल्ला करू लागला.

तपासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी हत्याकांडात आरोपी करण्यात आलं. नंतर पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्यात आली.

एक फेब्रुवारीला गोळवलकरांनी एक वक्तव्यं जारी केलं, “मला आशा आहे की या संकटसमयी लोक संयम बाळगतील आणि प्रेम, सेवा भावानं वागतील. मी आमच्या सर्व स्वयंसेवकांना आदेश देतो की गैरसमजातून उद्भवलेल्या कोणत्याही चिथावणीखोर कृतीसंदर्भात देखील त्यांनी लोकांशी प्रेमानं वागावं. मी दिवंगत आत्म्याला प्रणाम करतो.”

(द जनसंघ, द बायोग्राफी ऑफ अॅन इंडियन पॉलिटिकल पार्टी, पान क्रं. 43)

संघावर बंदी

यानंतर थोड्याच दिवसांनी गोळवलकरांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना जेव्हा अटक केली जात होती, तेव्हा जवळपास एक हजार लोक आरएसएसच्या मुख्यालयाबाहेर जमा झाले होते.

सरदार पटेल यांनी 4 फेब्रुवारी 1948 ला आरएसएसवर बंदी घातली.

6 ऑगस्ट 1948 पर्यंत गोळवलकर तुरुंगात होते. ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, त्यांना नागपूरच्या सीमेतच राहण्यास सांगण्यात आलं.

आरएसएसवरील बंदी हटवण्यासंदर्भात त्यांनी सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांना अनेक पत्रं लिहिली.

सरदार पटेल यांनी 11 सप्टेंबर 1948 ला गोळवलकरांना पाठवलेल्या उत्तरात लिहिलं, “संघानं हिंदू समाजाची सेवा केली आहे. मात्र आरएसएस सूडाच्या भावनेनं मुस्लिमांवर हल्ले करतं, या गोष्टीवर आक्षेप आहे. तुमच्या प्रत्येक भाषणात जातीयवादाचं विष भरलेलं असतं.”

“त्याचा परिणाम असा झाला की देशाला गांधीजींचं बलिदान द्यावं लागलं. गांधीजींच्या हत्येनंतर आरएसएसच्या लोकांनी आनंद साजरा केला आणि मिठाई वाटली. अशा परिस्थितीत आरएसएसवर बंदी घालणं सरकारसाठी आवश्यक झालं होतं,” असंही पुढं त्यांनी लिहिलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान गोळवलकरांना पुन्हा एकदा अटक करून आधी नागपूर आणि नंतर सिवनी तुरुंगात नेण्यात आलं.

शेवटी 12 जुलै 1949 ला आरएसएसवरील बंदी हटवण्यात आली आणि गोळवलकरांची सुटका करण्यात आली.

15 डिसेंबर 1950 ला सरदार पटेलांचं निधन झालं तेव्हा गोळवलकर नागपूरमध्ये होते.

मध्य प्रांताचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल, सरदार पटेलांच्या अंत्ययात्रेत जाण्यासाठी विमानानं मुंबईला जात आहेत हे कळल्यावर गोळवलकरांनी त्यांना विमानात एक सीट देण्याची विनंती केली.

शुक्ल यासाठी तयार झाले. गोळवलकरांनी मुंबईत सरदार पटेलांना श्रद्धांजली वाहिली.

(द नेहरू एपॉक, फ्रॉम डेमोक्रसी टू मोनोक्रसी, पान क्रं. 194)

1963 ची प्रजासत्ताक दिनाची परेड

1962 ला चीननं भारतावर आक्रमण केलं. त्यावेळेस गोळवलकरांनी चिनी हल्लेखोरांना बाहेर काढण्यासाठी सरकारला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव नेहरूंना दिला होता.

गोळवलकरांच्या या मोहिमेत त्यांच्या निशाण्यावर भारतीय कम्युनिस्टदेखील होते. ते कम्युनिस्टांना चीनच्या कम्युनिस्ट सरकारचे ‘एजंट’ म्हणायचे.

चीनबरोबरच्या युद्धात पराभव झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयानं 1963 च्या प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याचं ठरवलं होतं. मात्र, नेहरूंनी त्याला विरोध करत सैन्य परेडऐवजी ‘नागरिक परेड’ करण्याची सूचना केली.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

या परेडसाठी दिल्लीचे महापौर नूरुद्दीन अहमद यांना इन्चार्ज करण्यात आलं. त्यांनी समाजातील सर्व वर्गातील लोकांना परेडमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं.

इतर कामगार संघटनांप्रमाणेच आरएसएसशी संबंधित भारतीय मजदूर संघालादेखील परेडमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात आलं. (सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू, पान क्रं. 396)

धीरेंद्र झा लिहितात, “या परेडमध्ये खासदारांनीदेखील भाग घेतला होता, त्याचं नेतृत्व नेहरू आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी करत होते, या दृष्टीनं ही परेड वेगळी होती.”

“या परेडमध्ये आरएसएसचे दोन हजार स्वयंसेवकांनी त्यांच्या गणवेषात दिल्लीतील इतर नागरिकांबरोबर संचलन केलं. त्यांच्या हातात कोणताही बॅनर किंवा झेंडा नव्हता.”

शास्त्रीजींनी गोळवलकरांना दिल्लीत बोलावलं

1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं, त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजींनी सर्व पक्षीय बैठकीत इतर विरोधी पक्षांबरोबर गोळवलकरांनीदेखील आमंत्रण दिलं.

या बैठकीत भाग घेण्यासाठी गोळवलकर सांगलीतून दिल्लीला गेले.

दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वयंसेवकांना आवाहन करत सांगितलं की त्यांनी सरकारला शक्य ते सर्व सहकार्य करावं.

लाल बहादूर शास्त्री

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातच्या भागांचा दौरा केला. त्यांनी तिथे दिलेल्या भाषणांचं आकाशवाणीच्या बडोदा केंद्रानं प्रसारण केलं.

त्यानंतर गोळवलकर पंजाबात गेले, तिथे त्यांनी अंबाला छावणीमध्ये सैनिकांसमोर भाषण केलं.

(द इनकम्पेरेबल गुरु गोळवलकर, पान क्रं. 274)

‘हिंदूंपेक्षा वेगळे आहेत मुस्लीम’

जे. ए. करेन यांनी ‘मिलिटंट हिंदूइझम इन इंडियन पॉलिटिक्स’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, गोळवलकरांचं ‘वी आर अवर नेशनहुड डिफाइंड’ हे पुस्तक त्यांचे विचार समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

ते लिहितात, “या पुस्तकाला आरएसएसचं बायबल म्हटलं जाऊ शकतं.”

या पुस्तकातून संघाच्या राष्ट्रवादाचा सिद्धांत आणि राष्ट्रात अल्पसंख्यांकांना काय स्थान असून शकतं, याची झलक दिसते.

गोळवलकर लिहितात, ‘मुस्लीम आमच्यापेक्षा वेगळे आहेत. इस्लामचा जन्म हिंदुस्तानात झालेला नाही. सावरकरांच्या पुण्यभूमीच्या सिद्धांताला गोळवलकर मानायचे.’

सावरकरांनी लिहिलं आहे, “भारत मुस्लिमांची पुण्यभूमी नाही. कारण त्यांची श्रद्धास्थळं मक्का-मदिना आहेत. त्यामुळे भारताबद्दलची त्यांची निष्ठा संशयास्पद आहे.”

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत

फोटो स्रोत, Getty Images

धीरेंद्र झा म्हणतात, “गोळवलकरांच्या विचारसरणीचा ब्ल्यू प्रिंट ‘वी आर अवर नेशनहुड डिफाईन्ड’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे. यात ते अशी राजकीय परिस्थिती बनवण्याचा मुद्दा मांडतात, ज्यात मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचा विचार आहे.”

ते म्हणतात, “नंतरच्या काळात गोळवलकरांनी देखील स्वत:ला, त्यांच्याच ‘वी आर अवर नेशनहुड डिफाईन्ड’ पासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला.”

“मला इथे या गोष्टीवर भर द्यायचा आहे की जोपर्यंत आरएसएसचं समर्थन करणारे लेखक हे असत्य पसरवण्याचा प्रयत्न करतात की ‘वी आर अवर नेशनहुड डिफाईन्ड’ हे आमच्या विचारसरणीचं ब्ल्यू प्रिंट नाही, तोपर्यंत ठीक आहे. मात्र, जेव्हा संशोधक आणि इतर लेखक देखील असंच म्हणू लागतात, तेव्हा या गोष्टीला मान्यता मिळू लागते.”

गोळवलकरांच्या विचारांचं संकलन असलेल्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात एक सर्वाधिक वादग्रस्त मुद्दा होता. त्यात त्यांनी ख्रिश्चन, मुस्लीम आणि कम्युनिस्टांना ‘देशाचे अंतर्गत शत्रू’ म्हटलं होतं.

सप्टेंबर 2018 मध्ये ‘बंच ऑफ थॉट्स’ मधून तो भाग काढून टाकण्यात आला.

पुस्तकातून हा भाग काढून टाकण्याबद्दल आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “तो परिस्थितीमुळे मांडलेला मुद्दा होता, ते शाश्वत सत्य नव्हतं. आरएसएस एक बंदिस्त संघटना नाही. काळ जसा बदलतो, तशी आमची विचारसरणी बदलते.”

एम एस गोळवलकर

फोटो स्रोत, www.golwalkarguruji.org

गोळवलकरांच्या विचारांबद्दल खूप चर्चा होते. मात्र, हे सत्य आहे की गोळवलकरांनी आरएसएसचा विस्तार सर्व देशभरात केला. ते आरएसएसचे सर्वात प्रदीर्घ काळ म्हणजे 33 वर्षे सरसंघचालक होते.

क्रिस्तोफर जेफ्रेलॉट यांनी ‘हिंदू नॅशनलिस्ट मूव्हमेंट अँड इंडियन पॉलिटिक्स’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, “गोळवलकरांना राजा बनण्यापेक्षा राजा बनवण्यात जास्त रस होता.”

राम बहादूर राय यांना वाटतं की गोळवलकरांनी आरएसएसचं विघटन होण्यापासून वाचवलं.

गांधी हत्येनंतर तयार झालेल्या वातावरणात देखील देशातील राजकारणात त्यांनी आरएसएसला प्रासंगिक ठेवलं.

धीरेंद्र झा लिहितात, “त्यांच्या मृत्यूनंतर हिंदुत्वाच्या राजकारणात त्यांना जवळपास दैवताचं स्थान मिळालं आहे. त्यांचे अनेक शिष्य अनेक राज्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन जण, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC