Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Dan Kitwood/Getty Images
6 तासांपूर्वी
वाचन वेळ: 3 मिनिटे
ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांचे धाकटे भाऊ अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
आज सकाळी इंग्लंडमधील नॉरफोक येथील सँडरिंगहॅम इस्टेटमध्ये अनेक गाड्या आल्याचे फोटो समोर आले.
थेम्स व्हॅली पोलिसांनी म्हटलं की, अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांनी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन सोबत गोपनीय माहिती शेअर केल्याच्या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ही घटना घडली आहे.
अँड्र्यू यांनी सातत्याने आणि निश्चयपूर्वक सांगितले आहे की त्यांनी कोणतीही चूक केली नाहीये.
गेल्या वर्षी, त्यांनी ‘प्रिन्स’ ही पदवी गमावली. त्यानंतर त्यांना विंडसर कॅसलमधील रॉयल लॉज सोडण्यास भाग पाडण्यात आलं.
विंडसर कॅसल सोडल्यानंतर ते नॉरफोकमध्ये त्यांच्या घरी राहत होते. आज (19 फेब्रुवारी) सकाळी सँडरिंगहॅम येथे त्यांच्या घराच्या परिसरात अनेक गाड्या आलेल्या दिसल्या.
त्या गाड्या पोलिसांच्या असल्याचं मानलं जातंय.
ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या माजी प्रिन्सला अटक करण्यात आली आहे.
दोषी ठरवण्यात आलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन सोबत असलेल्या संबंधांबद्दल त्यांच्यावर अनेक आरोप आहेत.
मात्र, अँड्र्यू यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
सार्वजनिक पदावर गैरवर्तन केल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आल्याचं बीबीसी न्यूजचं मत आहे.
ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय काय म्हणाले?
अँड्र्यू यांच्या अटकेनंतर बीबीसीला ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्याकडून एक निवेदन प्राप्त झालं. त्यात लिहिलं आहे की, “अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्यासंबंधी हे वृत्त चिंताजनक आहे.
“आता यापुढची प्रक्रिया म्हणजे या प्रकरणाची योग्य पद्धतीने आणि योग्य अधिकाऱ्यांकडून पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी होईल.
“या चौकशीमध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे, आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य राहील.
“मी स्पष्टपणे सांगतो: कायद्याने त्याचं काम केलं पाहिजे. ही प्रक्रिया सुरू असताना, या विषयावर अधिक भाष्य करणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही.
“दरम्यान, मी आणि माझे कुटुंब तुम्हा सर्वांप्रति असलेले आमचे कर्तव्य आणि सेवा पूर्ण करत राहू.”
पोलिसांनी काय म्हटलं?
अँड्र्यू यांच्या अटकेनंतर थेम्स व्हॅली पोलिसांनी एक निवेदन जारी केलं आहे.
त्यात म्हटलं आहे की, “तपासाचा भाग म्हणून, आम्ही आज सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून (19/2) नॉरफोकमधून साठीतील एका व्यक्तीला अटक केली आहे. तसेच बर्कशायर आणि नॉरफोकमधील पत्त्यांवर देखील शोध घेण्यात येत आहे. ती व्यक्ती सध्या पोलीस कोठडीत आहे.”
त्यात असंही म्हटलं आहे की, “राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आम्ही अटक केलेल्या व्यक्तीचे नाव जाहीर करणार नाही. कृपया हे देखील लक्षात ठेवा की हा खटला अजूनही सक्रिय आहे, म्हणून न्यायालयाचा अवमान टाळण्यासाठी कोणतेही प्रकाशन सावधगिरीने केले पाहिजे.”
फोटो स्रोत, Bav Media
असिस्टंट चीफ कॉन्स्टेबल ऑलिव्हर राईट म्हणाले, “सविस्तर मूल्यांकनानंतर, आम्ही सार्वजनिक पदावरील व्यक्तीने गैरवर्तन केल्याच्या या आरोपाची चौकशी सुरू केली आहे.”
“या कथित गुन्ह्याचा तपास करताना, आमच्या भागीदारांच्या सहकार्याने, तपासाची निष्पक्षता आणि वस्तुनिष्ठता जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
“आम्हाला समजते की या प्रकरणातील घडामोडी लोकांना जाणून घ्यायच्या आहेत आणि आम्ही योग्य वेळी माहिती शेअर करू.”
अँड्र्यू माउंटबॅटन कोण आहेत?
फोटो स्रोत, Max Mumby/Indigo/Getty Images
अँड्र्यू माउंटबॅटन हे ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे भाऊ आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ‘प्रिन्स’ ही पदवी गमावली होती. त्यांना विंडसर पॅलेसमधील रॉयल लॉज सोडण्यास भाग पाडण्यात आलं.
मागच्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या एका चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. दोषी ठरवण्यात आलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबत अँड्र्यू माउंटबॅटन यांचे संबंध असल्याबाबत ही चर्चा होत होती.
बकिंगहॅम पॅलेसने म्हटले आहे की आता इंग्लंडच्या राजांचे भाऊ अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर म्हणून ओळखले जातील.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या प्रश्नांमुळे अँड्र्यू यांनी ड्यूक ऑफ यॉर्कसह त्यांच्या इतर शाही पदव्या देखील सोडल्या होत्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC



