Home LATEST NEWS ताजी बातमी अश्लील चॅटिंग करून ब्लॅकमेल, 350 रुपयांपासून सुरुवात करत तरुणाला 49 लाखांचा गंडा

अश्लील चॅटिंग करून ब्लॅकमेल, 350 रुपयांपासून सुरुवात करत तरुणाला 49 लाखांचा गंडा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

हनीट्रॅपमध्ये अडकून नागपुरातल्या तरुणाला 49 लाखांहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे.

नागपुरातील 23 वर्षीय तरुणाला हनीट्रॅपमध्ये फसवून, तब्बल 49 लाख 34 हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

पीडित तरुणाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यावरून परस्पर पैसे स्वतःच्या खात्यात वळवले आणि त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला पाठवले.

सुरुवातीला त्या तरुणीनं केवळ 350 रुपये मागितले. तरुण आपल्याला पैसे पाठवू शकतो, हे लक्षात आल्यानंतर तिनं त्याला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत अश्लील चॅटिंग सुरू केली. त्यानंतर ब्लॅकमेल करून तब्बल 49 लाख रुपये लुटले.

याप्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाईन हनीट्रॅप नेमका कसा होतो? नागपूरच्या या तरुणासोबत काय काय घडलं? आणि अशा घटनांपासून वाचायचं असेल तर नेमकं काय करायला हवं? जाणून घेऊया.

नागपुरातल्या तरुणासोबत काय घडलं?

नागपुरात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या तरुणाची इन्स्टाग्रामवरून एका तरुणीसोबत ओळख झाली.

पहिल्यांदा तिनं इन्स्टाग्रामवरुन ‘कुठली सर्व्हिस हवी आहे का?’ असा मेसेज केला.

त्यानंतर ते दोघेही व्हॉट्सअपवरून बोलू लागले. तरुणीनं ती उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील असून दिल्ली विद्यापीठात शिकत असल्याचं सांगितलं.

‘माझ्याकडे घरी जायलाही पैसे नाहीत’ असं म्हणत आपली गरीब परिस्थिती सांगितली. त्यामुळे या तरुणानं तिला 350 रुपये फोन पेद्वारे पाठवले.

त्यानंतर त्यांचं बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्यामध्ये अश्लील चॅटिंग सुरू झाली. तिने त्याला विवस्त्र अवस्थेतील फोटो पाठवायला सांगितला.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर तिनं त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पैसे दिले नाही, तर तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली.

इतकंच नाहीतर इतर मुलींना मोबाईल नंबर देऊन त्यांच्यासोबत पण बोलायला लावलं.

त्यामुळे या तरुणानं आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून 45 लाख रुपये काढले आणि स्वतःच्या खात्यातले काही पैसे काढून तिला दिले. तसेच, उरलेले पैसे इतर खात्यात ट्रान्सफर करायला लावले.

एकूण 49 लाख 34 हजार 286 रुपयांना तिने गंडा घातला, अशी माहिती सोनेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी दिली.

ऑनलाईन हनीट्रॅप नेमका कसा होतो?

सोशल मीडियावर अनेकदा अनोळखी लोकांची रिक्वेस्ट येते आणि आपण ती स्विकारतो.

नेमक्या याच संधीचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात. वेगवेगळ्या नावानं फेक आयडी तयार करून आपले सावज हेरतात.

ऑनलाईन हनीट्रॅपमध्ये तुम्हाला काही सेवा हवी आहे का? असा मेसेज येतो. या मेसेजला आपण उत्तर दिलं तर गुन्हेगार आपल्याला बोलण्यात गुंतवत जातात.

त्यानंतर व्हॉट्सअप नंबर मागतात आणि तिथंही चॅटिंग करून आपला विश्वास संपादन करतात.

आपली गरीब परिस्थिती किंवा तब्येतीचं कारण सांगून किंवा आणखी कुठल्या पद्धतीनं भावनिक करून काही पैसे मिळतात का याची चाचपणी करतात.

एकदा का आपण त्यांना थोडे पैसे द्यायला तयार झालो की मग ते आपल्याला जाळ्यात ओढायला सुरुवात करतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

आपला विश्वास संपादन करून अश्लील चॅटिंग सुरू करतात. त्यानंतर तुम्हाला काही वेळा विवस्त्र फोटो सुद्धा पाठवायला सांगू शकतात.

तुम्ही विश्वास आहे म्हणून असे फोटो पाठवले तर त्याचा गैरफायदा घेत तुम्हाला ते ब्लॅकमेल करतात.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तुमच्याकडून पैसे उकळतात.

तसेच आपल्या टोळीतल्या इतर लोकांना सुद्धा तुमच्यासोबत बोलायला लावून तुम्हाला आणखी ब्लॅकमेल केलं जातं आणि तुमच्याकडून जमतील तेवढे पैसे उकळले जातात.

काहीवेळा तुमच्याकडे कागदपत्रांची सुद्धा मागणी केली जाऊ शकते.

अशा घटना तुमच्यासोबत घडत असतील तर नक्की तुमची सायबर फसवणूक होत आहे हे लक्षात ठेवा. हा ऑनलाईन हनीट्रॅप असतो.

अशा घटनांपासून कसं सावध राहायचं?

ऑनलाईन हनी ट्रॅपच्या घटनांपासून आपण आपला बचाव कसा करायचा?

तर अनोळखी संपर्कांपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला नागपुरातील सायबर तज्ज्ञ आणि सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख लोहित मतानी देतात.

ते म्हणतात, की अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्स्वेस्ट स्विकारू नका. तसेच त्यांच्यासोबत कुठलंही चॅटींग करू नका.

विशेषतः जे लोक लवकर जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहा. अशा लोकांसोबत फोटो, व्हिडिओ अशी खासगी माहिती शेअर करू नका.

तसेच अशा लोकांचे व्हिडिओ कॉल येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा. कारण, तुमचे आक्षेपार्ह फुटेज रेकॉर्ड करून ते तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

जर कोणी तुमच्यासोबत वारंवार संपर्क साधत असेल किंवा जास्तच जवळीक दाखवत असेल तर त्याच्याबद्दल रिसर्च करा. त्याचा सोशल मीडिया तपासा, असंही ते सांगतात.

असे सायबर गुन्हेगार अनेकदा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. पण, त्यापासून सावध राहा.

कुठली काळजी घ्यायला हवी?

हे झालं अशा घटना आपल्यासोबत घडत असेल तर नेमकं काय करायला हवं.

पण, अशा घटना कधी घडूच नये, आपल्याला कोणी असे व्हिडिओ कॉल, अनोळखी नंबरवरून वारंवार संपर्क करणे असे प्रकार आपल्यासोबत घडू नये असं वाटत असेल तर नेमकं काय करायला हवं याबद्दल लोहित मतानी सविस्तर सांगतात.

आपलं सोशल मीडिया अकाऊट प्रायव्हेट ठेवायचं आणि कुठल्या पोस्ट कोणाला बघता येईल अशी सेटींग करून ठेवायची.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

तसेच कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये. कारण, या फिशिंग वेबसाईट असू शकतात.

तुम्हाला एखाद्याची वागणूक संशयास्पद वाटत असेल तर त्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याला रिपोर्ट करून ब्लॉक करा.

सायबर गुन्हेगार हे बनावट प्रोफाईल तयार करून व्हिडिओ कॉल करणे, भावनिक दबाव आणणे अशा गोष्टी करून तुम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करतात.

त्यामुळे त्यांच्या या युक्त्या ओळखून इतरांना सुद्धा याबद्दल माहिती द्या.

ऑनलाईन हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर काय करायचं?

पण, एखाद्या व्यक्तीनं काळजी घेतली नाही तर तो अशा ऑनलाईन हनीट्रॅपमध्ये अडकला आणि त्याला पैसे मागितले जात असतील, बदनामीची धमकी मिळत असेल तर नेमकं काय करायला हवं?

तर जी व्यक्ती अशा ऑनलाईन हनीट्रॅपमध्ये अडकली असेल तर त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे एकही रुपया सायबर गुन्हेगाराला देऊ नये. तसेच पैशांसाठी बोलणी सुद्धा करू नका.

कारण, एकदा पैसे दिल्यानंतर ब्लॅकमेलर तुमच्याकडे परत पैसे मागायला येतो. तेव्हा सायबर गुन्हेगारांच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट घ्या, ते चॅट सेव्ह करा. तसेच फोन नंबर सुद्धा सेव्ह करून ठेवा.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

या पुराव्यांच्या आधारे तुम्हाला स्थानिक सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यास मदत होईल.

तसेच तुम्ही नॅशनल सायबर क्राईम पोर्टलला सुद्धा तक्रार करू शकता, असंही लोहित मतानी सांगतात.

व्हॉट्सअपवर अशा गोष्टी घडत असतील तर तिथेच रिपोर्ट आणि ब्लॉक करा. घरात शांत बसून हे सगळं सहन करत बसू नका.

अशा घटना घडल्यास त्वरीत सायबर पोलिसांसोबत संपर्क साधा, असाही सल्ला मतानी देतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC