Home LATEST NEWS ताजी बातमी इंजेक्शनची सुई पुन्हा पुन्हा वापरल्यानं शेकडो मुलांना HIV चा संसर्ग; BBC च्या...

इंजेक्शनची सुई पुन्हा पुन्हा वापरल्यानं शेकडो मुलांना HIV चा संसर्ग; BBC च्या गुप्त चित्रीकरणातून भीषण सत्य उघड

15
0

Source :- BBC INDIA NEWS

अस्माची आई सुघ्राला एचआयव्हीचा संसर्ग झाला नव्हता, मात्र अस्मा (10 वर्षे) ला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं निदान झालं

(इशारा: या लेखातील काही तपशील वाचकांना विचलित करू शकतात)

मोहम्मद अमिनचा वयाच्या 8 व्या वर्षी मृत्यू झाला. HIV चा संसर्ग झाल्याचं निदान झाल्यानंतर काही दिवसांमध्येच त्याचा मृत्यू झाला होता.

त्याला तीव्र स्वरुपाचा ताप यायचा. इतका की तो चक्क पावसात झोपण्याचा हट्ट करायचा.

“त्याला जणू काही उकळत्या तेलात फेकण्यात आलं असावं, अशा वेदना होत होत्या. इतक्या वेदनेनं तो तडफडायचा,” असं त्याच्या आई सुघ्रा म्हणाल्या.

“तो माझ्याशी भांडायचा, मात्र तो माझ्यावर प्रेमदेखील करायचा,” असं 10 वर्षांची अस्मा तिच्या छोट्या भावाच्या कबरीशेजारी गुडघ्यावर बसून म्हणाली.

मोहम्मदला HIV चा संसर्ग झाल्यानंतर काही कालावधीतच अस्मालादेखील HIV चा संसर्ग झाल्याचं निदान झालं. त्यांच्या कुटुंबाला वाटतं की या दोन्ही मुलांना HIV चा संसर्ग इंजेक्शनमधून झाला होता.

THQ तौन्सा हॉस्पिटल बनलं HIV संसर्गाचं केंद्र

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील तौन्सामधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये नियमित उपचार घेत असताना या दोन्ही मुलांना इंजेक्शन देताना दूषित सुयांचा (सीरिंज किंवा नीडल्स) वापर झाला होता. त्यातूनच त्यांना HIV ची बाधा झाली असावी, असं या कुटुंबाला वाटतं.

या शहरात, नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान HIV संसर्गाचं निदान झाल्याची BBC आयनं ओळख पटवलेल्या 331 मुलांपैकी ही 2 मुलं आहेत.

एका खासगी क्लिनिकमधील डॉक्टरनं 2024 च्या अखेरीस, एचआयव्हीच्या या उद्रेकाचा संबंध THQ तौन्सा नावानं ओळखल्या जाणाऱ्या हॉस्पिटलशी जोडला होता.

त्यानंतर स्थानिक प्रशासनानं ‘मोठी कारवाई’ करण्याचं आश्वासन दिलं आणि मार्च 2025 मध्ये हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांना निलंबित केलं. मात्र बीबीसी आयनं केलेल्या तपासातून आता हे उघड झालं आहे की ती एचआयव्ही संसर्ग असलेली इंजेक्शन वापरण्याची धोकादायक पद्धत त्यानंतर अनेक महिन्यांनी देखील सुरूच होती.

THQ तौन्सामध्ये 2025 च्या अखेरीस 32 तास गुप्तपणे चित्रीकरण करण्यादरम्यान आम्ही 10 वेगवेगळ्या प्रसंगी औषधांच्या मल्टी-डोस व्हायल्स किंवा कुपींसाठी सीरिंज किंवा सुईचा पुनर्वापर होताना पाहिलं. त्यामुळे आतील औषध दूषित होण्याची शक्यता होती.

यापैकी 4 प्रकरणांमध्ये, एकाच कुपींमधील औषध दुसऱ्या मुलाला दिलं गेल्याचं आम्ही पाहिलं. त्यातील कोणताही मुलगा एचआयव्ही बाधित होता की नाही हे आम्हाला माहिती नाही. मात्र अशाप्रकारच्या पद्धतीमुळे विषाणूचा संसर्ग होण्याचा स्पष्ट धोका निर्माण होतो.

डॉ. गुल कैसरानी एका स्थानिक खासगी क्लिनिकमधील डॉक्टर असून 2024 च्या उत्तरार्धात त्यांनी धोक्याचा इशारा दिला होता

सुईचा पुन्हा वापर, इंजेक्शन देण्याची चुकीची पद्धत

डॉ. अल्ताफ अहमद सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (कन्सल्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट) आणि पाकिस्तानातील आघाडीच्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञांपैकी एक आहेत.

“जरी त्यांनी इंजेक्शनला नवीन सीरिंज किंवा सुई लावली असली तरीदेखील इंजेक्शनचा मागचा भाग ज्याला सीरिंज बॉडी म्हटलं जातं, त्यामध्ये विषाणू असतो. त्यामुळे जरी नवीन सुई वापरली तरीदेखील त्यातून त्या विषाणूचा प्रसार होतो,” असं डॉ. अल्ताफ अहमद, आम्ही गुप्तपणे केलेलं चित्रीकरण पाहिल्यानंतर म्हणाले.

चांदियो म्हणतात की एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णाबद्दल समजताच त्यांनी 'आवश्यक ती पावलं उचलली'

हॉस्पिटलच्या भिंतींवर सुरक्षित इंजेक्शन पद्धती दर्शविणारे फलक होते. मात्र असं असूनही आम्ही डॉक्टरांसह हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना स्टराईल ग्लोव्हज म्हणजे निर्जंतुकीकरण केलेले ग्लोव्हज न घालता 66 वेळा रुग्णांना इंजेक्शन देताना चित्रित केलं.

आमच्या चित्रीकरणामुळे पाकिस्तानतील संसर्ग नियंत्रण करण्यासाठीच्या प्रशिक्षणातील व्यापक स्वरुपातील कच्चे दुवे समोर आल्याचं, एका वेगळ्या तज्ज्ञानं आम्हाला सांगितलं.

आम्ही एका नर्सला स्टराईल किंवा निर्जंतुकीकरण केलेले हातमोजे न घालता वैद्यकीय गोष्टींसाठीच्या कचरापेटीत काहीतरी धुंडाळताना किंवा शोधताना देखील पाहिलं.

“ती औषधाचं इंजेक्शन देण्याच्या प्रत्येक तत्वाचं उल्लंघन करते आहे,” असं अहमद म्हणाले.

खासगी क्लिनिकमधील डॉक्टरच्या लक्षात आला प्रकार

डॉ. कासिम बुझदार हॉस्पिटलचे नवीन वैद्यकीय अधीक्षक आहेत. आम्ही जेव्हा आमचं फुटेज त्यांना दाखवलं, तेव्हा त्यांनी हे फुटेज अस्सल असल्याचं मानण्यास नकार दिला. त्यांना दावा केला की त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीचं हे फुटेज असू शकतं किंवा “हे फुटेज बनावट किंवा मुद्दाम तयार करण्यात आलेलं असू शकतं.” तसंच त्यांनी हे हॉस्पिटल मुलांसाठी सुरक्षित असल्याचंही ठामपणे म्हटलं.

डॉ. गुल कैसरानी हे एका स्थानिक खासजी क्लिनिकमधील डॉक्टर आहेत. एचआयव्हीची बाधा झालेल्यांच्या संख्येत उद्रेक झाल्याचं 2024 च्या उत्तरार्धात पहिल्यांदा त्यांच्याच लक्षात आलं होतं. त्यांच्या दवाखान्यात उपचारांसाठी येणाऱ्या एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या मुलांच्या संख्येत वाढ झाल्याचं त्यांना आढळलं होतं.

त्यांनी एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं निदान केलेल्या 65 ते 70 मुलांपैकी जवळपास सर्वच मुलांवर टीएचक्यू तौन्सामध्ये उपचार करण्यात आले होते, असं ते म्हणाले.

सीरिंज आणि औषधाच्या उघड्या बाटल्यांसोबत टाकून दिलेल्या सुया बीबीसीच्या फुटेजमध्ये दिसत आहेत

डॉ. गुल कैसरानी यांच्याकडे आलेल्या एका महिलेनं त्यांना एक धक्कादायक प्रकार सांगितला होता. त्या महिलेच्या मुलीला इंजेक्शन देण्यात आलं होतं. मात्र त्याआधी तीच सीरिंज किंवा सुई त्या मुलीच्या एचआयव्ही बाधित चुलत भावंडासाठी वापरण्यात आली होती. त्यानंतर ती सीरिंज इतर अनेक मुलांना इंजेक्शन देतानादेखील वापरण्यात आली.

कैसरानी यांनी आणखी एक उदाहरण दिलं. एका पित्यानं त्यांना सांगितलं की त्यांनी टीएचक्यू तौन्सा हॉस्पिटलमध्ये सीरिंजचा पुनर्वापर होत असण्याच्या प्रकाराला विरोध केला होता. मात्र तिथल्या नर्सनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

बीबीसी आयनं, पंजाब प्रांतीय एड्स तपासणी कार्यक्रम (पंजाब प्रोव्हिन्स एड्स स्क्रीनिंग प्रोग्रॅम), खासगी दवाखाने आणि पोलिसांकडून लीक झालेली माहिती, यामधील आकडेवारी एकत्रित केली.

पालकांना HIV नाही, मात्र मुलं HIV बाधित

या माहिती आणि आकडेवारीद्वारे बीबीसी आयनं नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान तौन्सा शहरात एचआयव्ही चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या म्हणजे HIV चा संसर्ग झाल्याचं निदान झालेल्या 331 मुलांची ओळख पटवली आहे.

HIV चा संसर्ग झालेल्या 97 मुलांपैकी, ज्यांच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली होती, फक्त 4 मुलांच्या माता HIV पॉझिटिव्ह ठरल्या. म्हणजे या 4 मुलांच्या मातांना HIV चा संसर्ग झाला होता. यातून असं दिसून येतं की, फार थोड्या मुलांना आईकडून HIV चा संसर्ग (मदर टू चाईल्ड ट्रान्समिशन) झाला होता.

सुघ्रा या मोहम्मद अमिन आणि अस्माच्या आई आहेत. त्यांची HIV ची चाचणी निगेटिव्ह आली होती. म्हणजे त्यांना संसर्ग झालेला नव्हता. सुघ्रा यांच्या पतीचा 2 वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.

आमच्या गुप्त चित्रीकरणात दिसतं आहे की एक नर्स वैद्यकीय कचरापेटी उघड्या हातांनी धुंडाळते आहे

प्रांतीय एड्स तपासणी कार्यक्रमाच्या (प्रोव्हिन्शियल एड्स स्क्रीनिंग प्रोग्रॅम) आकडेवारीमध्ये, या 331 प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणांमध्ये संसर्ग पसरण्याचं माध्यम ‘दूषित सीरिंज’ किंवा ‘सुई’ असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यात अस्माचाही समावेश आहे. तर उर्वरित मुलांच्या बाबतीत संसर्ग नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, ते नमूद करण्यात आलेलं नाही.

निलंबित अधीक्षक तीनच महिन्यात पुन्हा कार्यरत

पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारनं मार्च 2025 मध्ये यात हस्तक्षेप केला. त्यावेळेस त्यांनी एचआयव्ही बाधितांची संख्या 106 असल्याचं सांगितलं होतं. THQ तौन्सा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तय्यब फारूख चांदियो यांना यासंदर्भात निलंबित करण्यात आलं होतं.

मात्र बीबीसी आयच्या तपासातून समोर आलं आहे की फक्त 3 महिन्यातच डॉ. तय्यब पुन्हा मुलांवर उपचार करत होते. तौन्साच्या उपनगरात असणाऱ्या एका ग्रामीण आरोग्य केंद्रात ‘वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी’ म्हणून ते पुन्हा कार्यरत होते.

त्यांनी बीबीसी आयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की टीएचक्यू तौन्सा हॉस्पिटलमध्ये HIV बाधित रुग्ण आढळल्याचं समजताच त्यांनी ‘तात्काळ’ पावलं उचलली.

मात्र, HIV संसर्गाच्या उद्रेकासाठी ते हॉस्पिटल कारणीभूत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

ज्या कर्मचाऱ्यांनी ग्लोव्ह्ज घातले नव्हते आणि रुग्णांना कपड्यांच्या वरूनच इंजेक्शन देत होते, अशांचं आम्ही चित्रीकरण केलं

डॉ. तय्यब फारूख चांदियो यांच्या जागी तिथे बुझदार यांची नियुक्ती झाली. बुझदार यांनी बीबीसीला सांगितलं की मार्च 2025 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, एचआयव्ही संसर्गावर त्यांनी ‘मुख्य लक्ष’ केंद्रित केलं होतं. तसंच असुरक्षितरित्या इंजेक्शन देण्याबाबत त्यांचं ‘झीरो टॉलरन्स’ म्हणजे ‘कोणतीही तडजोड न करण्याचं’ धोरण होतं.

“एचआयव्हीच्या संसर्गाचा प्रसार कसा रोखायचा आणि त्यावर मात कशी करायची, यासाठी आम्ही पॅरामेडिक्स (सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी) आणि स्टाफमधील नर्ससाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. संसर्ग प्रतिबंध नियंत्रण विभाग, हा त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यासाठी त्यांना योग्यप्रकारे प्रशिक्षण देण्यात आलं आहे,” असं ते म्हणाले.

प्रकरण समोर येऊनही असुरक्षित पद्धतींचाच वापर

मात्र बीबीसीला मिळालेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होतं की 8 महिन्यांनंतरदेखील असुरक्षित पद्धतींचा वापर सुरूच होता.

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मधील आमच्या चित्रीकरणात, जे अनेक आठवडे चित्रित करण्यात आलं होतं, वापरलेल्या सुयांच्या बाजूलाच, सुया (सीरिंज) आणि छोट्या कुप्या (व्हायल्स) वारंवार उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. या सुया, कुप्या ठेवण्याची जागा वास्तविक निर्जंतूक ठेवायला हवी होती.

टीएचक्यू तौन्सा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या बहुतांश मुलांना कॅन्युलाद्वारे – शिरेमध्ये घातलेल्या ट्यूबद्वारे – इंजेक्शन दिलं जात असल्याचं आम्हाला आढळलं. यामुळे संसर्ग होण्याचा धोका आणखी वाढतो. रक्तप्रवाहात थेटपणे औषध दिल्यामुळे, दूषित औषध शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक व्यवस्था टाळू शकतं.

मिकाशा (2 वर्षे) कराचीतील अशा मुलांपैकी एक आहे, ज्यांच्या पालकांची एचआयव्ही चाचणी नेगेटिव्ह आली आहे, मात्र या मुलांना एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे

आम्ही एका नर्सचंदेखील चित्रीकरण केलं. ही नर्स काउंटरखालून वापरलेली सुई बाहेर काढत होती. ज्यात त्याच्या आधीच्या रुग्णासाठीचं द्रव किंवा औषध अजूनही शिल्लक होतं. ती सीरिंज टाकून देण्याऐवजी त्या नर्सनं त्या सीरिंजचा पुन्हा वापर करण्यासाठी तिच्या एका सहकाऱ्याला दिली.

आम्ही गुप्तपणे केलेलं चित्रीकरण जेव्हा बुझदार यांना दाखवलं, तेव्हा त्यांनी हे चित्रीकरण त्यांच्या कार्यकाळापूर्वीचं होतं किंवा बनावट होतं असं ठामपणे म्हटलं.

हे फुटेज पाहत असलेल्या स्थानिक पालकांना तुम्ही काय सांगाल, असं विचारल्यावर ते म्हणाले की, “मी त्यांना पूर्ण खात्रीनं आणि आत्मविश्वासानं सांगू शकतो की तुम्ही टीएचक्यू तौन्सा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले पाहिजेत.”

बालरोग विभागातील चिंताजनक स्थिती

स्थानिक प्रशासनानं यासंदर्भात दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की ‘टीएचक्यू तौन्सा हॉस्पिटल हे एचआयव्हीच्या संसर्गाच्या उद्रेकाचा स्त्रोत असल्याचं निश्चितपणे सिद्ध करणारा’ कोणताही ‘वैध साथीच्या रोगशास्त्राशी निगडीत पुरावा’ (एपिडेमिओलॉजिकल एव्हिडन्स) नाही.

त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की मुलांसाठी काम करणारी युनिसेफ (संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि प्रादेशिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त तपासातून, ‘अनियंत्रित खासगी वैद्यकीय सेवांची भूमिका’ आणि ‘तपासणी न केलेल्या रक्तसंक्रमणाचा (बाहेरून दिलेलं रक्त किंवा रक्तातील घटक) वाटा’ ही या समस्येमागची मुख्य कारणं असल्याचं समोर आलं आहे.

शहरातील एचआयव्ही संसर्गाबाबतचा संयुक्त पथकाचा एप्रिल 2025 मधील पाहणी अहवाल, बीबीसी आयला गोपनीयरित्या मिळाला आहे. टीएचक्यू तौन्सा हॉस्पिटलबाबत आमच्या तपासातून समोर आलेले मुद्देच या अहवालातूनदेखील समोर आले आहेत.

एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या अस्मासारख्या मुलांसाठी एचआयव्हीबद्दलच्या सामाजिक कलंकामुळे आयुष्य जगणं कठीण होऊ शकतं

“विशेषकरून, बालरोग आपत्कालीन कक्षातील चिंताजनक होती,” असं या अहवालात म्हटलं आहे. बीबीसीनं ज्या वेगवेगळ्या विभागांचं चित्रीकरण केलं होतं, त्यापैकी हा एक विभाग आहे.

त्या पुढे म्हटलं होतं, “बालरोगांसाठी आवश्यक असलेली औषधं तिथं उपलब्ध नव्हती. तसंच इंजेक्शन देण्याच्या असुरक्षित पद्धती सर्रास वापरल्या जात होत्या. शिरेद्वारे दिले जाणारे (इंट्राव्हेनिस) द्रवपदार्थ, औषधं पुन्हा वापरली जात होती.”

“कॅन्युलांना लेबल लावण्यात आलेलं नव्हतं. इंट्राव्हेनस द्रवपदार्थ किंवा औषधं तशीच स्टँडवर लटकत ठेवण्यात आलेली होती. हातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जात होतं. विभागातील बेसिन तुंबलेली होती. तिथे कोणतेही सॅनिटायर्स उपलब्ध नव्हते.”

पाकिस्तानातील वैद्यकीय सेवांमधील उणीवा समोर

डॉ. फातिमा मीर, कराचीमधील आगा खान विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये बालरोगशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.

बीबीसीच्या फुटेजमधून पाकिस्तानातील संसर्ग नियंत्रणाबाबतच्या प्रशिक्षणातील उणीवा किंवा कच्चे दुवे समोर आले आहेत, असं त्या म्हणतात.

“आम्ही इथल्या इंजेक्शन देणाऱ्यांना इशारा दिला पाहिजे की तुम्ही रोगाचा प्रसार करण्याचं एक सक्रिय साधन बनला आहात,” असं त्या म्हणाल्या.

आमच्या तपासातून असं दिसून येतं की, काही प्रमाणात इंजेक्शन देण्याच्या असुरक्षित व्यवस्थागत दबावांमुळे आहेत. यात उपचारांसाठी इंजेक्शनवर अवलंबून राहणं आणि त्याला असलेली सांस्कृतिक पसंती या मुद्द्यांचा समावेश आहे.

जगात उपचारांसाठी इंजेक्शनचा दिलं जाण्याचा सर्वाधिक दर असणाऱ्या देशांपैकी पाकिस्तान एक आहे. त्यापैकी अनेक इंजेक्शनं वैद्यकीयदृष्ट्या अनावश्यक असतात. सर्वासामान्य लोक स्वत:साठी आणि त्यांच्या मुलांसाठीदेखील इंजेक्शन देण्याची मागणी डॉक्टरकडे करतात. डॉक्टर्सदेखील ती आनंदानं पूर्ण करतात, असं मीर म्हणतात.

“इंजेक्शन देण्यासाठीची मर्यादा त्यांनी खूप वरच्या पातळीची ठेवली पाहिजे. म्हणजेच फक्त जीवघेण्या आजारांसाठीच इंजेक्शन दिलं पाहिजे. सौम्य किंवा मध्यम स्वरुपाच्या आजारांसाठी इंजेक्शन न देता, तोंडावाटे घ्यायची औषधं दिली पाहिजेत,” असं मीर म्हणाल्या.

वैद्यकीय संसाधनांचा तुटवडा

औषधं आणि वैद्यकीय साहित्याच्या तुटवड्यामुळेदेखील याप्रकारच्या असुरक्षित पद्धतींना चालना मिळते. इंजेक्शनला असलेल्या मागणीमुळे संसाधनांवर ताण येऊ शकतो. या संसाधनांचं सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या अधीक्षकांच्या देखरेखीखाली कोटा पद्धतीनं वाटप केलं जातं.

“या संसाधनांची एक निश्चित संख्या असते. ती संपूर्ण महिनाभर पुरवावीच लागतील असं त्यांना सांगितलं जातं. अशाप्रकारे औषधं आणि इतर वैद्यकीय साहित्यावरील खर्चात कपात करणं कुठे धोकादायक ठरू शकतो आणि यासाठीचा पैसा कुठे खर्च करायला हवं हे त्यांच्या लक्षात येतं आहे का?” असं त्या म्हणाल्या.

गुप्तपणे चित्रीकरण करत असताना आम्हाला आढळलं की हॉस्पिटलमधील वॉर्ड्समध्ये औषधं आणि वैद्यकीय साहित्याचा अनेकदा अभाव असायचा. तसंच ज्या रुग्णांना द्वव स्वरुपातील पॅरासिटामॉल औषध आणणं परवडत असे, त्यांना ते स्वत:च आणायला सांगितलं जात असे.

“आम्हाला अगदी छोट्या संख्येतील औषधाची नोंद ठेवावी लागते आणि त्यांना हिशोब द्यावा लागतो,” असं एक नर्स म्हणाली.

सिंध प्रांतातील एचआयव्हीचा उद्रेक

पाकिस्तानात इतरत्र यापूर्वी झालेल्या संसर्गांच्या उद्रेकांच्या वेळेस ज्याप्रकारची कार्यप्रणाली वापरली गेली होती. अगदी तशाच प्रकारची कार्यप्रणाली, वैद्यकीय उपचार पद्धती टीएचक्यू तौन्सा हॉस्पिटलमध्ये नोंदवण्यात आली आहे.

सिंध प्रांतातील ‘रतोदेरो’ शहरात 2019 मध्ये, शेकडो मुलांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. त्यातील बहुतांश मुलांच्या एचआयव्ही चाचणी मात्र नेगेटीव्ह आली. म्हणजे पालकांना एचआयव्हीचा संसर्ग झाला नव्हता.

स्थानिक बालरोगतज्ज्ञ डॉ. इम्रान अर्बानी यांनी बीबीसीला सांगितलं की त्या मुलांची वैद्यकीय पार्श्वभूमी पाहिली असता, ती वारंवार दवाखान्यात जात होती. त्यांनी अनेकदा इंजेक्शन घेतले होते. “त्यामुळे यातीलच एखाद्या वैद्यकीय केंद्रात उपचार घेताना त्यांना हा संसर्ग झाला असावा.”

एचआयव्ही-बाधित स्थानिक मुलांची संख्या 2021 पर्यंत वाढून 1,500 वर पोहोचली होती. अगदी, आजही संसर्ग झाल्याची नवीन प्रकरणं समोर येतच आहेत.

आम्ही तौन्सामध्ये चित्रीकरण करत असताना कराचीमध्ये एचआयव्ही संसर्गग्रस्तांचा एक समूह असल्याचं वृत्त आलं. साईट टाऊन एरियामधील कुलसूम बाई वालिका हॉस्पिटल या स्थानिक सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं निदान झालं.

या मुलांमध्ये 2 वर्षांच्या ‘मिकाशा’चा समावेश होता.

एका कुटुंबीयानं सांगितलं की हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी एकच सुई अनेक मुलांसाठी वापरली. “त्यांनी त्याच सीरिंजमध्ये औषध भरलं आणि ती एक मुलासाठी वापरली. मग त्यांनी ती पुन्हा भरली आणि दुसऱ्या मुलाला इंजेक्शन दिलं,” असं त्यांनी बीबीसी आयला सांगितलं.

त्या हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुमताज शेख यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “शिक्षित आणि योग्य प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर्स कधीही सीरिंजचा वापर पुन्हा करणार” नाहीत. “त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडण्याची शक्यताच नाही, असं आम्हाला वाटतं.”

मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सार्वजनिकरित्या दुजोरा दिला आहे की हॉस्पिटलमध्ये दूषित सीरिंजचा पुन्हा वापर केल्यामुळेच 84 जणांना संसर्ग झाला.

आम्ही आमच्या तपासातून समोर आलेले निष्कर्ष जेव्हा राष्ट्रीय सरकारसमोर ठेवले, तेव्हा त्यांच्या एका प्रवक्यानं सांगितलं की “निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीचा तपास करण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी, त्यांच्या अधिकार कक्षेनुसार त्यांनी तातडीनं पावलं उचलली आहेत.” तसंच मार्च 2025 मध्ये हॉस्पिटल किंवा आरोग्य केंद्रांना यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वं पाठवण्यात आली आहेत.

काहीही दोष नसताना आयुष्य उदध्वस्त झालेली अस्मा

तर तौन्सामध्ये अस्माच्या कुटुंबानं सांगितलं की तिचं वजन घटतं आहे. तिला जो संसर्ग कधीच व्हायला नको होतो, त्याच्या विषाणूवर आता आयुष्यभर उपचार घ्यावे लागणार आहेत.

एचआयव्हीचा संबंध सामाजिक कलंक किंवा दूषणाशी जोडला जातो. त्यामुळे अनेकदा त्यांचे शेजारी त्यांच्या मुलांना अस्माबरोबर खेळण्यापासून रोखतात. त्यामुळे ती आजारी असण्याबरोबरच सगळ्यांपासून वेगळी, एकटीदेखील पडते आहे, असं तिचे कुटुंबीय सांगतात.

“माझ्यामध्ये काय दोष आहे?” असं ती तिच्या आईला विचारते.

भावाच्या कबरीजवळ उभी राहून, अस्मा म्हणते की तिला त्याची खूप आठवण येते. “तो आता ईश्वराबरोबर आहे,” असं ती म्हणते.

तिनं बीबीसी आयला सांगितलं की ती शाळेत खूप मेहनतीनं अभ्यास करते.

“मोठी झाल्यावर मला डॉक्टर व्हायचं आहे,” असं अस्मी म्हणाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC